Meenakshi Valke Alchemy of bamboo chandrapur maharashtra nrvb

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात आदिवासी मुलामुलींना ४० दिवस बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन मीनाक्षी वाळके यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तसेच, बांबूवर क्यूआर कोड साकारण्याचा देशातील पहिला आगळावेगळा प्रयोग यशस्वी करून आपली हस्तकलेतील प्रतिभा सिद्ध केली. बांबू हस्तकला या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान मिळविणाऱ्या सामान्य मीनाक्षीचा हा असामान्य प्रेरणादायी प्रवास

  चंद्रपूर जिल्ह्यामधील नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे मीनाक्षीचं बालपण आणि शालेय शिक्षण झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच २०१४ साली ती विवाहबंधनात अडकली आणि तिचं शिक्षणही थांबलं. विवाहानंतर आणि २०१६ साली झालेल्या मुलाच्या जन्मानंतरसुद्धा आपली ही आवड जोपासत मीनाक्षी हस्तकलेच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि प्लायवूडपासूनही पूजेची थाळी, हळदीकुंकवाचे करंडे, दागिने अशा विविध वस्तू बनवून त्याची विक्रीही करायची.

  मात्र, २०१८ साली दुसऱ्या गरोदरपणात आठ महिन्यांच्या प्रसूतीदरम्यान मीनाक्षीचं बाळ मृत प्रसूत झालं. हा प्रचंड मोठा मानसिक धक्का तिला बसला. यातून तिला बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांना खूप प्रयत्न करावे लागले. तिला आलेले नैराश्य दूर व्हावे म्हणून तिचे पती मुकेश वाळके यांनी खंबीरपणे तिला साथ देत पुन्हा हस्तकलेचा व्यवसाय तिने सुरू करावा म्हणून पाठींबा दिला. याचदरम्यान त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेल्या तिच्या पतीच्या मित्रानं मीनाक्षीला बांबू प्रशिक्षण केंद्रात बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला आणि इथूनच तिच्या व्यवसायाला कलाटणी मिळाली.

  चंद्रपूरमधेच ‘बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’ या संस्थेत मीनाक्षीने प्रशिक्षणासाठी अर्ज केला. या प्रशिक्षणासाठी असलेली निवडप्रकिया मीनाक्षीने यशस्वीपणे पार केली. याविषयी ती म्हणाली, “माझ्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मलाच प्रयत्न करायला हवेत याची जाणीव झाली. या बांबू प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली होती.

  या प्रशिक्षणात लॅम्प, फुलदाणी, चटई, इ. पाच-सहा प्रकार बनवायला शिकवले. माझं हे प्रशिक्षण संपलं, तेव्हाच नेमकं नागपूर येथे एक प्रदर्शन भरलं होतं. मी बांबू प्रशिक्षण घेतलं खरं, पण मला उद्योगासाठी लागणाऱ्या कोणत्याच गोष्टींची माहिती नव्हती. मग मी बांबू प्रशिक्षण केंद्रातूनच काही वस्तू खरेदी केल्या आणि या प्रदर्शनात भाग घेतला. बांबूपासून तयार केलेल्या या वस्तू लोकांना आवडतात आणि या वस्तुंना मागणी आहे, हे माझ्या लक्षात आलं. मग मी स्वतःच संपूर्णपणे या क्षेत्रात उतरायचं ठरवलं.’

  बांबू प्रशिक्षण केंद्रातून मीनाक्षी यांना एक टूलकिट मिळालं होतं. ते टूलकिट आणि ५० रुपयांचा एक बांबू विकत घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. तेव्हा दिवाळी तोंडावरच होती. त्यामुळे त्यांनी लॅम्पशेड्स तयार केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यांच्या या पहिल्या प्रयत्नाला खूप प्रतिसाद मिळाला. राखीपौर्णिमेला त्यांनी बनवलेल्या बांबूच्या राख्यांनाही देशविदेशातून प्रचंड मागणी येऊ लागली आहे.

  राखीपौर्णिमेला बांबूच्या राख्यांची आणि दिवाळीत लॅम्पशेड, बास्केट, बांबूचे तोरण, कंदील स्टॅन्ड यांची मागणी त्या सध्या त्यांच्या हाताखाली असलेल्या १५ ते २० महिलांच्या साथीने पूर्ण करतात. या माध्यमातून मीनाक्षी यांनी ‘अभिसार इनोव्हेटीव्ह’ हा आपला ब्रँड तयार केला आहे.

  मीनाक्षी यांचे बांबू हस्तकलेतील कौशल्य पाहून अहमदाबाद येथील त्यांचे फेसबुक मित्र विरेंद्र रावत यांनी त्यांना २०१९ मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या पर्यावरणपूरक थीम असलेल्या ‘मिस क्लायमेट’ या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूपासून मुकुट तयार करण्याची ऑफर दिली. मीनाक्षी यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान होतं. या विषयी मीनाक्षी म्हणाली, “यापूर्वी मी कधीच बांबूचा मुकुट बनवला नव्हता. एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी मुकुट बनवायचा हे एक मोठं आव्हान होतं. पण मी ते स्वीकारलं. मी त्यांना दोन प्रकारचे मुकुट बनवून दिले. त्यातील एक डिझाइन त्यांना आवडलं आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. जेमतेम सात दिवसांत मी १६ मुकुट त्यांना बनवून दिले. भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूचे मुकुट वापरण्यात आले होते. या कार्यक्रमाचं मला खास आमंत्रण होतं. व्यासपीठावर सर्वांसमक्ष मला सन्मानित करण्यात आलं. हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता.’

  मीनाक्षीच्या एका नेहमीच्या ग्राहकाने तिला बांबूवर क्यूआर कोड बनविण्याचं आव्हान दिलं. तिनं ते स्वीकारून अनेक प्रयोगाअंती अथक मेहनतीने लेझर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बांबूचा क्यूआर कोड साकारला. देशातील हा पहिलाच प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. यानंतर ऑर्डरनुसार जवळजवळ चारशेच्या आसपास क्यूआर कोड मीनाक्षीने बनविले आणि अजूनही मागणी येत आहे.

  या प्रवासाविषयी मीनाक्षी म्हणाली, ‘मी जेव्हा बांबूच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. तेव्हा लोकं मला नावं ठेवत होती की, काय ही वेड्यासारखी बांबू शिवत बसते. पण मी लोकांकडे मुळीच लक्ष न देता माझं काम चालू ठेवलं. पूर्वी मी महिलांना सांगायची की तुम्हीही हे शिका. आता महिला स्वतः पुढे येऊन ‘आम्हाला हे शिकवा. आम्हाला रोजगार द्या’, म्हणून सांगतात. पुढेही महिलांना जास्तीत जास्त काम मिळावे म्हणून कर्ज काढून मी जागा घेतली असून त्यात आधुनिक प्रशिक्षणाची व्यवस्था असेल. या माझ्या प्रवासात पतीची भक्कम साथ मला आहे.’

  मीनाक्षीने आपल्या कर्तृत्वावर अनेक मानसन्मान मिळविले आहेत. ‘एमपीएससी’च्या अभ्यासक्रमातही मीनाक्षीच्या कार्याची दखल घेऊन त्यावर प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. तर यावर्षी ‘मातृशक्ती’चा तेजस्विनी पुरस्कार, उद्योग क्षेत्रासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’चा राज्य युवा पुरस्कारही मिळवला आहे.

  अनघा सावंत

  anaghasawant30@rediffmail.com