
आज काळ खूपच पुढे सरकतोय. आणि वाढत्या मनोरंजन वाहिन्या, नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म यांना 'दाखवण्यासाठी' सतत काही ना काही हवे आहे. मनोरंजन क्षेत्राने खूपच मोठ्या प्रमाणावर कात टाकली आहे आणि आता आर्थिक दृष्टिकोन विकसित करुन बहुभाषिकता ही या क्षेत्राची नवीन ओळख आहे. डिजिटल युगातील हे निश्चितच पुढचे पाऊल आहे...
एकाच दिवशी आलेले आजच्या ग्लोबल युगातील मनोरंजन क्षेत्राचे दोन अनुभव. दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांच्या ‘पेट पुराण’ या वेबसीरिजच्या निमित्ताने सई ताह्मणकर आणि ललित प्रभाकर यांच्या औपचारिक भेटीचा योग आला असता समजले की, ही वेबसिरिज मराठीसह हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा एकूण सात भाषेत रसिकांसमोर आली आहे. एखादी मराठी कलाकृती एकाच वेळेस सात भाषेत असणे हे एक नवीन आणि निश्चितच पुढचं पाऊल आहे. म्हणजे मराठी भाषेत याचे चित्रीकरण झाले असून ती अन्य सहा भाषेत डब करण्यात आली आहे आणि त्याची थीम (कन्टेन्ड), सादरीकरण, मनोरंजन आणि अभिनय यांची केमिस्ट्री रसिकांना आवडली तर एकाच वेळेस सात भाषेत त्याला यश प्राप्त होईल. आता डब करताना मूळ कलाकारांच्या आवाजाच्या आसपास जाणे पुरेसे असते. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला अशा पध्दतीने अनेक भाषांतील विविध प्रकारच्या गोष्टी आकर्षित करत आहेत. ही आवडनिवड फक्त चित्रपट, मालिका, वेबसीरिज तर झालेच पण अगदी पदार्थांपासून कपड्यापर्यंत हे विकसित झाले आहे. इतर प्रांतातील अनोळखी पदार्थांचा एकदा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे अशी भावना बळावत आहे. एक नवीन चव मिळते.
दुसरा अनुभवही असाच बोलका आहे,‘१ ओटीटी’ अर्थात ‘भारत का अपना मोबाईल ओटीटी’ या ओटीटीने ‘व्हिसलिंग वूड् स इंटरनॅशनल’ (‘डब्ल्यूडब्ल्यूआय’) या चित्रपट, संपर्क व सर्जनशील कला प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य करार केला असून ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’चे संस्थापक-अध्यक्ष सुभाष घई याबाबत असे म्हणाले की, “मी जेव्हा सत्तर ऐंशीच्या दशकात चित्रपट बनवत होतो तेव्हा प्रामुख्याने हिंदीमध्ये बनवायचो, साधारण २००० सालापर्यंत एकूणच चित्रपट निर्मितीचे सातत्य होते. पण आता एकाच थीमवर विविध भाषेत चित्रपट बनतात आणि ते चांगला व्यवसायदेखील करतात. त्यामुळे आपल्याला आता कोणत्याही एका भाषेत चित्रपट बनवून चालणार नाही तर तो जास्तीत जास्त भाषेत तयार करावा लागणार आहे आणि हे सिनेमाचे भविष्य आहे. गेल्या वीस वर्षात सिनेमांमध्ये मोठा बदल आलेला आहे. आपल्या भारतात जरी तीस बत्तीस भाषा असल्या तरी बोलीभाषा या पाच हजारपेक्षा जास्त आहेत, असे सुभाष घई म्हणाले. १ ओटीटीचे स्वप्नील जोशी आणि फिरोदिया सुभाष घई यांच्या या मताशी सहमत दिसले.
या दोन्ही गोष्टीतून निष्कर्ष काय निघतो?
तर आजच्या डिजिटल मिडियाच्या युगात एका भाषेत चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसीरिज निर्माण करा आणि ती अन्य भाषेत डब करा. यामुळे एकीकडे व्यवसायवृध्दी होईल तर दुसरीकडे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचता येईल. आपले काम अशा पध्दतीने अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावे अशी अनेकांची इच्छा असते अथवा असायलाच हवी आणि डबिंग हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. सबटायटलची पध्दत केव्हाच रुळली आहे. फार पूर्वी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपटाना सबटायटल असत, आता अनेक व्यावसायिक मनोरंजक चित्रपटांनाही ती असतात. अगदी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी ’या मराठी चित्रपटालाही ती आहेत.
याच बरोबर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘वीर दौडले सात’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली असून हाही चित्रपट एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण होत आहे. हिंदीत याचे नाव ‘वो सात’ असे आहे. दिग्दर्शक ओम राऊतनेही ‘तानाजी’ हा चित्रपट असाच एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत पडद्यावर आणला. काही महिन्यांपूर्वी आपल्या मराठी चित्रपटाचा कन्टेन्ड अतिशय चांगला असतो त्यामुळे तो मराठीबरोबरच हिंदीतही निर्माण करायला हवा असे महेश मांजरेकरनी म्हटले होते आणि आता त्यानुसार पाऊल टाकले आहे. फार पूर्वी त्यांनी ‘अस्तित्व’( यात सचिन खेडेकर, तब्बू, नम्रता शिरोडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत) हा चित्रपट असाच एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण केला होता. त्या काळात अशी गोष्ट अभावानेच व्हायची. पण आता ही गोष्ट छान रुळली आहे. या सगळ्यात महत्वाचे आहे ते प्रेक्षकांचा या स्थित्यंतराचा मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद.
फार पूर्वी कमल हसनचे ‘अप्पू राजा’, ‘मेयरसाब’ असे काही मूळ तामिळ चित्रपट हिंदीत डब होऊन येऊ लागले तेव्हा ते कमल हसन विविध गेटअपमध्ये भूमिका साकारतो याचे जास्त कौतुक होते. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग वाढला. पण असे डब चित्रपट मुख्य प्रवाहात आपली जागा निर्माण करु शकले नाहीत. तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत विलक्षण ताकदवान होती. कालांतराने राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’च्या यशापासून यात वेगाने बदल होत गेला. पहिल्या भागाने दणदणीत यश संपादले म्हणून त्याचा पुढचा भागही निर्माण झाला आणि त्यानेही खणखणीत यश संपादले. या चित्रपटात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचा अतिरंजितपणा, भडकपणा, भाषा शैली, नृत्य अदा खूप मोठ्या प्रमाणात असूनही तो रसिकांनी स्वीकारला. मूळ तेलगू भाषेतील हे चित्रपट हिंदी डब असल्याबद्दल रसिकांची कसलीही तक्रार नव्हती. त्यापेक्षा या चित्रपटांमधील पडदाभरची कानोकानीची भव्यता जास्त आवडली. मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप यापेक्षा मल्टीप्लेक्सचा भारी स्क्रीन आणि उत्तम दर्जाची साऊंड सिस्टीम यांना जास्त पसंती मिळाली. पुष्पा, आर आर आर, केजीएफ २ या चित्रपटाना रसिकांची उत्फूर्त दाद मिळताना या चित्रपटाचे मूळ रुप दक्षिण भारतीय असणे हे त्रासदायक वाटले नाही. रसिकांचा हा बदलता दृष्टिकोन खूप खूप महत्वाचा फंडा आहे. काही झाले तरी प्रेक्षकांची आवडनिवड खूपच महत्वाची.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट अथवा वेबसीरिज प्रदर्शित करताना ‘भाषेची मर्यादा’ राहिलेली नाही. अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांची भूमिका असलेला सुजीत सरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो जगभरातील पंधरा भाषेतील सबटायटलने ॲमेझाॅन ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. तेव्हा जणू एका नवीन मार्गाला हिरवा कंदील मिळाला. या भाषा अशा, अरॅबिक, पोलिश, रशियन, इटालियन, जर्मन, फ्रेन्च, स्पॅनिश, पोर्तुगाल, इंडोनेशियन, मलाय, कोरियन, ग्रीक, हब्रुयू, तुर्किश आणि इंग्रजी. म्हणजे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची सकारात्मक पावले टाकली. असा विस्तारवाद आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. तात्पर्य, वसुलीच्या जणू खिडक्या वाढतात. सबटायटल आणि डब यांनी तो मार्ग आता सुस्पष्ट केला आहे. आज ‘डबिंग कला’ एक महत्त्वाची आणि चांगले उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यामुळे अनेक डबिंग आर्टिस्टना रोजगार प्राप्त झाला आहे. श्रीदेवी दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटातून हिंदी चित्रपटात आली तेव्हा अनेक वर्षे बेबी नाझ ही अभिनेत्री तिला ‘आवाज’ देत होती. तर स्मिता पाटीलच्या निधनानंतर प्रदर्शित झालेल्या रवींद्र पीपट दिग्दर्शित ‘वारीस’ या चित्रपटासाठी रेखाने स्मिता पाटीलसाठी डबिंग केले. नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘बेनाम’ या चित्रपटात तर प्रेम चोप्राला कादर खानचा आवाज देऊन रहस्यरंजकता साध्य करण्यात आली होती.
आज काळ खूपच पुढे सरकतोय. आणि वाढत्या मनोरंजन वाहिन्या, नवनवीन ओटीटी प्लॅटफॉर्म यांना ‘दाखवण्यासाठी’ सतत काही ना काही हवे आहे. वृत्त वाहिन्याना ‘चोवीस तास’ प्रक्षेपण करण्यासाठी सतत घडामोडी चालू असणं, बातम्या जन्माला येणे, वादग्रस्त गोष्टी घडणे आवश्यक आहे तसेच काहीसे हे आहे. आणि येथे निर्मितीचे अफाट पीक येताना दर्जा काहीसा दुय्यम राहिला आहे. तो राखला तर रसिकांकडून वाढता प्रतिसाद आणि त्यासह वाढत्या जाहिराती मिळताहेत. या सगळ्यातून अर्थकारण सुरु आहे आणि त्याचे गणित ज्याला जमले तो यशस्वी.
तात्पर्य, हे सगळे बदल पाहताना एकच म्हणावेसे वाटते, मनोरंजन क्षेत्राने खूपच मोठ्या प्रमाणावर कात टाकली आहे आणि आता आर्थिक दृष्टिकोन विकसित करुन बहुभाषिकता ही या क्षेत्राची नवीन ओळख आहे. डिजिटल युगातील हे निश्चितच पुढचे पाऊल आहे…
— दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com