mahatma gandhi and lokmanya tilak

प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जिथे खूप काही सोसावे लागते. ऐशो आरामी जीवन जगणाऱ्या लोकांकडून कधी कोणाला काही चांगलं बनण्याची प्रेरणा मिळत नाही; पण ज्यांच्या जीवनात त्याग, सहनशीलता, नम्रता, प्रेम, निस्वार्थभाव.. अशा गुणांचा सुगंध दरवळतो. त्यांच्या जीवनातले क्षण आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणून मोठे होण्याची इच्छा असेल तर गुणांनी मोठे होण्याचा ध्यास घ्यावा. आपले कर्म हीच आपली ओळख आहे.

महात्मा गांधींच्या जीवनातला एक किस्सा सांगितला जातो की, एकदा महात्मा गांधी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना सोडवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गेले. ठरल्याप्रमाणे गाडी आली. त्याच गाडीने आलेल्या एका गृहस्थाला सामान नेण्यासाठी हमाल पाहिजे होता. कमरेला नुसता पंचा गुंडाळलेले गांधीजी पाहून त्या माणसाला वाटले की हा हमाल आहे. ‘ए कुली’ असे म्हणून त्याने गांधीजींना हाक मारली. गांधीजी हात जोडून अदबीने त्यांच्या समोर उभे राहिले. ‘तुला एम. के. गांधींचे घर माहीत आहे का?’ गांधीजी म्हणाले, ‘हो’. त्या माणसाला महात्मा गांधींकडेच जायचे होते. पण आपण महात्मा गांधीनाच हमाल समजलो हे त्याच्या लक्षात आले नाही. ‘किती पैसे घेशील?’ त्याने गांधीजींना विचारले. गांधीजी म्हणाले – ‘साहेब तुम्ही द्याल तेवढे. मी घासाघिस करणार नाही.’ ‘ठीक आहे. तुला मी दोन रुपये देईन’ असे म्हणत त्या गृहस्थांनी आपली बॅग गांधीजींच्या डोक्यावर ठेवली. गांधीजी घरी पोहोचले. घराच्या पुढच्या दारात त्यांनी सामान ठेवले. ‘थांबा हं, दार उघडतो’ असे म्हणत गांधीजी घराच्या मागच्या दाराने गेले व त्यांनी दार उघडले. सामान घरात घेतले. स्वतःच्या छातीकडे हात करीत ते त्याला म्हणाले – ‘या देहाला मोहनदास करमचंद गांधी म्हणतात’. आपण गांधीजींना हमाल समजलो. एवढेच नव्हे, तर त्यांना आपले सामान वहायला लावले याचे त्या गृहस्थाला खूप वाईट वाटले. ही गोष्ट आपल्याला हे सांगते की मनुष्य हा कधीही पैसा, कपडे, पद, .. यांनी मोठा होत नसतो. तो होतो आपल्या गुणांनी. गांधीजींनी कधीच पदवी किंवा मान मिळावा ह्यासाठी काही परिश्रम केले नाहीत. त्यांचे जीवन नेहमी त्यागाने भरलेले.

आजचा मनुष्य मग तो कोणत्याही क्षेत्रातला असला तरी त्याला मान सन्मानाची भूक ही असतेच. नाहीतर आपल्या पदाचा अहंकार हा असतोच. जोपर्यंत त्याच्या अहंकाराला खतपाणी मिळते तोपर्यंत सुखी नाही तर दुःखी आणि कधी कधी स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी उगाच मेहनत करावी लागते. पण हे एक सत्य आहे की जो मनुष्य स्थूल गोष्टींच्या पाठी धावतो तो कधीच सिद्धी मिळवू शकत नाही. भारतामध्ये होऊन गेलेले अनेक संत, योगी यांच्याकडे जबर शक्ति होती. ह्या शक्तींनी फक्त सजीव नाही पण निर्जीव वस्तूंवर पण त्यांचे आधिपत्य होते. त्यामुळेच आजही त्यांच्या जीवनगाथा खूप रुचिने ऐकवल्या जातात. त्यांच्या संकल्प, स्वप्नामध्ये सुद्धा अश्या काही शुल्लक अपेक्षा नसायच्या. स्थूल ऐश्वर्यात कधीच त्यांचे मन अडकले नाही म्हणून त्यांच्या विचारांमध्ये अफाट सामर्थ्य होते. ‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ असे समर्थांनी सांगितले आहे. मोठेपणा सर्वांना हवा असतो पण त्यासाठी झिजण्याची कुणाचीच तयारी नसते.

लोकमान्य टिळकांना एकाने विचारले – ‘मी काय केले म्हणजे लोकं मलादेखील लोकमान्य म्हणतील?’ ‘तेव्हा टिळकांनी तात्काळ उत्तर दिले – ‘मला लोकमान्य म्हणावे ही अपेक्षा सोडून दे. कीर्ती हे आपले उद्दिष्ट नसावे, तो आपल्या कष्टाचा व त्यागाचा परिणाम असावा.’ थोर पुरुषाची कीर्ती आपोआप फुलातील सुगंधाप्रमाणे सदैव पसरते. टिळकांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. शाळेत शिक्षकाची नोकरी करत असताना त्यांनी कधी पगार नाही घेतला. दोन वेळा तुरुंगवास सोसला. मंडालेच्या तुरुंगात तर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

सावरकरांचे चरित्र सुद्धा आपल्याला हेच सांगते की स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना अशीच नाही मिळाली. त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली. अंदमान येथील काळ्या पाण्यात त्यांना जे जेवण मिळायचे त्याचा विचार करून ही अंगावर काटा येतो. घाण्याच्या बैलाला जुंपावे तसे कोलू ओढून तेल काढण्यासाठी त्यांना जुंपले जायचे. अनेक प्रकारच्या विरोधाचा सामना करत असताना त्यांनी ‘कमला’ नावाचे महाकाव्य लिहिले. तुरुंगातील कैद्यांसाठी साक्षरतेचे वर्ग सुरू केले. रत्नागिरी येथील तुरुंगात त्यांनी अस्पृश्यता निवारणीची मोहीम हाती घेतली. पतित पावन मंदिर हरीजनांसाठी खुले केले. ‘माझी जन्मठेप’ हे सावरकरांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. पण त्यात त्यांनी कुठेही इंग्रज सरकारबद्दल एक अक्षर वाईट लिहिले नाही.

प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जिथे खूप काही सोसावे लागते. ऐशो आरामी जीवन जगणाऱ्या लोकांकडून कधी कोणाला काही चांगलं बनण्याची प्रेरणा मिळत नाही; पण ज्यांच्या जीवनात त्याग, सहनशीलता, नम्रता, प्रेम, निस्वार्थभाव.. अशा गुणांचा सुगंध दरवळतो. त्यांच्या जीवनातले क्षण आपल्याला खूप काही शिकवून जातात. म्हणून मोठे होण्याची इच्छा असेल तर गुणांनी मोठे होण्याचा ध्यास घ्यावा. आपले कर्म हीच आपली ओळख आहे.
– नीता बेन
bkneetaa24@gmail.com