सिनेरंग : राजकारण…. पडद्यावरचं

मराठी चित्रपट आणि वेबसीरिजमधील ‘राज्यातील राजकारणाचे रंगढंग’ हा महत्वाचा विषय आहे. राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं दर्शन कलाकृतींमध्ये घडते.

  सरकार पडण्याअगोदर ते उभं राहणं आवश्यक आहे….राजकीय प्रवास हा रेल्वेच्या प्रवासासारखा असतो, काही लोक आपल्याला डब्याबाहेर ढकलतात तर काही ना आपण, आपलं स्टेशन आलं की आपण स्वतःहून उतरावे हेच खरे…
  ‘रानबाजार’ या वेबसीरिजमधील हे संवाद सूचक आणि प्रभावीही आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही दिवसांपासूनच्या उलटसुलट घडामोडी, शह-काटशह, कुरघोडी, बदलत्या खेळी, युती, पक्षांतर, आश्वासने, आरोप-प्रत्यारोप पाहताना हे संवाद जास्तच महत्वाचे ठरतात.

  मराठी चित्रपट आणि वेबसीरिजमधील ‘राज्यातील राजकारणाचे रंगढंग’ हादेखील एक महत्वाचा विषय आहे. राजकारणात जे जे काही घडते/बिघडते अथवा अवघडते त्याचे दर्शन अशा कलाकृतीमध्ये घडते की अशा माध्यमातून ‘सिनेमॅटीक लिबर्टी’ घेऊन ते पडद्यावर येते, असा प्रश्न कायमच असतो.

  ते काही असले तरी ‘पडद्यावरचे राजकारण’ हा बहुचर्चित विषय आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात अर्थात वास्तवात राजकीय घडामोडी रंगतात तेव्हा चित्रपट/ मालिका/ वेबसीरिज यातून राजकारणावर ‘फोकस’ टाकणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात ‘भूकंप’ होताच सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर ‘सिंहासन’ आणि ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटांची, त्यातील काही दृश्ये आणि संवाद यांची दखल घेतली जात आहे, याचाच अर्थ आजूबाजूच्या घटनांबाबत सोशल मीडियात जागरुकता दिसतेय.

  तसे पाहिले तर, मराठी माणसाच्या अतिशय आवडत्या गोष्टी म्हणजे, संगीत, नाटक, वाचन, भटकंती, चित्रपट, क्रिकेट, जुन्या आठवणी आणि राजकारण…

  फार पूर्वी तर सत्तेचे राजकारण, सत्तेभोवतीच्या खेळी, सर्व प्रकारच्या निवडणुका (ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, महापालिका, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा) सरकार याबाबत अनेक मराठी माणसे न कंटाळता अनेक तास बोलत, तात्विक वाद घालत, मंत्रिमंडळाच्या एकाद्या निर्णयावर वृत्तपत्राला पत्र पाठवत. अनेक प्रकारच्या आंदोलनात भाग घेत, निषेध नोंदवत.

  तात्पर्य, समाजात राजकीय जागरुकता होती, त्याला सामाजिक पाश्वभूमी होती. काळानुसार त्याचे आज स्वरुप बदलले आहे इतकेच. पण अशा गोष्टीत रस घेण्याची वृत्ती अथवा त्याबाबत किमान काही गोष्टी माहित असण्याची उत्सुकता कायम आहे. आता तर मुद्रित माध्यमाच्या जोडीला वृत्त वाहिन्या, सोशल मीडिया, डिजिटल मीडियाही आहे. त्यामुळे अशा राजकीय घडामोडी आता चोवीस तास समोर येत आहेत.

  एक म्हणजे, ग्रामीण चित्रपटातील सरपंच अथवा पुढारी, दुसरे म्हणजे राजकीय चित्रपट, जे प्रत्यक्ष राजकारणात जे दिसते त्यावर फोकस टाकणे. आणि तिसरे म्हणजे, बदलत्या काळासोबत बदललेले राजकारण मराठी चित्रपटातही दिसले.

  या वाट‘चाली’त डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ ( १९७५) खूपच महत्वाचा चित्रपट ठरतो. तोपर्यंत ग्रामीण मराठी चित्रपटात एकादा सरपंच पाटील अथवा पुढारी असे आणि त्या व्यक्तिरेखेची छटा काहीशी व्हीलनीश असे. त्या चित्रपटाच्या थीमनुसार ते असे आणि प्रेक्षकांना तेवढंही पुरेसं वाटे. याबाबत अधिक तपशीलात जावे असे प्रेक्षकांना गरजेचे वाटत नव्हते. अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’, केशव तोरो दिग्दर्शित ‘पुढारी’, मधुकर पाठक दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’ अशा चित्रपटातून ते दिसते.

  सत्तरच्या दशकात राज्यात ग्रामीण भागात सहकारी साखर कारखानदारी आणि त्यातूनच आकाराला येत असलेले महत्वाकांक्षी नेतृत्व ही एक महत्त्वाची गोष्ट होती. तोपर्यंत मराठी चित्रपटात ‘गावातला पाटील’ आणि त्याची हुकुमत दिसायची. ‘सामना’ने त्यात सर्वप्रथम बदल केला. हेच साखर कारखानदार तालुका अथवा जिल्हा पातळीवर सम्राट बनू लागले होते आणि ते मराठी चित्रपटात येणे गरजेचे होते.

  विजय तेंडुलकर यांच्या पटकथेवर डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन आणि रामदास फुटाणे यांची निर्माता म्हणून साथ असा संगम जुळतानाच सहकार सम्राट धोंडे पाटील यांच्या दमदार भूमिकेत निळू फुले आणि गांधीवादी मास्तरांच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू असा हा ‘सामना’ रंगला. अभिनयाच्या जबरदस्त जुगलबंदीसाठी हा चित्रपट आजही ओळखला जातोय. मारुती कांबळेचे काय झालं? हा मास्तरांचा प्रश्न या चित्रपटात ‘कळीचा मुद्दा’ होता.

  ‘सामना’च्या यशानंतर डॉ. जब्बार पटेल एक पुढचे पाऊल टाकणार हे स्वाभाविक होतेच.

  पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘आज दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबरींवर आधारित विजय तेंडुलकर यांची कसदार आणि बंदिस्त पटकथा आणि संवाद असलेल्या डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ (१९७९) या राजकीय चित्रपटाची त्या काळात भरपूर चर्चा झाली आणि मराठी चित्रपटाच्या इतिहासातील हा माईलस्टोन राजकीय चित्रपट ठरला.

  ‘सिंहासन’मध्ये त्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट मांडला होता. अरुण सरनाईक यांना त्यांच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची भूमिका मिळाली. ते मुरब्बी चाणाक्ष मुत्सद्दी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होते. त्याना तितक्याच चतुरतेने शह देऊ पाहणारे अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे होते, डॉ. श्रीराम लागू, तर कामगार संघटनेचा नेता डिकॉस्टा साकारला सतीश दुभाषी यांनी! राजकीय पत्रकार निळू फुले यांनी साकारला आणि त्यांचा अगदी कायमस्वरुपी इम्पॅक्टही मराठी रसिकांवर बसलाय.

  या चित्रपटात दत्ता भट्ट, मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, माधव आपटे, मोहन आगाशे, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर, लालन सारंग, रिमा लागू, उषा नाडकर्णी, राजा मयेकर असे कलाकार होते. या चित्रपटाला त्रेचाळीस वर्षे पूर्ण झाल्याची सांस्कृतिक क्षेत्रात दखल घेतली नसल्याचे आश्चर्य वाटतेय. पुणे शहरात काही संदर्भात ‘सिंहासन’ची दखल घेतली जात असते.

  दत्ताराम तावडे दिग्दर्शित ‘सहकार सम्राट’ (ही शीर्षक भूमिका निळू फुले यांनी आपल्या नेहमीच्या ढंगात साकारली.), दिग्दर्शक अनंत माने यांचा ‘तोतया आमदार’ ( अरुण सरनाईक यांना वेगळी संधी), सतिश कुलकर्णी निर्मित आणि अनंत माने दिग्दर्शित ‘गल्ली ते दिल्ली’, उज्ज्वल ठेंगडी दिग्दर्शित ‘वजीर’ (अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, चंद्रकांत गोखले, कुलदीप पवार, आशुतोष गोवारीकर, फैयाज, सुधीर जोशी, सयाजी शिंदे यांच्या अभिनयाचा उत्तम आविष्कार या चित्रपटात पाह्यला मिळतो.), श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘सरकारनामा’ (या चित्रपटात यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, सुकन्या कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, आशुतोष गोवारीकर, यतीन कार्येकर, नंदू माधव, शर्वरी जमेनीस, मिलिंद गुणाजी अशी जबरदस्त स्टार कास्ट होती आणि हा चित्रपट मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये थाटात प्रदर्शित झाला.)

  ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘सूर्योदय’, ‘झेंडा’, ‘राज का रण’,‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ (या चित्रपटाचा सिक्वेलही आहे), ‘भगिरथ सरपंच’, ‘एक दिवस माझा’, ‘कागर’, ‘हायकमांड’, ‘सत्ताधीश’, ‘सत्तेसाठी काहीही’, ‘रणांगण’, ‘विजय असो’,अशा आणखी काही मराठी चित्रपटात कमी अधिक प्रमाणात राजकारण होते.

  दादा कोंडके यांच्या ‘रामराम गंगाराम’ या चित्रपटामागच्या निर्मितीची गोष्ट रंगतदार आहे. दादानी खरं तर आणीबाणीच्या वीस कलमाना पाठिंबा देण्यासाठी ‘गंगाराम वीसकलमे’ या चित्रपटाची निर्मिती सुरु केली आणि काही रिळांचे चित्रीकरण होताच आणीबाणी तर उठलीच पण देशात सत्तांतर होऊन जनता पक्षाचे सरकार आले. दादा कोंडके यांनी या राजकीय सामाजिक बदलाचे वारे लक्षात घेऊन पटकथेत फेरफार केले आणि ‘रामराम गंगाराम’ या आपल्या द्विअर्थी संवादाच्या शैलीचा चित्रपट पडद्यावर आणला आणि यशही मिळवले.

  राजकीय पटांच्या या परंपरेत अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’, जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘शासन’, समीर विध्वंस दिग्दर्शित ‘धुरळा’, अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘ठाकरे’, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ अशा चित्रपटांची भर पडली.

  ‘धुरळा’च्या पूर्वप्रसिध्दीसाठी मध्य मुंबईत प्रचार फेरी आयोजित करण्यात आली हे चित्रपटाच्या थीमनुसार झाले. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट ऐंशी आणि नव्वदच्या दशकात ठाणे जिल्ह्यात असलेले शिवसेना नेते आनंद दिघे यांचे एकहाती वर्चस्व, दबदबा आणि जनसामान्यांना सतत मदत यावर होता. प्रसाद ओकने साकारलेली आनंद दिघे ही व्यक्तिरेखा या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ ही वेबसीरिज राजकारणातील उलटसुलट खेळीवरच आहे.

  राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता मराठीच्या पडद्यावरील राजकारणाची दखल घ्यायला हवीच. काय सांगावे, सध्या जे राजकारणात सुरु आहे त्यावरप्रभावी अशी वेबसीरिज अथवा मराठी चित्रपट निर्माण होऊ शकतो…. खरं तर व्हायला हवा.

  दिलीप ठाकूर

  glam.thakurdilip@gmail.com