mother

आईबद्दल न थकता कितीही बोलता येतं! तिचं मृदु हृदय प्रसंगी वज्रासारखं कठोरही बनतं. त्याची ही कथा.....

  गेले कित्येक आठवडे शत्रूच्या सैनिकांनी शहराभोवती ‘पोलादी’ वेढा घातला होता. रात्रीच्या वेळी शहराच्या भिंतींवरून त्या जागी हजारो दिवे लाल डोळ्यांप्रमाणे चमकताना दिसत. या भयानक परिस्थितीमुळे शहरवासीयांचे मनोधैर्य पार ढासळून गेलं होतं.

  शत्रू हळूहळू जवळ येत चालला होता. वेढा आवळत होता. त्यांच्या घोड्यांचे खिंकाळणे सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. शस्त्रांचे आवाज आणि विजयाची खात्री असल्यामुळे हास्याची कारंजी तिकडे उडत होती. ते हास्य आणि गायल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे शहरी जनतेला किती त्रास होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

  शत्रुपक्षानं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांत प्रेत फेकलेली होती. बाहेरच्या सगळ्या बागा त्यांनी जाळून टाकल्या होत्या; जंगल नष्ट केलं होतं. संरक्षक भिंतींवर तोफेचे गोळे सतत आदळत होते. बंदुकीच्या फैरी झडतच होत्या.

  भुकेले आणि अर्धमेले सैनिक निराश होऊन शहराच्या आत रस्त्यांवरुन फिरत होते. घरांच्या खिडक्यांमधून जखमींच्या कण्हण्याचे, मुलांच्या रडण्याचे आणि स्त्रियांच्या प्रार्थनांचे आवाज बाहेर ऐकू येत होते. लोक सावधपणे, कुजबुजत्या आवाजात एकमेकांशी बोलत होते. शत्रू दाराशी येऊन ठेपला होता ना!

  रात्री जास्त भयानक वाटायच्या. लोक भुकेनं आणि कष्टानं हैराण झाले होते. त्यांचे आक्रोश दूरवर ऐकू जात होते. संरक्षक भिंती बऱ्याच जागी नष्ट झाल्या होत्या. त्यावरुन काळ्या सावल्या फिरायच्या. शत्रूच्या छावण्या दिसेनाशा व्हायच्या. तलवारीच्या घावांनी पोचे गेलेल्या चिलखताप्रमाणे दिसणारा चंद्र बाजूच्या पर्वतांमधून उगवे.

  शहरातल्या जनतेनं सुटकेशी आशा सोडून दिली होती. तो चंद्र, क्वचित त्याच्या उजेडात दिसणाऱ्या छावण्या, दूरचे पर्वत आणि दऱ्याखोरी बघून लोकांचा भयानं थरकाप उडायचा. आता मृत्यू अटळ होता. त्यांना दिलासा देण्यासाठी आकाशात एक तारासुद्धा दिसत नव्हता.

  घरात दिवे लावायचीसुद्धा लोकांना भीती वाटत होती. सगळे रस्ते रात्री काळोखात बुडून जायचे. नदीच्या तळातून एखादा मासा फिरत यावा त्याप्रमाणे, डोक्यापासून पायापर्यंत काळा बुरखा घातलेली एक स्त्री आवाज न करता, दबकत रस्त्यावरून चालली होती.

  लोकांनी जेव्हा तिला पाहिलं, तेव्हा ते एकमेकांशी कुजबुजले : ‘ही तीच आहे का?’
  ‘होय, तीच आहे!’

  काहीजण बाजूच्या इमारतींमधे दडले आणि काही तिच्या मागोमाग माना खाली घालून, अंतर राखून चालत राहिले. गस्त घालणाऱ्या प्रमुखानं कडक शब्दांत तिला बजावलं :
  ‘पुन्हा बाहेर चाललीस, मोना मारियाना?’ जपून जा. तुला कोणीतरी मारून टाकेल, आणि त्या गुन्हेगाराचा शोध घेण्याची कोणाला गरजही वाटणार नाही…

  ती ताठ उभी राहून जागेवरच थांबली, पण गस्तवाले लोक सरळ निघून गेले. एकतर तिच्या विरुद्ध हात उचलायला ते धजावत नव्हते, किंवा तिच्याबद्दल त्यांना तिरस्कार वाटत होता. सशस्त्र लोक एखाद्या प्रेताप्रमाणे तिला टाळत होते. ती एकटीच अंधारातून पुढे पुढे चालत राहिली होती; जणु शहराचं दुर्दैव नि:शब्दपणे तिच्या रूपानं फिरत होतं. आतल्या सैनिकांचा धीर पूर्णपणे सुटला होता. रडणे, कण्हणे, प्रार्थना आणि हळू आवाजातली कुजबुज एवढंच त्यांच्या हातात राहिलं होतं.

  शहराची नागरीक असलेली ती ‘आई’ चालताना आपल्या मुलाचाच विचार करत होती – आपल्या देशाचा तो प्रसन्न, देखणा पण हृदयशून्य मुलगा! थोड्याच काळापूर्वी ती त्याच्याकडे अभिमानानं बघत असायची. आपण देशाला एक मौल्यवान हिरा भेट दिला होता, अशी तिची समजूत होती. त्याच शहरात ती वाढली होती आणि तिचा मुलगाही लहानाचा मोठा झाला होता. त्याची शक्ती, नेतृत्व जनतेला खूप उपयुक्त ठरेल, असा तिला विश्वास होता. तिच्या पूर्वजांनी अपार कष्ट करून आपली घरं बांधली होती आणि शहाराभोवती दगडी भिंती उभारल्या होत्या. नातलगांच्या कबरी त्याच गावात होत्या. शहरवासियांच्या आशा-आकांक्षा, आख्यायिका तिला चांगल्याच माहित होत्या. हे सगळं आता तिला स्मरत होतं. तिचा लाडका आता हातातून गमावला होता, आणि तिचं हृदय त्यामुळे मूक रूदन करत होतं.

  मुलाबद्दलची माया आणि मातृभूमीबद्दलचं प्रेम, यात श्रेष्ठ काय याचा ती विचार करत होती. कोणाला झुकतं माप द्यायचं हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे ती रस्त्यांवरून फिरत राहिली होती. तिला न ओळखल्यामुळे काहीजण भीतीनं दूर जात होते- जणु मृत्यूच कृष्णकाया धारण करून अवतीर्ण झाला असावा. नाहीतरी तो आता जवळ येऊन ठेपलाच होता. ज्यांनी तिला ओळखलं ते एका देशद्रोही मुलाची आई म्हणून गुपचुप तिला टाळत होते.

  एक दिवस शहराच्या दूरवरील ओसाड जागी, भिंतीजवळ तिला दुसरी एक बाई एका प्रेताजवळ खाली वाकलेली दिसली. इतकी निश्चल की ती जमिनीचाच एक भाग वाटत होती. दु:खानं व्याकूळ होऊन तिनं प्रार्थना करत वर आकाशाकडे पाहिलं. भिंतीच्या वर सैनिक आपली शस्त्र सावरत हळू आवाजात बोलत होते.
  देशद्रोह्याच्या आईनं विचारलं.

  ‘तुझा नवरा?’
  ‘नाही’
  ‘मग तुझा भाऊ?’
  ‘माझा मुलगा. नवरा तेरा दिवसांपूर्वी मारला गेला आणि आज मुलगा!’
  गुडघ्यावर बसत त्या मृत मुलाची आई नम्रतापूर्वक म्हणाली : ‘येशू ख्रिस्ताची आई सगळं बघत आहे आणि तिला सगळं कळतं; मी तिच्याबद्दल कृतज्ञ आहे!’
  ‘कशासाठी? पहिलीनं विचारलं, आणि दुसऱ्या बाईनं उत्तर दिलं :

  ‘देशासाठी लढताना आता त्याला वीरमरण आलं, याचा मला अभिमान आहे. मला त्याच्याबद्दल एक भीती वाटत होती. तो फार कोमल अंत:करणाचा होता, पण खूप शूर! आपल्या देशाला तो दगा देईल का, हीच ती भीती होती- जसा मा रिआनाच्या मुलानं दिला. तो देव आणि मानवजातीचा वैरी आहे – आता शत्रुपक्षाचा नेता बनला आहे. तो आणि त्याला जन्म देणाऱ्या आईला लोक शिव्याशाप देत आहेत.’

  मारियानानं आपला चेहरा झाकला आणि तिथून दूर निघून गेली.
  (पूर्वार्ध)
  —मूळ लेखक : मॅक्झिम गॉर्की
  स्वैर अनुवाद : रवींद्र गुर्जर
  (rvgurjar123@gmail.com)