मानवतावादाचे शिलेदार – भाग २

  मानवी मनाचा व त्यायोगे मानवी वर्तनाचा, मानवी मनामध्ये अंतर्भूत असलेल्या क्षमतांचा वेध घेण्याचा प्रयत्न, मानवतावादाने सातत्याने केलेला आहे. मास्लो यांनी मांडलेल्या सिद्धांताद्वारे, एकूणच मानवी मनाचा प्रवास कुठून सुरू होऊन कुठपर्यंत पोहोचतो, याचे एक आखीव-रेखीव चित्रच आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. कार्ल रॉजर्स, अब्राहम मास्लो, एरिक फ्रॉम, विक्टर फ्रैंकल या सर्वांनीच मानवी मन व मानवी क्षमतांच्या वेगळेपणावर भर दिला. अब्राहम मास्लो आत्मशोधावर, आत्मपूर्तीवर भर देत होते. कार्ल रॉजर्स वैयक्तिक आत्मविकासाला महत्त्व देत होते तर विक्टर फ्रैंकल ‘अद्वितीय’ मानवी क्षमतांवर भर देत होते. या खास मानवी मनाच्या क्षमतांच्या वेगळेपणातूनच सातत्याने मानवी संस्कृतीमध्ये भर पडत असताना आपल्याला दिसतात. त्यातूनच मानवी वर्तणुकीविषयीची निरनिराळी पाथेय निर्माण होत जातात. यातच मानवतावादाचे व अस्तित्ववादाचे वेगळेपण सामावलेले आहे, असे आपल्याला म्हणता येईल. मानवी दुःखावर, संघर्षावर, यातनांवर मात करण्याची विलक्षण क्षमता मानवी मनामध्ये आहे. ही क्षमता आत्मविष्कारासाठी, आत्मपूर्तीसाठी वापरणे हे मानवी जीवनाचे ध्येय व भागधेय आहे.

  विक्टर फ्रैंकल
  मानवतावादी मानसशास्त्रातील कळसाध्याय म्हणजेच डॉ. विक्टर फ्रैंकल यांचे लोगोथेरपी. डॉ. फ्रैंकल हे ‘ज्यू ऑस्ट्रियन न्यूरोलॉजिस्ट व मानसोपचार’ तज्ञ होते. हिटलरच्या छळ छावणी मधून वाचलेला कैदी, अशी त्यांची अतिशय निराळी ओळख आहे. त्यांनी मांडलेल्या उपचार पद्धतीला अस्तित्ववादाचा सैद्धांतिक आधार आहे. अस्तित्ववाद हा मानवी जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माणसाला येणारी चिंता (anxiety) किंवा भीतीची छाया तसेच परात्मतेची जाणीव व नैराश्य (depression) अथवा अवसाद निरनिराळ्या कारणांपोटी निर्माण होतात. निरनिराळ्या मानवी परिस्थिती (human conditions) त्याला जबाबदार असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते मानवी जीवनाचे भागधेय आहे आणि त्यामुळेच या सर्वांवर उपाय शोधायचा असेल तर मानवी जीवनामध्ये काहीतरी ध्येय, काहीतरी अर्थ, काहीतरी उद्दिष्ट निर्माण करणे गरजेचे असते. जीवन सार्थकी लावणे महत्त्वाचे ठरते. विक्टर फ्रैंकल यांनी मांडलेली ‘लोगोथेरपी’ याच तत्त्वांवर बेतलेली आहे. त्यांना ‘लोगोथेरपी’चे जनक समजण्यात येते. मेडिकलचे शिक्षण घेत असताना व त्यानंतरही फ्रैंकल यांनी फ्रॉईड यांची ‘सायकोथेरपी’ व ‘वर्तनशास्त्र’ या दोन्ही विषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले व मानवाचे जे निराळेपण आहे, वेगळेपण आहे, त्याची कास धरल्यास, या वाटेने गेल्यास मानवी जीवन अधिक सुखकर, अधिक आशादायी व फलद्रूप होऊ शकते, असे विक्टर फ्रैंकल मानत. छळ छावणीमध्ये दाखल होण्यापूर्वी पासूनच, त्यांचा या सिद्धांतावर विश्वास होता. छळ छावणीतील अनुभवामुळे हा विश्वास अधिक दृढ झाला. छळ छावणीतील अनुभवांवर आधारित, त्यांनी ‘Man’s Search for Meaning’ (सन १९४६) नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक प्रचंड गाजले. या पुस्तकाचे निरनिराळे अनुवादही झाले तसेच अनेक आवृत्त्याही निघाल्या.

  फ्रैंकल यांनी मांडलेली ‘लोगोथेरपी’ तीन प्रमुख तत्त्वांवर बनलेली आहे,
  ही तत्त्वे म्हणजे
  १. मनुष्य काहीतरी मोठे कार्य करणे किंवा एखादे असाध्य ध्येय साध्य करून, स्वतःच्या जीवनात अर्थ निर्मिती करू शकतो. एखाद्या चित्रकाराने काढलेले सुंदर चित्र असो, अथवा रियाजाने कसून गायलेली एखादी सुंदर धून असो. कष्टप्राय ध्येयांद्वारे मनुष्य खचितच, स्वतःच्या आयुष्याला अर्थ मिळवून देऊ शकतो.

  २. एखादी गोष्ट, एखादा अनुभव, त्यात पूर्णपणे बुडून जाऊन घेणे या गोष्टीतून सुद्धा निरर्थक जीवन, सार्थक होऊ शकते. तसेच एखाद्यावर निरलस, निष्कपट, निरपेक्ष प्रेम करण्यातूनसुद्धा, तुम्ही तुमच्या आयुष्याला वेगळा अर्थ देऊ शकता. संत मीराबाई, सर्वच संतांचे असलेले ईश्वरावरील प्रेम, हा याचा दाखला होऊ शकतो. प्रेमाच्या अनेकविध भावभावना, अविष्कार अनुभवताना, मीरेच्या आयुष्याचे सार्थक झाले.

  पायो जी म्हें तो राम रतन धन पायो।
  वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरू, किरपा कर अपनायो॥
  जनम-जनम की पूँजी पाई, जग में सभी खोवायो।
  खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढ़त सवायो॥
  सत की नाँव खेवटिया सतगुरू, भवसागर तर आयो।
  ‘मीरा’ के प्रभु गिरिधर नागर, हरख-हरख जस पायो॥

  ३. मानवी जीवनात जे अटळ, अपरिहार्य दुःख अथवा यातनादायक प्रवास (suffering) आहे, त्याविषयी आपला असलेला दृष्टिकोन अथवा वृत्ती. ज्या क्षणी आपला आपल्या यातनादायक प्रवासाविषयीची (suffering) वृत्ती बदलते, त्या क्षणी तो यातनामय प्रवास राहत नाही. दुःखाचे रूपांतर एखाद्या प्रवासात अथवा काही उच्च कोटीच्या अनुभवात होऊन जाते.

  छळ छावणीतले एक एक दिवस घालवताना, संपूर्ण कुटुंबाची ताटातूट झालेली असताना, त्या छळ छावणीतही विक्टर फ्रैंकल यांनी, कधी पत्नीच्या रम्य आठवणीद्वारे, तर कधी सहकाऱ्यांना दिलेल्या आधाराद्वारे, त्या अत्यंत विफल निराशाजनक अशा क्षणांनाही सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अत्यंत यातनामय, दुःखमय आणि ज्याला आपण अमानव (Dehumanizing), अमानुष म्हणू शकतो अशा छळाचे, अशा यातनामय प्रवासाचे, रूपांतर त्यांनी प्रवासामध्ये किंवा एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये करून टाकले. छळ छावणीतून कसेही करून बाहेर पडायचे, हे उद्दिष्ट त्यांनी स्वतः समोर ठेवले होते, तसेच आपल्यासारखेच, आपल्या सहकैद्यांनाही यातून बाहेर पडण्यासाठी, मदत करायची हेही त्यांनी ठरवले होते. त्यामुळे छळ छावणीतील यातना, या यातना न राहता, सुटकेच्या प्रवासातील एक-एक टप्पा बनत गेल्या, एकेक पायरी बनत गेल्या. विक्टर फ्रैंकल यांचा ह्याबाबतीतील एक उद्धृत खूप महत्त्वाचे आहे.
  Those who have a ‘why’ to live can bear almost with any ‘how’. ‘ज्याला कशासाठी जगावे, हे कळलेले आहे तो जगातल्या कुठल्याही दुःखाच्या यातनेच्या पार जाऊ शकतो’, असे त्यांचे म्हणणे होते. ‘You can find hope in the darkest of the place’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांच्यामते, ‘उपचार पद्धतीला तत्त्वज्ञानाची जोड नसेल तर, ती उपचार पद्धती कदाचित केवळ तंत्रात्मक होऊन जाऊ शकते.’ मानवाचे वेगळेपण, निराळेपण, नेमके ज्यामध्ये साठवलेले आहे, ती गोष्ट लक्षात घेणे, अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘मानवाचे स्वातंत्र्य’. तुम्ही एखाद्या पासून, काहीही हिरावून घेऊ शकता, पण एखाद्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे हे खूपच अशक्यप्राय आहे. त्यामुळेच मानवामध्ये हे स्वातंत्र्य वापरून, स्वतःच्या अनुभवांना अर्थ देण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेवर आधारित त्यांनी ‘लोगोथेरपी’ ही उपचारपद्धती निर्माण केली आहे. म्हणजेच ‘अस्तित्ववाद’ व ‘मानवतावाद’ यांच्या तत्त्वांवर आधारित ही लोगोथेरपी आहे आणि म्हणूनच आपण निखालसपणे असे म्हणू शकतो की, ‘डॉ. विक्टर फ्रैंकल म्हणजे मानवतावादातील कळसाध्यायी उपचार पद्धती देणारा थोर विचारक आहे.’

  – डॉ सुचित्रा नाईक