बित्तंबातमी : छत्रपतींवरून नस्ता वाद!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे घरातील एखाद्या वडिलधाऱ्या, अघळपघळ बोलणाऱ्या व्यक्तीप्रमाणे असून जाहीर सभेतही असेच मुद्दा सोडून भरकटत असतात. त्यांच्या बोलण्यात कुहेतु नक्की नसला तरीही त्यांच्या बोलण्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थाच्या निराळ्या छटा लोक शोधू शकतात आणि त्यातून हे असे वाद सुरु होतात. मागे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या कार्यपद्धती संदर्भातही अशीच काही विधाने केली होती. त्यातून ते अडचणित आले होते. कोश्यारी हे अमराठी आहेत आणि त्यांच्या पहाडी हिंदी भाषेत कौतुक करताना एखाद्याचा एकेरी उल्लेख केला गेला तरी ते क्षम्य असावे. पण त्यांनी तसा अपराध मराठीत बोलताना न करण्याचीही काळजी घ्यायलाच हवी.

  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे काही भाजपा नेत्यांनीही तसाच सूर लावला आहे.

  ‘‘तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु महाराष्ट्रात मात्र तुम्हाला तुमचे आदर्श अन्यत्र शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील नायक आहेत,’’ असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात शनिवारी केले.

  या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे घरातील एखाद्या वडिलधाऱ्या, अघळपघळ बोलणाऱ्या व्यक्ती प्रमाणे असून जाहीर सभेतही असेच मुद्दा सोडून भरकटत असतात. आणि त्यांच्या बोलण्यात कुहेतु नक्की नसला तरीही त्यांच्या बोलण्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थाच्या निराळ्या छटा लोक शोधू शकतात आणि त्यातून हे असे वाद सुरु होतात.

  मागे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या कार्यपद्धती संदर्भातही अशीच काही विधाने केली होती. त्यातून ते अडचणित आले होते. कोश्यारी हे अमराठी आहेत आणि त्यांच्या पहाडी हिंदी भाषेत कौतुक करताना एखाद्याचा एकेरी उल्लेख केला गेला तरी ते क्षम्य असावे. पण त्यांनी तसा अपराध मराठीत बोलताना न करण्याचीही काळजी घ्यायलाच हवी. कारण मराठीत छत्रपतींचा एकेरी आला तर त्यातून क्षोभ निर्माण होणे अटळ आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करीत काही संघटनांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘‘सतत वाद निर्माण करणारी विधाने करणाऱ्या घटनात्मक पदावर असलेल्या या व्यक्तीलापदावरून हटवण्याबाबत राष्ट्रपतींनी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. एकंदरित राज्यपाल हटाव मोहीम महाविकास आघाडीने सुरु केली आहे.

  मराठी नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या राज्यपालांच्या अवमानकारक विधानांवर भाजप नेहमीच मौन का बाळगतो,’’ असा एक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला विचारला आहे. खरेतर भाजपचे प्रदेश चिटणीस आ. डॉ संजय कुटे यांनी तातडीने ट्वीटर माध्यमांतून राज्यपालांचा तीव्र निषेध केला हे याकडे माध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही. अर्थातच महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकाच्याच मनात शिवरायांचे स्थान अढळ आहे. त्यात कोणताही बदल होणे शक्य नाही.

  कोश्यारींच्या एकूण वीस-पंचवीस मिनिटांच्या मोठ्या भाषणात शिवरायांचा आदर्श जुना झाला या संदर्भात एक अर्धे वाक्य मात्र आहे. तेही अशा संदर्भात आलेले आहे की एकेकाळी विद्यार्थ्यांना तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे तेव्हा उत्तर असायचे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाला नेहरु या प्रकारचे. महाराष्ट्राच्या संदर्भात या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत. शिवाजी महाराज जुने झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकारांपासून शरद पवारांपर्यंत आणि नितीन गडकरींपर्यंत अनेक नावे सांगता येतील, असे राज्यपाल म्हणाले आहेत. यातील बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार ही नावे सोडून देऊन शिवाजीराजांची तुलना फक्त नितीन गडकरींबरोबर राज्यपाल करत हेत असे भासवणे हे कोणत्याही विधानाचा वाकडा अर्थ कसा काढावा याचाच वस्तुपाठ ठरावा. राज्यपाल बोलत असताना व्यासपीठावर स्वतः शरद पवार हे हजर होते आणि त्यांनी कधीही राज्यपालांच्या बोलण्याला, तिथे लगेच वा नंतरही, हरकत वा आक्षेप घेतल्याचे दिसले नाही.

  राज्यपाल जे बोलले त्याचे समर्थन न करताही त्यांच्या विधानाचा विपर्यास होऊ नये इतके मात्र नक्कीच म्हणावे लागेल. त्या दीक्षांत समारंभात पवार व गडकरी यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. हे सध्याचे आदर्श आहेत असे राज्यपाल म्हणत होते. पवार आणि गडकरी यांचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले की यांनी विशिष्ट ध्येयाने झपाटून काम करत सर्वासमोर आदर्श निर्माण केला आहे. पवार यांचे कृषी, उसाच्या क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यामुळेच ते कधी-कधी अधिकच गोड बोलतात. गडकरी पक्के मिशनरी अर्थात ध्येयवादाने काम करणारे असून त्यांची ओळख आता रोडकरी म्हणून झाली आहे, अशी टिप्पणीही राज्यपालांनी केली. राज्यपालांनी या वेळी असेही म्हटले की हिंदी एक प्रकारे राष्ट्रभाषा असली, तरी मातृभाषेतील शिक्षणही महत्त्वाचे आहे.

  राज्यपालांनी या दीक्षांत भाषणादरम्यान, झपाटलेपणाने काम करण्याच्या संदर्भात दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या शिकवणुकीचे उदाहरण दिले. गोळवलकर गुरुजींना अनेक जण म्हणायचे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पागल आहेत. तेही म्हणायचे, आम्ही पागल आहोत. मात्र, पागल शब्दाविषयी बोलताना त्यांनी पंजाबी भाषेत त्याचा अर्थ काय, हे समजावून सांगितले होते. ‘गल’ या शब्दाचा अर्थ रहस्य आहे, तर ‘पा’ म्हणजे प्राप्त करणे, असा मिळून अर्थ काढला तर रहस्य प्राप्त करणाऱ्यांना ‘पागल’ म्हणतात, असे गोळवलकर गुरुजी सांगायचे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

  संभाजी राजे बोलल्यानंतर उदयनराजेही मागे राहिले नाहीत. ते तर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत. पण त्यांनीही तितकीच आक्रमक भाषा कोश्यारींसाठी वापरली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी खाजगीत अनेकांना सांगितले आहे की त्यांना आता राजभवनात राहण्यात रुची नाही. त्यांना जनतेत फिरून काम करण्याची इच्छा आहे. ते उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतरचे पहिले मुख्यमंत्री राहिले होते. तिथे त्यांना मानणारे लोकही पुष्कळ आहेत. तिथे परत राजकारणात उतरण्याची त्यांची मनिषा लपून राहिलेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमीत शहा यांनी काही त्यांना अद्याप मुंबईचे राजभवन सोडण्यास सांगितले नाही. या वादाची परिणती कोश्यारींची परत पाठवणी होण्यात होईल अशी शक्यता सध्यातरी वाटत नाही. पण तसे झाले तर ती कोश्यारींसाठी शिक्ष नक्कीच ठरणार नाही!

  अनिकेत जोशी

  aniketsjoshi@hotmail.com