dog

  तेजोमयी, बाबा आणि आईसोबत अलेक्झांडर दररोज बागेत फिरायला जात असे. बागेत फिरताना त्याचं चौफेर लक्ष असे. कोण काय करतय हे बघण्यात किंवा त्यांचं निरीक्षण करण्याचा त्याला छंदच जडला होता. त्यामुळे बागेत कोणतीही नवी गोष्ट दिसली, कुणी नवं काही करताना बघितलं की स्वारी तिथे गेलीच म्हणून समजा. मग मोठ्या उत्सुकतने ते सगळं बघणार. त्यात त्याला काही मजेदार वाटलं तर काही क्षण बघून, आपल्याला बुवा आवडलं हे, असं मान आणि शेपूट हलवून व्यक्त करणार.

  अलेक्झांडर हा आता बागेत नेहमीचा येणारा असल्याने त्याच्याबद्दलची भीती फारशी कुणाला वाटत नसे. तोही आपण फार बिच्चारे आहोत, प्रेमळ आहोत हे दाखवायला किंवा सिध्द करायला विसरत नसे. त्याच्या या चौफेर निरीक्षणाचा बाबांना बरेचदा वैताग यायचा. आईला कौतुक वाटायचं तर तेजोमयीस आपणास याच्यासारखा निरीक्षणाचा उत्साह कां नाही? असं बरेचदा वाटून जायचं. कधी ती अलेक्झांडरच्या निरीक्षण मोहिमेत सहभागी व्हायची तर कधी कंटाळा करायची. मात्र त्यामुळे अलेक्झांडरवर काही परिणाम होत नसे.

  अलेक्झांडर असा एखाद्या नव्या गोष्टित डोकावू लागला की, तो बघा निरीक्षक आलाय, असं त्याला गमतिने काहीजण म्हणू लागले. सुरुवातीला हे त्याला कळलं नाही. पण जेव्हा त्याच्या ध्यानात हे आलं, तेव्हा मात्र निरीक्षक आला, हे शब्द कानावर पडताच स्वारी खुष होऊन उड्या मारायची.

  असंच एकदा मैदानाला फेऱ्या मारणं सुरु असताना अलेक्झांडरचं लक्षं एका आजोबांकडे गेलं. ते मैदानातील प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू गोळा करत होते. बागेत इतके लोक फिरत होते, पण कुणाचंही लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. काही जणाचं लक्षं गेलं असेल तर त्यांनी बघून न बघितल्यासारखं केलं. आजोबा एकटेच एकएक प्लास्टिक गोळा करुन त्यांच्याजवळ असलेल्या एका मोठ्या पिशवित टाकत होते.

  अलेक्झांडरने, बाबा-आई आणि तेजोमयीचं लक्ष तिकडे वेधलं. त्यांनी बघितल्यासारखं केलं नि तेही पुढे निघाले. अलेक्झांडर मागेच रेंगाळला. काही क्षण तो आजोबांचं निरीक्षण करु लागला. मग त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो त्यांचा बाजूला गेला आणि तोंडात पकडून प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्याकडे आणू लागला. प्रारंभी आजोबा दचकले. त्यांनी त्याला हाटहूटही केलं. पण अलेक्झांडरने तोंडातली प्लास्टिकची पिशवी त्यांच्याजवळ टाकली आणि तो पुन्हा प्लास्टिक जिथे दिसते त्याठिकाणी धावला. त्याने पुन्हा तोंडात पकडून प्लास्टिक आजोबांजवळ आणून टाकलं. हा आपल्यालाच मदत करतोय हे आजोबांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याच्याकडे हसून बघितलं. कानाला हात लावून सॉरीही म्हटलं. एखाद्या शहाण्या मुलासारखं अलेक्झांडरनेही, चलता है आजोबा, असं म्हणत मान आणि शेपटी हलवली. त्या दोघांचं प्लास्टिक गोळा करुणं पुन्हा सुरु झालं.
  अलेक्झांडरची चाहूल लागत नाही, हे बघून आईने मागे बघितलं तर तो दिसला नाही.
  अहो ठोंब्या, दिसत नाहीय हो.

  अगं तो कसलं तरी निरीक्षण करत असणार, काळजी करु नकोस. बाबा म्हणाले. तेवढ्यात तेजोमयीला तो दुरुन तोंडात प्लास्टिक घेऊन जाताना दिसला. तिने बाबांचं लक्ष तिकडे वेधलं.

  हा आता प्लास्टिक बिस्टिक खातो की काय? असं बाबांना वाटून ते त्याच्या दिशेने धावले, ते धावले म्हणून आई आणि तेजोमयीही धावली. ते अलेक्झांडरजवळ पोहचले. एव्हाना अलेक्झांडर आजोबांकडे पोहचला होता. त्याने तोंडातली पिशवी त्यांच्यासमोर टाकली.

  ठोंब्या, तुला बिस्किट हवंय का, आई त्याच्याकडे बघत म्हणाली. तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकून अलेक्झांडर दुसरीकडे पळाला नि त्याने पुन्हा एक प्लास्टिक पिशवी तोंडात धरुन आणली आणि आजोबांच्या समोर टाकली. आजोबांनी ती पिशवित टाकली. आईबाबा आणि तेजोमयीच्या तत्काळ लक्षात आलं.

  प्लास्टिकचा धोका अलेक्झांडरचा ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. पण एक म्हातारे गृहस्थ प्लास्टिक गोळा करताहेत याचा अर्थ ते काहीतरी वाईट असलं पाहिजे, हे त्याच्या चाणाक्ष बुध्दीला पटकन लक्षात आलं. तो आजोबांच्या मदतीला सुध्दा धावला.त्या मुक्या जीवाने आपल्या वर्तणुकीने चांगलाच धडा शिकवला होता. प्लास्टिक दुष्पपरिणामाबद्दल फक्त केवळ बडबड करणाऱ्यांपेक्षा अलेक्झांडरच्या त्या निर्व्याज्य कृतिने आईबाबा आणि तेजोमयीही भारावून गेले. ते सुध्दा आजोबांच्या मदतीला आले. त्यांचं बघून बागेतील काही मुलंही प्लास्टिक गोळा करु लागली. बघता बघता बाग स्वच्छ झाली. आजोबांनी अलेक्झांडरवर कौतुकाचा वर्षाव केला.
  खरंच आपण काही भव्यदिव्य केलं का? असा सवाल अलेक्झांडरच्या मनात निर्माण झाला नि त्याने आईकडे वळून बघितलं.

  खरंच रे माझ्या राज्या, तूच खरा कौतुकाचा धनी! आई म्हणाली. ते त्याला बरोबर कळलं आणि तो आईला प्रेमाने बिलगला.
  – सुरेश वांदिले
  ekank@hotmail.com