maharashtra political crisis confused shiv sainik or leadership nrvb

एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीच्या पाठबळावर राज्यातील सत्ता उलथवून टाकली. नवा डाव मांडला आणि कधी नव्हे ते ठाकरे परिवाराला आव्हान दिलं. आजपर्यंत अशी आव्हानाची भाषा ऐकण्याची सवय नसलेल्या ठाकरेंचा यामुळे गोंधळ उडालेला दिसतो. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे खरंतर शिवसैनिक संभ्रमात आहे. एकीकडे नेतृत्व संभ्रमित आहे की कार्यकर्ते, असा प्रश्न पडत असतानाच रस्त्यावर राडा घातला जात आहे.

  सत्तांतरानंतर राज्यातील राजकारणाला खर्याअ अर्थाने सुरुवात झाली. भाजपने लिहिलेल्या संहितेनुसार सत्तांतराचे नाट्य पार पडले. आता पुढचे नाट्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदारांना पूर्ण करायचे आहे. ठाकरेंच्या हातून सत्ता काढून घेतानाच त्यांच्या हातातून शिवसेनासुद्धा काढून घेण्याचे ‘महासत्ते’ने ठरवले आहे. त्यादृष्टीने पावले पडू लागली आहेत.

  ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि राज्यातील इतर मोठ्या महापालिकांची निवडणूक जाहीर होईल, निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेचे चिन्ह बदलेल. धनुष्यबाण ठाकरेंकडे असणार नाही, हे ज्यांना राजकारणाचा सध्याचा प्रवाह कळतो, त्यांना माहिती आहे. ठाकरेंकडून शस्त्र काढून घेत त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आव्हान दिले जाणार आहे.

  शक्य तितक्या सगळ्या आघाड्यांवर कोंडी करण्यात येईल. त्यातच संजय राऊत, अनिल परब किंवा नार्वेकर यांसारख्या निकटवर्तीयांनी स्वार्थापोटी करुन ठेवलेल्या चुकाही ठाकरेंना घेरतील. ही रणनीती ठरली आहे, त्यादिशेने सगळे भिडले आहेत. कोणीच कोणाबाबत सहानुभूती बाळगण्याचे तसे कारण नाही, हे राजकारण आहे.

  ज्याच्या हाती ससा तो पारधी, हा न्याय इथे लागणार असल्यामुळे ज्याच्या हाती धनुष्यबाण तो ‘शिवसेना’ हे स्पष्ट आहे. तो कोणत्या मार्गाने मिळवला, याला फारसे महत्व नसेल. तसेही राजकारणात साध्य बघितले जाते, साधनांवर खूप काही चर्चा होत नसते. त्यामुळे साधनशुचितेच्या गप्पा बौद्धिकांमध्येच बर्याह वाटतात. राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, तशी ती ठाकरेंसमोरही आहे.

  आजपर्यंत ठाकरेंना असे थेट आव्हान आपल्याच पक्षातूनही कधी कोणी दिले नाही. असे आव्हान निर्माण होण्यापूर्वीच शिवसैनिकांना भावनिक साद घालून आपल्या बाजुची तटबंदी भक्कम करण्यात येत असे. भुजबळ, राणे यांच्या बंडानंतर हेच केले गेले. यावेळी अशा भावनिक प्रयोगाचा प्रयत्न झाला पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळ्याच लोकप्रतिनिधींनी बंडाचा झेंडा फडकवला.

  ठाकरेंच्या आधीच शिंदेंनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. ठाकरे हेच आपले नेते, आणि आपला गट म्हणजेच शिवसेना, ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याच संभ्रमात ठाकरेही गुंतले. जाहीर आव्हानांचा थेट सामना करण्याची वेळ प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर आली होती. तोपर्यंत प्रतिक्रियात्मक राजकारणच ते करत होते. त्यामुळे या संभ्रमाच्या अवस्थेत काय करावे, यावरच शिवसेनेत सुरुवातीचे कितीतरी दिवस खल झाला.

  ज्यांनी बाळासाहेबांसोबत थेट आव्हानांचा सामना केले, असे नेते तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या परिघातून बाहेर काढले होते. त्यातच आता आदित्य आणि तेजस यांचे राजकीय करिअर सेट करण्याच्या वेळीच या बंडाळीने पक्षच गिळण्यास सुरुवात केल्याने ठाकरेंची अस्वस्थता अधिक आहे.

  या अस्थतेतूनच उद्धव ठाकरे यांनी आधी नव्या चिन्हासाठी मानसिक तयारी ठेवा, असे आवाहन शिवसैनिकांना केले. त्यानंतर त्यांनी धनुष्यबाण कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, हा विश्वायस देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बंडखोरी करणारे सगळेच आपले वाटणारे अचानक उद्धव ठाकरे यांच्या आणि आदित्य यांच्या नजरेत गद्दार ठरले.

  गद्दार म्हणण्याला आक्षेप घेणार्याअ बंडखोरांना उद्धव ठाकरे नंतर विश्वानसघातकी म्हणू लागले, तर आदित्य यांनी गद्दार हा आरोप कायम ठेवला. न्यायव्यवस्थेवर विश्वावस आहे, धनुष्यबाण कोणी घेऊ शकत नाही, हे एकीकडे सांगतानाच दुसरीकडे रस्त्यावरच्या लढाईत शिवसेना मागे नाही, हा इशारा उद्धव ठाकरे देऊ लागले आहेत. आदित्य ठाकरे हे जिल्ह्याजिल्ह्यात शिवसैनिकांना आवाहन करू लागले आहेत. गाड्या फोडण्याची, संपवून टाकण्याची भाषा केली जात आहे. यातूऩ नेमके काय करावे, हा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

  शिवसेनेचा स्वभाव संघर्षाचा आहे. शिवसैनिकांना कायम एखादा आंदोलनात्मक कार्यक्रम द्यावा लागतो. ते सत्तेत रमत नाहीत, नेते रमतात. या शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी भाजपविरुद्धच्या आंदोलनात गुंतवून ठेवले होते. पण भाजपविरुद्ध आंदोलन शिवसैनिकांना पटणारे नव्हते. त्यांना विरोध करण्यासाठी, आंदोलनासाठी पारंपरिक विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर दिसत नव्हते. शिंदे गटाने हेच ओळखून पुन्हा भाजपशी नाळ जुळवली. शिवसैनिक सुखावला, त्यामुळे या तोडफोडीच्या आवाहनांना खूप प्रतिसाद राज्यात मिळणार नाही. अगदीच तुरळक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना होऊ शकतात.

  उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेला हल्ला, औरंगाबाद येथील आपसातील हाणामारी, डोंबिवली येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन झालेला संघर्ष तसा फार मोठा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही. ठाकरेंकडून काहीतरी मिळावे किंवा शिंदे गटात दखल घेतली जावी, यासाठी दोन्ही बाजुने रस्त्यावर उतरून राडा करण्यासाठी बरेचजण तयार असतील.

  आपणच कसे प्रामाणिक आणि नेत्यांचा शब्द झेलण्यास तत्पर आहोत, हे दाखवण्याची स्पर्धा दोन्ही गटांमध्ये आहे. यातून मग कायदा हातात घेण्याचे आवाहन करणार्याा, धडा शिकवण्याची भाषा करणार्यान नेत्याचे कथित अनुयायी कायदा व सुव्यस्थेला नख लावतील, हा धोका आहे.

  ठाकरे आणि शिंदे यांच्याबाबत ठोस काय भूमिका घ्यावी, हे शिवसैनिकाला अद्याप कळलेले नाही. त्यांच्यात संभ्रम कायम असतानाच कोणत्याही बाजूने चिथावणीची भाषा झाल्यास त्याला अल्प असला तरीही प्रतिसाद मिळेल, आणि रस्त्यावर वर्चस्वासाठी हाणामारी सुरू होईल.

  ‘मला राज्यात शांतता हवी’ हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे वक्तव्य त्यासाठी महत्वाचे वाटते. पोलिसी बळाने विरोध चिरडून टाकण्याचा प्रयत्नही सरकारी पातळीवरुन होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागणार नाही. अन्यथा, संभ्रमित नेतृत्वाने संभ्रमात टाकलेल्या कार्यकर्त्यांकडून अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

  विशाल राजे

  vishalvkings@gmail.com