pakistan crisis Madrassas are like factories for making terrorists nrvb

तालिबान या संघटनेत प्रामुख्याने अफगाणिस्तानातून पाकिस्तानात येऊन राहिलेल्या लोकांचा समावेश होता. देशांतर्गत युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानातील पेशावर आणि अफगाण सीमेवरील आदिवासी पट्ट्यात लाखो अफगाण नागरिकांनी आश्रय घेतला. पाकिस्ताननं या विस्थापितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मदरसे उभे केले. या मदरशांमधून तरुणांना धार्मिक आणि शस्त्रास्त्र चालविण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं, अजूनही दिलं जातं. हे मदरसे म्हणजे दहशतवादी तयार करण्याची जणू फॅक्टरीच बनले आहेत.

  १६ डिसेंबर २०१४, पाकिस्तानातील पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कुलमध्ये सैनिकांच्या वेषात सहा शस्त्रधारी व्यक्ती घुसल्या अन् त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. १३२ विद्यार्थ्यांसह एकूण १४८ लोक या गोळीबारात ठार झाले. केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर जगाला हादरवणारी घटना होती ती. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्यांचं हे कृत्य. पाकिस्तान सरकारला अन् लष्कराला इशारा देण्यासाठी उचललेलं आततायी पाऊल.

  खरंतर या टीटीपीला जन्माला घातलं ते पाकिस्ताननंच. १९७९ मध्ये अफगाणिस्तानामध्ये रशियन फौजा दाखल झाल्या त्या त्यावेळच्या अफगाण सरकारला बळ देण्यासाठी. रशिया आणि अमेरिकेच्या शीतयुद्धाचा तो काळ. एकदा अफगाणिस्तानात जम बसवल्यावर इराण किंवा पाकिस्तानमार्गे रशिया सहजपणे अरबी समुद्रात उतरू शकत होता. त्यात भारतासारखा तटस्थ देशही काही प्रमाणात रशियाकडे झुकलेला. त्यामुळे रशियाची ही वाटचाल अमेरिकेला स्वस्थ बसू देईना. पण रशियाविरुध्द थेट उतरायलादेखील अमेरिका कचरत होतं. मग अमेरिकेने पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन देशांना प्रामुख्याने हाताशी धरले.

  पाकिस्तान तर अफगाणिस्तानचा शेजारी देश. अफगाणी समाज बराचसा विखुरलेला, प्रामुख्याने टोळीजीवन जगणारा. काबुलसारख्या बड्या शहरी भागांमधून आधुनिक जीवनशैली हळूहळू प्रचलित होत होती. स्त्रियांचा शिक्षण आणि नोकरी करण्याकडे कल वाढत होता. पण देशातील बहुसंख्य लोकांमध्ये शिक्षणाचा अभावच. सहाजिकच लोकांमध्ये रूढी परंपरांना धरून रहायची सवय. धर्माचा आणि मुल्ला, मौलवींचा प्रभाव. अमेरिकेने याच गोष्टीचा फायदा उठवला.

  रशिया त्यावेळी एक कम्युनिस्ट देश होता. कम्युनिस्ट राजवटींमध्ये धार्मिक गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नाही; किंबहुना त्यांचं खच्चीकरण केलं जातं. अशा ‘नास्तिक’ सत्तेविरुध्द् लढण्यासाठी धार्मिक नेत्यांना फूस लावायला सुरुवात झाली. स्थानिक मुल्ला, मौलवींना हाताशी धरलं गेलं. सहाजिकच त्यांच्या प्रभावाखालील समाजात रशिया विरोध वाढू लागला. हा विरोध मोडून काढण्यासाठी तत्कालीन अफगाण सरकार आणि रशियन फौजांनी केलेल्या प्रयत्नांमुळे असंतोष अधिकच वाढू लागला.

  रशियाविरुध्द लढण्याला धर्मयुद्ध किंवा जिहाद अशा प्रकारचं स्वरूप देण्यात आलं. या लढवय्यांना ‘मुजाहिदीन’ म्हटलं जाई.
  या मुजाहिदिनांच्या अनेक टोळ्या, संघटना अफगाणिस्तानात सगळीकडे पसरलेल्या. यांच्यापर्यंत पैसे आणि आधुनिक शस्त्रसामग्री पुरवण्याचं काम पाकिस्तान मार्गे सुरु होत.

  पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना यामध्ये अग्रेसर. जवळपास दहा वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर १९८९ मध्ये रशियन फौजांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतली अन् पुढे तर ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे रशियाचं विघटन होऊन अनेक नवे देश तयार झाले. असो. इकडे रशियन फौज निघून गेल्यावर अफगाणिस्तानात यादवी युद्धाला सुरुवात झाली.

  पूर्वी रशियाविरुध्द लढणारे गट आता एकमेकांविरुध्द लढू लागले. या सगळ्या धुमचक्रीत तालिबान या संघटनेनं अफगाणिस्तानातील मोठ्या प्रदेशावर अंमल बसवला. उत्तर अफगाणिस्तानातील पंजशीर व्हॅलीच्या आसपासच्या प्रदेशावर मात्र अहमदशहा मसूदची सत्ता अबाधित राहिली.

  तालिबान या संघटनेत प्रामुख्याने अफगाणिस्तानातून पाकिस्तानात येऊन राहिलेल्या लोकांचा समावेश होता. देशांतर्गत युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानातील पेशावर आणि अफगाण सीमेवरील आदिवासी पट्ट्यात (या प्रदेशाला ‘फाटा’ या नावाने ओळखलं जातं) लाखो अफगाण नागरिकांनी आश्रय घेतला. पाकिस्ताननं या विस्थापितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मदरसे उभे केले. या मदरशांमधून तरुणांना धार्मिक आणि शस्त्रास्त्र चालविण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं, अजूनही दिलं जातं. हे मदरसे म्हणजे दहशतवादी तयार करण्याची जणू फॅक्टरीच बनले आहेत.

  या मदरशांमधून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांची संघटना म्हणजे तालिबान. तालिबानवर साहजिकच पाक लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेचा खूप मोठा प्रभाव होता. सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या ट्विन टॉवरवरील हल्ल्यांनंतर अमेरिका अल कायदा अन् तालिबान विरुध्द थेट युद्धात उतरली. एकेकाळी हेच दहशतवादी अमेरिकेचे ‘हिरो’ होते.

  अफगाणिस्तानमधील युद्धात अमेरिकेला पाकिस्तानची मदत घेणं भाग होतं. पाकिस्तानने आर्थिक लाभाकडे नजर ठेऊन मदत देऊ केली खरी; पण अनेक अफगाण दहशतवादी पाकिस्तानात येऊन लपून बसत. मग अमेरिका त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यासाठी पाकवर दबाव टाकत असे. पाकिस्तानलाही या गटांविरुध्द कारवाई करणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. हे सर्व गट पाकच्याच छत्रछायेत तयार झालेले. खुद्द पाक सैन्यामध्ये.

  आयएसआयमध्ये या गटांशी जवळीक असणारे, सहानुभूती बाळगणारे अनेकजण. काही कारवाई केली तर अनेक दहशतवादी गट पाकवर नाराज होत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) हा अशांपैकीच एक. अफगाण पाक सीमेवरील ‘फाटा’ या डोंगराळ आदिवासी भागात दहशतवादी आसरा घेत. इथे कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करणे ही अत्यंत कठीण गोष्ट.

  या भागात अमेरिकेकडून ड्रोन हल्ले अनेकदा केले जात. यात काहीवेळा सामान्य माणसेदेखील मारली जात. तेथील जनतेमध्ये त्यामुळे अमेरिकाविरोध वाढत असेच पण पाक सरकार आणि लष्कराविरुध्ददेखील खूप मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होई. आमच्या प्रदेशात अमेरिका आम्हाला न विचारता कारवाई करते, असे म्हणत पाकिस्तान या हल्ल्यांचा निषेध करत असे.

  लोकांचा दबाव खूपच वाढला तर अशा गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली जायची. थोडे दिवस ड्रोन हल्ले बंद होत पण परत येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती असे. या प्रकारांमुळे काही दहशतवादी पाकिस्तान विरुध्द्च शस्त्र हाती घेत. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कुलवर केला गेलेला हल्ला हा याचा नमुना.

  बेनझीर भुत्तोंची हत्या, मलाला या शाळकरी मुलीवर केलेला हल्ला (जिला नंतर नोबेल शांतता पुरस्कार मिळाला) यामध्ये टीटीपीचा हात होता. इतरही अनेक लहान मोठे दहशतवादी हल्ले अनेकदा होतच आलेत. पाक आणि अफगाणिस्तानमधील सीमा तेथील स्थानिक लोकांना मान्य नाही, कारण सीमेच्या दोन्ही बाजूस रहाणारे लोक एकाच समुदायाचे.

  वर्षानुवर्षे एकत्र रहाणारे. पाक लष्करानं सीमेवर कुंपण घालून स्थानिक लोकांच्या हालचालीवर बंधनं घातलेली. त्यावरून अनेकदा लष्कराशी त्यांची चकमक उडते. असं असूनही पाकिस्तानने कधी या गटांचा पूर्ण बंदोबस्त केला नाही. कदाचित सरकार, लष्कर, आयएसआयमधील अनेकांचे हितसंबंध यात गुंतले असावेत. किंबहुना अशा हल्ल्यांचा पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी केला.

  पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत नाही. उलट त्यांच्याविरुध्द कारवाई करतो आणि इतर देशांप्रमाणे पाकदेखील दहशतवादाचा बळी आहे वगैरे. वर या हल्ल्यांना भारत आणि त्यावेळचं अफगाण सरकार मदत करतं अशी धादांत खोटी बोंबाबोंबही पाकिस्ताननं अनेकवेळा केली आहे.

  अफगाणिस्तानात अलीकडेच तालिबानची सत्ता आल्यावर पाकिस्तानने सुटकेचा निःश्वास टाकला असावा. अफगाणिस्तानची सत्ता मिळवण्याच्या लढाईत पाकने तालिबानला सर्वतोपरी मदत केलेली. त्यामुळे आता तालिबान टीटीपीच्या कारवाया बंद पाडेल अशी त्यांना आशा होती, पण तसं झालं नाही. किंबहुना अलिकडच्या काळात पाकच्या पोलिसांवरील आणि लष्करावरील हल्ल्यांमध्ये वाढच झालेली.

  पाक लष्कर, आयएसआयने अनेक प्रयत्न करूनही हे हल्ले त्यांना थांबवता आले नाहीत. पाकमध्ये हल्ले करून टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात जाऊन आश्रय घेतात. अफगाणिस्तान हे तालिबान त्यांच्याविरुध्द काही कारवाई करत नाहीच आणि त्यांच्या हद्दीत घुसून काही करण्याची पाकिस्तानला परवानगीदेखील देत नाही.

  अनेक दिवसांच्या संघर्षांनंतर पाकिस्तान आणि टीटीपीमध्ये काबुल येथे अफगाण तालिबानच्या मध्यस्थीने शांततेसाठी बैठका होऊ लागल्या आहेत. पाकने टीटीपीच्या शेकडो दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका केली आहे. अफगाण सीमेवरील मलाकंद भागात टीटीपीने त्यांना अपेक्षित असलेला शरिया कायदा लागू केलाय.

  पूर्ण पाकिस्तानात त्यांना अफगाणिस्तानप्रमाणे चालणारं सरकार आणायचं आहे. बैठकांचं सत्र चालू असेपर्यंत बंदुका शांत होतात. बोलणी फिस्कटली की परत हल्ले सुरु. पाकनेच मोठा केलेला भस्मासूर आता त्याच्या पाठी लागलाय.

  सचिन करमरकर

  purvachebaba@gmail.com