
मराठी रंगभूमीवरले मालवणी धुमशान असलेल्या 'वस्त्रहरण' नाटकाने जागतिक प्रयोगांचा महाविक्रम केला आहे. 'भद्रकाली'चे प्रसाद कांबळी यांनी पुन्हा एकदा या नाटकाच्या ५,२५५ प्रयोगाचा संकल्प जाहीर केला. येत्या १६ फेब्रुवारीला हे नाटक ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. योगायोग म्हणजे नाटककार गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या ८३ व्या वर्षात चक्क रत्नागिरीत 'वस्त्रहरण'च्या प्रयोगात तात्या सरपंचचा मुखवटा चढविला!
मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभारलेल्या ‘भद्रकाली’ प्रोडक्शनची वहिवाट ही त्यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी हे ताकदीने पुढे चालवित आहेत. केवळ ‘मालवणी’पूरती निर्मिती मर्यादित न ठेवता अनेक विषय – आशय शैलीदार नाट्यनिर्मिती त्यांनी बाबूजींच्या अनुपस्थितीत केलीय. याची दखल ही नाट्य वाटचालीत घेतली जातेय. ‘भद्रकाली’च्या दालनात लवकरच ‘दृष्टी’ही ६०वी नाट्यकृती ते सादर करणार आहेत तर पुन्हा एकदा ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाट्यकृतीला नव्या जोमात सादर करण्याचा त्यांचा इरादा आहे.
‘वस्त्रहरण’ नाटकाच्या कुंडलीत योगायोग गच्च भरलेले. १६ फेब्रुवारी १९८० हा दिवस. मच्छिंद्र कांबळी यांच्या गैरहजेरीत तात्या सरपंच याचा मुखवटा नाटककार गंगाराम गवाणकर यांनी चढविला. ‘रिप्लेसमेंट’चा प्रयोग झाला आता २०२३ साली रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात माडबन गावी शाळेच्या शताब्दी महोत्सवात पुन्हा एकदा गवाणकरांनी आपल्या ८३व्या वर्षी तात्या सरपंच उभा केला आणि साऱ्यांनाच थक्क करून सोडले. महिनाभर उभा गावच प्रयोगासाठी ‘वस्त्रहरण’मय झाला होता. ‘गोप्या तू डब्बो बडव!’ची हाक सातमजली हशा वसूल करून गेली… हा योग तसा दुर्मिळच. एका रंगकर्मीला रंगदेवतेने जणू आशीर्वादच दिलेत! एक काळ उलटला तरी रसिकांच्या मनात तात्या सरपंच हे टिकून राहिले आहेत. नाटककार गंगाराम गवाणकर आणि अभिनेते – निर्माते मच्छिंद्र कांबळी हे दोघे रंगभूमीच्या रंगसागरात मालवणी नाटकांचे दिपस्तंभ म्हणून ठामपणे उभे राहीले आणि बोली भाषेचे महत्त्व सिद्ध केले.
महाराष्ट्राची प्रादेशिक बोलीभाषा मालवणीला प्रतिष्ठा मिळवून देणारे ‘वस्त्रहरण’ या नाट्याने नवल घडविले. यापूर्वी मराठवाडी, वऱ्हाडी भाषेतील काही नाटके व्यावसायिक रंगभूमीवर जरूर आली मात्र, व्यावसायिक यश मिळाले नाही. पण १९७५ साली राज्य नाट्यस्पर्धेत गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’चा प्रयोग झाला आणि मालवणी नाटकांना व्यावसायिक दालने उघडी झाली. १६ फेब्रुवारी १९८० रोजी ओम नाट्यगंधातर्फे शुभारंभ प्रयोग दादरच्या शिवाजी नाट्यमंदिरात करण्याचे निश्चित झाले. पण सूत्रधार असलेल्या मामा पेडणेकर यांच्या लक्षात आले की, १६ फेब्रुवारी हा अशुभ दिन आहे. त्या दिवशी अशुभ सूर्यग्रहण आहे जे ८४ वर्षांनी येत आहे. १४ फेब्रुवारीला ही बाब मामांनी निर्माते मनोहर नरे यांना सांगितली. १५ फेब्रुवारी रोजी एक दिवस अगोदर शुभारंभ प्रयोग करण्याचे ठरले पण त्या दिवशी मच्छिंद्र कांबळी ‘महासागर’ नाटकासाठी पुण्यात होते. प्रयोग रद्द करण्यास नकार मिळाल्याने मच्छिंद्र कांबळी यांचाही नाइलाज होता. मग पांडूतात्याची मध्यवर्ती भूमिका १५ फेब्रुवारीच्या प्रयोगात नाटककार गंगाराम गवाणकर यांनी करून प्रयोग निभावून नेला. दुसऱ्या प्रयोगापासून नियोजित पांडूतात्या मच्छिद्र कांबळी आले! प्रादेशिक भाषेतील हे एकमेव नाट्य जे पाच हजाराव्या प्रयोगापर्यंत पोहोचले आहे. दुसऱ्या प्रयोगापासून प्रमुख भूमिका करणारे मच्छिंद्र कांबळी हे कायम आहेत.
१९८४ साली वस्त्रहरण नाटकाचा लंडन दौरा होता. सकाळी लंडन मुक्कामी पोहोचल्यानंतर ‘टिम’मधले दिलीप कांबळी (गोट्या), लहुराज कावळी (प्रॉम्प्टर), अशोक बांदेकर (भीम) यांना जासूस उर्फ स्पाय समजून अडविण्यात आले. इंग्रजी भाषेची बोंब असल्याने विमानतळावर अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आणि त्यांना गुन्हेगार ठरविण्यात आले. ब्रिटिश इमिग्रेशनचा क्रॉस शिक्का मारून झडती घेऊन त्याच विमानाने या तिघांना पुन्हा मुंबईत पाठवले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही घटना समजताच, त्यांनी इशारा दिला की ‘जर नाटकाच्या रंगकर्मींना सन्मानाने पुन्हा लंडन मुक्कामी प्रवेश दिला नाही तर मुंबईतले ब्रिटिश दूतावास जाळून टाकू!’ तत्कालीन सांस्कृतिक मंत्री वसंत साठे, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सूत्रे हलविली आणि शिवसेनाप्रमुखांच्या इशाऱ्याचा दणका लंडनपर्यंत बसला. त्यातल्या दोघा कलाकारांना पुन्हा लंडनला पाठविण्यात आले! मराठी प्रादेशिक भाषा ही जपली पाहिजे. हे वैभव आहे, असे शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी सांगितले.
साहित्य सम्राट आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांच्यानंतर आपल्या हयातीत आपल्या नाटकांचे हजारो प्रयोग बघण्याचे नवल नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या नशिबी आहे. तात्या सरपंचाचं गाऱ्हाणं म्हणजे मालवणी भक्ती – शक्तीचे आणि माणुसकीचे दर्शनच. गाऱ्हाण्याचं सादरीकरण हे ‘वस्त्रहरण’चं एक अनोखे आकर्षणच आहे. ‘वस्त्रहरण’ नाटकाची जादू छोट्या पडद्यावर मुलाखतीच्या रूपाने अवतरली आहे.
‘साहित्यप्रभू पु.ल. देशपांडे यांनी १९८० साली ऑगस्ट महिन्यात ‘वस्त्रहरण’ नाटक पुण्यात बघितले. त्यानंतर नाटककार गंगाराम गवाणकर यांना पुलंनी एक पत्र पाठवून नाटकाचे कौतुक आपल्या मार्मिक व मिश्कील शब्दांत केले. पुलं म्हणतात, “वस्त्रहरण’च्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्सचे भरजरी वस्त्र अर्पण केले आहे. ‘वस्त्रहरण’ म्हणजे शंभर टक्के देशी फार्स. हल्ली दुर्दैवाने बऱ्याचशा फार्समधल्या नटी या विंगेतच कोणीतरी वस्त्रहरण केल्यासारख्या स्टेजवर येतात. त्यामुळे त्या आणि लेखकांची विनोदबुद्धी एवढी रंगभूमीवर उघडी पडलेली दिसते. हसायचे कधी आणि का ते कळत नाही… नाटक बघितल्यानंतर या नाटकात आपल्याला भूमिका मिळायला हवी होती असे मला वाटले. मालवणच्या सिंधुदुर्गाइतकेच तुमच्या या मालवणी फार्सला दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी लोकांना खळखळून हसायला लावण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडत राहो ही शुभेच्छा!’
पुढे १७५व्या प्रयोगाला पुलंना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. ‘खरा म्हणजे मी कोकणीतून बोलूक होया असा. पण माझा कोकणी समजण्याक जरा कठीणच जाताला’ – असे सांगून पुलंनी भाषण केले.
लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे जेव्हा लंडनला प्रयोग करण्याचे मच्छिंद्रला आमंत्रण आले तेव्हा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण बावीस माणसांची मालवणी टोळी लंडनपर्यंत पोहोचायची कशी प्रश्न पैशाचा होता.
हाऊसफुल्ल सम्राट काशीनाथ घाणेकरांनी मच्छिंद्रला ‘तुला पैसे मिळण्यासाठी तू सांगशील ती भूमिका मी वस्त्रहरणात पाहुणा कलाकार म्हणून करीन फक्त प्रयोग षण्मुखानंद हॉलमध्ये ठेव!’ डॉ. काशीनाथ घाणेकर वस्त्रहरणात भूमिका करीत आहेत म्हटल्यावर मास्टर भगवान (धृतराष्ट्र), नाना पाटेकर (भीम), अशोक सराफ (धर्म), मास्टर सचिन (विदूर), दिलीप प्रभावळकर (देव), बाळ धुरी (दुर्योधन), स्वतः डॉ घाणेकर (दुःशासन) या दिग्गजांनी भूमिका केल्या. मुळात तीन तास होणारा नाटकाचा प्रयोग साडेचार तास रंगला. लंडनच्या तिकिटांची सोय झाली. भद्रकालीनेही काही खर्च उचलला. हे ही नवलच!
नाटककार गवाणकर हे जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी. त्यांनी १९६२च्या सुमारास एक एकांकिका लिहीली. त्याचे नाव होते ‘आज काय नाटक होवचा नाय.’ पुढे ती स्क्रीप्ट गहाळ झाली. त्याचे विस्तारीकरण म्हणजे ‘वस्त्रहरण’ हे नाटक !
वस्त्रहरण नाटकाचे हे अफाट यश पहायला या नाटकाचे संगीत दिग्दर्शक बाळ तावडे, दिग्दर्शक आणि मास्तरची अफलातून भूमिका करणारे रमेश रणदिवे, गोप्याची भूमिका करणारा दिलीप कांबळी, ढोलकीपटू शशी जेधे, धर्माची भूमिका करणारा मालवणीचा अर्क अशोक बांदेकर हे वस्त्रहरणाच्या यशातील शिलेदार आज हयात नाहीत याचे दुःख आहे.
लंडन दौऱ्यात प्रेक्षकांनी मालवणी कळणार नाही म्हणून मच्छिंद्र कांबळी यांनी मराठीत संवाद म्हणायला सुरुवात केली खरी, पण प्रेक्षकांनी मालवणीचा आग्रह धरला. आता बोला, यावर नाटककार गंगाराम गवाणकर म्हणाले, ‘राजापूरच्या गंगेने आपल्या मायबोलीची पाठराखण लंडनच्या थेम्स नदीपर्यंत केली!’
मराठी नाटकाने ब्लॅक होण्याची घटना तशी दुर्मिळच. पण पुलंचे एक पत्र जाहिरातीत दिल्यानंतर काही प्रयोग ओव्हर पॅक झाले. दहा रुपयांचे तिकीट चक्क शंभर रुपयांना ब्लॅकने खरेदी केल्याचे अनेक रसिकांनी त्यावेळी सांगितले. ब्लॅक होताना नाटकातील रंगकर्मींनी प्रत्यक्षा बघितलेही!
तर मंडळी शेवटी असा आमचा वस्त्रहरण सुरुवातीपासून आतापर्यंत जी जी म्हणून संकटाइली तेका धैर्याने तॉंड दिलंय, पण या घरचा संकट इला म्हणून मी आडवो झालय. आता यापुढं नाटक करूचा आमच्या आवाक्या बाहेरचा असा. तेवा ह्याच नाटक पुढल्या वर्षी ह्याच जागेवर आम्ही ‘वस्त्रहरण’पासून सुरू करू!’ असा शेवट नाबाद सुरू आहे. जो पुढल्या वर्षी त्याच्याही पुढल्या वर्षी सुरुच आहे! हाही एक योगायोग.
मालवणी भाषा ही सातासमुद्रापार गेली. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे ‘माडबन ते लंडन व्हाया वस्त्रहरण’ हा एकपात्री कार्यक्रम करतात त्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. एका नाटककाराचा त्याच्याच एका नाटकाभोवती गुंफलेला एकपात्री प्रयोग हा नाटसृष्टीतील एकमेव ठरलाय !
‘वस्त्रहरण’ नाटकाच्या चमत्काराला सलाम !
– संजय डहाळे (sanjaydahale33@gmail.com)