बित्तंबातमी : सेना अ‘नाथ’ का झाली?

मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष हजर राहून जनतेते मिसळणे आवश्यक असते. पण ते होत नव्हते. कदाचित, आम्ही काय ठाकरे, आमचा बाळासाहेबांचा वारसा.. या शब्द प्रयोगांच्या मोहात गुरफटलेले पक्षप्रमुख ठाकरे हे लोकशाहीच्या वातावरणात फारसे रमत नसावेत. त्यांचा तो “ठाकरी बाणा” आता त्यांच्याच लोकांना असह्य होतोय, याचेही भान त्यांना उरले नव्हते.

    एखादी पाण्याची धार सतत पडत राहिली तर ती प्रत्येक थेंबाने खालच्या कठीण खडकावरही आघात करत राहते आणि एका विशिष्ट क्षणी तो खडकही दुभंगू शकतो. पडणारा प्रत्येक थेंब क्रांती घडवत नसतो, पण जेव्हा खडक दुभंगतो तेव्हा आपल्याला आधी पडलेल्या प्रत्येक थेंबाची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. तसेच काहीसे शिवसेनेच्या बाबतीत घडते आहे.

    एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी होतील याची खात्री केली व नंतर ते निघून गेले हीही बाब लक्षणीय आहे. जाताना त्यांच्या सोबत डझनभर आमदार होते. मुंबईतून निघून हे सारे ठाण्यात महापौर बंगल्यावर जमले तिथे बैठक झाली, जेवण झाले. नंतर मंडळी पुढच्या प्रवासाला उत्तर दिशेकडे कूच करती झाली. ही दिशा आता ईशान्य भारताच्या टोकापर्यंत लांबली आहे.

    सूरतमध्ये शिंदेंच्या सोबत नेमके किती आमदार आहेत याचा अंदाज घेण्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुखांचे विश्वासू सहाय्यक व पक्षाचे चिटणीस मिलिंद नार्वेकर हे मंगळवारी दुपारी पंचतारांकित ला मेरेडियनवर गेले. त्यांना काही काळ ताटकळत ठेवून शिंदे भेटले. नार्वेकरांच्या फोनवरून शिंदेंनी उद्धव ठाकरें बरोबर बातचीतही केली. त्यांनी एकच प्रश्न ठाकरेंना विचारला की, “मी असा काय गुन्हा केला होता की तुम्ही ठाण्यात शिवसेना वर्तुळात मला अपमानित करायला निघालात?”

    ठाणे शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून गेल्या सहा महिन्यात झालेल्या वरूण सरदेसाई यांची नियुक्तीकडे शिंदेंचा रोख असावा. वरूण हे ठाकरे परिवारातीलच आहेत. सध्या ठाकरेंच्या कारभारात वरूण यांचा वाटा मोठा आहे. अशा कालच्या पोरा-टोरांकडून संघटनेबाबत मार्गदर्शन घेण्याची वेळ येणे हा शिंदेंसारख्या जुन्या सैनिकाचा मोठा अवमानच होता. याशिवाय विधान परिषद निवडणुकीत शिवेसनेकडील जादा मते काँग्रेस उमेदवारांना देण्याच्या मुद्दयावरून शिंदे आणि ठाकरे युवराज आदित्य यांची खडाजंगी झाली होती. त्यात संजय राऊत हेही सहभागी होते. शिवसेनेच्या आमदारांची मते काँग्रेस उमेदवाराला देण्यासाठी शिंदे तयार नव्हते.

    पवईच्या वेस्टीन रेनिसान्स हॉटेलमध्ये काही आमदारांच्या साक्षीने ही खडाजंगी झाली. त्या गोष्टीला दोन दिवस उलटत असतानाच शिंदे नॉट रिचेबल झाले. तो वाद उंटावरची शेवटची काडी ठरला जणू. आदित्य ठाकरे हे सरकारमध्ये अधिकाधिक खात्यांत लक्ष घालतात, अशी मंत्र्यांची तक्रारही होती. ही नाराजी पडणाऱ्या पाण्याच्या धारेसारखी हळु हळु जमा होत होती. वेस्टीनमधील त्या वादानंतर गेल्या वर्षभरातील साचलेल्या अपमानाचे असह्य ओझे एकनाथांनी फेकून दिले.

    एकनाथ शिंदे हे किती मोठे नेते आहेत याचे प्रत्यंतरही या घटनाक्रमातून आले आहे. त्यांच्या मागे शिवसेना पक्षातील निवडून आलेले ८० टक्के लोकप्रतिनिधी आहेत हे दिसून येते आहे. गोहातीच्या हॉटेलमधून जे फोटो आणि व्हिडिओ शिंदेंच्या लोकांकडून दाखवले जात आहेत त्यातून ही संख्या स्पष्ट होतेय. एकनाथ शिंदेनी सरत्या सप्ताहाच्या सुरवातीला ज्या प्रवासाची सुरवात केली त्यात सप्ताहा अखेरीकडे त्यांच्या गोटात शिवेसनेचे विधानसभेत निवडून आलेले किमान ४३ आमदार दाखल झालेले आहेत.

    शिंदेनी रातोरात आपला तळ गोहातीकडे हलवला याचेही कारण उघड आहे. मुंबई व महाराष्ट्रातून सूरेतवर स्वारी कऱणाऱ्या शिवसैनिकांच्या बेभान जथ्यांना आसामचा मार्ग सापडणे शक्य होणार नाही, असाच विचार त्या स्थानबदला मागे असणार.
    गेले दोन-तीन दिवस भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात मंथन सुरु आहे. विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे सरकार स्थापन करण्याच्या शक्यता आजमावत आहेत आणि त्यांनी गेल्या चार दिवसात दोनदा दिल्ली वारी केलेली आहे.

    एकनाथ शिंदेकडे शिवसेना विधिमंडळ पक्षातील विधानसभेचे दोन तृतियांशांपेक्षा अधिक सदस्य जमल्यामुळे त्या कुणाचीच आमदारकी जाणार नाही, असा कायदेशीर सल्ला त्यांना मिळालेला दिसतो आहे. कारण त्यांनी शिवसेनेच्या त्या बाबतच्या दबावांना तितक्याच कडकपणाने उत्तर दिले आहे.

    शिंदे यांच्या मागे भाजपाची ताकद उभी आहे हे तर दिसतंच. त्यांच्या मागे भाजपाची सारी शक्ती, सारी व्युहरचना उभी आहे असाच काढावा लागतो. सोमवार व मंगळवारच्या घटनाक्रमात कुठेही भाजपाच्या कोणाही नेत्याने कोणतीही टिप्पणी केलेली नाही. फक्त सातारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे म्हणाले की येणारी आषाढीची पूजा काही उद्धव ठाकरे करणार नाहीत, ती देवेन्द्र फडणवीसच करतील.

    आषाढी एकादशीला भल्या पहाटे पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा होते व तो मान राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक घेत असतात, याकडेच गोरेंचा रोख होता. ही एक टिप्पणी सोडल्यास भाजपा नेत्यांनी शिवसेना पक्ष फुटीवर, “नो कॉमेंटस्”, हेच धोरण घेतले आहे.

    अर्थात शिंदेवर जे काही बोलायचे व कारायचे ते अमित शहा, नड्डा यांनी केलेच असणार. पण या साऱ्या प्रकरणातून उद्धव ठाकरेंच्या कार्य पद्धती बद्दलची सर्व पक्षीय आमदारांची नाराजी प्रकट झाली आहे. राजकीय वर्तुळात असे सांगतिले जाते आहे की, शरद पवारांनी चार सहा महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की तुम्ही तुमच्या नेत्यांशी, आमदारांशी संवाद वाढवा, त्यांच्याशी बोलले-बसले पाहिजे. अन्यथा तुम्हाला एखाद्या बंडाचा सामना करावा लागू शकेल. हितेंद्र ठाकूर यांच्या सारखे सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे पक्ष आणि बच्चु कडुंसारखे सरकारमध्ये सहभागी झालेले व मंत्री असणारे, दोन आमदरांच्या पक्षाचे नेते हे दोघेही सारखेच नाराज असण्याचे कारण काय?

    राज्यसभा निवडणुकी आधी बच्चू कडू यांची नाराजी उघड झाली होती. सरकारमध्ये कामे होत नाहीत, काही मंत्री जाणीवपूर्वक आमदारांना डावलतात, शिवसेनचे मंत्री काँग्रेसवाल्यांना विचारत नाहीत आणि राष्ट्रवादीवाले शिवसेनेच्या आमदारांची कामे रखडवतात, अशा तक्रारी वारंवार कानी येत होत्या. त्या नाराजीच्या बातम्याही प्रसिद्ध होत होत्या. पण शिवेसनेने आपली वागण्या बोलण्याची पद्धती बदलली नाही.

    मुख्यमंत्री भेटत नाहीत ही सर्वात मोठी तक्रार होती. ती निवारण कऱण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणताही पुढाकारा घेतला नाही. अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे हे मागच्या सहा महिन्यात मंत्रालयात व विधानभवनात थोडे थोडे दिसू लागले होते अन्यथा कोरोना वाढतोय या करणासाठी ते कुणालाच भेटत नव्हते. त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी होत्या, हे जरी मान्य केले, तरी त्यातून बरे झाल्यानंतर, ऑपरेशनने पाठीच्या मणक्याचे दुखणे बरे झाल्या नंतर तरी त्यांच्या गाठीभेटी वाढल्या का ? नाहीच ! ते घराबाहेर पडत नाहीत ही तक्रार जुनी झाली. त्यावर त्यांचे उत्तर असे होते की, “तुम्ही (म्हणजे अजित पवार वा देवेन्द्र फडणवीस) तालुक्या तालुक्यात फिरून जितके काम करता त्या पेक्षा अधिक काम मी ऑनलाईन पद्धतीने बैठका घेऊन करत असतो!”

    पण शरद पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्याच्या पायाची भिंगरी, कॅन्सर सारख्या दुर्धर रोगातही थांबत नाही. त्यापेक्षा अधिक त्रास उद्धव यांना नक्कीच नाही. म्हणूनच काही ठराविक ठिकाणी तरी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष हजर राहून जनतेते मिसळणे आवश्यक असते. पण ते होत नव्हते. कदाचित, आम्ही काय ठाकरे, आमचा बाळासाहेबांचा वारसा.. या शब्द प्रयोगांच्या मोहात गुरफटलेले पक्षप्रमुख ठाकरे हे लोकशाहीच्या वातावरणात फारसे रमत नसावेत. त्यांचा तो “ठाकरी बाणा” आता त्यांच्याच लोकांना असह्य होतोय, याचेही भान त्यांना उरले नव्हते.

    त्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपद घेतले तेव्हापासून साधे आमदार असणारे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकींना हजर राहात होते, आयएएस अधिकारी सनदी पोलीस अधिकारी आदित्य साहेब काय म्हणतात, याचा कानोसा घेऊ लागले होते व मग त्यापुढे खात्याच्या मंत्र्यांनाही न जुमानण्याचे काम मंत्रालयात सुरु होते व त्याचा प्रचंड मानसिक त्रास व राजकीय ताप सर्वांनाच होत होता. आता एकेक ज्या हकीकती ऐकू येत आहेत. त्या खरेतर मुख्यमंत्र्यांच्या कानावर आधीच पडायला हव्या होत्या. त्या पडल्या नाहीत किंवा शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजितदाद पवार अशा सहकाऱ्यांनी जरी त्या बाबींकडे लक्ष वेधले असले तरी, “आम्ही ठाकरे”, या बाण्याने व बहाण्यात सारे काही कानामागे टाकले गेले, असे दिसते.

    उद्धव ठाकरे हे तीन-चार अधिकाऱ्यांवर प्रचंड विसंबून होते. मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच काम करायचे असते. पण काही निर्णय हे राजकीय दृष्टीने पक्षाचे धोरण म्हणून नियमात बसवून घ्यायचे असतात आणि असे निर्णय घेण्यास अधिकाऱ्यांना बाध्यही करायचे असते. नेमके तेच ठाकरे करत नाहीत. उद्धव ठाकरे हे फक्त अधिकारी सांगतात तसेच वागतात, अशी आमदारांची मंत्र्यांची तक्रार होती. आणि याच साऱ्या बाबींमुळे शिवसेना आता, “एकनाथा विना, अनाथ” झाली आहे.

    अनिकेत जोशी

    aniketsjoshi@hotmail.com