uddhav thakre with all ministers

वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे राजकारण नोव्हेंबर २०१९ मध्ये एका अनपेक्षीत वेगळ्या वळणावरून पुढे सरकले आहे. त्याची वर्षपूर्ती २८ नोव्हेंबर रोजी होत असताना या वर्षभराचा आढावा, लेखाजोखा आणि विश्लेषण वेगवेगळ्या अंगानी होत आहे.

वर्षपूर्तीच्या(one year of thakre government) या राजकीय वळणावर मध्येच कोविड-१९ कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतर जाणिवपूर्वक ठेवा, चेहऱ्यावर मास्क लावा आणि वेळोवेळी हात धुवून घ्या, असे अगदी सध्याच्या राजकीय स्थिती आणि वातावरणाला सुसंगत संदेश जगभर देण्यात आले. मग काय त्यांचे तंतोतंत पालन करावेच लागणार हे आलेच. नाहीतर भिती टाळेबंदीची! सारे काही थांबण्याच्या, बंद होण्याच्या टाळेबंदीच्या भितीपेक्षा ‘जाणिवपूर्वक अंतर पाळणेच उत्तम’ त्याला मग सामाजिक अंतर म्हणा, शाररीक म्हणा किंवा राजकीय अंतर म्हणा, तीनही पक्ष आणि विरोधीपक्षांसाठी हा मूलमंत्र ठरला आहे, मास्क म्हणजे मुखवटा साऱ्यांनीच लावला आहे. मतभेद असले तरी सत्तेत तिघेजण मुखवटे लावून एकत्र बसले आहेत. हात धुवून एकमेकांच्या आरोग्यासाठी कोरोना विषाणु पसरू नये म्हणून काळजी घेत आहेत. तर तीन पक्षांच्या संधीसाधूपणाच्या राजकारणाला ‘टाळेबंदी उठवा’ मंदीर उघडा,म्हणत आक्रमकपणे संघर्ष करत टीका करण्याची संधी साधत विरोधकही हात धुवून मागे लागत आहेत.

नवे असलो तरी नवखे नाही

राज्य विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधीपक्षांकडून पहिल्याच अधिवेशनात एकनाथी भारूडातून हिणवताना ‘काट्याच्या आणिवर वसले तीन गाव, दोन वसले एक वसेचीना’ असे म्हणत तीन पक्षांच्या सरकारचे काही अस्तित्व आणि भवितव्य नाही असे सांगण्याचा प्रयत्न झाला होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील मुख्यमंत्री म्हणून नंतर आपल्या खास शैलीत उत्तर देताना, ‘सभागृहात आपण येथे ‘नवे’ असलोतरी ‘नवखे’ नाही हे हजरजबाबी पध्दतीने भाषण करत दाखवून दिले होते!

वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे राजकारण नोव्हेंबर २०१९मध्ये एका अनपेक्षीत वेगळ्या वळणावरून पुढे सरकले आहे. त्याची वर्षपूर्ती २८ नोव्हेंबर रोजी होत असताना या वर्षभराचा आढावा, लेखाजोखा आणि विश्लेषण वेगवेगळ्या अंगानी होत आहे. एका वाक्यात किंवा थोडक्यात याचे वर्णन करता येत नाही. तरी देखील कुणाला याबद्दल अगदी एका वाक्यात सांगायचे झाले  तर या वर्षभराचा आणि त्या आधीचा काही वर्षांचा राज्याचा राजकीय प्रवास हा ‘बदलाचे राजकारण होते की बदल्यांचे राजकारण’ आहे हे अजूनही कुणी ठामपणे सांगू शकत नाही.

खरेतर या साऱ्या स्थित्यंतराला, परिवर्तनाला किंवा राजकीय संक्रमणाला वर्ष झाले तरी अजूनही त्यातील बऱ्याच गोष्टींचा तसा स्पष्ट अंदाज कुणालाच नाही हे कुणी प्रांजळपणे कबूल केले नाही तर उघड सत्य आहे. कारण २५ वर्ष एकत्र राहिलेल्या, त्यानंतर प्रचंड मतभेद झाले तरी ‘आमच ठरलंय’ म्हणत लोकसभा, विधानसभा एकत्र लढलेल्या दोन मित्र पक्षांना सत्ता संपादनासाठी पुरेसे बहुमत असतानाही त्यांच्यात बेबनाव होतो? त्यातून दुय्यमपणाची वागणूक दिल्याचे सांगत एकजण सर्व पर्याय मोकळे असल्याचे सांगत फारकत घेतो. नव्हे चक्क ज्यांच्या विरोधात निवडणुका जिंकल्या त्या वेगळ्या राजकीय विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तेची बोलणी करतो, त्यात बाजी मारत मुख्यमंत्रीपद देखील पटकावतो. आणि जुन्या दोस्तान्याचा त्याग करत मुख्यमंत्रीपदावर बसून पुन्हा सहकार्य करण्याचे आवाहन करताना दिसतो! सारेच अतर्क्य, अनाकलनीय असे वाटावे असे या घटनापटाकडे पाहिले की जाणवते. आणि तरीही एकनाथी भारूडात म्हटले आहे तसे किंचित राहिली फूणफूण. .  असा प्रकार त्या सत्तांतराच्या नाट्यानंतरही दोन्ही बाजूला कायम सुरूच आहे!

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, राज्यात ‘सेना रुसली आहे’ आणि तिला राजी करत पुन्हा नांदवायला नेण्यासाठी साम, दाम, दंड नितीवाल्या भाजपच्या नेत्यांच्या ‘नाकी नऊ’ आले आहेत अशी स्थिती होती. तरी ‘ते काय त्यांची बारगेनिंग पॉवर वाढवत आहेत’ असाच काहीचा बेदरकार पवित्रा भाजपच्या गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या नेत्यांचा होता. पण असे वाटले असतानाच २३तारखेला भल्या पहाटे त्यातील कळसाध्याय लिहिला गेला. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांपैकी महत्वाचे नेते आधारस्तंभ असलेल्या अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप झाला. आणि सारे चित्र पालटले, हो- नाही म्हणत नव्या बदलासाठी तयारी नसलेल्या साऱ्या राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. हे काही राज्यातल्या ‘बदलाचे राजकारण नाही हे राजकीय बदल्यांचे संकेत आहेत’,असे  स्पष्टपणे दिसू लागले. त्यामुळेच सत्तेच्या सारीपाटावर कोण जिंकणार? यासाठी अडेलपणा करून भाव खाणाऱ्या तीनही पक्षांचे नेते एकवटले आणि त्यांनी पुढच्या अवघ्या पाच दिवसांत आम्ही १६९ म्हणत मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेच्या नावाला केवळ पंसतीच दिली नव्हेतर त्यांना पदावर बसविले सुध्दा! त्यावेळी कुणाला कोणते खाते, कोणती पदे आणि कोणत्या दालनात बसवायचे इत्यादी विषयांवर नंतर चर्चा करू म्हणत केवळ तीनही बाजूंच्या सहा जणांसह ठाकरे सरकार स्थानापन्न झाले

फडणवीस अखेर विरोधी बाकावर बसले

‘मी पुन्हा येईन’ चा २३ तारखेच्या पहाटेचा ‘स्वप्नपट’ आता ‘भयपट’ ठरला होता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवारच यथावकाश या नव्या सरकारचेही उपमुख्यमंत्री झाल्याने सरकारची नवी वाटचाल आता सुरू होणार असे संकेत मिळाले. मात्र मुख्यमंत्री होण्याचा आटापिटा करणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना अनपेक्षीतपणे विरोधीपक्ष नेत्यांच्या खुर्चीत बसावे लागले. यावर विधानसभेत पहिल्यांदाच भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्मिक शैलीत म्हणाले होते की, ‘हा सारा राजकीय दैवाचा खेळ आहे. कुणाला माहिती होते देवेंद्रजी की, तुम्ही त्या खुर्चीत समोर बसणार आहात?, आणि मी या पहिल्या खुर्चीत, (मुख्यमंत्री म्हणून) बसेन? कदाचित आज मी घरीच बसून दूरचित्रवाणीवरून तुम्हाला या खुर्चीत बसून बोलताना पाहात असतो? पण नाही नियतीला हे मान्य नव्हते’.

त्यानंतर गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक विरोधीपक्षाचा जो आवेश, जोश आणि जोम दाखविला आहे, त्याला महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांच्या राजकीय इतिहासात तोड नाही. या पूर्वीच्या काळात सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यासमोर अभ्यासू लढाऊ शेतकरी कामगार पक्षाचे विरोधीपक्ष नेते, किंवा पुलोदच्या मुख्यमंत्र्यासमोर बलाढ्य काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांना या राज्याने अनुभवले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या एकट्याने विरोधात बसून वैधानिक जबाबदारी पार पाडण्याच्या या ऐतिहासिक वर्षपूर्तीला राज्याच्या इतिहासात वेगळेच स्थान द्यावे लागेल. याचे कारण जो पक्ष केंद्रात ठामपणे मोठ्या संख्याबळासह सत्तेत आहे, ज्याचे नेते देशात आणि जगात सलग सहा सात वर्षापासून लोकप्रिय असल्याचे सांगितले जाते तो पक्ष स्वत:चे १०५ आणि समर्थक दहा आमदार असताना राज्यात खड्यासारखा उचलून विरोधी बाकांवर बसविण्यात आला आहे. हे यापूर्वी क्वचितच घडले असेल!

विरोधाची धार तीव्रच

त्यापूर्वी अनेक राज्यात निवडणुकांनंतर ज्या पक्षाने त्यांच्या आवड्त्या साम दाम नितीचा परिचय करून देत सत्ता हस्तगत केलीच होती असा ताजा इतिहास आहे. त्या पक्षाला पुरेसे संख्याबळ, राजकीय किंवा व्यक्तिगत एकमत नसलेल्या तीन पक्षांच्या सरकारने विरोधी बाकांवर बसविले होते. अशा अभूतपूर्व घडामोडींनंतर भाजपच्या विरोधाची धार तीव्रच राहणार हे नक्कीच होते. त्यातही ज्या नेत्यांनी भल्या पहाटेदेखील सोबत येवून सत्तेचा सहभाग घेण्यासाठी साथ दिली होती आणि ज्यांनी विधानसभेत युती करतील की नाही असे वाटले असतानाही एकत्र येवून साथ दिली होती त्यांना समोरच्या बाकांवर प्रमुख सत्ताधारीपक्ष म्हणून बसलेले पाहताना कोणत्याही विरोधीपक्षांच्या नेत्यांना हातून संधी हुकल्याचा मनस्ताप निश्चितच होणार. विरोधीपक्ष म्हणून किंवा राजकीय नेता म्हणून पराकोटीचा संयम दाखवत या क्षणाला राज्याच्या जनतेच्या हितासाठी आपल्या लोकशाही कर्तव्यांना स्मरून वाटचाल करणे आवश्यक असते. आक्रमक विरोधक असूनही संयम आणि नियम पाळून लोकशाहीच्या चौकटीत ‘सर्वेसुखीन भवंतू’ या उद्देशाने काम करणे सोपे नाही. आणि तीच मोठी अडचण देखील आहे, कारण ‘मी पुन्हा येणार’ म्हणत अन्य पक्षांसह स्वपक्षातल्या आशाळभुतांची गर्दी जमविल्यानंतर दहीहंडीच जर फोडता आली नसेल तर या गर्दीला काय द्यायचे? कसे समजवायचे? आणि सांभाळायचे हा यक्षप्रश्न निर्माण झाला.

सत्य पचवणे नव्हते सोपे

केंद्रातील सरकारमध्ये बसलेल्या, राजभवनावर बसलेल्या हितचितंकाच्या माध्यमातून मग एक वेगळाच खेळ खेळण्यास सुरूवात झाली. राज्याचे जनेतेच दुष्काळ, आर्थिक तंगी, आरक्षण, रोजगाराच्या संधी यांचे गंभीर प्रश्न, ते सोडविण्यासाठी मागण्या, आणि ते सुटले नाहीत किंवा सुटणारच नाहीत या तर्कातून मग राजभवनावर सातत्याने जावून तक्रारी, भेटीगाठी यांचा सिलसिला सुरू झाला. या साऱ्यातून जाणवत होती ती प्रचंड राजकीय अस्वस्थता, चिडचिड आणि काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असतानाही काहीच करता येत नसल्याची अगतिकता! पण राज्याच्या इतिहासात विरोधी पक्षाला ‘सारे काही असूनही काहीच करता येत नाही, आणि हे सत्तेतील जुने मित्र आता काहीच कामाचे नाहीत हे सत्य पचविणे सोपे नव्हते हे मान्यच करायला हवे!

या सगळ्या राजकीय घुसमटीतून आणखी एखादा स्फोट होणार त्यात हे सरकार पडणार, असा तर्क मग बांधला जावू लागला, एक महिना, दोन. तीन मुहूर्त आणि भाकीते देणारे राजकीय ज्योतिषी यांचे फावले! अणि २८ नोव्हेंबरला १२ महिने पूर्ण झाले.

गेल्या वर्षभराचा आढावा घेताना या साऱ्या घटनाक्रमांचा मागोवा घेत या वर्षभरात ‘गेले द्यायचे राहून’ म्हणत सर्वानीच आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे नाही का?

– किशोर आपटे