नितीन चंद्रकांत देसाई यशस्वी घोडदौड; अनाकलनीय शेवट

मध्यरात्रीनंतर नितीन देसाई दिल्लीवरुन मुंबईत येतात काय, कर्जतच्या आपल्या एन. डी. स्टुडिओत जातात काय आणि व्हाॅईस रेकॉर्ड करुन आपल्या आयुष्याचा शेवट करतात काय अशी वेगळेच वळण घेणारी अशी त्यांच्या आयुष्याची वेगळे वळण घेणारी पटकथा कशी काय नियतीने लिहिली? आश्चर्य म्हणावे की आणि काय? आपल्या व्यवसायाच्या बाबतीत कधीच स्वस्थ न बसणारा, नवीन आव्हाने पेलणारा, नवीन वाटा स्वीकारणारा कलाकार असा शांत कसा होऊ शकतो? तसेच काही कारण असल्याशिवाय हे घडणे शक्यच नाही.

    तीस वर्षांपूर्वीची गोष्ट… त्या काळात एखादा दिग्दर्शक अन्य एखाद्या चित्रपटाच्या बहुचर्चित सेटला शूटिंगच्या वेळेस भेट देणे, त्याचं कौतुक करणे, अशा सकारात्मक गोष्टी घडत. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ (१९९४) चे बरेचसे चित्रीकरण हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे झाल्यानंतरही तेथील घरं, वातावरण यांचा सेट मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील आऊटडोअर्सला उभारण्यात आला. तो सेट म्हणजे जणू आपण डलहौसीत आहोत असा जणू फिल येतोय असं म्हटलं जाऊ लागले. तसे काही इंग्लिश मीडियात फोटोसह प्रसिद्धही झाले. अतिशय प्रतिष्ठित असा दिग्दर्शक विजय आनंद अर्थात गोल्डीने या सेटला भेट दिली. सेटवर अनिल कपूर, जॅकी श्राॅफ, मनिषा कोईराला, अनुपम खेर होते. गोल्डीला सेटवर आल्याचे पाहून ते कमालीचे प्रभावित झाले. पण गोल्डीचे लक्ष्य सेटवर खिळले होते.

    ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’, ‘जाॅनी मेरा नाम’ इत्यादी भारी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या गोल्डीसाठी हा अनुभव विलक्षण सुखद होता आणि त्याच्या तोंडून आले, कम्माल… यह आर्ट डायरेक्शन किसका है. त्यावर उत्तर आहे, नितीन देसाई. पहले आर्ट डायरेक्टर नितीश राॅय के साथ था, अभी खुद कर रहा है… विजय आनंदने नितीन देसाईची भेट घेतली. कामाचे विलक्षण कौतुक केले आणि ही गोष्ट मीडियात आली. चित्रपटसृष्टीत पसरली. त्यानंतर १९९५ ची गोष्ट… तेव्हापासून शंभर वर्षांपूर्वी म्हणजे ७ जुलै १८९५ रोजी मुंबईत फ्रान्सच्या ल्युमिरी बंधुनी ‘अरायव्हल ऑफ ट्रेन’ या लघुपटाचा केलेला शो म्हणजे आपल्या देशातील चित्रपट माध्यमाचे आगमन होते. त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वरळीतील नेहरु स्टेडियमवर ‘भारतातील चित्रपटाचे शतक’ या भव्य दिव्य दिमाखदार शोचे आयोजन करण्यात आले होते. सुभाष घई त्याचे सूत्रधार होते आणि या प्रचंड मोठ्या भव्य सेटसाठी त्यांनी नितीन देसाईंकडे सोपवली. नितीन देसाईंनी या स्टेजची एकूणच व्यापकता आणि रचना अशी केली की संपूर्ण चित्रपटसृष्टीची उत्स्फूर्त दाद मिळाली. कला दिग्दर्शक नीतिन चंद्रकांत देसाई या नावाभोवतीचे वलय या गोष्टींनी वाढले.

    बुधवारी २ ऑगस्ट २०२३ रोजी नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचे वृत्त माझ्यासाठी अंगावर एखादे वादळ आल्यासारखे होते. अनपेक्षित, अविश्वसनीय, धक्कादायक आणि काहीसं गूढ अशी ही गोष्ट वाटली. आपल्या मेहनत, फोकस्ड दृष्टिकोन, कामाशी असलेली बांधिलकी आणि अभ्यासू वृत्ती या सूत्रीवर आपल्या करियरमध्ये सतत पुढची पावले टाकण्यात आणि आपल्या कामाचा ठसा उमटवणारी व्यक्ती आपल्या आयुष्याचा शेवट असा कसा करु शकते, याचे खरे उत्तर त्याच व्यक्तीकडे असू शकते. पण ते आता ते मिळणे शक्य नाही. अशी एखाद्या फिल्मवाल्याची आत्महत्या म्हणजे उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे हे जणू ठरलेले. कित्येक कोटींच्या कर्जाच्या दबावातून हे टोकाचे पाऊल उचलले गेले आणि चार व्यावसायिकांचा दबाव होता, असे वृत्त गाजले. तसे असले तरी स्वतःला अतिशय कष्टाने घडवलेली व्यक्ती असा आपल्या आयुष्याचा डाव मध्येच कसा सोडू शकते, हा मानसशास्त्राचा विषय आहे. मध्यरात्रीनंतर नितीन देसाई दिल्लीवरुन मुंबईत येतात काय, कर्जतच्या आपल्या एन. डी. स्टुडिओत जातात काय आणि व्हाॅईस रेकॉर्ड करुन आपल्या आयुष्याचा शेवट करतात काय अशी वेगळेच वळण घेणारी अशी त्यांच्या आयुष्याची वेगळे वळण घेणारी पटकथा कशी काय नियतीने लिहिली? आश्चर्य म्हणावे की आणि काय?

    आपल्या व्यवसायाच्या बाबतीत कधीच स्वस्थ न बसणारा, नवीन आव्हाने पेलणारा, नवीन वाटा स्वीकारणारा कलाकार असा शांत कसा होऊ शकतो? तसेच काही कारण असल्याशिवाय हे घडणे शक्यच नाही. एकाकीपण आलेले, फारसं कोणाच्या संपर्कात नसलेले, संवाद नसलेल्या व्यक्ती असा आपल्या निराश आयुष्याचा शेवट करतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण नितीन देसाईबद्दल तर तसे कधीच जाणवले नाही. कायमच माणसात असणारे आणि झगमगाटी दुनियेत राहूनही फिल्मी न झालेले असे हे व्यक्तिमत्त्व होते. मला आठवतंय, मुंबई दूरदर्शनवर १९८७ साली गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ या मालिकेसाठी चित्रनगरीत भला मोठा सेट लागला होता आणि वर्षभर ही मालिका सुरु होती. कला दिग्दर्शक नितीश राॅय होते. सांताक्रुझ पूर्वेला त्यांचे घर व ऑफिस होते. त्यांच्याकडे नितीन देसाई चार क्रमांकाचे सहाय्यक म्हणून होते. तेव्हा त्यांचे वय बावीस असावे. या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी आमंत्रित केले असता नितीन देसाईंना पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर त्यांनी कबीर, चाणक्य अशा काही मालिकांसाठी सहाय्यक म्हणून काम करताना नवीन गोष्टी समजून व शिकून घेण्याची वृत्ती कायम ठेवली. हे होत असतानाच त्यांनी प्रमुख सहाय्यक कला दिग्दर्शक अशी मजल मारली.

    विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिंदा’ (१९८९) साठी त्यांनी बरीच कल्पकता दाखवून अनेकांची दाद मिळवली. एव्हाना नितीन देसाई याच चित्रपटसृष्टीत यशस्वी वाटचाल करणार हे स्पष्ट होतेच. अमोल पालेकर यांच्या ‘मृगनयनी’ या मालिकेचे कला दिग्दर्शन त्यांचेच होते. अधिकारी बंधुंनी ‘भूकंप’ (१९९३) च्या वेळेस नितीन देसाईंना स्वतंत्रपणे कला दिग्दर्शनाची पहिली संधी दिली आणि त्यांनी खरोखरच मागे वळून पाहिलेच नाही. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ नितीन देसाईसाठी टर्निंग पाॅईट ठरला. त्यानंतर विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली, आशुतोष गोवारीकर अशा आघाडीच्या चित्रपटाची कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे समीकरण घट्ट झाले. ‘देवदास’साठी प्रचंड मोठ्या महालाचा सेट असो, ‘लगान’साठी दीडशे वर्षांपूर्वीचे गाव असो, ‘स्वदेश’साठी स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही जगण्यासाठीच्या वीजेसारख्या सुविधा उपलब्ध नसलेले गाव असो अशी कमालीची विविधता नितीन देसाई यांच्या कामात आली.

    एकीकडे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान आणि अशातच राजकारण्यांशी वाढलेले संबंध, राजकीय पक्षांच्या सभा असोत, नवीन सरकारचा शपथविधी असो, नितीन चंद्रकांत देसाई यांचा भव्य- दिव्य दिमाखदार सेट हमखास असणारच हे समीकरण घट्ट होत गेले. राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, राज्य शासनाचा नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनानिमित्तचा देखावा अशा अनेक गोष्टींत नितीन देसाई हुकमी ठरले. चित्रपटात भूमिका (हॅलो जय हिंद), चित्रपट निर्मिती (बालगंधर्व), चित्रपट दिग्दर्शक (अजंठा), मालिका निर्मिती (राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, मराठी पाऊल पडते पुढे) अशा पावलांत एक पाऊल कर्जतमधील चौक गावातील भव्य एन. डी. स्टुडिओ. याच्या २००५ च्या भव्य उदघाटनापासून अनेक वेळा माझं जाणे होई. या स्टुडिओच्या प्रवेशव्दारापासूनच नितीन देसाईंच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवे. आतही ऐतिहासिक चित्रपट असो, वा अन्य भव्य दिव्य कलाकृती असो; त्याला साजेसे अनेक सेट, वस्तू, मूर्ती आणि वातावरण तेथे आहे. अगदी येथे राहण्याचीही उत्तम व्यवस्था आहे असे एकदा रेखाने दिलेले प्रमाणपत्र चक्क बातमीचा विषय ठरले.

    नितीन देसाईंचा हुरुप वाढवणाऱ्या अशा अनेक गोष्टी घडत. एकदा तर आशा भोसले यांच्या तरुण टवटवीत सदाबहार गाण्यांची कोजागिरी पौर्णिमा येथेच झक्कास रंगली. तेव्हा रात्रीच्या अंधारातील एन.डी. स्टुडिओ अनुभवला. अशा अनेक आठवणी आहेत. अनेक वैशिष्ट्यांमधून नितीन चंद्रकांत देसाईंची बहुस्तरीय चौफेर वाटचाल सुरु राहीली. अनेक पुरस्कार प्राप्त झाले. नऊ वेळा फिल्म फेअर आणि चारदा राष्ट्रीय पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांची वाटचाल समृद्ध केली. काही वर्षांपासून त्यांनी दाढी वाढवली आणि तशीच ती ठेवली. यामागचे कारण काय हे व्यक्तिगत असावे. आताही ‘महाराणा प्रताप’ या भव्य दिमाखदार ऐतिहासिक मालिकेच्या निर्मितीची तयारी सुरु होती. नितीन देसाई यांच्या चित्रपट कला दिग्दर्शनाची नावे सांगायची तर आ गले लग जा, माचिस, प्रेम रतन धन पायो… अशी बरीच आहेत. महत्वाचे आहे ते त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा उमटवलेला विलक्षण ठसा. तीच त्यांची कायमची ओळख राहिल.

    लालबागचा राजा आणि त्यासाठी नितीन देसाई यांचे देखणे भव्य डेकोरेशन, ठाणे शहरातील श्रीनवरात्रोत्सवाच्या देवीसाठी अनेक प्रकारच्या फूलांचे भव्य डेकोरेशन हेदेखील नितीन चंद्रकांत देसाई यांचेच कर्तृत्व. आताही काही दिवसांपूर्वीच देसाई यांनी परेल येथील लालबागचा राजाच्या तयारीची पाहणी केली. हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर हे चित्रपट आठवले तरी नितीन चंद्रकांत देसाई यांचे नाव व कला दिग्दर्शन नक्कीच आठवणार. या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या अनेक भेटीगाठीही आठवतील. त्यातील त्यांची सभ्यता, नम्रपणा नक्कीच आठवेल. चित्रपटसृष्टीतील अवतीभवतीच्या वातावरणाचा परिणाम त्यांनी अजिबात आपल्यावर होऊ दिला नाही यात बरेच काही चांगलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील कला दिग्दर्शनात एम. आर. आचरेकर, सुरेश सावंत, रत्नाकर फडके अशा अनेक महाराष्ट्रीय कला दिग्दर्शकांनी विलक्षण ठसा उमटवलाय. नीतिन चंद्रकांत देसाई यांनी तीच परंपरा यशस्वीपणे पुढे नेली…

    दिलीप ठाकूर
    glam.thakurdilip@gmail.com