Nana Patole's counterattack on Sharad Pawar's issue

विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. खूप सूक्ष्म नियोजन, खूप डावपेच खेळूनही भाजपला तसे पाहिले तर या निवडणुकीत अपयशच आले. उलट एकसंध राहिलेल्या आणि वंचितला सोबत घेतलेल्या महाविकास आघाडीसाठी हा निकाल उत्साहवर्धक आहे. परिषदेची ही निवडणूक म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट कदाचित नसेलही पण या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर या एका सुशिक्षित, मध्यमवर्गीय घटकाने मतदान केले आहे. या घटकाचा कल म्हणून याकडे बघायला हवे.

  विधान परिषदेच्या कोकण, औरंगाबाद आणि नागपूर या तीन शिक्षक, तर नाशिक व अमरावती या पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. पाचही मतदारसंघांमध्ये सर्वाधिक गाजली ती नाशिकची निवडणूक. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करणे, त्यानंतर त्यांचा मुलगा सत्यजीत यांनी अपक्ष अर्ज दाखल करणे. पक्षाला आपल्यासोबत फरफटत यावे लागेल, अशी व्यवस्था उभी करणे. अधिकृत उमेदवारच निघून गेल्यामुळे चाचपडणाऱ्या काँग्रेसला अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागणे, हा सगळा घटनाक्रम ताजा आहे. काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीतील इतरही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. पण सुरुवातीपासून सत्यजीत तांबे यांच्या विजयाची मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपला या मतदारसंघात यश मिळाले. आधीच खिळखिळी झालेल्या काँग्रेसला हा अजून एक धक्का भाजपने दिला. विशेष म्हणजे एकीकडे ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रातून जाण्याचे कौतुक सुरु असताना तांबे कुटुंब ‘भाजप से जोडो’ या अभियानात सहभागी झाले. त्यांच्यासाठी भाजपने केलेली खेळी, तांबेंचा वैयक्तिक संपर्क, बांधणी यातून त्यांना पदवीधरमध्ये यश मिळाले. महाविकास एकत्र असताना त्यांच्या उमेदवारापेक्षा सत्यजीत यांनी दुप्पट मते घेतली.

  कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे असले तरीही अपक्ष म्हणून उतरलेले उमेदवार बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. पाटील यांच्यामागे महाविकास आघाडी आहे की नाही, हे पुरेसे स्पष्ट होऊ न देता शेकापने आपला हा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविला. बाळाराम पाटील यांचा काहीही प्रचार झाला नाही. त्यांची गेल्या सहा वर्षातील निष्क्रीय कारकिर्द आणि पक्षाकडून झालेले दुर्लक्ष यामुळे त्यांच्यापेक्षा दुप्पट मते घेत भाजपचे ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला. खरंतर कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ म्हणायला हवा. गेल्यावेळी बाळाराम पाटील यांनी मुसंडी मारली. पनवेल परिसरातून काही ‘अदृष्य हात’ त्यांच्या मदतीला आले, आणि पाटील आमदार झाले. शिक्षकांच्या प्रश्नावरही ते कधी फार गंभीर होते, असे जाणवले नाही. त्यामुळे मतदार पु्न्हा भाजपकडे वळला.

  नागपूरातील भाजपचा पराभव हा धक्कादायक म्हणायला हवा. सध्या राजकारणात सर्वाधिक शक्तीशाली आणि अमिश शाह यांच्यानंतर चाणक्य म्हणून कार्यकर्त्यांमध्ये कौतुक केले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पदवीधर असोत की शिक्षक सर्वांमध्ये लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे तीन-तीन मोठे नेते असलेल्या मतदारसंघात भाजपचा पराभव, काय सुचवतोय, यावर भाजपमध्ये विचार व्हायला हवा. नागपुरातून नागो गाणार महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते आहेत. गाणार गेले दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून आमदार होते. या वेळेला महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेतून अजय भोयर आणि इतर कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागितली होती. राजेंद्र झाडे आणि गाणार यांच्या मतांची बेरीज केली तरीही सुधाकर आडबाले यांना अधिक मते मिळाली आहेत.

  औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे चौथ्यांदा आमदार झाले. तरीही भाजपच्या किरण पाटील यांनी चांगली लढत दिली. मात्र महाविकास आघाडीतील पक्ष एकसंध राहिल्यानंतरचा हा निकाल आहे. तोच प्रकार नागपूर आणि अमरावतीतही पहायला मिळाला. भाजपचे अमरावतीतील उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना त्यांची निष्क्रीयता आणि निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय जड गेली. रणजीत पाटील हे फडणवीस यांच्या जवळचे असतील पण स्थानिक राजकारणात भाजपच्याच नेत्यांना चालत नाहीत. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले धीरज लिंगाडे विजयी झाले.

  महाविकास आघाडीचे सगळेच घटक सोबत राहिले तर एकतर्फी होणाऱ्या निवडणुकांना चाप लागू शकतो. भाजपने कितीही जोडतोड केली, तरीही आघाडीची शक्ती तग धरु शकते. वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्वच नाकारणे भाजपला शक्य होणार नाही. या निवडणुकीच्या निकालांमध्ये वंचित आघाडीनेही भाजपला झुंजवण्याचा प्रयत्न केला. आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाचे विधान केले. मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून नाराजी लपवू न शकल्यामुळे ते अधून– मधून ‘कडू’ बोलत असतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली इथपर्यंत ठिक होतं, पण शिवसेना आणि चिन्ह यावर दावा करायला नको होता, हे बच्चू कडू म्हणाले. यामुळे अजुनही उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे, हे त्यांनी कबूल केले. उद्धव यांच्याबद्दलची सहानुभूती मुंबईतसुद्धा आहे. उद्धव यांच्याकडे असलेली मुंबईकरांची सहानुभूती कायम आहे, म्हणूनच पंतप्रधानांच्या व्यासपीठावरुनही त्यांच्यावर आगपाखड करावी लागतेय. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला, हे बिंबवावे लागते आहे. त्यासाठी लव्ह जिहाद असेल किंवा लॅण्ड जिहाद हे मुद्दे मुंबईत तापवावे लागत आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले होते, हे ‘जनता की अदालत’ मध्ये सिद्ध होत नाही, तोपर्यंत ठाकरेंचा मतदार तुटणार नाही. परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आले, त्याच दिवशी सायंकाळी बच्चू कडूंनी ठाकरेंबाबत सर्वसामान्यांना सहानुभूती आहे, हे वक्तव्य केले. एक निकाल खूप काही अर्थ घेऊन आला.

  – विशाल राजे
  vishalvkings@gmail.com