महाराष्ट्र ऑलिम्पिक : प्रयोग उत्तम; पण…

स्वातंत्र्यानंतर खाशाबा जाधव यांच्या कुस्तीमधील कांस्यपदकाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधील हे पदक महाराष्ट्रातील क्रीडापटूचे पहिले आणि आतापर्यंतचे शेवटचे पदक. ७१ वर्षांच्या महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपलेला नाही. हाच दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने तब्बल २२ वर्षांनी ‘मिनी ऑलिम्पिक’ हे ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ असे नवे नाव धारण करीत पुन्हा सुरू झाले. परंतु काही त्रुटींमुळे त्याचा सार्थकी लागेल का, हा प्रश्न कायम राहतो.

    नुकतीच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा असंख्य वादांचे अडथळे ओलांडत पार पडली. शिवराज राक्षे या नव्या ‘महाराष्ट्र केसरी’ने परंपरेप्रमाणे चांदीची गदासुद्धा उंचावली. या स्पर्धेला उपस्थित मोठ्या जनसंख्येपुढे राजकीय पुढाऱ्यांनी कुस्तीपटूंचे मानधन आणि निवृत्तवेतनात तिप्पटीने वाढ करण्याची घोषणा केली आणि टाळ्याही मिळाल्या. पण या टाळ्या गेले अनेक वर्षे ‘महाराष्ट्र केसरी’चे गुणगान गाण्यात धन्यता मानत आहेत.

    खाशाबा यांच्यानंतर सहा ऑलिम्पिक पदके भारताने पटकावली. हे पदक महाराष्ट्राचा कुस्तीपटू का पटकावू शकला नाही? राज्यात सर्वाधिक शासकीय लाभ हे कुस्ती खेळाला मिळतात. तीनदा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळालेल्या कुस्तीपटूला थेट सरकारी नोकरीसुद्धा दिली जाते. पण खाशाबा यांची पुण्याई आणि नंतर पदकाची अपूर्णता या कारणास्तव केलेल्या गुंतवणुकीचे रसाळ गोमटे ऑलिम्पिक ‘पदकफळ’ मात्र मिळालेले नाही.

    टोक्योत २०२१ला झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे ११९ क्रीडापटू सहभागी झाले. देशाच्या लोकसंख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राची ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंची ही संख्या अतिशय निराशाजनक आहे. परंतु देशाच्या लोकसंख्येपैकी फक्त १.८ टक्के वाटा असलेल्या हरयाणाकडून ३० क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले, नव्हे पदकेही जिंकली.

    २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा राज्यनिहाय आढावा घेतल्यास हरयाणाच्या क्रीडापटूंनी ६६ पैकी २२ पदके जिंकली होती, तर महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी फक्त ८ पदके जिंकली होती. स्पर्धापात्रता आणि पदकप्राप्ती यांच्यातील ही तफावत गेली अनेक वर्षे प्रकर्षाने दिसून येते आहे. ऑलिम्पिकपात्रतेत हरयाणानंतर दुसरा क्रमांक पंजाबचा लागतो. या राज्याचे १६ क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. त्यापैकी ११ हे हॉकीपटू आहेत. भारताने पुरुषांच्या हॉकीत ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले, तर महिलांमध्ये चौथे स्थान मिळवले. परंपरागत हॉकीची मक्तेदारी जशी पंजाबने आजमितीपर्यंत जपली.

    तशी महाराष्ट्राला कुस्तीमध्ये नाही सिद्ध करता आली. खाशाबा हे साताऱ्याचे, तर राज्यात कोल्हापूरमध्ये कुस्तीच्या अनेक जुन्या तालमी आहेत. आता पुणे हे कुस्तीचे केंद्रस्थान झाले आहे. पण महाराष्ट्राच्या कुस्तीने केवळ केसरीची गदा आणि राज्य शासनाकडून मिळणारे लाभ यातच धन्यता मानली.

    महाराष्ट्र शासनाने मोठ्या उत्साहाने आयोजित केलेल्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला वार्षिक कार्यक्रमपत्रिकेत स्थान देतानाही धडपड करावी लागली. राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले. याबाबतीत कबड्डीचेच उदाहरण घेऊया.

    महाराष्ट्राच्या पुरुष संघाने त्याआधी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही त्याची पुनरावृत्ती केली. राष्ट्रीय स्पर्धेत पूर्णत: महाराष्ट्राचा संघ खेळला. त्यापैकी काही खेळाडूंना नोकरीही नाही. पण त्यांना बक्षीस कुणामार्फतही मिळाले नाही. पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात रेल्वे आणि विदर्भाचाही समावेश असतो. मग राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघाबाहेर गेलेले खेळाडू या पैशांना मुकले, ही वस्तुस्थिती कशी नाकारून चालेल.

    गेल्या शंभर वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि टेनिस अशा आठ क्रीडा प्रकारांमध्ये पदके मिळवली आहेत. अगदी हुकलेली पदके आणि भविष्यातील आशा या दोन्ही पद्धतींचा विचार केल्यास हा आकडा २०पर्यंत जाऊ शकेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता, तर मध्य प्रदेशात होणाऱ्या आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत २७ क्रीडा प्रकार आहेत. मग महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ४० क्रीडा प्रकारांचा समावेश कशासाठी? यातील काही क्रीडा प्रकारांना ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यताही नाही.

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सेनादलानंतर दुसरा क्रमांक पटकावला. एक राज्य म्हणून तसा पहिलाच, असा टेंबा महाराष्ट्राकडून मिरवला जातो आहे. या यशात मल्लखांब (६ सुवर्ण, ५ रौप्य, २ कांस्य = एकूण ११ पदके), योगासने (५ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य = एकूण १४ पदके) आणि रोलर स्केटिंग (५ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य = एकूण ११ पदके) या तीन क्रीडा प्रकारांचा महत्त्वाचा वाटा आहे.

    कबड्डी (छत्रपती शिवाजी महाराज चषक), कुस्ती (खाशाबा जाधव चषक), खो-खो (भाई नेरूरकर चषक) आणि व्हॉलिबॉल या चार क्रीडा प्रकारांच्या राज्य शासनाकडून स्पर्धा होतात. कोरोना कालखंडात त्या स्थगित झाल्या. मोठी आर्थिक तरतूद केलेल्या या स्पर्धा अस्तित्वात असतानाही दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना दरवर्षी स्थान देण्याची आवश्यकता आहे का? कारण ज्या वर्षी राज्य ऑलिम्पिक स्पर्धा असतील, त्या वर्षी या स्पर्धांचे आयोजन करणे अतिशय कठीण जाणार आहे. एकंदरीतच महाराष्ट्राच्या यशाचे विश्लेषण आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचे धोरण हे सारे खरेच ऑलिम्पिक लक्ष्यप्राप्तीसाठी पुरक आहे का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.

    हुकलेली ऑलिम्पिक पदके

    < या पदकदुष्काळात आशेची किरणे ठरलेल्या महाराष्ट्राच्या काही हुकलेल्या पदकांचाही परामर्श घेणे महत्त्वाचे ठरेल.

    < १९५२मध्ये मिरजच्या केशव माणगावे (६२ किलो) यांचे कांस्यपदक एका गुणाने हुकले होते.

    < नेमबाज अंजली भागवतने तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. १९८४नंतर अंतिम फेरी गाठणारी ती भारताची पहिली क्रीडापटू ठरली. हे यश तिला पदकामध्ये परावर्तित करता न आल्याची खंत आजही तिला बोचते आहे.

    < हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी (१९९२, १९९६, २००० आणि २००४) चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. परंतु हॉकीचा सुवर्णकाळ ते आणू शकले नाहीत.

    < २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ललिता बाबरने ३००० मीटर्स स्टीपलचेस या अ‍ॅथलेटिक्समधील प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले. अ‍ॅथलेटिक्समधील तिचा हा पराक्रम कौतुकास्पद असाच होता.

    < २०१६ मध्ये बीडच्या दुष्काळी भागातील नौकानयनपटू दत्तू भोकनळने लक्ष वेधले. परंतु ऑलिम्पिकनंतर प्रतिष्ठा, पैसा यामुळे त्याची कारकीर्द डागाळली.

    प्रशांत केणी

    prashantkeni@gmail.com