
मागच्या आठवड्यात मुलाला पुस्तकाच्या दुकानात पाठवलं व म्हटलं मराठीतील सध्याचं बेस्ट सेलिंग बुक घेऊन ये. तो गेला दुकानात व तिथून फोन करून म्हणाला, “या दुकानात रॅकवर असलेली कथा, कादंबरी व कवितांची पुस्तकं मर्यादित आहेत. त्यांच्या कपाटातही फार नवीन दिसली नाही.” तरी मी त्याला म्हटलं तुझ्या चॉईसने चांगले घेऊन ये. ‘गुड मॉर्निंग’ आणतो म्हणाला. मी म्हटलं मराठीत हवं. हो बाबा ते मराठीतच आहे त्याचे उत्तर.
मागच्या आठवड्यात मुलाला पुस्तकाच्या दुकानात पाठवलं व म्हटलं मराठीतील सध्याचं बेस्ट सेलिंग बुक घेऊन ये. तो गेला दुकानात व तिथून फोन करून म्हणाला, “या दुकानात रॅकवर असलेली कथा, कादंबरी व कवितांची पुस्तकं मर्यादित आहेत. त्यांच्या कपाटातही फार नवीन दिसली नाही.” तरी मी त्याला म्हटलं तुझ्या चॉईसने चांगले घेऊन ये. ‘गुड मॉर्निंग’ आणतो म्हणाला. मी म्हटलं मराठीत हवं. हो बाबा ते मराठीतच आहे त्याचे उत्तर.
मुलाने पुस्तक आणल्यावर त्याला विचारलं, “औत्सुक्य हेच का निवडलंस?” तर तो म्हणाला, “या पुस्तकाची ही पाचवी आवृत्ती आहे. मला चांगलं वाटलं म्हणून मी आणलं.”
एका दिवसभरातच पुस्तकाचं वाचन झालं. छोटेखानी ५१ लेखांचा हा संग्रह. प्रशांत शांताराम देशमुख यांचा. प्रशांत देशमुख हे शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय महाविद्यालयीन जीवनात राज्यस्तरीय वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन आदी स्पर्धांमधून असंख्य पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. छत्रपती शिवराय हे त्यांचं गाजलेलं आणखी एक पुस्तक.
सकाळ वृत्तपत्रातील ‘गुड मॉर्निंग’ या सदरातील वर्षभरात प्रकाशित झालेल्या लेखनाचं संकलन म्हणजे हे पुस्तक. सकाळी एखादी व्यक्ती भेटली की आपण त्याला गुड मॉर्निंग म्हणतो त्यावेळी ती समोरची व्यक्ती आपल्याला गुड मॉर्निंग म्हणून प्रतिसाद देते. एका परीने दोघंही एकमेकांना सुख वाटण्याचा प्रयत्न करतात. सकाळच्या वेळी गुड मॉर्निंग वाचताना मिळणारा आनंद हे लेखक व वाचक एकमेकांना देतात ही या मागची कल्पना.
माणसाच्या विविध प्रकारच्या दैनंदिन वागण्यात त्याच्या स्वत:च्या वृत्तीचा, व्यक्तित्वाचा ओलावा असतो. सकारात्मक दृष्टी हा तो ओलावा. ज्या गोष्टीविषयी त्याला आस्था आहे, आवड आहे, गरज आहे त्यामध्ये चांगलं शोधण्याचा व ते दुसऱ्याला सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. हे सांगत असताना स्वत:चे अनुभव, संस्कार, त्याची विचारसरणी यातून हे प्रकट होत असते.
‘गुड मॉर्निंग’मधील विषय हे वैविध्यपूर्ण आहेत. साप्ताहिक सदर असल्याने कोणत्याही वयोगटातील वाचकांना भावणारे हलके-फुलके विषय लेखकाला शोधावे लागतात व ते तितक्याच लालित्यपूर्ण पद्धतीने मर्यादित शब्दांत मांडावे लागतात. त्याचबरोबर बोध, तात्पर्य वाचकांपुढे त्याला ठेवावे लागते. या सर्व लेखांतील विचार, बोध हे याच प्रकारचे आहेत.
‘शोध स्वत:चा’, ‘शब्द असेही’, ‘सुखाची गुंतवणूक’, ‘श्रद्धा जग जिंकते’, ‘कॉमन सेन्स’, ‘सकारात्मक विचार’, ‘जगणं सुंदर आहे’, ‘एकाग्र मनाची मुक्तता’, ‘पसायदान माउलीचे’, ‘आनंदाच्या वाटा’, ‘कर के देखो’ अशी काही लेखांची नावे आहेत.
धावपळीच्या जीवनात घडाळ्याच्या काट्याला बांधलेल्या माणसाला चार-दोन वाईट अनुभवामुळे नकारात्मकता येते व याच विचारात ही नकारात्मकता तो वाढवून बसतो व त्याला त्याच्या दृष्टीने तो ‘सकारात्मकता’ म्हणतो. असा उलटा विचार करणाऱ्या अहंकारी माणसाला या पुस्तकातील सर्व लेखांतून एक चांगली दृष्टी मिळू शकते.
माणसाचं जगणं हे निसर्गाचं देणं आहे. या निसर्गाशी वेगवेगळ्या माध्यमातून माणसाने संवाद साधायला हवा. मग त्याचं मन मोकळं होतं. समज-गैरसमज दूर होतात. परस्परांप्रती आदरभाव वाढतो. मग या संवादाला शीर्षक काही द्या. या पुस्तकातील प्रत्येक लेखात आपलं जगणं मुळातच सुंदर आहे ते अधिक सुंदर बनवायला हवं असा सल्ला लेखकांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी दैनंदिन जगण्यात भेटलेल्या अनेक माणसाच्या व्यक्तिचित्रणातून नैतिकता, मूल्य सांगण्याचा प्रयत्न आहे.
या माणसांमध्ये कधी पाचशेची पडलेली नोट परत करण्यासाठी गाडीचा पाठलाग करणारा प्रामाणिक फळं विकणारा आहे. मुलांना महत्त्वाचे प्रश्न काढून द्या हे सांगणारा भाबडा पालक आहे. पहाटे तीन वाजता फोन करून शंका विचारणारा एखादा शंकासूर श्रोता आहे तर लंगड्या कुत्र्याला आपल्या हातातलं बिस्किट भरवणारी निष्पाप चिमुरडी आहे. तर कधी पेडगांवला भेटलेले प्रेमळ क्षीरसागर गुरुजी आहेत.
अनेक हलक्या फुलक्या प्रसंगांतून प्रशांत देशमुख यांनी आध्यात्मिक सल्लाही दिली आहे. ध्यानाचे महत्त्व सांगताना ते लिहितात, “ध्यान आपल्याला इतकं मोठं करील की देव पाहावयास गेलो व देवची झालो.”, “दानाने धन्य होतो देणारा, घेणारा नाही.”
सध्याचं राजकारण पटत नाही म्हणून मी मतदानालाच जाणार नाही, हा काही राजकारण सुधारण्याचे प्रयत्न असू शकत नाही असा सल्ला ते देतात. सर्व पक्ष देशहितासाठीच असतात. फक्त प्रत्येकाचं देशहित करण्याचं धोरण आणि मार्ग वेगळे असतात इतकंचं. आपल्या घरात खोडकरपणे वावरणारा नरेंद्र उद्याचा स्वामी विवेकानंद असेल हे सांगताना लेखक पालकांना जाता जाता सहज मोलाचा सल्ला देतात. फेसबुक आणि व्हॉटस् ॲपवर साता समुद्रापल्याड आपल्या माणसांशी चॅट करताना आपल्या शेजारच्या घरातील एखादा विवंचनेत आहे, दु:खात आहे हे त्यांच्या गावी नसते व आपल्याकडे वेळही नसतो हे सांगताना लेखक क्षणभर हळवा होतो.
ज्या घरात मुलगी जन्माला येते. त्या घरात मांगल्य जन्माला येतं. मुलगी म्हणजे प्रेम, त्याग, सहनशीलता, समर्पण, कोमलता, घराचा मान आणि संस्कृती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू कोणाताही असो. पण मुलगी घरात असेल तर असतो फक्त जिव्हाळा. तिच्या ठायी असलेले हे सर्व अलौकिक गुण म्हणजे निसर्गाने मुलीच्या रूपाने आपल्याला बहाल केलेलं धनच असतं. म्हणूनच ‘पहिली बेटी धनाची पेटी’ असा स्त्रीशक्तीचा गौरव ते सार्थ ठरवतात.
रायगड जिल्ह्यातील खालापूर जिल्ह्यातील हातनोली हे लेखकाचं गाव. या गावच्या रस्त्यांनी, पायवाटांनी, गल्लीबोळ मंदिरांनी, शेतशिवार, क्रीडागणांनी एक मृद्गंध आपल्याला दिला ज्यानं आपलं जगणं, जीवन सुंदर आहे हे कळलं. तनामनातही ही दरवळ वक्तृत्वाच्या व लेखणीच्या रूपाने लोकांसमोर मांडत आहे याचा सार्थ अभिमान प्रशांत देशमुख यांना आहे.
ध्यानामुळे क्रोधावर नियंत्रण मिळवता येतो. ध्याने हे माणसाचं चार्जिंग आहे. त्यामुळे जीवनामध्ये एखादा ढासळण्याचा, कोलमडण्याचा, पाय घसरण्याचा प्रसंग आलाच तर ध्यानाची साधनाच त्याला तारते. म्हणून ध्यान म्हणजेच आत्मप्रकाश आहे असं ध्यानाचं महत्त्व ते सांगतात.
चांगला माणूस घडला असा या पुस्तकाचा उद्देश आहे. किंबहुना तो असतोच. पण प्रशांत देशमुख यांनी या पुस्तकाचा माध्यमातून आत्मविकासाबरोबरच व्यक्तिमत्त्वविकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे यातच या पुस्तकाचे यश आहे.
गुड मॉर्निंग
लेखक : प्रशांत शांताराम देशमुख
प्रकाशक : उज्ज्वला प्रशांत देशमुख, हातनोली, रायगड
मुखपृष्ठ : विष्णू थोरे, संजीव मुळ्ये
आवृत्ती : पाचवी
पृष्ठ : १४२, मूल्य : रु. १५०/-
– प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
raghunathshetkar0@gmail.com