fadanvis ajit pawar and shinde

गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत. चांगले आहे, सरकारला, यंत्रणेची जबाबदारी असलेल्यांना विकासाचा दृष्टीकोन आहे, याचे समाधान आहे. काही घोषणा अवास्तव वाटत असल्या तरीही त्यांची भविष्यातील गरज लक्षात घेतली पाहिजे. पण नुसताच घोषणांचा पाऊस पाडून विकासाचं पीक येणार नाही. घोषणांच्या पावसात चिंब भिजलेल्यांना कधीतरी वास्तवाची जाणीव होते. त्यावेळी ते जाब विचारतात. त्यामुळेच घोषणांनुसार, आश्‍वासनांनुसार प्रत्यक्ष काम केव्हा होणार याची नक्की तारीख घोषणा करणार्‍यांनी द्यायला हवी.

  राज्याच्या तुलनेत मुंबईत सगळंच काही मोठं, प्रचंड आहे. या शहराचा वेग, इथली अर्थव्यवस्था, लोकसंख्या, पायाभूत सुविधा सगळंच भव्य आहे. त्यामुळेच या शहराच्या भविष्यातील गरजासुद्धा खूप मोठ्या आहेत. एकीकडे गर्दी, गोंधळ, धूळ, प्रदूषण, बकालपणा वाढत आहे. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांची कामे, नवनव्या प्रकल्पांच्या घोषणा, नियोजन आणि आराखडे सुरु आहेत. मेट्रोच्या कामासाठी सुरु असलेल्या खोदकामामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे, तर दुसर्‍या टोकाला उरण किंवा नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे काही मिनिटांवर आली आहे. टोलेजंग इमारतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच वाढत्या प्रदूषणाने आकाश दिसणे दुरापास्त झाले आहे. मेट्रोने प्रवासाची गती वाढवली असतानाच रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अख्खा दिवस काढावा लागतोय. एकीकडे सुविधा वाढत आहेत, पण त्याचवेळी गरजा वाढत आहेत. सुविधा आणि गरजांच्या वाढीचा वेग व्यस्त आहे. त्यामुळे शहरातील बकालपण वाढीस लागले आहे. झोपडपट्ट्यांचा, त्यातील गोदामांचा, अवैध धंद्यांचा मोठा प्रश्‍न आहे, पण त्यावर कोणी बोलत नाही. तिथे मतदार राहतात. धारावी पुनर्विकास प्रकल्प वेग घेताना दिसतो आहे. अदानींनी हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर काहीतरी घडते आहे. पण त्यापूर्वीच सवयीप्रमाणे तिथे राजकारण होताना दिसू लागले. काहीही झाले तरीही हा प्रकल्प रेटून न्यायला हवा. धारावीतील नागरिकांना चांगली घरे मिळायलाच हवी, त्याचवेळी मुंबईतील ही झोपडपट्टी हटायला हवी.

  गेल्या काही दिवसात विकास कामांच्या घोषणांचा सुकाळ आहे. मुख्यमंत्री आणि दोन – दोन उपमुख्यमंत्री घोषणा करतात. इतर मंत्रीही घोषणांबाबत मागे नाहीत. त्यामुळे घोषणांच्या पावसात चिंब भिजायला होते. विकासाची गरज, भविष्यातील प्रकल्प याबाबत या सरकारला दूरदृष्टी आहे, हे अशा घोषणांच्या पावसात जाणवते. अगदीच कोकणाचा कॅलिफोर्निया आणि मुंबईचे शांघाय वगैरे करु, असं सांगण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. काही घोषणा अवास्तव वाटत असल्या तरीही समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बन लिंक रोड किंवा मेट्रो ही कामे उदाहरणादाखल समोर आहेत. त्यामुळे हे सरकार करू शकेल, असे वाटते. तरीही घोषणांचा धबधबाच गेल्या काही दिवसात सुरु आहे. प्रत्येक कार्यक्रमात, बैठकांमध्ये हा धबधबा कोसळत राहतो. या सगळ्या घोषणा खरोखर पूर्णत्वास गेल्या तर राज्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. कदाचित आपल्याला सिनेमातील स्मृतीभ्रंश झालेल्या नायिकेसारखे ’मै कहां हूं?’ असे विचारावे लागेल.

  आधी म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या गरजा खूप मोठ्या आहेत. त्यामुळे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी करायच्या घोषणाही खूप मोठ्या असतात. त्यातही केवळ बोलण्याचाच किंवा घोषणा करण्याचा विषय असेल आणि दीपक केसरकर यांच्यासमोर पत्रकार असतील, तर मग बघायलाच नको. घोषणांचे आकारमान मुंबईच्या लोकसंख्येसारखे वाढते. त्याचा अनुभव नुकताच मुंबई महापालिकेत आला. महापालिकेची निवडणूक होत नाहीये, यावर कोणी काही बोलत नाही. पण या महापालिकेचा कारभार दोन – दोन पालकमंत्री पाहताहेत. मुंबईचे पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर परवा महापालिकेत आले. मुंबईसाठी आवश्यक, महत्वाच्या, गरजेच्या काही गोष्टी करण्याच्या घोषणा त्यांनी केल्या. ‘लंडन आय’ च्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्सलगत ‘मुंबई आय’ प्रकल्प साकारण्यात येईल. लंडन आयसारखे मोठे चक्र तिथे बसवण्यात येईल, ज्यावरुन संपूर्ण मुंबईचा नजरा बघता येईल. रेसकोर्सपासूनच भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडला जाता येईल. रेसकोर्सनजिक थीम पार्क उभारण्याची योजना २००८ मध्ये मुंबई महापालिकेने जाहीर केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये राज्य सरकारनेही या योजनेची घोषणा केली मात्र, विरोधामुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला, हेसुद्धा केसरकर यांनी सांगीतले.

  स्कायवॉकना सरकते जिने, लिफ्ट, बेघरांसाठी रात्रीचा निवारा, भाजी, मासळी बाजारातील स्वच्छतेवर भर, हेरिटेज इमारतींचे संवर्धन याबाबतही त्यांनी माहिती दिली. राणी बागेत लहानग्यांसाठी डबल डेकर, महिलांसाठी कॉमन सेंटर, फेरीवाल्यांसाठी नव्या ठिकाणी भूमिगत जागा, हाजीअली परिसराचे सुशोभिकरण, तिथे जाण्यासाठी नवा रस्ता या घोषणाही त्यांनी केल्या. महालक्ष्मी मंदिरासाठी वाहनांसाठी मोठी पार्कींग सुविधा उपलब्ध करतानाच मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवार चालणार्‍या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक आठवड्यात इथे पार्कींंग आणि नवीन रस्ता तयार केला जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. बाणगंगा तलावाचाही विकास करताना पार्किंग सुविधा, येणार्‍यांसाठी आसन व्यवस्था, शास्त्रीय संगीत, चहा व खाण्यापिण्याची सुविधा देण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईत खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटचा विकास करताना तिथे अनेक सुविधांची भर पडणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांचा विकास पर्यटन स्थळे म्हणून करण्याचीही योजना त्यांनी जाहीर केली. कोळीवाड्यात येणार्‍या देशी – परदेशी पर्यटकांना कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार असून संस्कृती आणि परंपरेची झलक पहायला मिळणार आहे. पर्यटकांच्या निवासाचीही व्यवस्था कोळीवाड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी कफ परेड, वरळी आणि माहिम कोळीवाड्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांना भाडेतत्वावर याठिकाणी घरे देण्यासाठी आणि कोळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोळीवाड्यात फूड कोर्ट उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर करुन टाकले. इतकेच़ नाही तर न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर उभारले जाणार आहेत. या सेंटरमध्ये विविध सुविधा उपलब्ध असतील. या सेंटरपासून विरंगुळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी सिटी बसचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात असे डे केअर सेंटर सुरु करण्यात येतील, अशीही घोषणा केसरकर यांनी केली. या घोषणा एका दमात नुसत्या वाचायच्या म्हटल्या तरीही तोंडाला फेस येईल.

  पालकमंत्री म्हणून मुंबईचा कसा चेहरा मोहरा बदलायला केसरकर निघालेत हे त्यांनी या घोषणांच्या माध्यमातून सांगीतले. आता या घोषणांमधील किती घोषणा प्रत्यक्षात उतरतील, हे काळच सांगेल. घोषणा नक्कीच चांगल्या आहेत, मुंबईच्या विकासाच्या आहेत, नागरिकांच्या सुविधा वाढविणार्‍या आहेत. पण सांगून टाका, पुढचं पुढे पाहू, असे या घोषणांबाबत होऊ नये. मुंबईकरांना केसरकरांनी अनेक स्वप्न दाखवली आहेत. मुंबई महापालिकेच्या इमारतीला अशा घोषणांची आणि सर्वसामान्यांना स्वप्न दाखवण्याची सवय झाली आहे. या स्वप्नांची पूर्तता कधी होणार, याची तारीखही त्यांनी जाहीर करायला हवी, तरच केसरकरांचे आणि या सरकारचे वेगळेपण लक्षात येईल.

  – विशाल राजे