केरळ बॉम्बस्फोटांचे राजकीय प्रतिध्वनी !

केरळच्या एर्नाकुलम येथे ख्रिस्ती धर्मातील एक पंथाने आयोजित केलेल्या परिषदेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेने केरळ हादरले आहेच; पण या स्फोटांमागील धागेदोरे दहशतवादाशी जोडले गेलेले नाहीत ना, या शंकेने देशभर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. केरळला राजकीय हिंसाचार नवीन नाही. डावे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाने अनेकदा हिंसक वळण घेतलेले आहे.

  केरळमध्ये हिंदूंचे प्रमाण ५७% आहे, मुस्लिमांचे २३ % आणि ख्रिस्ती १९%. धार्मिक गट आणि समुदाय म्हणजे राजकीय पक्षांच्या दृष्टीने मतपेढी. त्यामुळे त्यांच्या लांगूलचानाच्या स्पर्धेचा परिणाम म्हणून धार्मिक तेढ निर्माण होते. साहजिकच असे स्फोट होतात तेव्हा पहिल्यांदा शंका येते ती धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांवर. हे स्फोट कोणी, का, कोणाच्या प्रभावाखाली आणि साह्याने घडवून आणले याचा तपास करणे म्हणूनच गरजेचे; तरच त्याची पाळेमुळे अन्यत्र कुठे पसरलेली नाहीत ना याचा शोध घेता येईल. आता झालेल्या स्फोटांचा तपास राज्य स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर सुरु झाला आहे. तथापि त्या तपासाचे निष्कर्ष पुढे येण्याअगोदरच राजकीय नेत्यांनी परस्परांवर चिखलफेक सुरु केली. त्याचे पर्यवसान एका केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल होण्यात झाले आहे. कोणत्याही घटनेचे गांभीर्य विसरून राजकीय लाभाचा विचार करून जीभा सैल सोडण्याची खोड राजकीय नेत्यांना जडली असल्याने यापेक्षा निराळ्या प्रतिक्रिया संभवत नाहीत. मात्र त्याचा परिणाम अशा घातपाताचा सखोल शोध घेण्यावर होता कामा नये.

  हे स्फोट झाले ते ‘जुहूवाज विटनेस’ या ख्रिस्ती धर्मातील एका पंथाच्या परिषदेत. २७ ऑक्टोबरपासून तीन दिवस ही वार्षिक परिषद सुरु होती. अखेरच्या दिवशी सुमारे दोन हजार जण उपस्थित असताना हे स्फोट झाले. काही मिनिटांच्या अंतराने तीन स्फोट झाले आणि त्यांत आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे; त्यांत एका बारा वर्षीय मुलीचा समावेश आहे. सुमारे पन्नास जण जखमी झाले आहेत; त्यातील अठरा जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील विजयन सरकारने वीस सदस्यीय तपास तुकडीची स्थापना केली आहेच; पण राष्ट्रीय तपास संघटना (एनआयए) आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) या केंद्रीय तपास यंत्रणांनी तपासास सुरुवात केली आहे. हा स्फोट ख्रिस्ती समुदायाच्या एका परिषदेवर झाल्याने हा हल्ला इस्लामी दहशतवाद्यांनीच केला असल्याचे गृहीत धरून भाजपने विजयन सरकारला लगेचच लक्ष्य केले. विजयन यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे अशा घटना घडत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली.

  भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी विजयन सरकार पीएफआयसारख्या संघटनांच्या बाबतीत कठोर नसल्याने हे घडत असल्याने म्हटले; तर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्याचा संबंध हमासला डाव्यांच्या असणाऱ्या कथित समर्थनाशी जोडला. विजयन हे खोटारडे असल्याचे चंद्रशेखर यांनी विधान केले तर चंद्रशेखर यांची वृत्ती विषारी आहे असा आरोप विजयन यांनी केला. या सगळ्या वाक् युद्धानंतर काँग्रेसने चंद्रशेखर इत्यादींच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आणि आता चंद्रशेखर यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य काही भाजप नेत्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्याची तड आता न्यायालयात लागेल. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना पार्श्वभूमी होती ती हमासच्या माजी नेत्याने केरळच्या मल्लपूरम येथे जमलेल्या पॅलेस्टिन समर्थकांना दृकश्राव्य माध्यमातून केलेल्या संबोधनाची. जमात -इ -इस्लाम या संघटनेने ही सभा आयोजित केली होती. हिंसक प्रवृत्तींना चिथावण्यास हे वातावरण कारणीभूत ठरते हा भाजपचा आरोप.

  मात्र तूर्तास तरी या स्फोटांमागे इस्लामी दहशतवादी आहेत असे सकृत्दर्शनी दिसत नाही. पण तरीही या स्फोटांना धार्मिक संघर्षाचा पदर आहेच हेही विसरता येणार नाही. हे स्फोट झाल्यानंतर त्यांची जबाबदारी घेत डॉमिनिक मार्टिन या इसमाने या स्फोटांचे समर्थन करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित केली. एवढेच नव्हे तर त्याने स्फोट होतानाचे चित्रण आपल्या फोनमध्ये केले. मार्टिन गेली सतराएक वर्षे नोकरीनिमित्त आखातात होता. साहजिकच त्याने जरी ख्रिस्ती समुदायालाच लक्ष्य केले असले तरी आखातात त्याला प्रभावित करण्यात आले नाही ना; त्याने हे स्फोट एकट्याने घडवून आणले की त्याच्यामागे कोणत्या अन्य विघातक शक्ती आहेत इत्यादी प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक. अर्थात मार्टिनने आपण एकट्यानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. तो अलीकडेच भारतात परतला आणि आपल्या पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होता. इंग्रजीचे अध्यापन तो करीत होता. ज्या ‘जुहूवाज विटनेस’ या पंथाचा तो सदस्य आहे त्याबद्दल त्याचे काही आक्षेप होते व आहेत.
  या पंथाची बीजे एकोणिसाव्या शतकात चार्ल्स रसेल याने सुरु केलेल्या ‘इंटरनॅशनल बायबल स्टुडंट्स असोसिएशन’मध्ये आहेत. मात्र हा पंथ स्वतःस प्रोटेस्टंट मानत नाही. भारतात १९०५ पासून हा पंथ स्थिरावला. ख्रिस्ती धर्मातील अन्य पंथांशी या पंथाची मतभिन्नता आहे. ‘सहा वर्षांपूर्वी आपल्याला असे जाणवले की केरळमधील जुहूवाज विटनेस समुदाय चुकीच्या मार्गावर आहे; देशविघातक गोष्टींचा पुरस्कार करीत आहे. आपण त्यांना वेळोवेळी त्यावरून समजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी लक्ष दिले नाही. राष्ट्रगीत न गाण्याचे लहान मुलांवर ते बिंबवितात. मतदान करू नये; सैन्यात प्रवेश घेऊ नये इत्यादी विचारांचा प्रसार करून मुलांच्या मनात विष कालवतात’ अशी माहिती मार्टिनने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. त्यामुळे अखेरीस आपण स्फोट घडवून आणण्याचा मार्ग पत्करला असे त्याने त्यातून सूचित केले आहे. पोलीस स्थानकात जाऊन तो स्वतः शरण आला; आपण तयार केलेल्या या बॉम्बसाठी निरनिराळ्या दुकानांतून वस्तू खरेदी केल्याचे त्याने नंतर सांगितले; एवढेच नव्हे तर त्याच्या पावत्याही दाखविल्या अशी वृत्ते स्थानिक माध्यमांनी दिली आहेत. स्फोट घडवून आणण्याअगोदर तो एका हॉटेलात उतरला होता; पण काही वेळातच तो तेथून बाहेर पडला. त्या हॉटेलातील सीसीटीव्ही चित्रण पोलीस आणि तपास यंत्रणा तपासतीलच. ‘जुहूवाज विटनेस’वर मार्टिनने घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत असे नाही. याच पंथातील एका इसमाच्या तीन मुली शाळेत राष्ट्रगीताच्या वेळी उभ्या राहतात; पण राष्ट्रगीत म्हणत नाहीत म्हणून शाळा तपासणी अधिकाऱ्याने त्या मुलींना शाळेतून काढून टाकण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्या मुलींच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली; पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. १९८६ साली त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्या विद्यार्थिनींच्या मूलभूत धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आणून देत त्यांना संरक्षण दिले होते. त्या विद्यार्थिनी राष्ट्रगीताचा अवमान करीत नाहीत हा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला होता. आता ३७ वर्षांनी मार्टिनने याच पंथाकडून होणाऱ्या राष्ट्रगीताच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करून स्फोट घडवून आणले आहेत.
  मार्टिनला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्याला कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली तेव्हा आपणच आपला युक्तिवाद करू असे मार्टिनने सांगितले. तूर्तास मार्टिन याने स्वतःच हे सगळे कांड रचले असे दिसत असले तरी या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन होणे आवश्यक. याची कारणे दोन. एक म्हणजे खरोखरच मार्टिनने स्वतःच्या डोक्याने हे केले की त्यामागे कोणत्या अन्य शक्ती आहेत यांचा छडा लागला पाहिजे. केरळसारख्या राज्यात अशा घटनांना लगेचच धार्मिक संघर्षाचे वळण लागू शकते; तेव्हा हा तपास लवकरात लवकर आणि निष्पक्षपणे झाला पाहिजे. त्यासाठी राज्याने नेमलेली तुकडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी प्रसंगी परंपरांशी समन्वय आणि सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. दुसरे कारण म्हणजे आपण ज्या पंथाशी संबंधित आहोत त्याच पंथाला ‘धडा’ शिकविण्याची मानसिकता मार्टिनमध्ये कशी आणि का तयार झाली; त्याने या पंथाबद्दल जे दावे केले आहेत त्यात तथ्य किती आहे; तसे असेल तर त्यावर कारवाई काय होणार यादृष्टीने तपास होणे आवश्यक.

  मार्टिनने घडवून आणलेल्या स्फोटांसाठी त्याने जे बॉम्ब तयार केले होते त्यासाठी अगदी जुजबी इलेक्ट्रिक वस्तू आणि फटाक्यांसाठी वापरण्यात येणारी रसायने, पेट्रोल आदींचा वापर केला होता; तेव्हा हा काही शक्तिशाली बॉम्ब नव्हे. मात्र तरीही त्यात तीन जणांचा बळी गेला आहे आणि अनेकजण गंभीर जखमी आहेत. तेव्हा या स्फोटांकडे एकाकी घटना म्हणून पाहू चालणार नाही हे खरे; तथापि तोवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संयम राखणे आवश्यक. तपशील, तथ्य यांची पडताळणी न करता राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी घाईघाईने प्रतिक्रिया देणे अशोभनीय. आपली स्फोटक विधाने करण्याची खुमखुमी राजकीय नेत्यांनी अशावेळी तरी आवरायला हवी !

  – राहुल गोखले