इये स्वगताचिये नगरी!

स्वगतांमुळे नाटक अधिक खोलवर बघण्याची परिपक्व रसिकदृष्टी मिळते. कारण स्वगतात प्रामाणिकपणे मनस्वी सहजसंवाद असतो आणि स्वगतांनी भरलेली नाटके म्हणजे नाट्य व साहित्य म्हणून भूषणास्पद आहेत. मनापर्यंत भिडण्याचा ती प्रयत्न करतात. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, वसंतराव कानेटकर, प्रेमानंद गज्वी अशा दिग्गज नाटककारांनी हे वैभव आजवर संहितेत जपले आहे.

  स्वगतांना रंगभूमीवर मानाचे व महत्त्वाचे स्थान आहे. ‘एकोक्ती’ किंवा ‘मोनोलॉग’ असेही त्याला म्हटले गेले आहे. जागतिक रंगभूमीवरही स्वगतांना एकूणच नाट्यनिर्मितीमध्ये अग्रक्रम देण्यात आलाय. स्वगतांशिवाय नाटक म्हणजे पिठाशिवाय जेवण असेही म्हटले जाते.

  या स्वगतांमुळे रसिकांशी कुठेतरी थेट संवाद साधला जातो. त्यांच्यापुढे मनातल्या दाबलेल्या घटनांचीही नोंद घेतली जाते. अगदी परकीय रंगभूमीवरही ‘टू बी ऑर नॉट टू बी श, जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे!’  हे स्वगत जे हॅम्लेट मधील गाजले. किंवा ‘मॅकबेथ’मध्ये ‘टुमारो टुमारो ॲन्ड टुमारो’हे स्वगतही ऐतिहासिक ठरलय. शेक्सपिअरने आपल्या भोवती नाटकांमध्ये स्वगतांचा पुरेपूर वापर केला आहे. जो नाट्य रंगतदार होण्यास कारणीभूत ठरला आहे. एकूणच नाट्यसंहितेत स्वगतांच महत्त्व, हे नाट्य प्रभावी होण्यासाठी एक शब्द हत्यार असे मानले जाते.

  मराठी रंगभूमीवरही स्वगतांची परंपरा आहे. अनेक स्वगते ही रसिकांच्या तोंडपाठही आहेत. मराठीत पहिली आदर्श शोकांतिका म्हणून ओळखले जाणारे ‘एकच प्याला’ हे नाटक म्हणजे मराठी साहित्य आणि नाटक या दोन्हीकडे वैभवच आहे. नाटकाने वयाची शंभरी जरी पार केली तरीही नव्या पिढीला हे नाटक रंगभूमीवर आजही करण्याचा मोह होतो. राम गणेश गडकरी यांच्या संहितेतली जादू ही पुढे अनेक पिढ्यांनी अनुभवली. सुधाकराचे ‘बस्स’ दुर्दैवाचे दशावतार! हे स्वगत तसेच ‘भाऊसाहेब माझे डोळे हे साफ उघडले!’हे देखील स्वगत म्हणजे मैलाचं निशाण ठरलंय. स्वगतांमुळे शोकात्म अनुभव देणारे नाट्य म्हणून भारावून सोडते. संहिता म्हणून एक अद्वितीय नाट्यकृती म्हणून ‘एकच प्याला’ सिद्ध झाला.

  कुसुमाग्रजांनी स्वर्गातून अमृताचे कुंभ भरून आणले आणि डॉक्टर लागूंनी रत्नजडित चषकांमधून ते अमृत प्रेक्षकात मुक्तहस्ताने उधळले! असे नाटक ‘नटसम्राट!’ त्यातील स्वगते म्हणजे मराठीतले अमृताचे कुंभ आहेत. हेच खरे!

  ‘नटसम्राट’ हे नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांनी सुद्धा केले आहे. त्यांचे ‘नटसम्राट’ करण्याचे स्वप्न त्यांनी प्रयोगांपुरते का होईना पूर्णत्वाला आले. एका मुलाखतीत पंत म्हणाले होते, ‘नाटकातील तात्यांची भरजरी भाषा आणि सर्वात मोलाचं म्हणजे एकापेक्षा एक स्वगतं याचा मोह मला झाला आणि मी ‘नटसम्राट’च्या भूमिकेत शिरलो!’

  तात्यासाहेब म्हणजे संवाद आणि स्वगतांची जादुगिरीच. त्यांची अनेक नाटके रंगभूमीवर आली. गाजली पण त्यांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील गणपतराव बेलवलकर यांची स्वगते ही आजही आदर्श म्हणून ओळखली जातात. त्यातील ‘कुणी घर देता का घर’ आणि ‘दूर व्हा हा ज्युलिअर सीझर…..’ या दोन स्वगतांची आजही एकपात्री स्पर्धेत हजेरी आहे. त्यातील शब्दाशब्दात काव्य, ताल आणि अभिनय गच्च भरलेला.

  बेलवलकर म्हणतात-

  ‘कुणी घर देता का घर

  एका तुफानाला

  कुणी घर देता का घर

  एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून 

  माणसांच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून 

  जंगला जंगलात हिंडत आहे

  इथून कोणी उठवणार नाही

  अशी जागा धुंडतं आहे

  कुणी घर देता का घर’

  आणि – ‘मी आहे ज्युलिअर सीझर! मी आहे ऑथेल्लो! मी आहे प्रतापराव! सुधाकर आणि हॅमर हॅम्लेट! आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट! सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामियान्यात रहायला आले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारींना कायमचे आव्हानच! चिरंतन आव्हान! ते पहा मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी उपसल्या आहेत. या ज्युलिअस सीझरला मारण्यासाठी, मला चहुबाजूंनी घेरलय तो मारेकरी ओरडतोय मारा मारा! कट्यारी चालवा! कोण तू ग्रुप ब्रुक्स.  तू सुद्धा! मग मर – सीझर, मर असं-असतं नाटक राजा. अस.’

  ‘न्यायमूर्ती महाराज! पण तो मी नव्हेच!! आपण कसलाही विचार न करता दहा काळ्यापाण्याची शिक्षा पंचवीस फाशीची शिक्षा बेधडक मला द्या. बिलकुल भिऊ नका. माझ्या या बलिदानाने जर मध्यमवर्गीय सुशिक्षित मुलींच्या विवाहाचा प्रश्न उद्या सुटला आणि त्यांच्या आई-बाबांना अक्कल आली तर माझे हौतात्म समाजाच्या सार्थकी लागेल, असे मी समजेन!’

  तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे यांचे गाजलेले नाटक आणि त्यातील लखोबा लोखंडे यांची साक्ष म्हणजे बिलंदर बहुरूपी स्वगताचे दर्शनच! जे मराठी रसिकांनी अनुभवले. त्याला उत्स्फूर्त दाद दिली. प्रभाकर पणशीकर यांनी ‘तो मी नव्हेच’ म्हणत ‘एक कोर्ट ड्रामा’ उभ्या महाराष्ट्रात पोहचविला. नाबाद पाचहजार प्रयोगांचा जागतिक विक्रमही या नाट्याने केला आहे. यातील व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव हे अनेक संवाद स्वगत यातून प्रभावीपणे आलेत. ‘तो मी नव्हेच’ शिवाय मराठी नाट्य इतिहासाला पूर्तता नाही, हेच खरे!

  विजय तेंडुलकर लिखित डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक तेंडूलकरांच्या भाषेत-‘ऐतिहासिक आधार असलेली एक अनैतिहासिक नृत्य संगीतमय दंत कथा’ असे आणि नाटकाचे वर्णन करता येईल. ‘जा घाश्या अक्कर माशा, केला तुला कोतवाल! खुशाल हमामा घाल. पण या नावाची चाल तुला ठावी नाही. अरे यावेळी ही राजकारणी बंदूक ठासली आहे दु बारी! पहिल्या बारात नवीन लोळवीन तुझी लुसलुशीत पोरगी पण दुसऱ्या बाराने खेळवीन हा नाना सारी पुण्यनगरी! घाश्या, लेका तू उपरा. तुस बसवला आहे पुण्यनगरीच्या माथी कशास?’ हे स्वागतही नाटकाप्रमाणे दंतकथा ठरली. एक काळ उलटला असला तरीही याचे प्रयोग होतच आहेत मग भाषा, देश कुठलाही असो! हिंदीतही याचे प्रयोग रंगभूमीवर सुरू आहेत.

  ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हे स्वगत ठसक्यात म्हणणारी पुल देशपांडे यांची ‘ती फुलराणी’ मराठी रसिकांना विसरता येणं शक्य नाही. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी – या अभिनेत्रींनी फुलराणीचा अवतार चढवून आजवर स्वगतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कालानुरूप ‘फुलराणी’ जरी बदलत गेली तरी स्वगतांचे सादरीकरण बदलले नाही. कारण नाटकातील तीच खरी ताकद ठरलीय. बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या नाटकावरून मराठीत पुल देशपांडे यांनी १९७५ साली रंगभूमीवर आणले. लेखनासह दिग्दर्शनाचीही जबाबदारी त्यांनीच सांभाळली.

  फुलवाल्या मंजुळाची स्वगत म्हणजे नाटकातील सर्वोच्च क्षण. ‘थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोठा समजतो सोतःला मास्तर, तुजं गटारात घालजा शास्तर, तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या तोंडात घालीन शान, तुजा क,  तुजा क,  तुजा ग, तुजा घ मारे पैजेचा घेतोय इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा! तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज, माझी चाटत येशील बूटं, मी म्हणलं आज इकडं कुठं? हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा शुद्ध बोलायला शीक! स्वगत हे मराठी साहित्यातील एक कोंदण ठरलंय. पुलंनी त्यात काव्यात्मकता भरलीय. अभिनयासाठी जागाही दिल्यात. ‘ती फुलराणी’तले संवाद आणि स्वगते यावर नाट्य अभ्यासक स्वतंत्रपणे विचार करतात. स्वगतातील एकेक वैशिष्ट्य ही भारावून सोडतात. भक्ती बर्वे यांची मंजुळा आणि स्वगतातील उच्चार म्हणजे एका पिढीतील रसिकांपुढे चमत्कारच ठरला आहे.

  स्वगतांच्या या दुनियेत व्यवसायिक रंगभूमीवर १९९१-९२च्या सुमारास चर्चेत असलेले प्रेमानंद गज्वी यांच्या ‘किरवंत’ या नाटकाची दखलही वेगळ्या वाटेवरलं नाट्य म्हणून दखलही घ्यावी लागेल. ‘रूपवेध’ आणि ‘सुयोग’ यांची निर्मिती होती आणि दिग्दर्शन तसेच प्रमुख भूमिका ही डॉ. श्रीराम लागू यांनी केलेली. जन्माने ब्राह्मण पण स्मशानकार्य करणाऱ्याला समाजात टाळलं जातं. ब्राह्मणामधला जणू अस्पृश्य म्हणून त्याच्याशी वर्तन करण्यात येतं. नेमक्या याच नाटकाची निवड करून डॉक्टरांमधला समाजसुधारक जागा झाला आणि त्यांनी नाटकाची निर्मिती केली. सिद्धेश्वरशास्त्रींची भूमिका आणि त्यांचे शेवटचे स्वगत जे स्वगत आणि अभिनयातून जिवंत केलं.

  ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील शिवाजीराजे यांची काही स्वगते तर ‘एक शून्य बाजीराव’ यातील बाजीराव, इथे ओशाळला मृत्यू यातील संभाजीराजे, अशा शिवकाल, पेशवेकाळ जिवंत करणाऱ्या अनेक नाटकातील ‘गगनभेदी’ भूमिकांना नाटककारांनी दिलेली स्वगते ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बदलत्या नाट्यप्रवाहात एवढी तोलामोलाची स्वगते ही जरी दिसत नसतील तरी त्यादृष्टीने काही नव्या नाटककारांचे प्रयत्न हे संहितेतून निश्चितच दिसतात. एखादे नाटक, एखाद्या व्यक्तिरेखाच्या थेट संवादामुळे एक प्रेक्षक म्हणून खडबडून जाग करतं, विचार करायला भाग पाडतं तेव्हा तो संवादरुपी स्वगताचा विजय ठरतो.

  विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक. त्यातील लीला बेणारे हिची स्वगते जी सुलभा देशपांडे या श्रेष्ठ अभिनेत्रीने जिवंत केली. एक लक्षवेधी भूमिका ठरली.

  बदलत्या काळात नाटकातील स्वगतांवर कात्री फिरविली जाते. त्यामुळे भाषेचे सौंदर्य कुठेतरी तोडले जाते. ‘तो मी नव्हेच’ मधला लखोबा किंवा ‘नटसम्राट’मधला आप्पासाहेब, ‘पुरुष’मधला गुलाबराव, ‘फुलराणी’तली मंजुळा, ‘संध्याछाया’तली नाना-नानी, अशा शेकडो भूमिकांना काव्यात्मक स्वगवतांचे वैभव आहे. पण नव्या तंत्रज्ञानात आणि फास्टलाईफमुळे मोराचा पिसारा कापून त्याची कोंबडी होऊ नये, ही अपेक्षा!

  – संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com