मुंबई इंडियन्सचा मास्टर स्ट्रोक!

मुकेश अंबानी हे कल्पक व धूर्त उद्योगपती आहेत. त्यांनी यंदाच्या आय पी एलमध्ये एक करोडोंची गोष्ट अवघ्या वीस लाखात पदरात पाडून घेतली. ती गोष्ट आहे आकाश मदवाल. कालपरवापर्यंत हा आकाश मदवाल कुणाच्याही खिजगणतीत नव्हता. अचानक कुठून आला. जसप्रीत भुमरा हा मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज अजूनही फिट नाही. दुसरा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर जायबंदी होऊन परतला. लेग स्पिनर पियुष चावला हा एकमेव गोलंदाजीचा आधार. तोही मधल्या षटकांमधला. पॉवर फ्लेमध्ये कोण गोलंदाजी करणार आणि “डेथ ओव्हर्स” मध्ये निर्णायक षटकात कोण बॉलिंग करणार? मुंबई इंडियन्सच्या त्या प्रश्नाचे उत्तर आकाश मदवाल या नावात सामावलेले आहे.

  कोण? कुठला हा आकाश? कधी याचे नावही ऐकले नव्हते. स्थानिक क्रिकेटमध्येही फारसा ज्ञात नाही. दोन वर्षांपूर्वी रॉयल चॅलेन्जर्स, बंगळुरू यांनी आकाशला नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी घेतले होते. त्यांना हा हिरा ओळखता आला नाही. गेल्यावर्षी म्हणजे २०२२च्या आय पी एल स्पर्धेदरम्यान सूर्यकुमार यादव जायबंदी झाला. त्याच्या जागी आकाशला संघात स्थान मिळाले. यंदा तर अवघ्या २० लाखात आकाशला मुंबईने लिलावात घेतले. हाच खरा मास्टरस्ट्रोक. करोडोंची वस्तू अंबानींनी लाखात घेतली.

  मुंबईच्या गोलंदाजीच्या दुबळ्या पंखात याच आकाशने बळ भरले. एकेकाळी बेरहनड्रॉर्फ आणि पियुष चावला यांच्याबरोबर सुरू होणारी व संपणारी मुंबई इंडियन्सची गोलंदाजी दमदार वाटायला लागली. खरं तर मुंबई इंडियन्ससाठीही आकाशची ओळख, नेट्ससाठीचा गोलंदाज अशीच होती. जोफ्रा आर्चरही जायबंदी झाला आणि मग मुंबई इंडियन्सपुढे उपलब्ध असलेल्या गोलंदाजांशिवाय पर्यायच उरला नाही. तेथेच आकाश मदवालचे नशिब उघडले. गुजरात टायटन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर आकाशच्या हातात चेंडू आला. त्याने बृद्धिमान साहा, शुभमन गिल, मिलर हे गुजरातचे ३ मोहरे सुरुवातीलाच टिपले आणि मुंबई इंडियन्सने यंदाच्या आय पी एलमध्ये पहिल्यांदाच आत्मविश्वासपूर्ण विजय मिळविला.

  आकाश यावरच थांबला नाही. त्यानंतरच्या हैदराबादविरुद्ध सामन्यात त्याने ४ षटकात ३७ धावा देऊन ४ बळी घेतले. मुंबई इंडियन्सचा आणखी एक आत्मविश्वासपूर्ण विजय. आत्ता मात्र आकाशची खरी कसोटी होती. चेन्नईत लखनौविरुद्ध निर्णायक सामना होता. स्टॉयनिस तुफान फलंदाजी करीत होता. लखनौचा धावफलक वेगात पुढे सरकत होता. अशा वेळी आकाश खेळपट्‌टीवर आला आणि क्षणार्धात चित्रच पालटले. त्याने अवघ्या २१ चेंडूत लखनौचा निम्मा संघ उखडला; तोही अवघ्या ५ धावांच्या मोबदल्यात मुंबईचा उपांत्य फेरीचा दरवाजा उघडला. जो मुंबई संघ यंदा दुबळ्या गोलदाजीमुळे बाद फेरी गाठणार नाही असेच वाटत होते. त्याच मुंबईच्या संघाच्या गोलंदाजीला अचानक आकाशच्या भेदक गोलंदाजीची धार आली आहे.

  कोण आहे हा आकाश मदवाल? कुठून आला? काय करतो?

  आतापर्यंत कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या आकाशबद्दल असे अनेक प्रश्न सध्या विचारले जाताहेत. मूळातच हा आकाश क्रिकेटमध्ये फारशा परिचित नसलेल्या उत्तराखंड संघाकडून खेळतो. वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणून त्याला मर्यादित षटकाच्या क्रकेट संघाचे कप्तानपद देखील दिले गेले. जन्म रुरकीचा. पण कर्मभूमी धनदेरा, उत्तराखंडच. सर्वप्रथम उत्तराखंडचे प्रशिक्षक वासिम जाफर यांचे लक्ष आकाशाकडे गेले. ऋषभ पंत आणि आकाश यांचे क्रिकेट गुरू एकच; अवतार सिंग. सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करता करता, टेनिस बॉल क्रिकेटही खेळायचा. पण उत्तराखंडसाठी अधिक क्रिकेट खेळता यावे म्हणून इंजिनियर पदाची नोकरी सोडावी लागली. त्यामुळे फायदा झाला क्रिकेटचा.

  टेनिस बॉलचे क्रिकेट खेळून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल झालेल्या एक मोठ्या क्रिकेटपटूचे नाव आहे अॅन्डी रॉबटर्स. बार्बाडोसच्या रस्त्यावर अॅन्डी रॉबटर्स क्रिकेट खेळायचे. त्यांच्यातील गोलंदाजीचा जोश पाहून त्यांना भेट सिझन बॉलने क्रिकेट खेळायला विंडिज संघात पाचारण केले गेले, होते. आकाशचेही, काहीसे तसेच आहे. थेट टेनिस बॉल क्रिकेटमधून तो प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये आला. अॅन्डी रॉबर्ट्स म्हणा किंवा आपला झहीर खान, म्हणा… यांनी टेनिस बॉलमधील गोलंदाजीची कला मुख्य क्रिकेट प्रवाहात आल्यानंतर वापरली.

  आकाशनेही तेच केले. सध्या तेच करतोय. आकाशचे यॉकर्र हे अतिशय प्रभावी अस्त्र आहे. ५ फूट ५ इंच उंचीच्या आकाशकडून अपेक्षा केली जात होती; धावा रोखण्याची. आकाशने ते काम केलेच; पण बरोबरच विकेटही काढत गेला. यॉकर्र या अस्त्राविषयी आकाश म्हणतो, टेनिसबॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूचा टप्पा जराही चुकवून चालत नाही. नाहीतर धुलाईच होते. यॉकर्र मारणे कठिण असते. तेच अस्त्र त्याने आय पी एलमध्ये वापरले. खेळपट्‌टीवर किंचित दव पडले की चेंडू “स्कीट” व्हायला लागतो. टप्पा पडल्यावर चेंडू किंचित पुढे घसरतो. आकाशने त्यावर प्रभुत्व मिळविले आहे.

  जोस लिटिलच्या गोलंदाजीच्यावेळी देखील आपण हे पाहिले होते. आकाशची गोलंदाजी त्यामुळे अधिक भेदक बनली आहे. चेंडू अधिक वेगात आणि अचूक टप्प्यावर पडून पुढे ‘स्कीट’ झाला तर खेळणे कठीण होऊन बसते. आणि हाणामारीच्या षटकात तर विकेटच गमवावी लागते. अगदी अलिकडेच म्हणजे २०१८ साली उत्तराखंड क्रिकेटची स्थापना झाली. अगदी बाल्यावस्थेत असलेल्या या संघाकडे आकाश मदवाल हा एक हिरा आहे. मात्र या हिऱ्याला अजूनही पैलू पाडण्याची गरज आहे.

  मुंबई इंडियन्ससारख्या एका श्रीमंत फ्रॅन्चायझीच्या हाताला हा हिरा लागला. आकाशची पुढील वाटचालही अशा अनुभवी फ्रॅन्चायझीसोबत राहिल्यानेच योग्य दिशेने होणार आहे. बंगळुरू संघाने त्याला दोन वर्षे केवळ नेट्सचा गोलंदाज म्हणूनच वापरला. मुंबईनेही गतवर्षी दोन सामन्यापुरताच त्याला घेतला होता. यंदाही आकाशला आधीच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. आर्चर जायबंदी झाल्यामुळे उशिरा का होईना, आकाशला संधी मिळाली. अवघ्या २० लाखांची किंमत केली गेलेला हा खेळाडू निश्चितच त्यापेक्षा मोठा आहे.

  विनायक दळवी

  vinayakdalvi41@gmail.com