नक्षलवाद्यांचे नारायणपूर

गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडापासून छत्तीसगडच्या नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर; तेलंगणच्या खम्मम, वारंगल; ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत अबुझमाडचे जंगल पसरलेले आहे. साधारणतःसर्वसामान्यांना येथे प्रवेश नाही. पण २००९ पासून सुरू असलेली बंदी काही प्रमाणात उठविण्यात आलेली आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरिता सरकारने १९८० पासून ही बंदी घातलेली होती. तरीही आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्याकरिता विशेष परवानगीने अभ्यासक येथे येत असतात. येथील आदिवासी विकासापासून आजही हजारो मैल दूर आहेत.

    छत्तीसगडमधला डोंगरगड ते जगदलपूर हा प्रवासच अत्यंत लोभसवाणा आहे. सुंदर जंगले, नागमोडी अप्रतिम रस्ते, दर्‍या, डोंगरघाट, माकडांच्या टोळ्या आणि उंच घाटामध्ये लागणारे दहा ‘अंधे मोड’ हे बघतच आपण कांकेर कसब्यात प्रवेश करतो; येथून सुरू होते नक्षलवादी प्रभाव क्षेत्र. बालोद, माहुड, चारामा, कोमलपूर, केशकाल, गोंडागाव आणि इंद्रावती नदी हा प्रवास केल्यानंतर सुरू होते ‘बस्तर क्षेत्र’. मार्गात अनेक लहान सहान गावे लागतात. दूरवर पसरलेली मोहक हिरवीगार शेती, नारळाची, ताडाची उंच  झाडे  आणि मध्येच शहरात मोठे हॉस्पिटल आणि शिक्षणसंस्था, आरोग्य केंद्रे दिसायला लागतात. येथे मोफत इलाज केल्या जातो. नारायणपूर हा जिल्हा दंतेवाड्यापासून १२५ किलोमीटरवर किर्र जंगलात असून तीन तासात ‘छेडीबेडा’ नावाच्या नदीला पार करून जावे लागते. ‘ओरछा’ नावाच्या विकास खंडात असलेल्या ‘अबुझमाडच्या जंगलात’ नारायणपूर जिल्हा वसलेला आहे. ‘अबुझमाड’ हे एक दुर्गम क्षेत्र असून घनदाट जंगलाचा जणूकाही प्राकृतीक स्वर्गच आहे. छत्तीसगडचे हे क्षेत्र जवळपास चार हजार स्क्वेअर मैलाचे असून नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा हे जिल्हे यात सामावलेले आहेत. गोंड, मुरिया, अबूझ मारिया आणि हलबी आदिवासी जमाती प्रामुख्याने येथे आढळतात. अजूनही येथील आदिवासी अर्धनग्न अवस्थेत जीवन जगतात . ‘अबुझ’ म्हणजे ‘न विझणारे’… ज्या जंगलाला कुणीही ‘बुझवु’ शकले आणि म्हणून ‘अबुझ’ आणि ‘माड’ म्हणजे ‘खोल दर्‍या आणि पहाड’. या दोन्हीचे मिश्रण असलेला हा भाग आहे. अबुझमाडात दूरवर २५० च्या वर गावे वसलेली आहेत. अबुझमाडचा सर्वाधिक भाग नारायणपूर जिल्ह्यात येतो. नारायणपूर पोलिसांना अनेकदा प्रयत्न करूनही अबुझमाडमध्ये शिरणे शक्य झाले नाही. मात्र एकदा ‘माड’मध्ये शिरल्यानंतर बाहेर पडण्याविषयी आत्मविश्वास नसल्याने अबुझमाड माओवाद्यांसाठी नंदनवन, तर सुरक्षा दलांसाठी आव्हान देणारे अरण्य ठरले आहे. नक्षलवाद्यांची सर्वसुत्रे येथूनच हलतात.

    छत्तीसगड हे संपूर्ण राज्यच नक्षलग्रस्त प्रदेश म्हणून ओळखले जाते. याचे प्रशासकीय मुख्यालय जगदलपूर आहे. ११ मे २००७ ला पूर्वीच्या बस्तर जिल्ह्याचे विभाजन झाले आणि दोन नवीन जिल्हे अस्तित्वात आले. ‘नारायणपूर’ हा नवीन जिल्हा निर्माण झाला. छत्तीसगडच्या ३३ जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा आहे. या नवीन जिल्ह्याचा काही भाग महाराष्ट्रात तर काही भाग आंध्र प्रदेशात आहे. नारायणपूर जिल्हा नक्षलवाद्यांमुळे खुपच प्रभावित असून बहुतेक गाड्यांची कडक तपासणी होते. घनदाट जंगल, उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या या जंगलाची तुलना आफ्रिकेच्या जंगलांशी केली जाते. १० ते १५ हजार वर्गकिलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या अबुझमाडमध्ये घनगर्द वृक्षांच्या आणि उंच पर्वतांच्या रांगाच रांगा दिसतील. छत्तीसगड आणि महाराष्ट्राची सीमारेषा विभागणार्‍या इंद्रावती, पर्लकोटा तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशला विभागणार्‍या गोदावरी या मोठ्या नद्या या भागातून वाहतात. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडापासून छत्तीसगडच्या नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर; तेलंगणच्या खम्मम, वारंगल; ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत अबुझमाडचे जंगल पसरलेले आहे. साधारणतःसर्वसामान्यांना येथे प्रवेश नाही. पण २००९ पासून सुरू असलेली बंदी काही प्रमाणात उठविण्यात आलेली आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्या करिता सरकारने १९८० पासून ही बंदी घातलेली होती. तरीही आदिवासी संस्कृतीचा  अभ्यास करण्या करिता विशेष परवानगीने अभ्यासक येथे येत असतात. येथील आदिवासी विकासापासून आजही हजारो  मैल दूर आहेत. त्यामुळेच हा जिल्हा ‘संवेदनशील’ म्हणून ओळखला जातो. आजही येथे माओवाद्यांचे म्हणजे नक्षलवाद्यांचे वर्चस्व आहे. अबुझमाडमध्ये माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मुप्पाला लक्ष्मणराव ऊर्फ गणपती, मिलिटरी कमांडचा प्रमुख नंबाला केशव उर्फ गंगन्ना, भूपती यांच्यासह केंद्रीय समितीचे बडे नेते वास्तव्याला आहेत. येथील आदिवासी बाहेरच्या लोकांसोबत जास्त संपर्क ठेवत नाही. ‘पोलिसांचा खबर्‍या’असल्याची थोडी जरी शंका आल्यास ते जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही. सरळ तुमचा खातमाच करून टाकतात. त्या मुळे येथे पोलिस, राजकारण, नक्षलवाद, सरकारी धोरण या विषयावर चर्चा करता येत नाही. बसमधून खाली उतरल्यावर स्थानिकांसोबत बोलून विचारपुस करणे सुद्धा अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे गावातल्या कुणाही सोबत न बोलण्याच्या सूचना अगोदरच आम्हा पर्यटकांना देण्यात आल्या होत्या. बस्तरचे हे दक्षिण क्षेत्र अत्यंत धोकादायक असून नक्षलवाद्यांकरिता ‘जन्नत’च आहे. ही नक्षलवाद्यांची राजधानी आहे. १९८० ते १९८७ च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी अमुझमाडच्या जंगलातील जमीन लीजवर घेऊन शेत मजुरांवर अन्याय करणार्‍या व्यापारांच्याविरोधात लढा उभारला आणि येथील आदिवासींच्या मदतीला धावले. सरकारच्या विरोधात नक्षलवाद्यांनी सहानुभूती प्राप्त केली. आदिवासिंनी मग त्यांना आश्रय दिला आणि गडचिरोलीच्या मार्गाने येऊन  येथेच बस्तान बनवून ठाण मांडले आणि आपले समांतर सरकार बनविले. हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असून अनेक ठिकाणी तर सुर्याची किरणे सुद्धा पोहोचत नाही इतके हे घनदाट जंगल आहे. नारायणपूरला जाताना या जंगलात शस्त्रसज्ज कमांडोची अनेक पथके शिकारी कुत्र्यांसह जंगलातल्या सडकेवर गस्त घालताना दिसले. हे क्षेत्र अत्यंत अविकसित असून येथील समाजच अशिक्षित आहे. इथले अनेक आदिवासी आजही आदिकाळाच्या स्वरुपातच वावरतात. तरीही काही शिकले सवरले लोक असून अनेक आदिवासी  सायकल वरुन धान्य,तेल आणि तांदूळ घेण्या करिता याच जंगलात असलेल्या नारायणपूरला येतात. अबुझमाडला ‘छत्तीसगडची चेरापुंजी’ म्हटले जाते. कारण छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त पाऊस अबुझमाडला पडतो.-या जंगलात अनेक वाघ असून त्यांची सरकारी गणना अजूनपर्यंत झालेली नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घनदाट जंगलात रेडा, गौर, सांबर, चौसिंगा विपुल प्रमाणात असून पहाडी क्षेत्र असल्याने चितळांची संख्या अतिशय कमी आहे. असे म्हणतात की या जंगलात अनेक रहस्ये लपलेली आहेत जी अजूनही कुणालाच भेदता आली नाही. येथे आजपर्यंत कधीही झाडे कापण्यात आलेली नाही आणि ‘जंगल कटाई’ झालेली नाही. त्यामुळे वनस्पति औषधीयुक्त मुळ जंगल बघण्याचा आनंद घेता येतो.

    अशा या अबुझगडच्या किर्र जंगलात असलेल्या नारायणपूरमध्ये वसलेले आहे तुळशी वृंदावनासारखे पवित्र आणि समाजाला मंद मंद हळुवार प्रकाश देणारे ‘रामकृष्ण मिशन आश्रम’..! आदिवासींच्या उत्थानाकरिता तयार झालेल्या आणि ६७ एकरमध्ये पसरलेल्या रामकृष्ण मिशनचा प्रमुख भाग असलेल्या या प्रकल्पाचे नाव आहे ‘अबुझमाड ट्रायबल सर्विस’. ज्यावेळेस या आश्रमात आमचा प्रवेश झाला त्या वेळेस एका नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू होते. प्रसाद ग्रहण करून आम्हाला हा नारायणपूरच्या जंगलात असलेला आश्रम दाखविण्यात आला. भव्य दिव्य रस्ते, शाळा, दवाखाने, खेळांची मैदाने वाचनालय, स्वस्त वस्तु भांडार, नर्सरी, हॉस्टेल, शारदा कन्या छात्रावास, विज्ञान प्रयोगशाळा, विवेकानंद विद्यापीठ, इंडोअर स्टेडीयम, संगीत शाळा हे सर्व बघून एखाद्या लहानशा शहरातच वावरात असल्याचा भास झाला. डोळ्याचे पारणे फिटले.  गेल्या पाच सहा वर्षात संस्थेने फुटबॉल, खो-खो, जिमनॅस्टिक, बॅडमिंटन, अॅथ्लेटिक्स, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल इत्यादि खेळात वर्चस्व दाखवुन प्रचंड यश प्राप्त केलेले आहे. येथले अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोचलेले असून आश्रमाला असंख्य सामाजिक व  प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या आश्रमात अत्यंत सुंदर  बगीचे असून कमालीची शांतता स्वच्छता आणि शिस्तबद्ध संन्यासी हे येथले वैशिष्ट्य म्हणावे लागेल. इतक्या घनदाट अरण्यात इतका अप्रतिम आश्रम असेल अशी कुणालाच कल्पना येत नाही. येथे अनेक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आणि शेतकर्‍यांना  दिल्या जाते. विज्ञान पार्क, डेअरी, चक्की, तांदळाची मिल बघायला मिळाली. अनेक सामाजिक कार्यक्रम होत असतात. यात बियाणे वाटप, किसान मेळावा, राष्ट्रीय युवा दिवस, विविध प्रदर्शन यांचे आयोजन होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेने १९८५ स्थापन झालेल्या या आश्रमाचे सचिव आणि मुख्य स्वामी व्यापतानंद यांनी एक तास देऊन आश्रमाचा इतिहास कथन केला. स्वामींचा हा एक तास आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला आणि येथल्या ग्रामीण आदिवासींच्या जीवनाची कल्पना आली.
    नक्षलवाद्यांचे साम्राज्य असणार्‍या नारायणपूर मधला ‘अबुझमाड’च्या निबीड अरण्यातला असा हा रामकृष्ण मिशनचा आश्रम म्हणजे समाजाला मंद प्रकाश देणारा नंदादीपच.

    – श्रीकांत पवनीकर