युगप्रवर्तक डॉ. सिग्मंड फ्रॉईड – भाग २

डॉ. फ्रॉईड यांनी मानवी मनाच्या तीन स्तरांबरोबर मानवी व्यक्तिमत्त्वाचेही तीन स्तर कल्पिले आहेत. ते म्हणजे 'ID', 'Ego', : Super Ego:. यापैकी इडचा संबंध हा माणसाच्या अबोध मनाशी आहे. ID चा शब्दशः अर्थ

    ‘Impulsive Desires’ अबोध मनामध्ये ज्या अनेक इच्छा, गर्दी करून असतात, त्यांच्या अतृप्तीमधून जे मानवी भावभावनांचे संघर्ष सतत दमन केले जातात, या सगळ्या इच्छा, हे सगळे संघर्ष म्हणजे आपला इड ! इडला एकच भाषा समजते ती म्हणजे, इच्छापूर्ती, आज आणि आत्ता मला माझ्या इच्छा पूर्ण व्हायला हव्या असतात. इड अबोध मनामध्ये दडपून बसलेला असतो व त्याची सतत काही ना काही मागणी असते. सतत इच्छापूर्तीचा ध्यास असतो. आपले समाजातील स्थान, समाजातील दंडक, याच्याशी इडला काहीही घेणे देणे नसते. त्याला फक्त आणि फक्त आपल्या इच्छा पूर्ण व्हायला हव्या असतात. थोडक्यात काय तर, इड हा एखाद्या बालकाप्रमाणे असतो. या उलट इगो म्हणजे शहाणा माणूस, समोर असलेल्या वास्तवाशी सतत जुळवून घेणारा माणूस. आपल्या इच्छा समाजाच्या मर्यादांमध्ये राहून, कशा पूर्ण करता येतील याचे चिंतन इगो करत असतो. इच्छांना कधीतरी पुन्हा अबोध मनात हाकलून देण्यास तो व्यक्तीला प्रवृत्त करतो. या दोघांसोबत मनामध्ये एक सुपर इगो असतो. हा सुपर इगो पालकांच्या भूमिकेतून, इड व इगो यांच्याशी संभाषण करत असतो. थोडक्यात म्हणजे सुपर इगो हा आपल्या नितीमत्तेचा पहारेकरी असतो. अबोध मन, अर्ध-अबोध मन व जाणीव यांच्यात जसा सतत झगडा सुरू असतो, त्याचप्रमाणे इड इगो – सुपर इगो यांच्यातही सतत संघर्ष सुरू असतो. वर्गात लेक्चर सुरू असताना, कॅन्टीनमधील बटाटावड्यांचा वास, इडला येतो. त्याला पळून बाहेर जाऊन वडा खायचा असतो. पण सुपर इगो, जवळ आलेल्या परीक्षेची आठवण करून देतो व लेक्चरमध्ये मन लावायला सांगतो. इगो दोघांनाही समजावतो व म्हणतो, जरा हे लेक्चर संपले की, पटकन जाऊन वडापाव खाऊनच येऊ म्हणजे पुढच्या लेक्चर्समध्ये अधिक चांगले मन लागेल. हे उदाहरण तसे खूपच बाळबोध आहे पण एकूणच मानवी मन कशा प्रकारे काम करते, हे समजण्यासाठी ते पुरेसे आहे.
    डॉ. फ्रॉईड यांच्यावर टीका होण्यामागे अनेक कारणांपैकी अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी लैंगिकतेला दिलेले मध्यवर्ती स्थान. पण याविषयी नीट माहिती करून घेणे, मांडलेली लैंगिकतेची संकल्पना समजून घेणे, हे खूप महत्त्वाचे आहे. कदाचित ही संकल्पना समजल्यानंतर, त्यांच्यावर होणारा टीकेचा भडीमार निश्चित कमी होईल किंवा टीका बोथट तरी होईल. डॉ. फ्रॉईड यांच्या मतानुसार, ‘लैंगिकता म्हणजे मानवी शरीरात असलेले अनेक प्लेजर जोन्स’. (काम) डॉ. फ्रॉईड यांचा संपूर्ण मनोविश्लेषणात्मक सिद्धांत समजून घेण्यासाठी त्यांची ही संकल्पना समजून घेणे खूप गरजेचे आहे.

    मानवी लैंगिकतेला मध्यवर्ती स्थान
    डॉ. फ्रॉईड यांनी मानवी लैंगिकतेला मध्यवर्ती स्थान देऊन मानवी शरीरातील निरनिराळ्या प्लेझर झोन्सचे किंवा सुखद्वारांची कल्पना मांडली. या संकल्पनेमधील आणखीन एक महत्त्वाचा कंगोरा म्हणजे ‘लिबीडो किंवा मानवी मन व शरीरामध्ये खोलवर स्थापित झालेली किंवा मूळ धरलेली लैंगिक सुखाची संवेदना’. (काम) अतिशय बालपणापासून ही सुखद्वारांची संकल्पना मानवी वर्तनाला लागू पडते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, अतिशय बालपणापासून मानवाला किंवा बालकांना लैंगिकतेची जाणीव असते. नेमक्या याच प्रतिपादनामुळे डॉ. फ्राईड यांच्यावर अमाप टीका झाली. परंतु त्यांनी मांडलेले सिद्धांत, निश्चितच आपल्याला बालकांच्या वर्तणुकीशी किंवा ज्यावेळेस, ही वर्तणूक खूपच सदोष होऊन जाते, अशा प्रौढ रूग्ण प्रकरणांशी ताडून पाहता येतात. मानवी शरीरात खोलवर रुजलेला लिबीडो (काम) किंवा सुखाची आस ही वेगवेगळ्या शरीर-द्वारांमधून प्रगत होत जाते. विकासाच्या साधारणतः पाच टप्प्यांचे वर्णन या सिद्धांतामध्ये केले आहे. प्रथम टप्पा हा मौखिक सुखाचा आहे. तान्ह्या बाळाच्या सर्व सुख संवेदना या स्तनपानाशी अथवा मुखाद्वारे जग जाणून घेण्याशी जोडलेल्या आहेत. या पुढील टप्पा हा गुदद्वाराचा टप्पा समजला जातो. ज्यामध्ये बालकाच्या सर्व संवेदना, या मलमूत्र निःसारणाशी जोडल्या जातात. त्यातून त्याला अतिव अशी सुख संवेदना जाणवते. यापुढील टप्पा हा बाललैंगिकतेचा टप्पा आहे. ज्यावेळेस त्याला दोन विभिन्न लिंगांची जाणीव होते व आपली निराळी अशी लैंगिक ओळख, बालक स्वतःहूनच करून घेऊ लागतो. हा टप्पा साधारण तीन ते पाच या वयापर्यंत टिकतो. त्यानंतर मात्र लिबिडोचे किंवा सुखद्वार हे एकच न राहता एकूणच सर्व शारीरिक क्रियांमधून वेगवेगळ्या उपक्रमांमधून बालक, आनंद घेऊ लागते. निरनिराळे खेळ, निरनिराळे उपक्रम, नाटक, नृत्य अशा सर्व गोष्टींमधून बालकाला सुख मिळू लागते. म्हणूनच ह्या वयात बालकांची ऊर्जा प्रचंड असते. हा खेळांचा सिलसिला साधारण पौगंडावस्थेपर्यंत टिकतो. मुखद्वारापासून सुरू झालेला सुख-संवेदनांचा प्रवास, तोपर्यंत बालकाच्या नेणिवेमध्ये किंवा अबोध मनामध्ये जाऊन लपलेला असतो. आता मात्र पुन्हा एकदा या सुख-संवेदना आकार घेऊ लागतात. त्याचे योग्य प्रगटीकरण होऊ लागते. मुला-मुलींना परस्पर आकर्षण वाटू लागते, आणि ह्या आकर्षणाचे रूपांतर मग पुढे केव्हातरी सुयोग्य अशा लैंगिक वर्तनामध्ये होते.

    ‘ईडीपस गंड व इलेक्ट्रा गंड’
    डॉ. फ्रॉईड यांनी मांडलेली अजून एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘ईडीपस गंड व इलेक्ट्रा गंड’. या गंडानुसार प्रत्येक बालकास आपल्या भिन्न लिंगी पालकाविषयी, शरीर असे आकर्षण वाटत असते. त्याचवेळेस समलिंगी पालकाविषयी द्वेष अथवा मत्सर वाटत असतो. अनेकदा वयात आल्यावरही वडील- मुलांमध्ये होणारे झगडे किंवा आई-मुलीमधील संघर्ष यांची मुळे कुठेतरी या गंडामध्ये असतात. डॉ. फ्रॉईड यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विपुल लेखन केले.

    वाचकाला पटविण्याची त्यांची हातोटी विलक्षण

    त्यापैकी ‘Psychopathology of Everyday life’ किंवा ‘Three Essays on the theory of sexuality व The Interpretation of dreams’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके विशेष गाजली. अनेक उदाहरणे देऊन तार्किकदृष्ट्या वाचकाला पटविण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. तसेच लोकांना बरे करण्याचा त्यांचा अनुभवही खूपच दांडगा होता. त्यामुळेच संपूर्ण मानसशास्त्रावर व एकूणच तत्कालीन शैक्षणिक जगतावर त्यांचा प्रचंड प्रभाव होता.
    मानवी मनाच्या गुहेमध्ये दडलेल्या अशा अनेक अनाकलनीय गुहांची त्यांनी आपल्या सिद्धांतांद्वारे उकल करून दाखवली. मानवी वर्तनाचा, मानवी स्वप्नांचा, मानवी आशा-आकांक्षांचा, संबंध त्यांनी मानवाच्या अबोध मनाशी तसेच त्याच्या बालपणातील अत्यंत तीव्र (काम) अनुभवांशी जोडून व ताडून दाखवला. या सिद्धांतांवर आधारित त्यांनी मनोविश्लेषणात्मक उपचार-तंत्र सिद्ध केले. व्हिएन्ना मधील तत्कालीन उच्चभ्रू समाजातील स्त्रियांमध्ये आढळून येणारी हिस्टेरीयाची समस्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सोडवून दाखवली. त्यांच्या उपचार पद्धतीचे सूत्र तसे दिसायला साधे व सोपे होते, पण ते साधणे हे महाकर्मकठीण होते. फ्री असोसिएशन ऑफ वर्ड्स किंवा संमोहन, अशा तंत्राच्या मदतीने, डॉ. फ्रॉईड व्याधीग्रस्त रुग्णाला रिलॅक्स करत. मनाच्या अर्ध मिटल्या व अर्ध जागृत अवस्थेमध्ये, मनाच्या तळाशी खोलवर दडून बसलेल्या, अनेक गाठीनिरगाठी, अलगद जाणिवेपर्यंत आणून सोडत. ज्याक्षणी हे संघर्ष, रुग्णाच्या, जाणिवेच्या टप्प्यात येते, तोच क्षण नेमका त्यांच्या मुक्तीचा क्षण असे. परंतु ह्या सगळ्यासाठी निदानाची हातोटी, संमोहन व इतर तंत्रांचा सुयोग्य वापर तसेच रुग्णाला भरपूर वेळ देणे, यासर्व पूर्व अटी होत्या. तरीही डॉ. फ्रॉईड यांनी अनेक रुग्णांना, अशा प्रकारे स्वतःच कोंडल्या गेलेल्या पिंजऱ्यांमधून बाहेर काढले, हे मात्र निश्चित सत्य आहे. आजही डॉ. फ्रॉईड यांनी दाखवलेला रस्ता तंतोतंत चालून जाणारे अनेक मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रामध्ये पाहायला मिळतात.
    मागील लेखांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे डॉ. फ्रॉईड यांचा प्रभाव हा फक्त मानसशास्त्र पुरता मर्यादित नव्हता तर अनेक इतर ज्ञानशाखांवर, मानवी व्यवहारांवर त्याचा फार सखोल परिणाम झाला होता. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वतः देखील अनेक मानवी व ज्ञानव्यवहारांचे विश्लेषण केले आहे. त्यांचे हे सिद्धांत किंवा उप-सिद्धांत खूप गाजले आहेत. त्याची मानवी संस्कृतीच्या इतिहासात नोंद घेतली गेली आहे. तसेच ते कमालीचे वादग्रस्तही ठरले आहेत. त्यांनी केलेले चित्रकलेचे विश्लेषण. दा विंची यांचे वैयक्तिक मनोविश्लेषण. त्याकाळी खूप गाजले होते. असेच एक महत्त्वाचे मनोविश्लेषण आपल्या, ‘Totem and Taboo’ नावाच्या पुस्तकांमध्ये मांडले आहे. या पुस्तकामध्ये मानवी धर्माचा विचार, मनोविश्लेषणात्मक सिद्धांताच्या वाटेने करतात. धर्म म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, निसर्गातील करालतेला, निसर्गातील भीषणतेला, निरर्थकतेला, मृत्यूला, मानवाने दिलेला एक न्यूरॉटिक प्रतिसाद आहे. भयातून अभयाकडे जाण्यासाठी, निरर्थकतेकडून सार्थकतेपर्यंत जाण्यासाठी, तसेच अनागोंदी पासून सुव्यवस्थेपर्यंत जाण्यासाठी, ज्या काही गोष्टी मानवी मनाने काल्पनिकरित्या निर्माण केल्या, त्या सर्वाला ‘धर्म’ अशी संज्ञा डॉ. फ्राईड देतात. ज्याप्रमाणे कार्ल मार्क्स धर्माला ‘अफूची गोळी’ म्हणाले, त्याप्रमाणे डॉ. फ्राईड थोड्या वेगळ्या पद्धतीने धर्माला भीतीवर मानवाने काढलेला ‘न्यूरॉटिक उपाय’ असे समजतात. मग भयावर मात करण्यासाठी, आकाशातील सर्व शक्तिमान पिता कल्पिला जातो. त्याला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रूढी- परंपरा (Rituals) सांगितल्या जातात. तसेच पृथ्वीवरील विलक्षण दुःख सहन करण्यासाठी, स्वर्गाची व स्वर्ग-सुखाची कल्पना रंगवून मांडली जाते. मृत्यूच्या व निसर्गाच्या निर्मम करालतेपासून वाचण्याचा, तो एक राजमान्य उपाय असतो. अर्थातच, त्यांच्या लैंगिकतेच्या सिद्धांताप्रमाणे या सिद्धांतावरही कडाडून टीका झाली आहे. अर्थात हे मनोविश्लेषण जास्ती करून पाश्चिमात्य धर्म धारणांना लागू पडते. धर्मांचे विश्लेषण, मनोविश्लेषण अशा प्रकारे केले जाणे थोडे कठीण आहे. पण तो विषय पुन्हा कधीतरी…
    डॉ. फ्रॉईड यांचे अनेक अनुयायी होऊन गेले, त्यांनी मनोविश्लेषण वाद त्यांच्यानंतरही जागता ठेवला. त्यात भर घातली आणि अनेक नवे विलक्षण असे सिद्धांत, मानसशास्त्रामध्ये त्यांनी मांडले. त्यातील दोन महत्त्वाचे विचारक म्हणजे ॲडलर व हूंग. त्यांचे सिद्धांत हे स्वतंत्रपणे अभ्यासण्या जोगे व संपूर्ण मानवी व्यवहाराला व्यापून उरणारे आहेत. – डॉ सुचित्रा नाईक