थॉमस कपच्या निमित्तानं; बॅडमिंटनमध्ये इंडिया शायनिंग

गेल्या रविवारपर्यंत थॉमस कप नावाची कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते, हेच आपल्या गावी नव्हते. हे नाव भारतीयांना समजले ते भारतीय संघाने अभूतपूर्व कामगिरी करत ही स्पर्धा जिंकल्यानंतर. बॅडमिंटनमध्ये महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपत असताना पुरूषांच्या संघाने मिळवलेले हे यश खरोखर अतुलनीय आहे. या निमित्ताने भारतीय बॅडमिंटनचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि अर्थात भविष्यकाळ याचा वेध घेणे क्रमप्राप्त ठरते...

  बॅडमिंटनमध्ये अत्यंत मानाची समजली जाणारी थॉमस कप स्पर्धा… आतापर्यंत भारत या स्पर्धेत कुठेच नव्हता. त्यामुळे या स्पर्धेबाबत किंवा त्याच्या महत्त्वाबाबत आपल्याला माहिती असण्याची काहीच गरज नव्हती. पण गेल्या रविवारी सगळ्या भारतीयांच्या तोंडी हे नाव झळकले ते ४ भारतीय खेळाडूंच्या कर्तृत्वामुळे… लक्ष्य सेन, स्वस्तिक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी आणि कदंबी श्रीकांत या चार भारतीय बॅडमिंटनपटूंच्या संघाने इतिहास घडवला.

  नुसता इतिहास घडवलाच नाही, तर नवा इतिहास रचला. कारण १४ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या आणि गतविजेत्या बलाढ्य इंडोनेशियाला चारी मुंड्या चित करून भारताने थॉमस कपवर आपली मोहोर उमटवली. या अंतिम स्पर्धेचा थरार हा भारताच्या विजयाइतकाच थरारक होता. हा थरार नेमका कसा होता, हे जाणून घेण्यापूर्वी स्पर्धेबाबत फारशी माहिती नसलेल्या वाचकांना थोडे फायनलबाबत सांगायला हवे…

  बेस्ट ऑफ थ्री…

  थॉमस कप स्पर्धेचा प्रकार साधारणतः टेनिसमधल्या डेव्हिस कपसारखा असतो. दोन संघ असतात. त्यात ३ किंवा ४ खेळाडू असतात. प्रथम दोन खेळाडूंमध्ये सिंगल्स मॅच होते. त्यानंतर एक डबल्स आणि त्यानंतर वेगळ्या दोन खेळाडूंमध्ये तिसरी, परतीचा एकेरी सामना होतो. या तीन मॅचपैकी २ मॅच जिंकणारा अर्थातच विजेता ठरतो. भारत विरुद्ध इंडोनेशिया या अंतिम सामन्याबाबत बोलायचे तर दोन्ही सिंगल्स आणि डबल्स असे तिन्ही सामने हारण्याच्या परिस्थितीत भारतीय खेळाडू आले होते. पण… नियतीला हे मंजूर नसावे… त्यामुळेच अत्यंत नाट्यमयरित्या भारताने चक्क ३-० अशा फरकाने इंडोनिशियाला मात दिली, तेव्हा अनेकांना आश्चर्याने तोंडात बोटे घातली…

  ०-३ ते ३-०… विजयाचा प्रवास

  पहिली सिंगल… लक्ष्य सेनने पहिला गेम ८-२१ अशा मोठ्या फरकाने गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तो अँथोनी सिनिसुका जिंटिंग याच्यापेक्षा ७-११ने पिछाडीवर होता. आणखी थोडा गेम बिघडला असता तरी लक्ष्यने हा सामना गमावला असता. मात्र या परिस्थितीतून सहिसलामत बाहेर पडला आणि त्याने पहिली सिंगल ८-२१, २१-१७ आणि २१-१६ अशी जिंकली. लक्ष्यच्या या विजयामुळे टीम इंडियाचे ‘लक्ष्य’ दृष्टीपथात आले असले तरी ते सोपे नव्हते… त्यानंतर झालेली डबल्स… स्वस्तिक साईराज आणि चिराग विरुद्ध मोहम्मद अशान आणि केविन संजया सुकामुजो… पहिला गेम १८-२१नं गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही इंडोनेशियाची टीम १७-२०, म्हणजे मॅच पॉइंटला पोहोचली होती. मात्र त्या स्थितीमधून बाहेर पडत २३-२१नं स्वस्तिक-चिरागनं हा गेम जिंकला आणि अत्यंत अटीतटीच्या तिसऱ्या गेममध्ये २१-१९ने विजय मिळवत भारतीय संघाचा विजय निश्चित केला. अर्थात, स्पर्धा जिंकणं आणि निखालसपणे जिंकणे यात फरक आहे. भारताचा अनुभवी खेळाडू कदंबी श्रीकांतला हा फरक निश्चितच समजतो. त्यामुळेच परतीच्या सिंगलमध्ये त्याने आपला खेळ बिलकूल ढिसाळ होऊ दिला नाही. २१-१५ आणि २३-२१ फरकाने हा सामना जिंकत भारताचा ३-०ने विजय निश्चित केला… आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये असलेला महिला खेळाडूंचा दबदबा पुरूष खेळाडूंनीही सिद्ध केला आहे.

  फुलराण्या आणि शटलकिंग्ज !

  गोपिचंदने२००१मध्येे ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली होती. मात्र त्यानंतर बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव फारसे घेतले जात नव्हते. २००९ मध्ये सायना नेहवालने बी डब्ल्यू एफ सुपरसिरीज जिंकली आणि तिथून भारतीय महिला खेळाडूंचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. सायनाला लाडाने ‘फुलराणी’ म्हटले जाऊ लागले… अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत सायनानं भारताचा तिरंगा फडकत ठेवला. त्यानंतर पी व्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावत सायनाने रचलेल्या पायावर कळस चढवला. मात्र पुरूष खेळाडूंना आजवर अशी मोठी कामगिरी करता आली नव्हती. थॉमस कपनं ही कसूर भरून काढलीये. पी गोपिचंद यांच्या ‘शिष्या’ दमदार कामगिरी करत असताना त्यांचे शिष्य मात्र फारसे चमकले नाहीत. या विजयामुळे भारताच्या शटलकिंग्जनी आपलेही अस्तित्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या विजयाने भारताच्या छोट्या शहरांमध्ये दडलेले टॅलेंट पुन्हा उजेडात आणले आहे.

  छोट्या शहरांचे मोठे टॅलेंट

  उत्तराखंडमधले अलमोरा हे शहर… लक्ष्य सेन या छोट्या शहरातून आलेला अत्यंत गुणी खेळाडू. आंध्र प्रदेशातील रावुलापालम आणि अमलापुरम ही अत्यंत छोटी शहरे आणि तिथून आलेले अनुक्रमे कदंबी श्रीकांत आणि स्वस्तिकसाईराज रांकीरेड्डी… टॅलेंट ही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूसारख्या शहरांची मक्तेदारी नाही, हे सिद्ध करणारे हे तीन खेळाडू…

  भारताच्या थॉमस कप विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या चौघांपैकी तिघे अशा छोट्या शहरांमधून आलेले. यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी… छोट्या शहरांमधून आलेले हे अत्यंत प्रतिभावान खेळाडू, नव्हे… कर्णधार. एकाने भारताला पहिला वन-डे विश्चचषक जिंकून दिला आणि दुसऱ्या पहिल्यांदा झालेला टी-२० विश्वचषक. ही तुलना केवळ छोट्या शहरातल्या टॅलेंटपुरती मर्यादित नाही… थॉमस कपमध्ये मिळालेला विजय ही भविष्यकाळाची नांदी ठरू शकते…

  १९८३ आणि २०२२

  कपिल देवच्या संघाने १९८३ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तशी कुणीच अपेक्षा केली नव्हती. मात्र तेव्हा इंग्लंडच्या लॉर्डसवर इतिहास घडला आणि त्याने भारताचे क्रिकेट बदलले आणि जगाचा क्रिकेट इतिहास नव्याने लिहिला गेला. आता भारत क्रिकेट विश्वावर अक्षरशः राज्य करत आहे. थॉमस कपचा इतिहास हा त्यापेक्षा जुना आहे. तब्बल ७३ वर्षांनी भारतीय संघाला केवळ स्पर्धेत स्थानच नव्हे, तर स्पर्धा जिंकता आली आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी ही गोष्ट अत्यंत समाधानकारक आहे. या विजयामुळे भारतातील उदयोन्मुख खेळाडूंना नवी ऊर्जा मिळणार आहे, अगदी क्रिकेटमध्ये ८३ साली मिळाली तशीच… त्यामुळे या विजयाचे मोल मोठे आहे.

  पण म्हणतात नाही, ‘उच्च पदावर पोहोचणे सोपे आहे, पण तिथे टिकून राहणे कठीण आहे.’ थॉमस कपच्या विजयानंतर भारतीय बॅडमिंटनपटूंची जबाबदारी अधिक वाढली आहे. आता हे उच्चस्थान टिकवून ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाशी संवाद साधला. हे केवळ भारतातच घडू शकते. पंतप्रधानांच्या या एका छोट्याशा कृतीमुळे खेळाडूंचा हुरूप वाढणार आहे. आता हा विनिंग मोमेंटम टिकवून ठेवण्याची जबाबदारी भारतीय बॅडमिंटनपटूंवर आहे. ती ते जोमानं पार पाडतील, अशी आशा करूयात आणि भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात!

  sportswriterap@gmail.com