raj Thackeray

प्रभू श्रीरामाच्या आज्ञेने अग्नीपरीक्षा देणाऱ्या सीतेप्रमाणे आता महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय पक्षांची अग्नीपरीक्षा त्याच अयोध्या भूमीमध्ये होऊ घातली आहे. कोणाचा भगवा अधिक भगवा हे सिद्ध करण्याची अहमहमिका लागली असतानाच अयोध्याच का? असा प्रश्‍न आपसूक पडल्याशिवाय राहात नाही. राज ठाकरे (Raj Thackeray Ayodhya Visit)यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला असला तरी त्याचे कवित्व सुरुच राहणार आहे. प्रभू श्रीरामाच्या साक्षीने बरेच काही घडणार असल्याचे दिसते.

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण जणूकाही उत्तर प्रदेशातून किंवा रामजन्मभूमीतून चालते, असे वाटावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हिंदुत्वाचे प्रमाणपत्र हे अयोध्येतूनच (Ayodhya)  मिळते, असा भास राज्यातील सगळ्याच राजकीय नेत्यांना झाला, आणि त्यांनी अयोध्येकडे धाव घेतली, असेही वाटू लागले. एकदा का हिंदुत्वाचे (Hidutva) प्रमाणपत्र अयोध्येतून मिळवले की महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच भगवा फडकणार, असा विश्‍वास या नेतेमंंडळींना असावा, असे चित्र निर्माण केले जात आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरु आहे. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंगे काढणे हेच खरे हिंदूत्व, असा एक समज पक्का करून देत राज यांनी पाच जुनला अयोध्येच्या दौऱ्याची घोषणा केली होती. आता हा दौरा स्थगित झाला आहे. आदित्य ठाकरे यांनीही दहा जुनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असल्याचे सांगण्यापर्यंत पोहचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवारांनीही रामललाचे दर्शन घेतले. राज्यातील सगळ्याच्या राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यामागचे गणित काय? निवडणुकीपूर्वी अचानक गावदेवतेच्या मंदिरात पुढाऱ्यांची गर्दी होऊ लागते, त्यातलाच हा प्रकार आहे. महापालिकेची निवडणूक आहे, आणि त्यामुळे प्रभू श्रीरामांचे दर्शन सगळ्यांनाच हवेहवेसे वाटू लागले आहे.

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार, केंद्राच्या विविध योजना आणि धोरणं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची फारकत, मराठी मतांचे विभाजन, नवाब मलिकसारख्यांची सरकारातील शिवसेनेकडून पाठराखण असे मुद्दे खरेतर भाजपकडून पुढे आणले जातील, असे संकेत गेल्या काही दिवसातील सभा, संमेलनांनी दिले आहेत. हिंदुत्वापासून शिवसेनेची फारकत झाली, हे दाखवण्यासाठी भाजपने राम मंदिराच्या निर्माणाचेच नव्हे तर बाबरी ध्वस्त करण्याचेही श्रेय आपलेच असल्याची जाहीर भूमिका घेतली. बाबरीचा ढाचा पाडला आणि मंदिराचे निर्माण न्यायालयाच्या निवाड्यानुसार होतेय, ही भूमिका शिवसेनेने सोडली नाही, पण सरकारमध्ये असल्यामुळे ते तेवढी आक्रमकपणे मांडू शकत नाहीत. त्याचाच लाभ घेत हिंदुत्ववादी मते आपल्याकडे पूर्णपणे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे मनसेने हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारत आपणच असे जहाल हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत, हे सांगण्यासाठी थेट मशिदींवरील भोंग्यांनाच हात घातला. भरीस भर म्हणून शिवसेनेचे हिंदुत्व लेचेपेचे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्याच्या चार दिवसांच्या हाय व्होल्टेज नाट्यानेही केला.

    हिंदुत्व आणि ते सिद्ध करण्यासाठी अयोध्या दौरा किंवा राम मंदिराचा मुद्दा अचानक आलेला नाही. निवडणुकीचे वातावरण तयार होत असतानाच हा मुद्दा तापवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रबिंदू मानूनच हे सगळे राजकारण सुरु आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या पाहता, ती मते आपल्याकडे खेचून घेण्याची ही स्पर्धा आहे. भाजपकडे बहुसंख्य उत्तर भारतीय हिंदू मते जातील, हे स्पष्ट आहे. मराठी मतांमध्ये होणाऱ्या विभाजनास मनसे कारणीभूत ठरावी आणि शिवसेनेच्या गठ्ठ्याला नख लावता यावे, असा मोठा प्रयत्न यामागे आहे. मराठी मतांच्या विभाजनासाठी राज ठाकरे हे नावच पुरेसे आहे. पण राज ठाकरे म्हणजे भाजपची बी किंवा सी टीम अशी टीका सुरु होताच राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला. त्यानंतरच्या घडामोडी बारकाईने समजून घेण्याची गरज आहे.

    राज यांना गुढीपाडव्याच्या भाषणानंतर केंद्र सरकारने वाढीव सुरक्षा देण्यासाठी पावले उचललीत. त्यावर शिवसेनेतून टीका झाली. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या सगळ्यांना केंद्राकडून सुरक्षा दिली जाते, असे म्हटले गेले आणि राज ठाकरे यांना वाढीव सुरक्षा देण्याचा निर्णय लांबणीवर पडला. तसाच प्रकार राज यांच्यावर भाजपशी जवळीक असल्याचा होताच त्यांना उत्तर प्रदेशात भाजपच्याच खासदाराकडून विरोध सुरु झाला. या घडामोडी अशा क्रमाने पाहिल्या तरच त्यामागची समीकरणे उलगडतात.

    राज ठाकरे यांच्याशी भाजपचे संधान बांधलेले नाही, हेच दाखवण्याचा प्रयत्न यातून होत आहे. राज उत्तर भारतीयांची माफी मागणे केवळ अशक्य. कारण राज ठाकरे यांनी माफीच नाही पण दिलगिरीसुद्धा व्यक्त केली तर मराठी मतांपासून ते दूर जातील, हे कोणीही सांगेल. राज ठाकरे यांची कट्टर हिंदुत्वावादी नेता अशी प्रतिमा तयार करतानाच कट्टर मराठी नेता ही प्रतिमासुद्धा उत्तर भारतातील त्यांच्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामुळे तयार होतेय, आणि तीसुद्धा तिथल्या भाजपच्याच एका खासदारामुळे हा केवळ योगायोग असावा?

    राज ठाकरे यांच्यासोबत भाजप आहे किंवा त्यांची मदत भाजप घेत आहे, हे जाहीर करणे भाजपला मुंबईत परवडणारे नाही. भाजपची वोट बँक असलेले उत्तर भारतीय मतदार दुखावणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेची एकगठ्ठा मते कमी करण्यासह उत्तर भारतीय मतांचा आपला गठ्ठा अधिक पक्का करणं हा प्रयत्न भाजपचा आहे.

    राज ठाकरेंशी आपला संबंध नाही, हे दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशातून होणारा विरोध असू शकतो. पाच जुनला राज यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून वाढीव सुरक्षा पुरवली जाऊ शकते. राज यांना अयोध्येत जाण्यापासून रोखणे भाजपला शक्य नाही. पण एकीकडे विरोध आणि दुसरीकडे केंद्राच्या कडेकोट सुरक्षेत त्यांचा दौरा पूर्ण करून देणे यातून भाजपला ईप्सीत असा संदेश देता येणार आहे. तर मनसेच्या हिंदुत्वाला अधिक झळाळी मिळेल.

    महापालिकेच्या निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वावर आणण्यात बऱ्यापैकी सगळ्यांनाच यश मिळाले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतून रोहीत पवारही कुटुंबासह अयोध्येत दर्शन घेऊन आले आहेत. कोणाचे हिंदुत्व अधिक कट्टर, कोणाचा भगवा अधिक भगवा, याचे उत्तर शोधण्यात आता ऑक्टोबरपर्यंत मतदार गुंतलेले राहतात का, आणि मतदारांना भगव्या भोवतीच गुंतवून ठेवण्यात राजकीय पक्ष यशस्वी होतात, का यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. पण सध्यातरी खऱ्या भगव्याची चाचणी अयोध्येतच होत आहे.
    – विशाल राजे
    vishalvkings@gmail.com