Ashok_Patki

गेली पन्नास वर्षे मराठी रंगभूमीवर गीतकार, संगीतकार म्हणून प्रवास करणारे अशोक पत्की यांना मटा सन्मानात 'महाराष्ट्र भूषण' म्हणून यंदा गौरविण्यात आले. वैभवशाली संगीताचा वारसा जपणारा हा संगीतकार. जो पिढ्यान् पिढ्यांना आपला हक्काचा वाटला. संगीतातले विविध प्रकार ताकदीने हाताळून नाटकाचा आविष्कार रंगविण्याचे जबरदस्त कसब असणारा हा रंगप्रवासीच!

वयाची ऐंशी वर्षे केव्हाच पार केलेले संगीतकार अशोक पत्की यांच्या मराठी नाटकातील संगीतावर भाष्य करण्याचा योग नुकताच नाट्यअभ्यासकांपुढे आला, त्यावेळी या महान व्यक्तीत्त्वाच्या संगीत वाटचालीवर म्हणावी तेवढी दखल घेण्यात आलेली नाही असे वारंवार जाणवले.

केवळ नाटकांचे संगीत, गाणं यापुरता त्यांचा वावर नाही तर त्याही सोबत भावगीतांचे लेखन, चित्रपट, मालिका, जाहिराती, जिंगल्स, शीर्षकगीते असे अनेक प्रकार त्यांनी ताकदीने साकार केलेत. अगदी गर्दीतला पेटीवादक ते चित्रपट संगीतकार असा त्यांचा प्रवास. जो प्रत्येक वळणावर कल्पकता व कलात्मकता यांचा साक्षीदार ठरलाय. त्यांच्या या सप्तसुरांवर एका दमात दखल घेणं हे मुश्कीलच आहे. पण मराठी नाटकात संगीत रंगभूमीपासून ते गद्य नाटकापर्यंत तसेच प्रायोगिक नाटकांपासून ते महानाट्यापर्यंतचा त्यांचा आवाका थक्क करून सोडणारा तसेच नव्या दिशा शोधणारा.

त्यांचे वडील गिरणी कामगार. मध्यमवर्गीय कुटुंब. खेतवाडीतल्या चाळीत घर. गोवा हिंदू असोसिएशनचा जमाना. संगीत नाटकासाठी पेटीवाल्याचा शोध सुरू होता. पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत काम करण्याची संधी त्यातूनच त्यांना मिळाली. संगीत मत्स्यगंधापासून त्यांचे आणि पंडितजींचे सूर जुळले ते शेवटपर्यंत. ‘तू तर चाफेकळी’ हे नाटक शेवटचं ठरलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.

आटपाटनगरची राजकन्या, पद्मश्री धोंडीराम, नटसम्राट, सभ्य गृहस्थ, हो माणसाला पंख फुटतात, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, दुर्गी, कैकयी, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, ब्रह्मचारी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, कलम ३०२, लेकुरे उदंड झाली, ती फुलराणी, प्रियतमा, किरवंत, संध्याछाया, गांधी विरुद्ध गांधी, श्री तशी सौ, नातीगोती, मित्र, जादू तेरी नजर, शोभायात्रा, मी नथुराम गोडसे, श्रीमान योगी, चारचौघी – इथपासून ते आजही – ‘तू म्हणशील तसं, हरविलेल्या पत्त्यांचा बंगला, सारखं काहीतरी होतय, यु मस्ट डाय, नियम व अटी लागू!’ ही यादी अपूर्ण आहे. अजूनही पुढे काम सुरूच आहे. शेकडो नव्हे तर हजारो नाटकांना संगीत त्यांनी दिलय. त्यांची पूर्ण यादी प्रसिद्ध करणे म्हणजे एक पुस्तिकाच तयार करणे भाग पडेल. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते आजच्या इस्टमन कलरपर्यंतचा त्यांचा वावर! रंगमंचाच्या भाषेत सांगायचं तर रंगविलेल्या पडद्यांपासून ते आजच्या फिरत्या व डबलसेट पर्यंतची त्यांची साथसोबत आहे. तिन पिढ्यांशी त्यांची रंगकर्मीशी दर्दी रसिकांची ओळख आहे‌. याचा वारंवार अनुभव हा ते समोर असतांना येतच राहातो.

‘मोरूची मावशी’ हे आचार्य अत्रे यांचे नाटक. हे धम्माल विनोदी नाटक दोनदा रंगभूमीवर आलं. त्यावर ‘अत्रे पिक्चर्स’ तर्फे चित्रपटही निघाला. पुनरुज्जीवनात १ जानेवारी १९८५ या दिवशी ‘सुयोग’ तर्फे शुभारंभ झाला. दिलीप कोल्हटकर यांचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन अशोक पत्की! जे तुफान गाजले. त्यातील विजय चव्हाण यांच्या ‘टांग टिंग टिंगा’ला चक्क वन्समोअर मिळायचे. ‘सुयोग’ या नाट्यसंस्थेला या नाटकाने ओळख मिळाली. परदेशातही याचे हाऊसफुल्ल प्रयोग झाले. विनोदाचा पक्का ठेका त्यात होता. ‘सुयोग’चे नंतरचे अत्रे यांचेच ‘ब्रह्मचारी’ नाटकही रंगभूमीवर आले. त्यातलाही वेगळेपणा रसिकांच्या नजरेत भरला. वर्षा उसगांवकर आणि प्रशांत दामले या दोघांनी नाटक गाजविले. जुनी नाटके नव्या संचात आणि बदललेल्या वातावरणात सादर करतांना संगीतात, गाण्यात जे काही बदल करायचे ते पडद्यामागे त्यांनी केलेले‌. हे वेगळेपण असल्याने रसिकांचीही चांगली दाद मिळाली.’सुयोग’चे सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांच्याप्रमाणेच प्रशांत दामले यांच्याशीही चांगले ‘स्वरसंबंध’ त्यांचे जुळले गेलेत. प्रशांतने निर्मिती केलेल्या बहुतेक सर्वच नाटकांना संगीतकार, गीतकार म्हणून ‘अशोक पत्की’ हे नाव झळकते! दोघांचं ट्युनिंग मस्त जुळलेलं. म्हणून आजही ‘सारखं काहीतरी होतंय’ यातही प्रशांतला गाणं म्हणायला लावलय आणि ताल धरत रसिक नाट्यगृहाबाहेर पडतात. ‘माझ्या गाण्याचं शंभर टक्के श्रेय हे संगीतकार अशोक पत्की यांना आहे. त्याच्यामुळेच सारं काही शक्य होतं! असं प्रशांत वारंवार म्हणतोय.

‘गोवा हिंदू असोसिएशन’च्या नाट्य विभागाने आजवर अनेक दर्जेदार गद्य नाटके दिली. त्यावेळी दामू केंकरे यांच्यासोबत नाटकांना संगीत देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली‌. आणि दोघांची युती जुळली. दिग्दर्शक – संगीत यात एकमत व्हायचे. अनेक नाटके केली. तसे ‘अखेरचा सवाल’ हे नाटक. वसंत कानेटकर यांची संहिता आणि केंकरे यांचे दिग्दर्शन. १९७४ चा सुमार. विजया मेहता, भक्ती बर्वे यांच्या भूमिका. गंभीर आशय. पण त्याला अनुरूप संगीत मिळाले. तेव्हापासून केंकरे परिवाराशी त्यांचे नाते जुळले. नंतर विजय केंकरे सोबतही चाळीसएक नाटके केली. हॉरर – थरार असलेले यंदाच्या वर्षातले ‘यु मस्ट डाय’ हे नाटक. एका वेगळ्या वळणावरली वातावरण निर्मितीत नंबर वन ठरलेय. त्यात संगीताची कामगिरी जबरदस्तच.
तू सप्तसूर माझे
तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा
तव स्पर्श अमृताचा!
हे बोल पत्की यांचे. जे त्यांनी त्यांच्यासाठीच जणू लिहीले आहे. ‘सप्तसूर माझे’ हे त्यांचे २०१२ साली आत्मचरित्र प्रसिद्ध झाले जे मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी वाचकांपुढे देखण्या रंगरूपात दिलय. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघत आहेत.

एका संगीतकाराचा प्रवास जाणून घेण्याचं कुतहूल रसिकांना, वाचकांना आहे यातच सारं काही आलय. अनेक रंगवळणं तसंच अनुभव याने हे आत्मचरित्र परिपूर्ण झालय. अभ्यासकांसाठी संग्राह्य ठरलय.

आज २०२३ या वर्षात रविवारचे वृत्तपत्र उघडले आणि नाटकांच्या जाहिराती बघितल्या तर ‘संगीत – अशोक पत्की’ हे नाव ठळकपणे हमखास वाचायला मिळते. कारण गेली पन्नास वर्षे बदलत्या काळासोबत चालणारा ‘फ्रेश’ संगीतकार ते आहेत. गीत आणि संगीतात साधं – सरळ – ताल धरायला भाग पाडणारे. आजही प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चारचौघी नाटक; संतोष पवार लिखित – दिग्दर्शित हीच तर फॅमिलीची गम्मत आहे; ‘प्रशांत – वर्षा’ची पुन्हा एकदा जोडी जुळून आलेलं ‘सारखं काहीतरी होतंय’; प्रशांतच्याच संस्थेचे ‘नियम व अटी लागू’! – अशी किमान पाच-सहा नाटकांच्या जाहिरातीत हा संगीतकार हजर आहे. जो नाटक समृद्ध करतोय‌.

पन्नास वर्ष एक रंगकर्मी सातत्याने रसिकांपुढे आपल्यासोबत दिसतोय. त्यांनी या प्रदीर्घकाळात म्हणजे चक्क १९७२ पासून २५२ नाटकांचे पार्श्वसंगीत, ५०० पेक्षा जादा भावगीते, ३०० मालिकांची शीर्षकगीते, साडेपाच हजारावरले जिंगल्स असा आविष्कार केलाय. जो चमत्कारच म्हणावा लागेल.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महाराष्ट्रातील दिग्गजांना दरवर्षी ‘मटा सन्माना’त महाराष्ट्रभूषणाने गौरविण्यात येते. यंदा अशोक पत्की यांची निवड झालीय. जी त्यांच्या लाखोच्या चाहत्यांना सुखविणारा क्षण. ज्यांनी मराठी नाटकासाठी केलेली कामगिरी म्हणजे ‘सुवर्णअक्षरांचे सप्तसूर’च म्हणावे लागतील. या सप्तसुरांच्या प्रवासावर एखादी सर्वांगसुंदर अशी कादंबरी होऊ शकेल. या सप्तसुरांना नाट्यजागरात सलाम!

– संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com