senior citizen

  अनेक दिवसांनी तेजोमयीच्या घरी बाबांची मित्र मंडळी आली होती. हॉलमध्ये बसून त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. कधी पाणी, तर कधी नाश्ता, तर कधी चहा नेण्यासाठी अधूनमधून आईसोबत तेजोमयी हॉलमध्ये जात येत होती. तेव्हा तिच्या कानावर यातील काही गप्पा पडत असत. अलेक्झांडरला मात्र या गप्पांमध्ये फारसा रस वाटत नसे. बाबांची मित्रमंडळी त्याच्याही ओळखीची झाली असल्याने, तो समजून जायचा की यांची बडबड दोन-तीन तास चालणार म्हणून. सर्वांकडून एकेकदा लाड करवून घेतले की मग एकतर स्वारी आतल्या खोलित जाऊन ताणून द्यायची किंवा मग आईच्या अवतीभवती घुटमळत राहयची. या सर्वांसाठी आई चहानाश्ता का करत असावी? अशासारखे प्रश्न त्याला पडत असावेत. त्यामुळे, “तुला नाही कळायचं ठोंब्या. बिनकामाचे असले तरी तुझ्या बाबांचे दोस्त आहेत ते. दोस्तांची अशी खातिरदारी करण्याची आमच्याकडे रित आहे”, असं एकदा तिने त्याला समजावून सांगितलं होतं. त्यानेही तेव्हा, “समजलं गं, सारं समजलं”, म्हणून मान हलवली.

  आज मात्र अलेक्झांडर आईभोवती न घुटमळता गॅलरीत खोलीत जाऊन एकटाच खेळत बसला.
  इकडे गप्पा चांगल्याच रंगल्या. आजच्या गप्पांचा विषय ग्यानवापी मस्जिद हा होता. बाबांची परवानगी घेऊन तेजोमयी हॉलमध्ये बसली. या गप्पा कान देऊन ऐकू लागली.

  ही मस्जिद नसून मंदिर आहे, ते सुध्दा महादेवाचे! देशपांडे काका म्हणाले.
  तसे पुरावेही मिळाले आहेत. जोशी काकांनी माहिती दिली.
  मग आता कशाची वाट बघितली जातेय?

  कसली म्हणजे?
  कसली म्हणजे काय? ज्याला मस्जिद म्हणतात ती मस्जिद नसून मंदिर असल्याचे सिध्द करणारे पुरावे मिळालेत ना, तेव्हा ही मस्जिद पाडायला नको का? एकबोटे काका तावातावात म्हणाले. त्यांना इतका त्वेष आला होता की ते एखाद्याला पेला मारुन फेकतील की काय, असं तेजोमयीस वाटलं.

  अरे सोनवण्या, जरा शांत हो, शांत हो. आपण थोडीच मस्जिद पाडायला जाणार आहोत. तुंडुलवार काका म्हणाले.1
  पण कुणीतरी जायलाच हवं ना. औरंगजेबाला कसं जाव वाटलं होतं, मंदिर पाडून मस्जिद बांधायला.
  पण तो स्वत: कुठे गेला होता? जोशी काका म्हणाले.

  अरे, मला शब्दात पकडू नकोस. त्यानेच नाही का मंदिर पाडून मस्जिद बांधण्याचा आदेश दिला होता. कुलकर्णी काकांनी मुद्दा मांडला.तसंही “यांना” ती सवयच आहे म्हणा! नरड काका नाक मुरडत म्हणाले.”यांना” म्हणजे कोण हो काका? अचानक तेजोमयी बालून गेली. या वादावादित तेजोमयी हॉलमध्ये बसल्याचं काकामंडळी विसरुन गेली होती.जाऊ दे, तुला नाही कळायचं ते? तू लहान आहेस अजून. सूर्यवंशी काका म्हणाले.

  अरे, लहान असली तरी त्यांनाही कळायला हवं ना की, “ते” तसेच होते म्हणून. देशपांडे काका म्हणाले.
  “ते” म्हणजे कोण हो काका? तेजोमयीनं पुन्हा प्रश्न विचारला.
  “ते” म्हणजे? म्हणजे “ते” गं..जाऊ देना तू कशाला इतक्या खोलात जातेस? नरड काका म्हणाले.
  जा बाळ, आतमध्ये जाऊन खेळ बघू. असं मोठ्यांचं बोलणं ऐकणं बरोबर नाही.जोशी काका म्हणाले.
  तेजोमयी हसली. बाबांनी तिला आत जाण्याचा इशारा केला. आत जाता-जाता तेजोमयी, जोशी काकांकडे बघत म्हणाली, “ते” म्हणजे मुसलमानच, असं तुम्हाला म्हणायचय ना काका?तेजोमयीच्या या प्रश्नाने हॉलमध्ये काहीक्षण शांतता पसरली.

  तसं नाही गं पण…
  तेजोमयी हसली आणि आत गेली. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. आजची मुलं भारीच चौकस बुवा! नरड काका म्हणाले. तेजोमयी तर आणखी चार पावलं पुढे, तुंडुलवार काकांनी प्रतिक्रिया दिली.

  ते बोलत असताना तेजोमयी पुन्हा हॉलमध्ये आली. तिच्या हातात कालचा पेपर होता. त्या पेपरमधील एका लेखात, काश्मीरमधील देवेंद्र नावाच्या राजाने माधव नावाच्या इसमास मंदिर पाडण्याच्या कामावर नेमल्याचं लिहिलं होतं. त्याचे काही पुरावेही होते. तेजोमयीने ते वाचून दाखवले.

  आता बोला! तेजोमयी म्हणाली.
  म्हणजे “ते” ही तसेच आणि “हे” ही तसेच की काय? नरड काका म्हणाले.औरंगजेबाने मंदिरं पाडली आणि या मिलिंद राजानेही मंदिरं पाडलीत. झाली ना फिट्टमफाट. तेजोमयी म्हणाली. कसली फिट्टमफाट? तेजोमयीच्या या आगावूपणावर नापसंती दर्शवत जोशी काका म्हणाले.बादशहा, सम्राट, राजे यांना असं मंदिरं किंवा प्रार्थना स्थळं पाडण्याचा शौकच होता म्हणायचा. देशपांडे काका म्हणाले.त्यांनी तेव्हा काय काय करुन ठेवलं, आणि आज आपणास भोगायला लागतं. एकबोटे काका म्हणाले.

  अरे एकबोट्या, आपणास काय भोगावं लागतं? काहीच नाही. इतिहासातले मुडदे कशाला खोदायचे म्हणतो मी. तेजोमयीचे बाबा म्हणाले. यावर सर्वजण हसले. ही मंडळी हसतात तेव्हा, यांना त्यांची चूक कळलेली असते की पुन्हा नव्या चुकीच्या तयारीचं ते प्रतीक असतं,असा प्रश्न तेजोमयीस पडला. काय हो बाबा? असं ती बाबांना विचारु पाहत होती. मात्र तिकडे गॅलरीतून धडाडधूम आवाज आल्याने बाबा आणि तेजोमयी तिकडे धावले.

  खेळता खेळता गॅलरितील एक कुंडी अलेक्झांडरने अंगावर पाडून घेतली होती.आईही स्वयंपाक घरातून धावली.आता ही कुंडी का पाडली? कशी पाडली? असं विचारत बसू नकोस आणि रागावू नकोस अलेक्झूला. त्याच्या अंगावरची माती बाजूला कर नि आंघोळीला ने, बाबा आईला म्हणाले.थँक्यू, असे भाव अलेक्झांडरच्या डोळ्यात उमटले.कुंडीच्या पडण्यामुळे ज्ञानवापीची चर्चा खंडित झाली. काका मंडळींनी बाबांचा निरोप घेतला.बघा बाबा, काहीतरी पडल्याशिवाय किंवा पाडल्याशिवाय आपल्याकडे विषय संपत नाही. तेजोमयी म्हणाली. बाबा मनमुराद हसले.

  – सुरेश वांदिले
  ekank@hotmail.com