फुसका बार आणि गरगर फिरणारा फटका!

दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळीतील फराळ करण्याचं काम घरोघरी चालू आहे. त्यातच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात. त्यामुळं दिवाळीत फराळाला बोलवण्याचं प्रमाण वाढणार आहे. राजकीय फुलबाज्यांची या वेळची गंमत काही न्यारीच असणार. राजकीय फटाक्यांची वैशिष्ट्यं जाणून घेतली पाहिजेत.

    फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात, तर काही नुसतेच शोभेचे असतात. काही खालच्याखाली म्हणजे जमिनीवर वाजवायचे असतात तर काही आभाळात उडवायचे असतात. त्यातही विशेष प्रांतातले काही काही फटाके जास्त प्रसिद्ध असतात. निवडणुकीच्या रिंगणात कोणते फटाके कसे वाजतात, त्यांची कामगिरी कशी असते, कोणते फटाके दुसऱ्या फटाक्यांना पडद्याआडून उडण्याची मदत करतात, हेही या निमित्तानं दिसणार आहे. ‘दिलसे’ नावाचा एक फटाका आहे. प्रत्येक निवडणुकीत या फटाक्याचा आवाज काहीतरी वेगळाच असतो. या फटाक्याचं वैशिष्ट्यं म्हणजे तो कायम इतरांना मदत करीत असतो. खळखळखट्याक असं या फटाक्याचं आणखी एक वैशिष्ट्य. प्रत्येक हंगामात जशी पिकावर टोळझाड येत असते. तशी या पक्षाची निवडणुकीअगोदर टोलझाड येत असते. या फटाक्याचा वापर अन्य फटाके स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करत असतात. मागं एका फार जुन्या फटाक्याच्या राज्यातल्या प्रमुखानं या फटाक्याचा फायदा करून देताना आपल्या प्रमुख स्पर्धक असलेल्या फटाक्याचं राजकीय मायलेज कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आताच्य़ा दिवाळीत हा राजकीय फटाका रेल्वेच्या इंजिनाची दिशा बदलते, तसे १८० अंशात दिशा बदलून दुसऱ्याच राजकीय फटाक्याच्या हातचं बाहुलं बनणार आहे. हे करताना आपलं इंजिन गती का पकडत नाही, हेच या फटाक्याच्या लक्षात येत नाही. पूर्वी ‘मामी’ नावाचा फटाका जसा स्वतःभोवती फिरायचा आणि ठराविक व्यासाच्या बाहेर जसा जात नाही, तसंच हा राजकीय फटाका आहे. त्याला गती येत नाही आणि इतरांच्या पायात पाय गुंतवण्याचं काम हा फटाका करीत असतो. भुईचक्रासारखं या पक्षाचं वागणं असतं. या फटाक्याच्या इंजिनाला डबे कधीच लागत नाहीत. बाजारात हा फटाका आल्यानंतर पहिल्यांदा जेवढं यश मिळालं, त्यानंतरच्या कित्येक दिवाळी आल्या; परंतु तो फुटलाच नाही.

    फार जुना फटाका पूर्वीसारखा चकाकायचा; मात्र गेल्या तीन दशकांत या फटाक्याची पार रया गेली आहे. लवंगीच्या लडीसारखं बांधण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यातील छोटे छोटे घटक छोट्या दोऱ्यातून कायम वेगळं व्हायचं प्रयत्न करतात. या फटाक्यात ‘वेगळं व्हायचंय मला’चे प्रयोग सातत्यानं रंगत असतात. देशातील नागरिक फटाक्याची गंमत पाहत पाहत आता तो विकत घ्यायचं टाळायला लागले आहेत. त्याचं कारण लडीतील अनेक फटाके फुसकेच निघत असतात. जनतेला या फटाक्याची आवश्यकता वाटते; परंतु हा फटाका जनतेपासून दूर राहणं पसंत करतो. आप-आपसातल्या मारामाऱ्यामुळं तो फुटत नाही आणि त्याच्या मारामाऱ्याचा फायदा नव्या दमाचा आणि सर्वांची मिसळ करून झालेला फटाका उठवत असतो. त्याचं तडातडा उडणं हे जनतेला आता पटत नाही. एका विचारानं आणि एका मुशीत बांधलेल्या ॲटमबाँब चांगला वाजत असतो; परंतु सध्या त्यानं अन्य फटाक्यांची साथ बरोबर घेतली आहे. त्यामुळं आता या फटाक्यातही गुणांपेक्षा दोषांची जास्त लागण झाली आहे. पूर्वी या फटाक्याच्या बॉक्समधले सर्वंच फटाक्यांचा चांगलाच बार वाजायचा आता मात्र तसं राहिलं नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या फटाक्याची चलती असली, तरी ढवळ्याशेजारी बांधला पवळा, गुण नाही तरी वाण लागला, तसं या फटाक्याचं झालं आहे. बॉक्समध्ये मुळापासून असलेल्या फटाक्यांना आता असंगांगी संग नको, असं झालं आहे. या फटाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं एका विचारधारेला वाहून घेतलं आहे. सर्वसमावेशकता हा त्याचा गुण नाही. त्याला संस्कृतीचं वेष्टन आहे. देशप्रेमाचं लेपन आहे. त्यातल्या दारूला देशीचा वास आहे आणि पाश्चात्याचं प्रेम आहे. या फटाकड्याच्या कुळातल्या अनेकांचं अमेरिकाप्रेम जगजाहीर आहे. शेतकरी आणि दलितांचा कळवला असलेल्या टिकल्यांची संख्या वाढती आहे. टिकल्यांच्या डबीतही त्या एकत्र राहत नाही. त्यांचा कधी आवाज होत नाही. पिस्तूलात घालून वाजवल्या, नखांत घालून वाजवल्या, तरी त्यांचं वाजणं फार काही मोठं नसतं. मर्यादित आवाजावर समाधान मानणारं आणि तरीही आप्तांशीच भांडण्याचा या टिकल्यांचा स्वभाव काही जात नाही.

    आकाशात उडणारे बाण असतात. तसेच समोरच्याचा वेध घेणारे बाण असतात. या फटाक्याच्या बाणाची प्रत्यंचा पूर्वी व्यवस्थित ओढला जायचा. राज्यात या फटाक्याचा पूर्वी आवाज असायचा. त्याला मित्राची संगत नडली. काही काळ मित्र फटाक्याला राज्यात वाढण्यास त्यानं मदत केली; परंतु नंतर मात्र मित्रफटाका आणि त्याचा आवाज वाढत गेला आणि मूळच्या फटाक्याच्या बाणाची धार कमी होत गेली. बरं या मित्राचा अनुभव असा, की तो विस्तारासाठी आणि जादा आवाजासाठी मित्राची मदत घेतो, स्वतः मोठा होतो आणि मित्राची वातच काढून घेतो, असा त्याचा अनुभव. असाच एक फटाका. त्याचा नेता मोठा. अभ्यासू; पण नेत्याची विश्वासार्हता कायमच पणाला लागलेली. या फटाक्यानं कायम नवनवे प्रयोग केले. या फटाक्यावरचं चिन्ह कायम बदलत गेलं. या फटाक्याला कायम दुसऱ्यापासून चौथ्या स्थानापर्यंत जनतेनं आपल्या मनात स्थान दिलं. या जातकुळीच्या फटाक्यात सरंजामदारी वृत्तीची जास्त. त्याचा आवाजही मोठा. जनतेच्या कामाचा; परंतु कधी दगाफटका करील, याचा भरवसा नसलेला अशी या फटाक्याची ख्याती. यानं इतर फटाक्यांना कायम आपल्या बॉक्समधील मोठमोठे फटाके दिले. फुटीवर त्याचं जास्त प्रेम. या फटाक्याला बॉक्सला नुकतीच गळती लागलेली. आतापर्यंत आवाज दाबून ठेवलेल्या या जातकुळीतील फटाक्यानं काकाच्या घरातच बंड घडवून आणलं आहे. काका ताकदीचे. कुणी बरोबर नसले, तरी फटाक्याला बळ देणारे. त्यांच्याबरोबर दरवेळी किती असतात आणि ऐन दिवाळीत कसा आपटबार करतात, हे अन्य फटाक्यांना चांगलंच माहीत. पावसातही हा फटाका चांगला फुटतो. वंचिता घरच्या दिवाळीला महत्त्व असतं. दिल्या घेतलेल्यांचा आणि पावशेराचं महत्त्व असलेला हा फटाका. त्याचा फुटण्याअगोदरच जास्त आवाज असतो. पेटवल्यानंतर फुसकेपणाच वाट्याला जास्त येतो. सुतळी बाँबसारखा बिनभरवशाचाच म्हणा ना. शेवटपर्यंत झुंजवत ठेवत त्याला बरोबर घेण्यास अन्य फटाके तयार होत नाहीत. त्याचं कारण तो कुणाची एक, बी की सी टीम असतो, हे कळत नाही. पावसाळी छत्र्यांसारखं उगवून केव्हाही बाजारात येणारे हातातल्या हातात राहणाऱ्या फुलबाज्या अनेक असतात. त्या फक्त दिवाळीत ओवाळणीपुरत्याच असतात. त्यांचं अन्य काही महत्त्व नसतं. लोकशाहीच्या या दिवाळीत असे अनेक फटाके आपले नशीब अजमावत असतात; परंतु जनतारुपी ग्राहक काहीच फटाके घेऊन त्याच्या आवाजाची चाचणी घेत असते. त्यात जो फटाका जनतेला जास्त आवडतो, त्याचाच खप होतो; मग भलेही तो काही का कामाचा नसेना. आवाजाला भुलणारी दुनिया असल्यावर आणखी काय हवं?

    – भागा वरखडे
    warkhade.bhaga@gmal.com