major league cricket

अमेरिकेतील एक स्थळ… डल्लास! सध्या ॲशेस रंगतेय त्या इंग्लंडपासून सुमारे ४५०० मैल दूर. रणरणत्या उन्हात एक क्रिकेट स्टेडियम आकारलंय. उष्णतामान किमान ४० डिग्री.

  एक ऑस्ट्रेलियन, जस्टिन गेल आपल्या देशापासून आणखी काही मैलावर आलाय. तब्बल आठ वर्षांची त्याची मेहनत फळाला येतेय. अमेरिकेत एक क्रिकेट लिग होतेय. ‘मेजर क्रिकेट लिग’ (एमएलसी) अमेरिकेतील या मेजर क्रिकेट लिगला अखेर मुहूर्त मिळाला. जुलै १३चा मुहूर्त साधलाय. ३० जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी झालेत त्यात एम आय न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स, टेक्सास सुपर किंग्ज हे आय पी एल फ्रॅन्चायझींचे संघ आहेत. त्याशिवाय सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉर्नस्, वॉशिंग्टन फ्रिडम, सियाटल ऑर्कस, हे संघही आहेत. वाळवंटात बाग फुलविण्याचा हा प्रयत्न आहे. जेथे क्रिकेटच नाही तेथे क्रिकेट रुजविण्याचा प्रयत्न होतोय.
  भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अन्य आशियाई देशांचे क्रिकेट रसिक या क्रिकेटच्या मशागतीला हातभार लावणार आहेत. प्रत्यक्ष मैदानावर आयपीएल स्पर्धेत खेळलेले तब्बल ३० क्रिकेटपटू अवतरणार आहेत. त्याशिवाय आयपीएलमध्ये सहभागी न होऊ शकलेले पाकिस्तानी क्रिकेटपटूही स्पर्धेत उतरणार आहेत. काही वर्षांपूर्वी अब्दुल रहेमान बुखातीर याने शारजाच्या वाळवंटात भारत पाकिस्तानच्या क्रिकेट शौकिनांना एकत्र आणण्याचा प्रयोग केला होता. तसाच काहीसा हा प्रकार वाटतो. पण जस्टिनच्या शब्दात सांगायचे, तर तसं नाही. २०२४ च्या पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जे अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजन करणार आहे त्याची ही एक रंगीत तालीम आहे. पुढे २०२८ मध्ये लॉस एंजेलिसला ऑलिम्पिक होणार आहे. त्या ऑलिम्पिकच्या निमित्ताने आयसीसीला अमेरिका पादाक्रान्त करायची आहे.

  जस्टिन म्हणतात, आम्हाला इथल्या मेजर लिग बेसबॉलशी (एमएलबी) पंगा घ्यायचा नाही. किंवा अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या अन्य कोणत्याही खेळांशी स्पर्धा करायची नाही. मात्र आयोजकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कारण आयसीसी या स्पर्धेचे यजमानपद देताना एमएलसीवर फारच मेहेरबान झाली आहे. या लिगचे यजमानपद अमेरिकेत क्रिकेट असोसिएशन यांना देण्यात आलेले नाही. या लिगची मालकी एका खाजगी संस्थेकडे आहे. अमेरिकन क्रिकेट एन्टरप्राईझेस (ए.सी.ई.) यांना या लिगच्या आयोजनासाठी परवानगी मिळाली आहे.

  खरं सांगायचे झाल्यास क्रिकेट हा एक उद्योग म्हणून सुरुवात करण्याचा हा प्रयत्न आहे. या उद्योगासाठी पैसा खाजगी उद्योगसमूहांकडून घेण्यात आला आहे. अनेक बड्या उद्योगपतींनी खाजगीरित्या या लिगमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी याआधी अशाच दोन मायनर लिगचे आयोजनदेखील केले होते. ते प्रयत्न फारसे यशस्वी झाले नव्हते. यावेळी मात्र आणखी जोशात व पूर्ण तयारीनिशी आयोजक उतरले आहेत. डल्लासला १२ आणि नॉर्थ कॅरोलिना येथे ७ सामन्यांचे आयोजन होणार आहे. प्रत्येक फ्रॅन्चायझीचे स्वत:चे मैदान असेल आणि आयपीएल प्रमाणे स्वगृही आणि प्रतिस्पर्ध्यांकडे अशा दुहेरी लढतींचे आयोजन करण्याचा पुढील प्रयत्न.

  या प्रयत्नात अडथळे बरेच आहेत. सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळा क्रिकेटचे प्रचंड पाठबळ असणाऱ्या आशिया खंडातील वेळांशी सोईस्कर नाहीत. सामन्यांची बरीच तिकिटे अद्याप शिल्लक आहेत. मात्र येथील पाकिस्तानी नागरिकांची प्रचंड लोकसंख्या हाच त्यांना आधार वाटतोय. त्यामुळेच त्यांनी अनेक पाकिस्तानी खेळाडूंना येथे खेळण्यासाठी गळ घातली आहे.

  आव्हान येथील प्रचंड उष्णतेचेही आहेच. मात्र, एरव्ही या लिगसाठी वेळ मिळालीही नसती. ख्रिसमसच्या हंगामातही आयोजन अशक्य आहे. कारण या लिगसाठी मोकळी ‘विंडो’ मिळणे कठिण आहे. त्यापेक्षाही मोठे आव्हान आहे स्थानिक क्रिकेट विकसित करण्याचा. परदेशी किंवा नोकरी-व्यवसायानिमित्त आलेल्या लोकांच्या आधारे स्थानिक क्रिकेटचा विकास होऊ शकत नाही. झिम्बाबेमध्ये अलिकडेच झालेल्या वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत अमेरिकेचा संघ एकही सामना जिंकू शकला नव्हता. स्थानिक क्रिकेटपटूंच्या दर्जाचा अभाव आणि मर्यादित संख्या यामुळे फ्रॅन्चायझींसाठी चारऐवजी सहा परदेशी खेळाडू खेळविण्याची परवानगी आयसीसीने सदस्य राष्ट्रांचा विरोध पत्करून दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील लिगसाठी प्रत्येक संघात तब्बल आठ परदेशी खेळाडू खेळविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघटनेला कालपरवाच आयसीसीच्या बैठकीत गप्प करण्यात आले होते. अनेक देशांच्या बोर्डांचाही या सवलतीला विरोध आहे. इंटरनॅशनल लिगसाठी नऊ परदेशी खेळाडू प्रत्येक संघात खेळविण्याच्या आयसीसीच्या मान्यतेला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही विरोध केला आहे. आयसीसी या अनधिकृत लिगचे अधिक लाड का करीत आहे हेच कळत नाही. फ्रॅन्चायझींच्या या ‘लाडाला’ आवर घालण्याचा नजिकच्या काळात विचार नसल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. दरबान येथील ११ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आयसीसीने सदर प्रस्तावावर मतदान देखील घेतले नाही. सदस्य देशांना अशा लिगवर काही अटी व नियम लादने सक्तीचे आहे असे वाटत असताना आयसीसी मात्र क्रिकेटच्या या बाजारू व्यापारीकरणाला खतपाणी का घालत आहे?

  सदस्यांची काळजी धुडकावून आयसीसीच्या सीईओंनी विंडिज, युएई आणि अमेरिकेतील या लिगना मोठे बळ प्राप्त करून दिले आहे.अशा लिगमुळे देशांतर्गत क्रिकेटची यंत्रणाच खिळखिळी होईल अशीही भीती काही बोर्डांना वाटत आहे. कारण या अशा लिगमध्ये पैसा प्रचंड मिळत असल्याने स्थानिक क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ वळविण्यास सर्वत्र सुरुवात देखील झाली आहे. आपापल्या देशांचे करार धुडकावून स्वत:ला मुक्त ठेऊन अशा लिगमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

  प्रत्येक फ्रॅन्चायझींना चारच खेळाडू खेळविण्याची मुभा असली पाहिजे. परदेशी खेळाडूंच्या देशांच्या क्रिकेट संघटनांना १० टक्के मानधनातील हिस्सा हवा आहे. बीसीसीआय या दोन्ही अटींची पूर्तता करीत आहे. मात्र बीसीसीआयला जगभरातील अशी लिगवर मर्यादा-अटी घालणे मान्य नाही. जेसन रॉयसारख्या खेळाडूंनी ‘ईसीबी’च्या करारास नकार देणे आणि एप्रिल ते सप्टेंबर या क्रिकेट हंगामातील कालावधीतच आयसीसीने अशा लिगना मान्यता देणे इंग्लिश क्रिकेट बोर्डाला रूचले नाही. अशा लिगच्या माध्यमातून आपले हातपाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पसरवण्याचा काही उद्योजकांचा डाव आहे. हौशी खेळाचे स्वरूप असलेल्या क्रिकेटला व्यावसायिक बनविण्याच्या स्वप्नांपाई आयसीसी आपले खेळावरील वर्चस्व आणि नियंत्रण गमाविण्याचा धोका दिसायला लागला आहे. इंग्लंडने धोक्याचा इशारा दिला आहेच. वेस्ट इंडिजनेही आयसीसीला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.

  -विनायक दळवी 
  vinayakdalvi41@gmail.com