mallikarjun kharge

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पाच राज्यांच्या निवडणुका आणि लोकसभेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कार्यकारिणीच्या नव्या टीमची घोषणा केली. या कार्यकारिणीकडं पाहिलं, तर त्यात निवडणुकीच्या राजकारणाशी फारसा संबंध नसलेल्या आणि वयोवृद्धांचा समावेश आहे. उदयपूर जाहीरनाम्याप्रमाणं त्यात युवकांना स्थान देण्यात आलं नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी आणि भाजपशी हा संघ सामना कसा करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

  राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्ट रोजी देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असताना खर्गे यांनी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली. त्यावरच्या क्रिया, प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसच्या उदयपूरला झालेल्या चिंतन शिबिरात एक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता. त्यात परिवारवाद हे भाजपच्या हातातील हत्यार काढून घेण्याचं ठरलं होतं; परंतु त्यानंतरच्या निवडणुकांत काँग्रेस, घराणेशाहीला दूर करू शकलेली नाही.

  युवकांना पन्नास टक्के प्रतिनिधित्त्व देण्याच्या आपल्याच घोषणापत्राचा काँग्रेसला विसर पडला असल्याचं नव्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावं पाहिली, तर लक्षात येतं. ३९ जणांच्या कार्यकारिणीत अवघे तीन जण पन्नाशीच्या आतील आहेत. राजस्थानमधील सचिन पायलट, जितेंद्र सिंग आणि महेंद्रजीत सिंग मालवीय यांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. जितेंद्र सिंह मध्य प्रदेशच्या स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. मालवीय यांच्याबाबतीत नवा संदेश देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. अनेक दिवसांपासून पायलट यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. ते काँग्रेसमध्ये राहणारच नाही, असं त्यांच्याविरोधातील गट सातत्यानं सांगत होता; पण पायलट यांना काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या मुख्य मंडळात ठेवून काँग्रेसनं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या इतर समर्थकांना संदेश दिला आहे, की आम्हाला आगामी काळात पायलट यांना राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आणायचं आहे.

  राजस्थानमधील तरुणांना गेल्या पाच वर्षांत फारसे सरकारी लाभ मिळालेले नाहीत. सरकारमध्ये तरुणांना जास्तीत जास्त वाटा मिळावा, त्याचप्रमाणं आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा राजस्थानमध्ये अजमेर, धिंडोरा, सवाई माधोपूर आणि टोंक अशा चार जाट-गुर्जर बहुल जागा आहेत, त्या जिंकण्यासाठी पायलट किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांना डावलून चालणार नाही, हे काँग्रेसनं कृतीतून दाखवलं आहे. विधानसभेच्या २४-२५ जागा अशा आहेत, जिथं गुर्जरांचा प्रभाव आहे. आगामी काळात एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे. अभिषेक मनू सिंघवी हे जोधपूरचे आहेत. त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ते पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत आणि पक्षाला विविध प्रकारे सहकार्य करत आहेत. पंजाबचे प्रभारी म्हणून हरीश चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे प्रभारी असलेले मोहन प्रकाश हे राहुल यांच्या जवळचे आहेत. ते केंद्रीय राजकारण जास्त करतात. त्यांचा स्थायी सदस्य म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. पवन खेडा हे उदयपूरचे असून ते आदिवासी असून पक्षाचे प्रवक्ते आहेत. ते राजस्थानचे राजकारण करत नाहीत, तर दिल्लीचे राजकारण करतात; पण त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. राजस्थानच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथल्या सात जणांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या रचनेवरून गेहलोत यांना तुमची हुकूमशाही चालणार नाही, असा संदेश देण्यात आला आहे.

  गेहलोत यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, अशी पक्षाची इच्छा होती; पण त्यांनी बंड केले. आता त्याच गेहलोत यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विहिंपमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना उमेदवारी देण्याची त्यांची इच्छा आहे; परंतु आता त्यांना ते तितकंसं सोपं नाही. माजी मंत्री राजेंद्र गुढा यांच्या डायरीचं प्रकरण सध्या गाजतं आहे. या डायरीची आणखी काही पानं उघडली, तर त्यांना स्वच्छ चेहरा म्हणून वावरण्यास अडचण येईल. शांती धारीवाल, महेंद्र जोशी आणि धर्मेंद्र राठोड या गेहलोत समर्थकांना उमेदवारी मिळेल, की नाही, याबाबत आता साशंकता आहे. मोठा नेता असो की छोटा; पक्षापेक्षा तो मोठा नाही. तसे होण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याची जागा दाखवू, असा संदेश ही कार्यकारिणी निवडताना दिला गेला. नेतृत्वाला आव्हान दिल्याची किंमत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोजावी लागली आहे. विकास गोगोई यांना स्क्रीनिंग समितीचं अध्यक्ष बनवणं, मधुसूदन मिस्त्री यांना निवड समितीचा चेहरा बनवणं, यावरून गेहलोत यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. मध्य प्रदेशात दिग्विजय सिंह, कमलेश्वर पटेल यांना कार्यकारिणीवर घेण्यात आलं आहे. मीनाक्षी नटराजन यांना मंदसौरमधून, चरणजित सिंग चन्नी यांना पंजाबमधून, दीपेंद्र हुडा यांना हरियाणातून, सुरजेवाला आणि सेलजा यांना घेण्यात आलं आहे. काही वडिलधाऱ्यांना जागा देण्यात आली आहे तर काहींना घरी बसवण्यात आलं आहे. आता खरा कस तिकीट वाटपात लागणार आहे. पायलट यांना ज्या प्रकारे पसंती मिळाली आहे, त्यावरून आगामी काळात त्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं दिसतं. पहिल्यांदाच ३९ नेत्यांना कार्यकारिणीत सदस्य म्हणून स्थान मिळालं. यापूर्वी जास्तीत जास्त २५ सदस्यांची तरतूद होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत समाविष्ट झालेल्या ६० टक्क्यांहून अधिक नेत्यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली नव्हती, तर काही पराभूत झाले होते. दलित कोट्यातून काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.

  काँग्रेस कार्यकारिणीची पदे मिळालेल्या ३९ पैकी ११ नेत्यांनी गेल्या दहा वर्षात किंवा त्याहून अधिक काळ कोणतीही निवडणूक लढलेली नाही. बहुतांश नेते राज्यसभेच्या मदतीनं राजकारण करतात. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे कार्यकारिणीतील सर्वात वयस्कर (९० वर्षे) आहेत. सिंग यांनी आतापर्यंत लोकसभेची एकही निवडणूक लढलेली नाही. गेल्या नऊ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय नाहीत. २०१८ मध्ये राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आजपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही. संघटनेनं त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली; पण तिथं पक्षाची कामगिरी खराब राहिली. हीच अवस्था ए के अँटनी, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अभिषेक मनु सिंघवी, दीपक बाबरिया, नासिर हुसेन, अविनाश पांडे आदींची आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खुद्द खर्गे यांचा गुलबर्गामधून पराभव झाला. अजय माकन, जगदीश ठाकोर, गुलाम अहमद मीर, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंह, तारिक अन्वर, मीरा कुमार, जितेंद्र सिंग, मुकुल वासनिक आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले दीपा दास मुन्शी यांचा काँग्रेस कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत पराभूत झालेले रणदीप सुरजेवाला आणि चरणजित सिंह चन्नी यांना काँग्रेस कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. सुरजेवाला सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला, तर अशोक चव्हाण यांचा या कार्यकारिणीत नव्यानं समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारिणीत सर्वाधिक आठ सदस्य हे महाराष्ट्रातून आहेत. अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे हे ३९ मुख्य सदस्यापैंकी आहेत, तर प्रभारी म्हणून रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, कायम आमंत्रित म्हणून चंद्रकांत हंडोरे तर विशेष आमंत्रित म्हणून प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांचा समावेश करण्यात आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेत चव्हाण यांचं नाव या पदासाठी होतं; पण आता ते या रेसमध्ये नसतील. हंडोरे यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही विधानपरिषद निवडणुकीत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला, त्यांचंही पुनर्वसन ‘वर्किंग कमिटी’त झाल्याचं पाहायला मिळतं. खर्गेंच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर यांच्यासह मनीष तिवारी, आनंद शर्मा, वीरप्पा मोईली या जी २३ गटातल्या नेत्यांनाही यात स्थान आहे; परंतु पृथ्वीराज चव्हाणांना नाही. अर्थात ते पूर्वीही राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्हते. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, महिला काँग्रेस अध्यक्ष, युवक काँग्रेस अध्यक्ष अशी सगळी पदं विदर्भात आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडं गटनेतेपद असल्यानं त्यांना कार्यकारिणीत स्थान दिलेलं नसावं. आ. सत्यजीत तांबे या भाच्याची बंडखोरी आणि अजूनही त्यांची भाजपशी असलेली जवळीक थोरात यांना अडचणीची ठरलेली दिसते. काँग्रेसनं दीर्घकाळ रखडलेल्या ‘वर्किंग कमिटी’ची घोषणा तर केली; पण प्रत्यक्ष कार्यशैलीतल्या बदलात काँग्रेस किती परिणाम दाखवते, यावरच पुढचं यश अवलंबून असेल.

  – भागा वरखडे
  warkhade.bhaga@gmail.com