masoom the next generation

चाळीस वर्षात संपूर्ण जग आंतर्बाह्य बदललंय. सगळेच काटकोन, त्रिकोण, बेरीज, वजाबाकी, गणिते, प्रमेय बदललीत... म्हणूनच तर प्रश्न पडलाय, 'मासूम' (१९८३) या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात सिक्वेल 'मासूम द नेक्स्ट जनरेशन'मध्ये काय पाहायला मिळेल?

  शेखर कपूरलाच या सिक्वेलची कल्पना सुचलीय म्हणून तर भारी उत्सुकता. ‘मासूम’चे दिग्दर्शन त्याने केले तेव्हा तो अभिनयाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे आला होता. देव, चेतन व विजय आनंद यांचा भाचा ही त्याची पहिली ओळख. आनंदबंधुंच्याच ‘जान हाजिर है’ (१९७६) पासून तो अभिनेता झाला. ‘टूटे खिलौने’ वगैरे चित्रपटात त्याने नायक साकारला. त्यात मन न रमल्याने दिग्दर्शनात आला आणि पहिलाच चित्रपट ‘मासूम’मध्ये त्याने आपली कल्पकता दाखवली. समिक्षक व रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर बोनी कपूर निर्मित ‘मिस्टर इंडिया’ (१९८६)च्या दिग्दर्शनात त्याने खूपच मोठी झेप घेतली. फूलनदेवीच्या आयुष्यावरील ‘बॅन्डीट क्वीन’ (१९९४)च्या वेळेस तो आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पोहचला. ‘एलिझाबेथ’ (१९९८) हा जागतिक पातळीवरील चित्रपट ठरला. अशी ग्लोबल युगातील आंतरराष्ट्रीय वाटचाल सुरु असलेल्या शेखर कपूरचा ‘मासूम’चा सिक्वेल असाच जागतिक पातळीवरीलच असेल हे स्वाभाविक आहे. या वाटचालीत त्याने संपूर्णपणे बदललेले जग, मानसिकता, जीवनशैली, नातेसंबंध पाहिलेत. बदलता चित्रपट आणि सततची नवीन माध्यमे पाहिलीत. यातूनच त्याचा ‘नेक्स्ट जनरेशन’चा ‘मासूम’ नक्कीच आकार घेईल. याचं कारण, त्याला आता फक्त एकीकडे हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांपर्यंतच पोहचायचे नाही तर जगभरातील चित्रपट रसिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भान ठेवायचे आहे.

  मूळ ‘मासूम’मध्ये काय होतं? दोन लहान मुलींच्या पिंकी आणि मिकी यांच्या (उर्मिला मातोंडकर व आराधना श्रीवास्तव) पालनपोषणात रमलेल्या. डी. के. व इंदू मल्होत्रा दाम्पत्यात (नसिरुद्दीन शहा व शबाना आझमी) एक अनपेक्षित वादळ येते. डी. के.मल्होत्रा यांचे लग्नापूर्वी विशेष संबंध आलेल्या भावनाच्या (सुप्रिया पाठक) मुलाला राहुलला (जुगल हंसराज) भावनाच्या मृत्यूनंतर डी. के. मल्होत्राला स्वीकारावे लागते. पर्यायच नसतो. इंदूला हा धक्का असतोच पण हा मुलगा या कुटुंबात रुळणार कसा आणि केव्हा हादेखील प्रश्न असतोच. राहुलही या कुटुंबात हरवल्यासारखा वावरतो. त्याची मानसिक भावनिक कुचंबणा म्हणजे हा ‘मासूम’. नसिरुद्दीन शहाचा जबरदस्त मुद्राभिनय आणि शबाना आझमीची बेहतरीन अदाकारी यासह तेव्हा बालकलाकार असलेल्या उर्मिला मातोंडकरचा खट्याळपणा यामुळे चित्रपट अधिकच प्रभावी ठरला. गुलजार यांचे लेखन व गीते आणि राहुल देव बर्मनचे संगीत या केवढ्या तरी जमेच्या बाजू. दो नैना एक कहानी (पार्श्वगायिका आरती मुखर्जी), हुजूर इस तरह (सुरेश वाडकर व भूपिंदर सिंग), तुझसे नाराज नही (लता मंगेशकर), लकडी की काठी (वनीत मिश्रा, गौरी बापट, गुरपीत कौर) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

  ‘नेक्स्ट जनरेशन’मध्ये अशी गाणी आणणार कुठून हा भला मोठाच प्रश्न आहे म्हणा. थीममध्ये आजच्या ग्लोबल युगातील विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, सेकंड होम (सेकंड वुमन अथवा फ्रेन्ड), काॅन्ट्रॅक्ट मॅरेज, इंटरनेट मॅरेज, दुसरं लग्न असे संदर्भ नक्कीच असतील. लग्न संस्था हीच आपली परंपरा, संस्कृती, मूल्ये आहेत पण आजच्या सामाजिक स्थितीत त्यात दुर्दैवाने घसरण झालीय. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण छान वाढलयं, तेवढ्याच समस्याही वाढल्यात. आणि म्हणूनच ‘तेरे मासूम सवालो से मे हैराण हू मै… परेशान हू मे’ हा प्रश्नही फारच गुंतागुंतीचा झालाय.

  शेखर कपूरचा यावर ‘फोकस’ काय आणि भाष्य कोणते हेच जनरेशन नेक्स्टचे उत्तर आहे. प्रश्नांच्या उत्तरात नवीन प्रश्न आहे.

  शेखर कपूरची एक ‘दुसरी बाजू’ही आहेच. मुहूर्तालाच चित्रपट बंद करण्याचा प्रताप (उदा. तारा रम पम्म), काही रिळांचे शूटिंग झाल्यावर मध्येच त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडणे (रुप की रानी चोरो का राजा, बरसात, दुश्मनी, जोशिले, टाईम मशीन… एकाच दिग्दर्शकाने इतके चित्रपट मध्येच सोडावेत हा बहुतेक जागतिक विक्रम असावा.) मोठ्या चित्रपटाच्या घोषणा करणे (पानी) हीदेखील शेखर कपूरची वैशिष्ट्य.

  ‘मासूम’ जनरेशन नेक्स्ट हे शेखर कपूरला सुचलंय, त्याचं व्हिजन आहे, म्हणूनच ते ‘हटके’च असणार याची खात्री आहेच. नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्या ताकदीचे कलाकारही हवेत म्हणा. राजकुमार राव व कंगना रानावतही ते असू शकतात. कलाकारांमध्येही जनरेशन नेक्स्ट आहेच आणि चित्रपट रसिकांमध्येही आहे. सर्वांचा ताळमेळ जमून आलाच तर शेखर कपूरमधील ‘दिग्दर्शक दिसला’ म्हणू….

  -दिलीप ठाकूर
  glam.thakurdilip@gmail.com