विघ्न विनाशक गणराया…

महाराष्ट्राचे सर्वात लाडके दैवत म्हणजे गणपती. गणपतीचे हे आगळे-वेगळे रूप मनाला आकर्षित करणारे आहे. दरवर्षी सर्वांना या उत्सवाची उत्सुकता असते. मग तो सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरी येणारा हा गणराया असो. ‘गणपति बाप्पा मोरया’चा नाद गल्लोगल्ली कानावर पडू लागतो. सर्वांच्या मनामध्ये एक भावना जरूर असते की गणरायाच्या आगमनाने आमच्या जीवनातले सर्व विघ्न आता दूर होणार. त्यांचा वरद हस्त आमच्यावर राहील्याने आमचे जीवन सुरळीत होणार.

  कोणी दीड दिवसाचा गणपती, तर कोणी पाच किंवा सात दिवसाचा, तर कोणी अकरा दिवसांचा गणपती घरी बसवतात. प्रेम-भावनेने त्याची आराधना करतात.  मोदकाचा खास नैवेद्य दाखवतात. ही सर्व कार्ये मनोभावे केली जातात. ज्या भावनेने पूजाअर्चा केली जाते, त्यानुसार मनोकामना पूर्ण होण्याचा अनुभव आपल्या सर्वांकडे असेलच. असे या देवतेमध्ये काय आहे?  ज्यामुळे आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात? प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात गणपती वंदनेने केली जाते कारण गणरायाचे रूप जर व्यवस्थित न्याहाळले तर प्रत्येक अंग गुणांनी भरलेले आहे. म्हणूनच गणपती म्हणजे गुण-पती असेही म्हटले जाते.
  जीवनामध्ये जेव्हा विघ्न येतात तेव्हा मनुष्याचा कल पूजा-अर्चा, उपवास, नवस… या सर्व गोष्टीकडे जातो; पण आपल्या जीवनातले विघ्न दूर करण्यासाठी आपल्यालाच अचूक पाऊल उचलावे लागते. विघ्न विनाशक बनण्यासाठी गणरायासारखे बनावे लागेल.  आपल्या सर्वाना गणेशाची जन्मकथा माहितच असेल.  पार्वतीच्या मळाने एका पुत्राचा जन्म होतो. शंकर आपली तपस्या पूर्ण करून जेव्हा परत येतात तेव्हा पार्वती स्नान करायला गेली होती. अशा वेळी या पार्वती नंदनाला बाहेर बसवून आणि ताकीद देऊन गेली होती की, कोणी ही आले तरी त्यांना आत पाठवायचे नाही. जेव्हा शंकर आत जाऊ लागले तर या पुत्राने त्यांना अडवले. शंकर यांना प्रश्न उठला की हा कोण जो मला अडवतोय? रागात येऊन ते या पुत्राचे शीर धडापासून वेगळे करतात.  पार्वती अंघोळ करून बाहेर येते तेव्हा झालेला प्रकार बघून त्यांना सांगते की मीच त्याला सांगून गेले होते. हा आपलाच पूत्र आहे. काहीही करा पण याला कोणाचेही तोंड लावून जीवंत करा. तेव्हा शंकरजी हत्तीचे तोंड या मुलाला लावतात आणि याच शिवपुत्राचे नाव ‘गणपती’, ‘गजानन’ असे ठेवले जाते.
  हत्तीचेच तोंड का? हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला असेल. हत्तीला बुद्धीवान, बलवान, आज्ञाधारक मानले जाते. हत्तीच्या प्रत्येक अंगामध्ये रहस्य आहे. सुपासारखे कान हे चांगले आणि वाईट यांचा भेद करून चांगले आपल्या जवळ ठेवण्याची कला शिकवणारे आहे. वाईट ऐकण्याची सवय ही आपल्या जीवनाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. म्हणून Hear no evil ही गाठ आपण बांधावी. शरीर इतके मोठे मात्र डोळे किती छोटे. दूरची वस्तू बघण्यासाठी आपल्याला डोळे छोटे करावे लागतात. हे डोळे दूरदृष्टीचे प्रतिक आहे. कोणतेही कार्य करण्यासाठी त्याचे होणारे परिणाम पहिले लक्षात घ्यावे. कारण आजचा मनुष्य पहिले कृती करतो आणि मग त्यावर विचार करत राहतो परंतु पहिले विचार करावा व मग कार्याला लागावे ही सवय आपण स्वतःला लावावी. हत्तीची सोंड ही बलशाली असण्याचे प्रतिक आहे. या सोंडेने भले मोठी झाडे मुळासकट उपटून काढली जातात. याच सोंडेने देवाला हार ही अर्पण केला जातो. या सोंडेमध्ये कोणीही काहीही दिले तर ते मालकापर्यंत पोहोचवण्याची इमानदारीही दिसून येते.  अशक्य कार्य शक्य करण्याची शक्ति हत्तीमध्ये दिसून येते.  मानवी मनामध्येसुद्धा अद्भुत शक्ति आहे ज्याद्वारे असंभव कार्य संभव होऊन जातात. तसेच नम्रता आणि इमानदार राहिल्याने जीवनातल्या समस्या कमी होतात.
  या गुणांचा वापर दैनंदिन कार्यामध्ये आपण केला जसे दूरदृष्टी ठेवून जे आवश्यक आहे तितके ऐकणे, बोलणे… यावर अटेन्शन ठेवले तर वेळेचा सदुपयोग तर होईलच पण व्यर्थ गोष्टींपासून मुक्त ही होऊ. आपल्यामध्ये जे गुण आणि शक्ती आहेत त्यांचा व्यर्थ व्यय न करता खऱ्या मार्गाने वापर केला तर विघ्न कमी येतील आणि जर परिस्थिती आलीच तर त्याचा सामना पण करू शकतो.
  या गणेशोत्सवानिमित्त आपण आज संकल्प घेऊ या की रोज या गणरायाचे दर्शन करून त्यांचे सर्व गुण आणि शक्ति मला माझ्यामध्ये आणायचे आहेत. मी स्वतःला इतके शक्तिशाली बनवेन की कितीही विघ्न आली तरी ती या शक्तिंनी समाप्त होतील. मी सुद्धा गणरायासारखे गुणांनी स्वतःला भरपूर करीन.

  – नीता बेन