महानगरांची अतिरेकी घेराबंदी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने राज्यात एक- दोन नव्हे तर तब्बल ४१ ठिकाणी छापेमारी केली. पैकी ४० ठिकाणे मुंबई, ठाणे परिसरातील होती. येथे पकडलेले असामाजिक तत्व, तेथे सुरु असलेल्या काही कारवाया पाहता एक खूप मोठे संकट आपल्यावर घोंघावत असल्याचा निष्कर्ष काढायला हरकत नाही. राष्ट्रीय सुरक्षेला तडा देत देशांतर्गत सुरु असलेल्या या अतिरेकी कारवाया हादरवून सोडणार्‍या आहेत. मुंबईच नव्हे; तर अनेक महानगरांची अशी अतिरेकी घेराबंदी करण्याचे षडयंत्र तर सुरु नसावे, असा संशय घेण्यास यातून जागा आहे.

  देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य असलेल्या महाराष्ट्रात आणि मुंबईच्या अगदीच शेजारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कुठे ड्रग्ज, तर कुठे शस्त्रांचे पुरवठादार वाढत असल्याची आकडेवारी चिंताजनक आहे. अर्थात हे असामाजिक तत्व तपास यंत्रणांनी पकडल्यानंतरच सर्वसामान्यांना कळतात, हे मान्य. राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे असे लोक पकडले जातात, याचेही समाधान आहे. मात्र पाच पन्नास लोकांना पकडून ही राष्ट्रद्रोही प्रवृत्ती ठेचता येणार नाही, हे सत्य आहे. महानगरं आणि त्यांच्या भोवतालच्या गावांमध्ये वाढत जाणारी लोकसंख्या, बकालपणा यातूनही अनेक समस्या निर्माण होत आहेत. राष्ट्रीयत्वाशी जोडल्या गेलेल्या आजच्या राजकारणात विरोधी भूमिका म्हणजे राष्ट्रद्रोहाची असा ग्रह झालेले भरकटलेले किंवा आयएसआयएस, सिमी, लष्कर सारख्या संघटनांनी हेतुपुरस्सर वैचारिक विष पेरलेले तरुण या अतिरेकाच्या मार्गाला गेलेले दिसतात. नुकतीच झालेली कारवाई हिमनगाचे टोक असावे, इतका हा अतिरेकी विचार पेरला गेलेला दिसतो.
  ….

  अतिरेक्यांचे स्वतंत्र गाव
  एका गावास सिरीया बनवण्याची पूर्ण तयारी अतिरेक्यांनी केली होती. भारतात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करुन अराजकता निर्माण करण्याचा उद्देश दहशतवाद्यांनी ठेवला होता. आयएसआयएसच्या सिरीयाप्रमाणे या गावातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी काम सुरु केले होते. सर्व दहशतवादी या गावात एकत्र येऊ लागले होते. सर्व राज्यात स्थानिक सेलची निर्मिती करुन दहशतवादी कारवाया करण्यात येणार होत्या. अतिरेक्यांनी या गावाला परस्पर स्वतंत्र जाहीर केले. गावाचे नामांतर करुन अल् शाम ठेवले. मग देशभरातून जिहादी युवकांना या गावात आणून दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याची घातक योजना सुरू होती.
  हे गाव भारत – पाकिस्तान सिमेवरील नव्हे, तर चक्क ठाणे जिल्ह्यातील पडघा गाव आहे. या पडघा गावाचे नामकरण करण्यात आले, आणि तेथूनच या राष्ट्रद्रोही कारवाया सुरु होत्या, हे एनआयएच्या तपासात उघडकीस आले आहे.
  ….
  पडघा गावात घाटकोपर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साकिब नाचण राहतो. दहा वर्ष कारागृहात राहून बाहेर आलेल्या नाचण आणि त्याच्या कुटुंबातील काही जणांनी पुन्हा अतिरेकी कारवाया सुरु केल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आणि त्यानंतर साकीब याचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. साकिब नाचण हा २००२ आणि २००३ मधील मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. त्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाला होता.
  ….
  ड्रोनद्वारे हल्ल्याचे षडयंत्र
  इस्त्राईलवर हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमिवर कदाचित मुंबईला वेठीस धरण्याची योजना अतिरेक्यांची होती का, याचा शोध घेतला जात आहे.  अतिरेक्यांनी मुंबईसह देशातील अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होती. या लोकांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची योजना होती. त्यांना ड्रोन हल्ला करण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते. साकिब नाचन संघटनेत सहभागी होणार्‍यांना ‘बायथ’ म्हणजे आयएसआयएससाठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. एनआयएच्या कारवाईनंतर इसिसच्या टेरर मॉड्यूलचा भांडाफोड झाला आहे. एनआयए केलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
  ….
  षडयंत्राची भीषणता
  एनआयएने पडघा बोरिवली गावात तसेच ठाणे शहर, पुणे, मीरा भाईंदर आणि अंधेरीतील कार्गो एयरपोर्ट परिसरात छापेमारी केल्यानंतर या कारवाई सापडलेल्या शस्त्रांवरुन षडयंत्राची भीषणता लक्षात येईल. या कारवाईत ६८ लाखांची रोख रक्कम, १ पिस्तुल, २ एअरगन, १० मॅगझिन, ८ तलवारी, हमासचे ५१ झेंडे, ३८ मोबाईल फोन आणि २ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसात पडघा गावाशेजारी असणार्‍या बोरीवली गावात आयसीसशी सबंधित काही हालचाली तपासयंत्रणांच्या निदर्शनास आल्या होत्या. पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे धागेदोरे पडघा गावात सापडले होते. याच प्रकरणात साकीब नाचणचा मुलगा शामिल नाचण आणि भाऊ आकीब नाचण यांना अटक करण्यात आली होती मात्र या सगळ्यांचा नेता असणार्‍या साकीब नाचणला अटक करत एनआयएने हे मोठे ऑपरेशन यशस्वी केले.

  पडघा गावातील हालचाली पाहता आणि आयसीस मॉड्युलमध्ये काही तरुण सक्रिय होत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर येताच या कारवाईची तयारी मागील काही दिवसापासून केली जात होती. पडघा बोरिवली हे मुस्लिम बहुल वस्तीचं ठिकाण असून मागिल काही वर्षातील तिथल्या घडामोडी पाहता हे ऑपरेशन गोपनीय पध्दतीने करणे मोठे आव्हान होते. यासाठी एनआयएने महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसच्या मदत घेतली. ९ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता संपूर्ण बोरीवली गावाला महाराष्ट्र पोलिसांनी वेढा दिला. त्यानंतर एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच पथक एकाच वेळी जवळपास ६० ते ७० गाड्या घेऊन गावात शिरले. एकाच वेळी मध्यरात्री झालेल्या अशा छापेमारीमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. मात्र गावच्या सभोवताली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली होती. एनआयए दिलेल्या संशयितांची ओळख पटवण्यात महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस मदत करत होते. त्यानुसार साकिब नाचण आणि इतर १४ जणांना एनआयएने ताब्यात घेतले आणि सर्वांना घेऊन दिल्ली गाठली.

  आधी सीमी या दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा साकिब नाचण यावेळी आयसीस मोड्युलशी जोडला गेला असल्याचे तपास यंत्रणांना कळले होते. पण असे किती तरुण असतील, ज्यांना गझवा-ए-हिंदच्या संकल्पनेतून अतिरेकी विचारसरणीकडे ढकलले जात असेल. असे किती तरुण असतील ज्यांचे ब्रेन वॉश करून आपल्याच देशाविरुद्ध आत्मघातकी म्हणून तयार करण्यात येत असेल. नाचण हा एकटा अतिरेकी नाही. त्याच्यासारखे अनेक नाचण आजही मोकळे फ़िरत आहेत. साकीब नाचण आयसीस मॉड्यूलचा महाराष्ट्रातला नेता आहे, त्यामुळे तो मुस्लिम तरुणांना आयसीस मॉड्यूलला जोडून त्याना आयसीसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायला लावत होता. पडघ्यासारख्या लहानशा गावात या कारवाया सुरु असताना त्याबाबतची माहिती दडवून ठेवली जाते. एखाद्या देशद्रोह्याच्या मुसक्या आवळण्यासाठी जाणार्‍या पोलिसांवर विक्रोळीसारख्या ठिकाणी दगडफ़ेक केली जाते. आयएसआयएसचे झेंडे अधूनमधून फडकतात. हमासच्या क्रूर हल्ल्याचे जाहीर समर्थन केले जाते आणि इस्राईलच्या विरोधात भूमिका घेतली जाते. तिकडे पाऊस झाला की भारतात छत्री उघडली जाते, इतके काहीजण पाकिस्तान किंवा पाकिस्तानीच्या भूमिकेशी एकरुप झालेले अधून मधून घडणार्‍या घटनांमुळे आपल्या समोर येते. विशेष म्हणजे ज्या परिसरात, गावात अशा प्रकारच्या कारवाया सुरु असतात, त्याठिकाणी त्यांना विरोध केला जात नाही. मुस्लिम समाजाकडून अशा अतिरेकी विचारसरणीवर बहिष्कार केला जात नाही, ही बाब अधिक चिंता वाढविणारी आहे.

  मुस्लिम तरुणांना पडघा बोरीवली परिसरात वास्तव्यास येण्यास प्रवृत्त करत शरिया कायद्याचे पालन करत येत्या काळात देशविघातक कृत्यासाठी काम करण्याची शिकवण देत असे. या आयसीस मॉड्यूलचे हैंडलर हे परदेशातून हे सगळं मॉनिटर करत असल्याचेही तपासात समोर आले. विशेष म्हणजे पडघा बोरिवली हे ‘मुक्तक्षेत्र’ आणि अल शाम धरती बनवण्याचे साकीब नाचणचे स्वप्न होते. एनआयएने ही सगळी कारवाई करुन महाराष्ट्रातील आयसीस मॉड्यूल पुन्हा एकदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्नच म्हणावा लागेल. कारण अनेकांच्या मनात धर्माच्या नावावर विष कालवणार्‍यांनी त्याची पेरणी किती खोलवर करून ठेवली आहे, याचा शोध कोणाला घेता येणार नाही. मात्र ही देशाविरुद्ध युद्धाची तयारी आहे, हे लक्षात घेऊन देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणार्‍यांना शासन व्हायला हवे, तरच पाकिस्तानी विचाराचे हे अतिरेकी संपवता येतील, आणि महानगरांना पडू पाहणारा हा अतिरेकी घेरा सैल होईल.

  – विशाल राजे