
७ ऑगस्ट २०२१ पर्यंत नीरज चोप्रा हे नाव कुणाला फारसे ठाऊक नव्हते. कसं असणार? आपण भालाफेक या स्पर्धेबद्दल फारसे उत्सुकही नव्हतो. ऑलिम्पिक अॅथलेटिक्स म्हणजे जगातील सर्वोत्तम अॅथलिटची कामगिरी पाहण्याचा खेळ. एव्हढीच त्याबाबतची उत्सुकता. पण विश्व अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत ८६.४८ मीटर्सवर भाला फेकून विश्वविजेता झालेल्या नीरज चोप्राने फक्त भारतीयांचेच नव्हे तर तमाम क्रीडाविश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले होते.
मानवाच्या वेगाला मर्यादा नाहीत. तरीही प्रत्येक ऑलिम्पिकआधी, दर चार वर्षांनी १०० मीटर्स शर्यतीचा विजेता, वेगवान मानव कोण असेल याची उत्सुकता असते. तसाच प्राचिन ऑलिम्पिकपासून भालाफेक हा देखील क्रीडाप्रकार प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला. कारण आपला भारताचा विश्वविजेता, ऑलिम्पिक चॅम्पियन, एशियाड विजेता नीरज चोप्राच म्हणतो ‘थ्रो’च्या क्रीडाप्रकारात मर्यादा नाही. ‘थ्रो’ला फिनिश लाईन नाही. आपण सुदैवी आहोत, आपल्या हातात भाला आहे. २०२१च्या ऑलिम्पिकपासून तरी जगात सर्वांच्या पुढेच आपल्या नीरजचा भाला पडतोय; आणि व्यासपीठावर भारताचा तिरंगा फडकतोय.
नीरज भारताचा पुत्र! हे देशाचे, भारताचे सुवर्णपदक
या तिरंग्यावरून आठवलं; जेव्हा नीरज ऑलिम्पिक विजेता झाला तेव्हा त्याच्या गुणकौशल्यापेक्षाही चिरफाड झाली. त्याचा धर्म, जात शोधण्याची, अगदी कालपरवाच विश्व अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत जेव्हा नीरजच्या भाल्याने ९० मीटर्स अंतर पार करून सुवर्णपदक पटकाविले, तेव्हा नेहमीप्रमाणे काहींनी त्याच्या आईला विचारलेच, हे मेडल हरियाणाचे आहे, असे नाही वाटतं? त्याच्या आईलाही अशा प्रश्नांची उत्तरे देऊन आता कंटाळा आला आहे. ती ठणकावून म्हणाली, हे देशाचे, भारताचे सुवर्णपदक आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावविल्यानंतरही असाच शोध लावण्याचा काहींनी प्रयत्न केला होता. काहींनी तर त्याची जात, पोटजात शोधण्यासाठी वैचारिक पातळीचा तळ गाठला होता. पण नीरज याबाबतीत ठाम असतो. त्याचे कुटुंबियही कुणाच्याही अशा प्रश्नांनी बावचळून जात नाहीत. दोन वर्षांपूर्वी नीरजला मराठ्यांचा वंशज ठरविण्यापर्यंत काहींची मजल गेली होती.
अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक
असो… अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा तमाम भारताचा, देशाचा आहे. त्याच्या कुटुंबियांनी आणि स्वत: नीरजनेच ही गोष्ट वारंवार स्पष्ट केल्यामुळे सध्या यावर अधिक चर्चा करण्यात येत नाही, हे चांगले आहे. त्याच्या गळ्यातील ऑलिम्पिक (२०२१), वर्ल्ड चॅम्पीयनशीप (२०२३), डायमंड लिग (२०२२), एशियाड (२०१८), राष्ट्रकुल (२०१८), एशियन चॅम्पीयनशीप (२०१७), दक्षिण आशियाई स्पर्धा (२०१६), विश्व ज्युनियर चॅम्पीयनशीप (२०१६) या सुवर्णपदकांना अधिक झळाळी आहे, देशप्रेमाची.
त्याच्या साधेपणातच त्याची श्रीमंती डोकावते
तो किंवा त्याचे कुटुंबिय त्याच्या या वर्चस्वाचे मोठेपण मिरवित नाहीत. या साधेपणातच त्याची श्रीमंती डोकावते. घर साधेच आहे; जेथे सर्वसामान्य माणसाला आत शिरतानाही संकोच वाटत नाही. साधेपणा जपणाऱ्या नीरजने आपले कौशल्याही याच प्रेमाच्या आधारे वाढविले आहे. स्वत: फारसे प्रयोग न करता, नाविन्याच्या मागे न लागता, आहे त्याच शैलीत, बळावर पुन्हा पुन्हा जिंकत आहे.
नीरजने तमाम क्रीडाविश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले
७ ऑगस्ट २०२१ पर्यंत नीरज चोप्रा हे नाव कुणाला फारसे ठाऊक नव्हते. कसं असणार? आपण भालाफेक या स्पर्धेबद्दल फारसे उत्सुकही नव्हतो. ऑलिम्पिक अॅथलेटिक्स म्हणजे जगातील सर्वोत्तम अॅथलिटची कामगिरी पाहण्याचा खेळ. एव्हढीच त्याबाबतची उत्सुकता. पण विश्व अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत ८६.४८ मीटर्सवर भाला फेकून विश्वविजेता झालेल्या नीरज चोप्राने फक्त भारतीयांचेच नव्हे तर तमाम क्रीडाविश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले होते. २०१६ची येथील ही घटना.
ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पहायला सुरुवात
तेव्हापासूनच भारताला अॅथलेटिक्समधील ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पहायला सुरुवात झाली होती. खरं तर रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्यापेक्षाही नीरजची कामगिरी उजवी होती. त्याला तेव्हाही रौप्यपदक सहज मिळाले असते. पण नीरजने टप्प्या टप्प्याने प्रवास सुरू केला. राष्ट्रकुल, एशियाड, आशियाई सुवर्णपदके पटकावून आपले अव्वलपण सिद्ध केले. नीरजला आव्हान फक्त एकाचेच होते. जर्मनीच्या जॉन्सन वेट्टरचे.
कालांतराने तो वेट्टरच नीरजचा मित्र बनला. एकदा फिनलंडमध्ये विमानतळावर जाण्यासाठी वेट्टरने त्याला लिफ्ट दिली. तेव्हापासून तो नीरजचा मित्र बनला. नीरजचे इंग्रजीही चांगले नव्हते. पण तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याने वेट्टरशी संवाद साधायला सुरुवात केली. वेट्टरच्या बद्दलची त्याची भीती हळूहळू दूर होत गेली. केवळ तो आव्हानवीर आहे, इतरांसारखा आहे, याबद्दल नीरजला खात्री पटली. त्यानंतरचा त्याचा टोकियो ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सुवर्णपदकाचा वेध घेणारा ठरला.
पानीपतच्या खांदरा गावचा नीरज, खाऊनपिऊन मस्त आणि सुस्त होता. वाढलेले वजन आणि कायम अस्वस्थ असणाऱ्या नीरजला कुठेतरी गुंतवायला हवे म्हणून वडrल शिवाजी स्टेडियमवर घेऊन जायचे. क्रिकेट व्हॉलीबॉल व अन्य खेळात नीरजने हात-पाय मारून पाहिले. त्यात त्याला फारशी गती नव्हती. स्टेडियमवर उंच-धिप्पाड पुरुषांना त्याने भाला फेकताना पाहिले. त्यावेळीच त्या खेळाच्या प्रेमात तो पडला.
भारताच्या टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा प्रवास
आपले प्रेम आहे ते हेच याबद्दल त्याला खात्री झाली आणि भारताच्या टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा प्रवास त्या क्षणापासून सुरू झाला. भालाफेकीची त्याची शैली ही नैसर्गिक आहे. आपोआप त्याच्यात आलेली, असं नीरजचे पहिले प्रशिक्षक, ऑस्ट्रेलियन गॅरी क्लाव्हर्ट म्हणतात. त्यांच्यात मार्गदर्शनाखाली नीरजने पोलंडच्या विश्व युथ अजिंक्यपद स्पर्धेत नवा विश्वविक्रम नोंदविला होता.
चार वर्षे आधीच वर्तवले होते ऑलिम्पिकचे भाकित
या क्लाव्हर्ट आणि भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे प्रमुख सल्लागार व्हीलर हर्मन यांनी त्याकाळी भाकित केलं होतं की नीरज २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिमध्ये पदक निश्चित पटकाविणार. त्यांचे बोल नीरजने टोकियोतच खरे करून दाखविले… चार वर्षे आधीच!
भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेक हा प्रकार आहे तरी काय?
कोण हा नीरज चोप्रा? कुठून आला? त्याने कसा काय सुवर्णवेध केला?
रामायण, महाभारतापासून भारतीय भूमीवर झालेल्या प्राचिन युद्धांमध्ये, लढायांमध्ये भाला हे प्रमुख युद्ध अस्र होतं. असं असतानाही त्या परंपरा, इतिहास, आख्यायिकांमधून असा एकही पदकपुरुष का जन्माला आला नव्हता. नीरज जन्मला ती माती देखील एकेकाळची युद्धभूमीच. कदाचित इतिहासातील ती युद्धकला त्याच्या अंगी भिनली असेल, परंपरा, इतिहास किंवा निव्वळ योगायोग असावा तो. नीरजच्या बाहुंमधून सुटलेला भाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास लिहून गेला. क्रिकेट प्रेमात आकंठ बुडालेल्या भारतवर्षातील येणाऱ्या पिढीची दृष्टी, “व्हिजन” कदाचित त्या फेकीमुळे बदलेल. नीरजला मिळालेली अफाट प्रसिद्धी, प्रचंड पैसा, ग्लॅमर यामुळे नवी पिढी फक्त भालाफेकच नव्हे तर अॅथलेटिक्सकडेच आकर्षित होऊ शकेल.
इतरही खेळात क्रिकेटप्रमाणेच पैसा मिळतो, प्रसिद्धी, फेम मिळतं हे आता सर्वांनाच उमगायला लागलं आहे. नीरजचे ऑलिम्पिक सुवर्णपदक या देशाच्या क्रीडासंस्कृतीला नवे वळण देणारे ठरू शकेलही.
खरं तर भालाफेक हा प्राचिन क्रीडाप्रकार. अगदी ख्रिस्तपूर्व काळातला. (७०८ बी.सी.) खरं तर ऑलिम्पिक क्रीडाचळवळीचे वेगवान, शक्तीमान, बलवान आणि उत्तुंग भरारी घेण्याचे तत्त्व जपणारा, जोपासणारा भालाफक हा क्रीडाप्रकार. प्राचिन ऑलिम्पिकमध्ये पेटॅन्थलॉन या पाच विविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धेतला एक महत्त्वाचा क्रीडाप्रकार. भाला दूरवर फेकण्याची कला आणि लक्ष्याचा अचूक भेद करण्याइतकी अचूकता यांचा ताळमेळ साधलेला हा क्रीडाप्रकार.
कालांतराने, आधुनिक ऑलिम्पिकमध्ये निव्वळ भालाफेक या स्वरूपात पुरुषांसाठी १९०८च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तर महिलांसाठी १९३२ च्या ऑलिम्पिकमध्ये दाखल झालेला हा प्रकार.
त्याआधी जर्मन आणि स्वीडिश लोकांनी नव्या स्वरूपात पुनरुज्जीवीत केलेला हा क्रीडाप्रकार. १८७० पासून भालाफेकीची हा कला, नव्या रंगात-ढंगात जगासमोर यायला लागली. जर्मन आणि स्वीडिश लोकांनी सध्याच्या भाला सदृश्य असे नवे भाले तयार केले. नवनवे नियम जोडले गेले. हळूहळू इतरही देशांमध्ये भालाफेकी हा क्रीडाप्रकार लोकप्रिय व्हायला लागला. पूर्वी एकाच जागेवर उभे राहून भाला फेकला जायचा. कालांतराने मर्यादित अंतर धावल्यानंतर भाला फेकता येऊ लागला. गरजेनुसार आणि खेळ रंगतदार व्हावा यासाठी नियम सतत बदलत गेले.
खरं तर प्राचिन ऑलिम्पिकचा अविभाज्य अंग आणि लोकप्रिय क्रीडाप्रकार म्हणजे भालाफेक. मानवी सामर्थ्याच्या मर्यादा उंचावत नेणाऱ्या स्पर्धांपैकी हा एक प्रकार. पृथ्वीवरचा मानव किती वेगात धावू शकतो याची उत्सुकता दर चार वर्षांनी कायम असते. तसेच मानव किती अंतरावर दूरवर भाला फेकू शकतो, याबाबतही कायम उत्सुकता असते. ऑलिम्पिक क्रीडाचळवळीच्या प्रवाहात हा क्रीडाप्रकार १९०८ मध्ये आला आणि वेगात लोकप्रियतेबरोबरच नवनवे स्वरूप धारण करत गेला.
प्राचिन काळापासून अस्तित्वात असलेली भालाफेक ही उपजीविकेचे एक साधन होती. प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे हे एक प्रमुख अस्र होते. त्यामुळेच या कलेची मानवाला नितांत गरज होती. भाला दूरवर फेकता येत होता. लक्ष्य अचूक साधता येत होते. प्राचिन काळातही आज ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला मिळालेली लोकप्रियता, ‘फेम’ मिळत होते. अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या, भाला दूरवर फेकून शिकार करण्याचे जमाती जामातींमध्ये कौतुक होत होते. ललना त्याच्यावर फिदा व्हायच्या. कळपाचे प्रमुखपद मिळण्याचा तो एक मार्ग होता. अन्न मिळविण्याचा तो एक प्रमुख मार्ग होता आणि त्या मार्गावरचे प्रमुख शस्र भाला हेच होते. भालाफेकीचे ‘स्कील’ अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन होतं. त्याच कर्तृत्वाला ऑलिम्पिक चळवळीतही सामावून घेण्यात आलं. मात्र तसे करताना नियमांच्या चौकटीत हा खेळ बसविण्यात आला.
भालाफेक स्पर्धेचे प्रमुख साहित्य आहे भाला. हा भाला तीन भागात विभागला आहे. डोके किंवा भाल्याचे टोक मधला भाग आणि तिसरा भाग भालाफेकपटूंच्या ‘ग्रीप’चा. भाला फेकतानाची पकड या भागावर असते. मधला भाग धातूचा असतो. पुरुषांसाठीच्या भाल्याचे वजन असते ८०० ग्रॅम लांबी २.६ ते २.७ मीटर्स एवढी महिला स्पर्धकांसाठीचा भाला ६०० ग्रॅम वजनाचा असतो, आणि लांबी असते २.२ मीटर्स ते २.३ मीटर्सची ‘ग्रीप’साठी १५० मीलीमीटर्सची मर्यादा आहे.
भाला फेकणाऱ्या हाताच्या बोटांवर पट्ट्या बांधण्यासाठीही नियम आहेत. प्रमुख पंचांनी ते पहावे लागते. दोन किंवा त्यापेक्षा अधिक बोटांना एकत्रितपणे टेप बांधण्यास किंवा ग्लोव्हजचा वापर करण्यास मनाई आहे.
प्रत्येक भालाफेकीसाठी एका मिनिटाचा अवधी असतो. त्यापैकी अखेरची १५ सेकंद शिल्लक राहिल्या खूण पंच पिवळा झेंडा दाखवून करीत असतो.
भालाफेकण्यासाठी धाव घेण्यासाठीचे अंतरही निश्चित केलं आहे हे अंतर किंवा “रन वे”चे अंतर किमान ३० मीटर्स असावे. जागा अधिक उपलब्ध असल्यास ३६.३० मीटर्सपर्यंत हेच अंतर वाढविता येते. या धावपट्टीची रुंदी ४ मीटर्सची असावी. भाला फेकण्याच्या जागेची कमानीप्रमाणे जागा ८ मीटर्स असावी असे निश्चित करण्यात आले. त्याच रेषेत पुढे भाला फेकण्याचे अंतर कमानीप्रमाणे २८.९६ मीटर्स पासून आखण्यात यावे.
दोन स्पर्धकांनी समान अंतरावर भाला फेकल्यास, त्यानंतरची सर्वोत्तम फेक (थ्रो) विजेता निश्चित करील. त्यातही सारखेपणा असल्यास त्या स्पर्धकांनी नोंदविलेल्या तिसऱ्या क्रमांकाची नोंद विजेता निश्चित करण्यासाठी वापरली जाईल.
याचाच अर्थ प्रत्येक ‘थ्रो’ महत्त्वाचा असेल. प्रत्येक स्पर्धकाला एकच ‘ट्रायल थ्रो’ मिळेल. ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत स्पर्धकांच्या सहभाग संख्येची मर्यादा नाही. प्रत्येक स्पर्धकाला पात्रता फेरीत ३ वेळा भाला फेकण्याची संधी मिळते. त्यापैकी १२ सर्वोत्तम फेक करणाऱ्यांची अंतिम फेरीसाठी निवड घेते. अंतिम फेरीत पहिल्या तीन फेकीनंतर तळाच्या चार जणांना अर्धचंद्र मिळतो. उर्वरित ८ स्पर्धकांना आपले नशिब आजमाविण्यासाठी आणखी तीन वेळा भाला फेकण्याची संधी मिळते. म्हणजे अंतिम ८ स्पर्धकांना एकूण ६ वेळा भाला फेकता येतो.
भाला फेकल्यानंतरचे अंतर मोजण्यासाठी अलिकडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करण्यात येतो. मात्र मैदानातील पंच स्टील किंवा फायबर ग्लास टेपनेही अंतर मोजू शकतात. भाल्याचे टोक जेथे रुतते तेच अंतर स्पर्धकाने नोंदविले असे मानले जाते.
भालाफेकीच्या योग्य पद्धतीच्या पकडीशिवाय (ग्रीप) फेक केल्यास तो ‘फाऊल’ मानला जातो. भाला फेकल्यानंतर स्पर्धकाला पूर्णपणे वळता येत नाही किंवा पाठ दाखविता येत नाही. धावपट्टीच्या सीमारेषांनाही स्पर्धकाचा धावताना स्पर्श झाल्यास तो फाऊल मानला जातो. तसेच पुढील रेषा ओलांडल्यासही ते अवैध मानले जाते. तसेच भाला फेकण्यासाठी जे अंतर आखण्यात आले असते, त्याच्या बाजूच्या रेषांपलिकडे भाल्याचे टोक लागल्यास ते अंतर न मोजता, तो फाऊल ठरविला जातो. भाला फेकण्यासाठी एका मिनिटांची वेळमर्यादा ओलांडल्यानंतर फेकलेल्या भाल्याचे अंतरही ग्राह्य न मानता, तो फाऊल पकडला जातो. योग्य फाऊलसाठी खूण केली जात नाही, मात्र अवैध फाऊलसाठी लाल झेंडा दाखवून पंचांना सूचित केले जाते.
– विनायक दळवी