सिंहासनासाठी ‘नाट्यसामना’ गाजला!

नाट्यपरिषदेची यंदाची निवडणूक गाजली. दोन गटातील संघर्ष हा विकोपाला, टोकाला पोहचला. थेट राजकीय हस्तक्षेपही वाढला. नाट्यसृष्टीचे पावित्र्य, वैभव, सभ्यता, वेगळेपण जपण्यासाठी जी वेळोवेळी आवाहने करण्यात येतात त्यावर अनुकरण दिसले नाही. नाट्यसृष्टीच्या सत्तेसाठी झालेल्या सिंहासनावर चॉकलेट हिरो प्रशांत दामले यांच्याकडे निर्विवाद विजेतेपद चालून आलंय. आता नवा डाव कुशलतेने मांडण्याची त्याची जबाबदारी वाढलीय

  राजकारण्यांनाही आपण दोन पावले मागे आहोत, असं वाटणारी यंदाची नाट्यपरिषदेची निवडणूक रंगली. आरोप – प्रत्यारोप, लपवाछपवी, नकार – होकार, आश्वासने – प्रतिआश्वासने आणि सर्वात हादरून सोडणारी बाब म्हणजे विजेतेपदासाठी राजकीय पक्षाचा पाठींबा आणि पाठबळाची अपेक्षा! नाट्यपरिषदेचे अध्यक्षपद आणि सत्ता म्हणजे एखादी आमदारकी किंवा खासदारकीच्या निवडणुकीपेक्षा रंगतदार झाली. त्यामुळे नाट्यसृष्टीकडे बघण्याच्या रसिकांच्या नजरा या बदलणे स्वाभाविकच आहेत.

  महाराष्ट्रात नुकत्याच रंगलेल्या सत्तांतर नाट्याचे पडसाद याही निवडणुकीत पडलेले दिसले. या निवडणुकीसाठी राज्यभरातून साठ एक सदस्य हे १६ मे पूर्वी मुंबईत दाखल झाले. त्यातील सुमारे चाळीस एक मतदार असलेल्या सदस्यांची म्हणे नवी मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलात व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनाही ‘मुंबईदर्शन’चा लाभ मिळाला.

  ‘खाना – पिना – घूमना’याने सारी यंत्रणा सज्ज होती… अशा एक ना दोन, अनेक बातम्या या त्या आठवड्यात धडकतच होत्या. ज्या चक्रावून सोडणाऱ्या होत्या. काहींच्या मते पूर्ण ‘गुवाहाटी पॅटर्न’प्रमाणे सारंकाही ‘ओके’ करण्यात आलं होतं. नवी मुंबईतल्या ‘रमाडा’ या हॉटेलपासून ते थेट नाट्यपरिषदेच्या निवडणूक केंद्रापर्यंत विश्वासू मंडळींची फौज सज्ज होती. आता या साऱ्या प्रकरणाची सत्यता किंवा असत्यता यावर भाष्य करण्यापेक्षा एकंदर कधी नव्हे तेवढी राजकीय अटीतटीचा ‘सामना’ हा नाट्यपरिषदेच्या ‘सिंहासना’साठी रंगला आणि उभ्या जगाला नाट्यपरिषदेत आता राजकारण्यांप्रमाणे राजकारण शिरले असल्याचे उघड झाले.

  नाट्यपरिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचं ‘आपलं पॅनल’ विरुद्ध हाउसफुल्ल सम्राट प्रशांत दामले याचे ‘रंगकर्मी समूह’ हे दोघे गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. दोघेही निर्माते. प्रशांत हा ग्लॅमरस रंगकर्मी. प्रसादला त्याचे वडील मच्छिंद्र कांबळी यांचा वारसा. आधी प्रसाद कांबळी हे निवडणूक लढविणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही अनेकांनी ठामपणे वर्तविली होती; पण ऐनवेळी प्रसादने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने उत्कंठा वाढली.

  ही निवडणूक दोन टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यात नियमक मंडळाची निवडणूक. त्यात निर्विवाद बहुमत हे प्रशांतच्या पारड्यात पडले. पण राज्यभरातले ६० सभासदांसह दुसऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत प्रशांत अध्यक्षस्थानी आणि त्याची ‘टिम’ सत्तेवर आली. झालेला जल्लोष हा कमालीचा होता. प्रसाद त्यात ‘विजेचा’ ठरू शकला नाही. स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरला. असो.

  दोन वर्षांच्या कोरोना कालखंडामुळे शंभरावे नाट्यसंमेलन अजून झालेले नाही. १९०५ साली पहिले नाट्यसंमेलन हे गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबापुरीत झाले होते. पहिले नाट्यसंमेलन मुंबई झाले म्हणून आता ‘शंभरी’ ही मुंबापुरीतच करण्याचे बेत रचले गेले आणि आजही सुरू झालेत. दादासाहेबांनी केलेल्या अध्यक्षपदाच्या भाषणात ‘नाटक एक पवित्र धंदा आहे. त्यांचं पावित्र्य उभ्या नाट्यसृष्टीने जपले पाहिजे. व्यावहारिक आणि आध्यात्मिक शिक्षण कलाकृतीतून आणि वर्तनातून रंगकर्मींने द्यावयास हवे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ११८ वर्षांपूर्वीचे हे बोल आजही अचूक लागू पडतात. त्यापासून आजच्या पिढीने बोध घेण्याची वेळ आलीय. नाट्यसृष्टीने पावित्र्य जपण्याचा प्रयत्न हा अपेक्षित आहे.

  यापूर्वीही अध्यक्षपदाची तसेच नाट्यआघाड्यांची चढाओढ ही झाली आहे. गेली चाळीसएक वर्षे एक पत्रकार म्हणून ती जवळून बघण्याची संधी मिळाली. पण यंदाचा नूर काही औरच होता. दुश्मन, शत्रू, खलनायक अशा चष्म्यातून काहीजण बघत होते. त्याला समर्थन हे राजकीय नेत्यांचे खुलेआम दिसले. ही बाब मात्र खटकणारी होती. राजकारणी माणूस हा रसिक असू शकतो. त्यांनी राजकीय क्षेत्र निवडलं आहे. कबूल पण त्या क्षेत्राचा दबाव म्हणून वापर होणं योग्य नाही. नट हा स्वतःच एक वाद्य आहे आणि त्याला वाजविणाराही तोच आहे, अशा आशयाचा सिद्धांत स्टॅनिस्लावस्की यांचा आहे. याची जाणीव ही नटमंडळींनी घेतली तर त्यांची जबाबदारी त्यांना नक्कीच उमलू शकेल!

  ‘नाट्यमंदार’चे निर्माते आणि १९८९ च्या सुमारास नाट्यपरिषदेचे अध्यक्ष झालेले राजाराम शिंदे यांची आठवण यानिमित्ताने आली. त्यावेळी नाट्यसंकुलासाठी भूखंड मिळाला खरा पण एक मोठी धार्मिक – भावनिक अडचण समोर उभी होती. सभासदांनी शिंदे यांच्या भोवती असलेल्या राजकीय वर्चस्वामुळे अध्यक्षपदापर्यंत पोहचविले.

  तत्पूर्वी ६९ व्या सांगली नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपदी बहाल केले. आता संकुलाच्या या जागेवर वास्तू कशी काय उभी राहाणार हा प्रश्न होता. कारण तिथे एक भलामोठा पिंपळाचा वृक्ष होता. काहींच्या मते तो शंभरएक वर्षांपूर्वीचा असावा. कारण म्हणे त्या जागृत पिंपळावर मुंजा असतो. त्याचं घर पिंपळावरच असतं. हा पिंपळ तोडण्यासाठी जवळपासच्या चाळकऱ्यांचा विरोध होता. त्यावेळी मुंबईमहानगरपालिकेचे आयुक्त तिनईकर होते आणि एकेदिवशी पोलिस बंदोबस्तात हा पिंपळ अखेर तोडला.

  त्याच्या काही फांद्या या जवळपास पूजाअर्चा करून लावल्या. त्यानंतर बरेच दिवस संकुलाचे काम रखडले. पुन्हा सुरू झाले. आज संकुल बंद आहे. ज्यात नाट्यपरिषदेचे मुख्यालय आहे. योगायोग म्हणजे प्रशांतने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वेगात चक्रे फिरविली आणि येत्या १४ जूनला गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी पुन्हा हे मुख्यालय, नाट्यगृह रसिकांसाठी रंगकर्मीसाठी खुले होणार आहे. ‘त्या पिंपळाच्या मुंजाला प्रशांतने पुन्हा पटवला!’ अशीही मिश्कील प्रतिक्रिया एका बुजूर्ग रंगकर्मीनी यावर व्यक्त केली! कालाय तस्मै नम:

  एक घटना या निमित्ताने नोंद करावीशी वाटते. नवीमुंबई, ठाणे परिसरातील हौशी उमेदवारी करणाऱ्या राजकारण्यांचा ग्रुप असावा. सारेजण तरूण. एकंदर नाट्यपरिषदेतील परिस्थिती ते सकाळपासून बघत असावेत. नाट्यसंकुलाच्या कोपऱ्यावर एसी गाडीभोवती त्यांच्या गप्पा निवडणूकीच्या दिवशी सुरू होत्या. त्यांना या निवडणुकीशी तस थेट कुठलही देणं घेणं नव्हतं पण काही जबाबदारी त्यांच्यावर बहुदा सोपविण्यात आली होती.

  ‘पत्रकार’ म्हणून कोण्या एका महाभागाने ओळख करून दिली. त्या तरुण मंडळींचे सवाल होते. ‘या पार्टीत येण्यासाठी सभासद कसं काय बनायचं? त्याची प्रोसेस काय आहे? अशी निवडणूक किती दिवस चालते? आमचे दहाजण आहेत. त्यांना मतदान कधी आणि कसं काय करायला मिळेल?’ त्यांचा प्रश्नांचा भडीमार सुरूच होता. ज्यांचा नाट्यक्षेत्राशी काहीएक संबंध नाही अशी तरुण पिढी काही फायदा होईल या आशेने – स्वार्थाने या क्षेत्राकडे आता बघू लागली आहेत. नाट्यपरिषद म्हणजे सत्ता – संपत्ती प्रसिद्धीचे माध्यम समजू लागले आहेत. हे दुर्दैवच म्हणावे लागेल!

  नाट्यसृष्टीची बिघडलेली वादग्रस्त प्रतिमा पुन्हा एकदा स्वच्छ करणे, शंभरावे नाट्यसंमेलन दिमाखात आयोजित करण्यासाठी तयारी; यशवंत नाट्यगृहाची डागडुगी आणि पुन्हा शुभारंभ; वयोवृद्ध रंगकर्मी तसेच नाट्य संमेलनाध्यक्ष जे आज आशेने नाट्यसृष्टीकडे बघताहेत. त्यांच्यासाठी मासिक सन्मान योजना सुरू करणे; रंगकर्मींसाठी मुंबई किंवा नजीकच्या परिसरात घरासाठी भूखंड यासाठी पाठपुरावा, राज्यातील नाट्यगृहांची दुरवस्था आणि वाढत्या भाड्यांचा प्रश्न; राजकारण्यांशी सुरक्षित अंतर राखणे; अशी अनेक कामे ही प्रशांत दामले या नव्या अध्यक्षांकडून अपेक्षित आहेत. आता निवडणुकीचे नाटक संपले आहे आणि खरेखुरे नाटक सुरू झालय. दणदणीत विजयाप्रमाणे खणखणीत कामे ही त्याच्या हातून घडो, ही नटराज चरणी प्रार्थना!

  संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com