
महाभारतात शत्रूविरुद्ध १०५ अशी संज्ञा वापरली जात होती. याचा अर्थ घरांत कितीही भांडणं असली, तरी इतरांविरुद्ध आम्ही सर्व एक असा होतो. भारतातील राजकीय पक्ष पूर्वी परस्परांविरुद्ध देशात कितीही आरोप करायचे; परंतु आरोपाची धुणी परदेशातील धोबीघाटावर कधीच धुतली जात नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर परदेशात टीका केली. आरोप केले. आता तेच राहुल गांधी करायला लागले आहेत. त्यातून दोघंही देशाची बदनामी करीत आहेत, हे मात्र खरं.
राजकारण शिष्टाचाराचं असतं; परंतु आता त्याचं भान कुणालाच राहिलेलं नाही. राजकीय पक्षांनी त्यांचं राजकारण इथल्या भूमीत करावं, आरोप-प्रत्यारोप इथंच करावेत. परदेशात गेलं, की तिथं वेगळ्या विषयांवर चर्चा केली, तरच त्याचं गांभीर्य राहतं. तिथंही पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर निघायला लागले, की त्या पक्षांपेक्षा देशाचं नाव खराब होत असतं; परंतु त्याचं भान कुणालाही राहिलेलं नाही.
एखाद्यानं वासरू मारलं, म्हणून दुसऱ्यानं गाय मारायची नसते. परदेशी भूमीत कुणी काय टीका केली, हे सांगायचं म्हटलं, तर अशी अनेक उदाहरणं देता येतील. मध्यंतरी अमेरिकन गुंतवणूकदारानं ‘हिंडेनबर्ग’चं उदाहरण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांच्या एकूण नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं. त्या वेळी खरं तर काँग्रेसनं काहीच भूमिका घेतली नव्हती; परंतु भाजपनं लगेच काँग्रेसवर खापर फोडण्याची घाई केली. पी. चिदंबरम् यांनी उलट मोदी यांची बाजू घेऊन संबंधित गुंतवणूकदारावर टीका केली होती.
देश म्हणून आम्ही सारे एक आहोत, हे दाखवण्याची आवश्यकता असताना ते पाळलं जात नाही. मोदी यांनी यापूर्वी जर्मनी आणि अमेरिकेच्या दौऱ्यात भारताची प्रगती कशी होते आहे, भारताकडून तुम्हाला काय घेण्यासारखं आहे, हे सांगायला हवं होतं. आपल्या सरकारची कामगिरीही सांगायला काहीच हरकत नव्हती; परंतु या दोन्ही देशांत काँग्रेसच्या काळात कसा गैरव्यवहार झाला, हे सांगण्यात मोदिंनी वेळ घातला. मोदी यांचं गेल्या आठ वर्षापासून सरकार असताना काँग्रेसच्या किती घोटाळेबाजांना गजाआड केलं, हे मोदी सांगत नाहीत. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करताना काँग्रेसच्या ऱ्हासावर परदेशात कसं संशोधन सुरू आहे, हे सांगण्यात मोदी यांनी बराच वेळ घालवला. काँग्रेस जर दखलपात्र नाही, तिला कुठंच यश मिळत नाही, असं असेल, तर मोदी आणि भाजपच्या टिवटिवकर्त्यांनी आपला अमूल्य वेळ का घालावा, असा प्रश्न पडतो.
सध्या भारतीय राजकारणात काँग्रेसची अवस्था बुडत्या बोटीसारखी झाली आहे. असं असतानाही पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राहुल गांधी राजकारणाबाबत गंभीर दिसत नाहीत आणि ‘आपली डफली आप बजाना’च्या मूडमधून बाहेर पडत नाहीत. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मार्चला येणार होते; पण त्याआधीच राहुल देश सोडून गेले. असं काही पहिल्यांदाच घडलं आहे असं नाही, याआधीही त्यांनी अनेकदा असं केलं आहे की, जेव्हा देशाच्या राजकीय पटलावर पक्षाला त्यांची गरज होती, त्या वेळी राहुल परदेशात नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपविरोधात आगपाखड करत होते.
मोदी यांनी काँग्रेसवर कितीही टीका केली, तरी या टीकेचं संधीत रुपांतर करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. भाजप कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी लढवतो, तर काँग्रेस हरण्यासाठी. राहुल यांना परिपक्व राजकारणी समजलं जात नव्हतं. आता कुठं त्यांची प्रतिमा ‘भारत जोडो’ यात्रेनं काही प्रमाणात बदलवली असली, तरी त्याचा अर्थ काँग्रेस लगेच जिंकण्याच्या मानसिकतेची झाली आहे, असं नाही.
राहुल यांच्या वृत्तीवरून हे स्पष्ट होतं, की त्यांच्यासाठी राजकारण हे दिवसरात्र लढण्याचं नाव नाही. दोन-तीन महिने मेहनत केली आणि आता काही दिवस आराम करेन, अशी वृत्ती ते कंपनीत काम करणाऱ्या ‘सीईओ’ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची अंगीकारतात. राजकारणात तसं नसतं. तिथं २४ तास सज्ज राहावं लागतं. काँग्रेसला पुन्हा उभं राहायचं असेल, तर त्यांना गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. परदेशी भूमीवर मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली तर त्यामुळं भारतातील काँग्रेसचा फायदा होईल, असं त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. उलट, भाजपनं राहुल यांनी केलेल्या टीकेवरून मोठा गदारोळ माजवला आहे.
परदेशात राहुल यांनी दिलेल्या प्रत्येक भाषणाचा भाजप स्वत:च्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून वापर करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे घडत आहे, तरीही राहुल यातून काही धडा घेऊ शकलेले नाहीत. त्याचा फटका शेवटी काँग्रेसला सहन करावा लागला आहे. राहुल हे भारतीय राजकारणातील काँग्रेसचा सर्वांत मोठा चेहरा आणि महत्त्वाचा नेता आहे हे ते का विसरत आहेत, हेच समजत नाही. त्यांच्याकडं आजही विरोधी पक्ष म्हणून संपूर्ण भारतात सर्वात मोठा जनसंपर्क आणि पकड आहे.
राहुल जेव्हा केंब्रिज विद्यापीठात बोलत होते, तेव्हा त्यांच्या मनात हेच नव्हतं का की गेल्या ३० वर्षांपासून भारतीय जनतेमध्ये चीनबद्दल कोणता विचार आहे? चीनकडून राहुल यांच्या पक्षाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेला निधी मिळत असताना आता त्यांनी चीनबाबतच्या भारताच्या धोरणावर बोलावं, हे योग्यच नाही. राहुल गांधी यांनी परदेशात असं वक्तव्य जेव्हा केव्हा केलं. तेव्हा भाजपनं त्याचा वापर काँग्रेसच्या विरोधात केला आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला आहे.
एक राजकीय पक्ष म्हणून राहुल यांच्या विधानांचा काँग्रेसला फायदा झाला नसून केवळ नुकसानच झालं आहे, हेही वास्तव आहे. जनतेमध्ये काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली आहे. राहुल यांनी हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे, की त्यांची आणि काँग्रेसची प्रतिमा एकमेकांशी जोडलेली आहे.
भाजपविरोधकांची मोट बांधण्यात काँग्रेसला यश येत नसताना राहुल यांच्यासारख्यांनी मोदी यांना अंगावर घेणं म्हणजे अन्य विरोधी पक्षांनाही काँग्रेसपासून दूर करण्यासारखं आहे. मग त्या ममता बॅनर्जी असोत, अखिलेश यादव असोत, की के. चंद्रशेखर राव; काँग्रेसबद्दल लोकांमध्ये निर्माण होत असलेला समज पाहता, काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानं इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आपल्याच राज्यात नुकसान सोसावं लागेल, असं वाटतं.
यामुळंच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या निवडणुकीत कोणाशीही हातमिळवणी करणार नसल्याचं जाहीर केले आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष काँग्रेसपासून दूर राहील असा त्याचा सरळ अर्थ आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचे निकाल. भाजपचा पराभव करण्यासाठी ‘सीपीएम’ने काँग्रेससोबत मिळून निवडणूक लढवली. याचा पक्षाला फायदा तर होईलच; शिवाय त्रिपुरात भाजपला पुन्हा सत्तेत येणं कठीण होईल, अशी अपेक्षा होती; पण घडलं उलटंच. काँग्रेससोबतच्या युतीचा ना ‘सीपीएम’ला फायदा झाला, ना काँग्रेसला. उलट ‘सीपीएम’ला गेल्या वेळेच्या तुलनेत तोटा सहन करावा लागला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत सीपीएम आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते.
२५ वर्षे सातत्यानं राज्य करूनही ‘सीपीएम’नं त्या वेळी १६ जागा जिंकल्या होत्या; मात्र या वेळी काँग्रेसचा हात धरल्यानं ‘सीपीएम’ला जागांचं तसंच मतांचंही मोठे नुकसान झालं. असाच अनुभव समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनाही आला आहे. अखिलेश यादव यांनी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली.
समाजवादी पक्षानं युती करून, ३३१ जागांवर निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ ४७ जागा जिंकता आल्या. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपासून दुरावल्यानंतरही त्याचा फायदा अखिलेश यादव यांना झाला.
त्यांच्या पक्षानं २०१७ च्या तुलनेत चांगली कामगिरी करत १११ जागा जिंकल्या. समाजवादी पक्षाच्या मतांमध्येही दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांतील प्रबळ विरोधी पक्षही काँग्रेसपासून दूर राहण्यातच आपलं हीत समजू लागले आहेत. राहुल यांना या दृष्टिकोनातूनही खूप काम करण्याची गरज आहे.
भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com