जामनगरात पोलंड..? एक अज्ञात गाथा..!

अरबी समुद्र आणि कच्छ खाडीच्या दक्षिणेच्या काठियावाड प्रांतातले गुजरातचे पाचवे सर्वात मोठे शहर असलेल्या ऐतिहासिक जामनगरच्या कुठल्याही मोठ्या प्रशस्त सडकेवर उभे राहुन सकाळी सकाळी स्वादिष्ट फरसाण खाण्यातली मजा काही औरच आहे. तसे बघितले तर संपूर्ण गुजरातच हा फरसाण प्रेमी आहे. म्हणूनच त्यांच्या रोजच्या जेवणात फरसाण असतेच.

  भारतातल्या अनेक शहरांमध्ये ‘जामनगरी’ नावाची फरसाणची दुकाने अतिशय प्रसिद्ध आहेत. ही दुकाने म्हणजे प्रत्यक्षात जामनगरची ‘खाद्यनगरी’च आहे असे वाटायला लागते. समुद्रातीरावर वसलेले हे शहर जसे नवनवीन खाद्यपदार्थांकरिता प्रसिद्ध आहे, तसेच ते अनेक पर्यटन स्थळांकरिता सुद्धा प्रसिद्ध आहे.

  स्वामीनारायन मंदिर, दरबारगढ पॅलेस, १९३४ ला बांधलेली सोलेरियम नावाची अद्भुत इमारत ज्या ठिकाणी सूर्यशक्तीवर आधारित निसर्ग उपचार होतो. हे महाराजा रणजीतसिंग यांनी स्थापन केले आहे. या चिकित्सालयात सूर्यकिरणापासून आरोग्यावर म्हणजे टी.बी, चर्मरोग, संधिवात अशा दुर्धर आजारांवर येथे प्रभावी उपचार केल्या जातात.

  अशा प्रकारे उपचार करणारे हे भारतातील पहिले आणि जगातले दुसरे चिकित्सालाय आहे. पण सध्या हे सोलेरियम बंद असल्याचे कळते. अप्रतिम स्मशान घाट म्हणजे जणूकाही आकर्षक पर्यटन स्थळीच आल्याचा भास व्हायला लागतो.! अनेक ऐतिहासिक महाल, मंदिरे आणि आधुनिक कारखान्यांची येथे भरभराट बघायला मिळते. द्वारका येथून जवळच आहे.

  प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि नवानगरचे दहावे जामसाहेब महाराजा रणजीतसिंग हे येथले प्रसिद्ध शासक होते. त्यांच्या अगोदरसुद्धा बहादूरशहा, जामरावल, हमिरजी अशा काही छोट्या राज्यकर्त्यांनी जामनगरच्या मर्यादित सीमेपर्यंत राज्य केले. पण समाजपयोगी कामात रणजितसिंगांनी केलेल्या कामाला तोड नाही.

  भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने २ एप्रिल १९३३ ला त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९३४ पासून यांच्याच नावाने क्रिकेटची “रणजी ट्रॉफी”ची स्थापना झाली आणि सामने सुरू केले ते आजही सुरू आहे. पुढे रणजीतसिंग यांचे पुत्र दिग्विजयसिंग जामसाहेब हे नवानगरचे ‘राजे’ झाले. इ.स.१५४० पासून जामनगरचे नाव ‘नवानगर’ होते. ही एक जडेजा रजपूत घराण्याची गर्भश्रीमंत ‘रियासत’ होती असे समजले.

  सन १९३९ ला दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आदेशावरून जर्मनीने पोलंड या लहानशा देशावर मित्रदेशांच्या इशार्‍यानंतरही राक्षसी आक्रमण केले. पोलंड बेचिराख करायला सुरवात केली. दुसऱ्या महायुद्धात पोलंड उदध्वस्त झाला. १ सप्टेंबर १९२९ ला हिटलरने अर्धे पोलंड ताब्यात घेतले. पण हिटलरचे समाधान झाले नाही. पूर्ण पोलंड ताब्यात घेण्यासाठी याच वेळेस जर्मनीने रशियाचा तानाशाह स्टॅलिनसोबत एक करार केला.

  सोळा दिवसांनंतर स्टॅलिनच्या आदेशाने रशियानेसुद्धा पोलंडचा काही भाग ताब्यात घेण्याकरिता या देशावर तीव्र आक्रमण केले आणि पोलंडला बरबाद करायला सुरवात केली. रशियाने स्त्रियांना आणि अनाथ बालकांना अत्यंत किळसवाण्या कॅम्पमध्ये ठेवले. १९४१ साली रशियाने या सर्वांना कॅम्पमधून निघुन जाण्यास सांगितले. ब्रिटनच्या वॉर कॅबिनेटमध्ये या परिस्थितीवर चर्चा झाली.

  जामनगरचे महाराज दिग्विजयसिंग जडेजा हे या ‘वॉर कॅबिनेट’चा प्रभावशाली भाग होते. त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या ‘रियासत’मध्ये या सर्वांना आश्रय देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. पोलंडच्या सैनिकांनी जहाजाच्या कॅप्टन सांगितले की ‘जिथे कुठे शरण मिळेल त्या देशात यांना घेऊन जा नाही तर हे युद्धात मारल्या जातील. जिवंत राहिलो तर परत भेटू.’ त्यानंतर एका जहाजात पाचशेपेक्षा जास्त विधवा महिला आणि तीनशेच्या वर बालकांना घेऊन जहाजे समुद्रातून रवाना झाली.

  या मोहिमेचे नाव होते ‘किंडर ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’. पण ही जहाजे समुद्रात आणि वादळात भरकटली आणि इराणच्या सिराफ बंदरात पोहोचली. पण इराणने शरण दिली नाही. जहाजावर यातले अनेक लोक कुपोषणाने आणि विविध रोगाने आजारी पडले. काही मृत्युमुखी पडले आणि त्यांची प्रेते समुद्रात फेकून देण्यात आली. ध्यानीमनी नसताना १९४२ ला गुजरातमधील जामनगरच्या समुद्रतटावर आणि काही मुंबई तटावर येऊन धडकली.

  मुंबईवरून राजांच्या कारभार्‍याने या निरागस मुलांना जामनगरपासून २५ कि.मी.वर असलेल्या ‘बालाचडी’ या समुद्री तटावर सन्मानाने आणले. येथे महाराजांची ग्रीष्मकालीन भव्य महाल होता. या सर्वांना महाराजांनी दत्तक घेऊन त्यांची तात्पुरती व्यवस्था केली. पण यांची कायमची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून महाराजांनी त्या काळात सहा ते सात लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शाळा, चर्च, दवाखाना, सांस्कृतिक भवन, हॉस्टेल, अशा साठच्या वर इमारती बांधल्या.

  या सर्वांची काळजी घेण्याकरिता डॉक्टर, कंपाउंडर, नर्स यांची नेमणूक केली. महाराज, रियासतची मुले आणि अनाथ बालके मिळून राजवाड्यात सण साजरे करायचे. महाराजांचा वाढदिवससुद्धा साजरे करायचे. महाराज नेहमी म्हणायचे ‘तुम्ही अनाथ नाही. लाचार नाही. मी तुमचा ‘बापू’आहे. ते सर्व जामसाहेबांना आपुलकीने ‘बापू म्हणायचे’. येथे पोलंडच्या झेंड्याला सुद्धा मानवंदना दिली जायची. कारण या मुलांनी आपल्या देशाला विसरू नये.

  पोलिश बालकांकरिता सैनिक शाळेत प्रवेश देऊन त्यांचे नऊ वर्षापर्यंत सुरेख पालन पोषण केले. त्यांना आर्मी ट्रेनिंग दिले आणि काही विद्यार्थ्यांना शस्त्र देऊन आणि तयार करून पुन्हा पोलंडच्या पुनर्रस्थापनेकरिता परत पाठविले. याच विद्यार्थ्यांपैकी एक जण पुढे पोलंडचा प्रधानमंत्रीसुद्धा झाला. विश्वयुद्ध संपल्यावर महाराजांनी १९४६ मध्ये या सर्वांना अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिला.

  या कॅम्पच्या जागेवर आता तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी उद्घाटन केलेले जामनगरचे सैनिक स्कूल आहे. आज कॅम्पमधली बालके ८५/९० च्या वर गेलेली आहेत. आपल्या पुर्वस्मृतींना उजाळा देण्याकरिता ते आपल्या कुटुंबासह दरवर्षी जामनगरला येत असतात.

  पोलंडच्या संविधांनानुसार ‘जामसाहेब दिग्विजयसिंग’ यांना ईश्वराचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणूनच पोलंडच्या संसदेत आजही ‘दिग्विजयसिंग जडेजा’ यांना साक्षी मानून शपथ घेतली जाते. तिथे दिग्विजयसिंगांचा अपमान अजिबात सहन होत नाही. असे काही सिद्ध झाले तर सरळ तोफेच्या गोळ्यांनी उडवून दिल्या जाते. ‘एका गुजरातच्या राजाला’ पोलंडमध्ये मिळालेला दर्जा कोणत्याही ईश्वरपेक्षा कमी नाही. आजही ही आठवण काढुन पोलंडचे लोक भावूक होतात… त्यांना अश्रू आवरत नाही..!

  श्रीकांत पवनीकर

  sppshrikant81@gmail.com