prashant damle

महाविक्रमी प्रशांत दामले याला मराठी रंगभूमीवरला प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनी तो प्रदान करण्यात येणार आहे. गेली चार दशकांपासून 'इनॲक्शन' असणाऱ्या या रंगकर्मीची 'जादु तेरी नजर' जबरदस्तच! चित्रपट, मालिका या चक्रात न अडकता त्याने रंगभूमीच आपलं कार्यक्षेत्र निवडलं त्याचा हा सन्मान म्हणजे एका विक्रमवीराचा गौरवच !

    ‘गेली पस्तीस एक वर्षे असा एकही महिना रिकामा गेला नसेल की ज्या महिन्यात ‘प्रशांत’वर लिहिण्यासाठी काही एक नाही! अगदी नाट्यगृहे पूर्णपणे बंद होती, त्या कोरोना काळातही तो सक्रीय होता. बॅकस्टेजवाल्यांसाठी त्याने केलेल्या मदतीसाठी लेखणी हाती घ्यावी लागली होती. प्रशांत दामले ही सहाअक्षरे म्हणजे नाट्यसृष्टीतलं एक दिशादर्शक होकायंत्रच! जो कधीही थांबला नाही. रसिकांच्या दिशेने चालत राहीला. विश्रांती ही जशी त्याला ठावूकच नाही. म्हणूनच सर्वाधिक जागतिक प्रयोगसंस्थेच्या महाविक्रमात तो मराठी रंगभूमीवरला महानायक ठरलाय. देश-विदेशात स्वतःचा हक्काचा चाहातावर्ग असलेला तो एकमेव स्टेजआर्टीस्ट आहे. अनेक प्रतिष्ठीत बक्षिसे, पुरस्कार, बहुमान हे त्याच्यादिशेने अलगद चालत आलेत. त्यात यंदा संगीत नाटक अकादमीच्या मागोमाग विष्णूदास भावे सन्मानाने त्याला येत्या पाच नोव्हेम्बर रोजी रंगभूमीदिनी गौरवण्यात येणार आहे. संगीत नाटकातील बालगंधर्व, गद्य नाटकातील डॉ. काशिनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले – या तिघा ‘स्टार्स’भोवती जे वलय रसिकांच्या हृदयात आहे त्याचे दर्शनच सदैव होते. हाऊसफुल्लसम्राट, चॉकलेट हिरो, बेस्ट एंटरटेनर, सदाप्रफुल्लीत, प्रशांत महासागर…. अशी कित्येक विशेषणं आजवर वापरली. जी तशी कमीच वाटतात. येवढी जादुगिरी त्याच्या व्यक्तिमत्वात गच्च भरली आहेत.

    ‘टुरटूर’ या नाटकाने मराठी रंगभूमीला नव्या दमाची एक पिढी दिली. तो काळ प्रशांतच्या कॉलेज जीवनातला. सिद्धार्थ कॉलेजातून सतीश पुळेकर एकापेक्षा एक एकांकिका करीत होता. त्या गाजल्या. ‘टूरटूर’ची जूळवाजूळव पूरु बेर्डे करीत होता. देखणा, गोरापान, गोडगळ्याचा एक मूलगा पूरुला गवसला. तो या नाटकात गाऊ लागला. अभिनय करु लागला. पूढे स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर‌ ‘प्रशांत दामले’ गाजला. २३ फेब्रुवारी १९८३ हा दिवस. जो आजही त्याला नेमका आठवतो. प्रशांत पहिल्यांदा नाटकाच्या प्रयोगाला स्टेजवर उभा राहीला. त्याच्या वाटेला फक्त एकच वाक्य होतं खरं, पण तो चूकला – अडकला – गोंधळ उडाला. कारण त्याकाळात अभिनयापेक्षा गाण्याकडे त्याचं लक्ष आधिक होतं. पण ‘टुरटुर’ने व्यावसायिक रंगभूमीवर त्याची एंट्री झाली. आज ‘सारखं काहीतरी होतय’ पर्यंत तो पोहचला. १९८३ ते २०२३ पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे एखाद्या महाकादंबरीचा विषय ठरेल.  ‘बेस्ट’चा कर्मचारी‌ ते नाट्यपरिषदेचा अध्यक्ष पर्यंतचा त्याचा प्रवास विलक्षणच!

    महविक्रमांनाही लाजवेल येवढे वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा आहेत. जे भल्याभल्यांना चक्रावून सोडतात. गेली तीन दशके तर बुकींगवरला सम्राटच तो ठरलाय. ‘गर्दी म्हणजे प्रशांतच!’ हे समिकरण जणू बनलय. गेल्या वर्षी ६ नोव्हेम्बर २०२२ हा दिवस. सारे नाटकवाले मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेने निघालेले. कारण या दिवशी त्याने आपल्या नाट्यप्रवासाला १२,५०० प्रयोगांचा विक्रमी पल्ला पार केला. ज्याची नोंद ही जागतिक रंगभूमीवर नोंदविली गेलीय. तो एकमेवच ठरलाय.

    ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘मध्ये काही पानं ही प्रशांतने व्यापूनच टाकली असणार! हे भाग्य दूर्मिळच म्हणावं लागेल. २४ डिसेंबर १९९५ या दिवशी तिन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग त्याने सादर केल होते. तर १ जानेवारी १९९५ ते ३१ डिसेंबर १९९५ या एकाच वर्षात त्याने ३६५ दिवसात चक्क ४५२ प्रयोग केले. हा चमत्कार म्हणावा येवढा प्रयोग संख्येचा विक्रम ठरला. दिवसालाही लाजविणारा हा प्रकार! ज्याची नोंद सुवर्ण अक्षरात करावी लागेल.

    आजही तो दिवस आठवतो. १८ जानेवारी २००१ हा दिवस. प्रशांत पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत बिझी होता. तिन प्रयोगांसाठी त्याने मुखवटे चढविले. एकाच दिवसात ३ वेगवेगळ्या प्रयोगांचे पाच प्रयोग करून नाटकवाल्यांना भारावून सोडले. महाविक्रम म्हणजे प्रशांत! पून्हा कधीतरी या विक्रमांवर अधिक तपशिलांनी मांडता येईल. कारण सातशे शब्दांच्या शब्दमर्यादेत प्रशांत पूर्णपणे सामावून घेता येणार नाही, हेच खरे! काही आठवणींना उजाळा येवढच शक्य आहे.

    १९९२ चा सुमार असावा. त्यावेळी त्याचं ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक गाजत होतं. १७४५ प्रयोग संख्येपर्यंत हे नाटक पूढे पोहचले. ५ डिसेंबर १९९२ ला नाटक सुरु झालं. त्यावेळी प्रशांत नोकरी आणि नाटक दोन्ही सांभाळत होता. ‘बेस्ट’ची नोकरी ही नावापूरती होती. ६ डिसेंबरला बाबरी मशीद तूटती. देशभरात दंगल उसळली. मुंबईत तणाव. एकच प्रयोग झालेला. आता नाटकाचे काही खरं नाही, अशा चर्चा रंगल्या. वसंत सबनीसांची संहिता ताकदीची होती. प्रशांत त्यात फिट बसलेला पण पुढे हे नाटक विश्वविक्रमी ठरले. येवढं की त्या जोरावर त्याने ‘बेस्ट’च्या नोकरीला बायबाय केला!

    १९९६ हे वर्ष असावे. ‘सुंदर मी होणार’ हे नाटक‌ नाटकात सारी दिग्गज मंडळी. डॉ. श्रीराम लागू, वंदना गुप्ते यांच्या सोबत भूमिका. सुधीर भटांची निर्मिती. प्रयोग सुरू झाले. प्रशांतची भूमिका तशी दुय्यम. फार किरकोळ पण एकदोन प्रसंगात‌ टाळ्यांची हमखास दाद मिळायची. त्याला भेटण्यासाठी प्रेक्षक आत शिरायचे. काही प्रयोगानंतर डॉ. श्रीराम लागू निर्माते सुधीर भट यांना म्हणाले, प्रशांतला चांगला प्रतिसाद मिळतोय. जाहिरातीत ‘आणि प्रशांत दामले!’ असा उल्लेख करा! एका नटसम्राटाने दुसऱ्या नटसम्राटाला दिलेली ही दाद होती. दोनशे प्रयोगापर्यंत हे नाटक गेले खरे पण ‘आणि प्रशांत दामले!’ प्रशांत ठरला !

    टुरटुर महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, प्रितीसंगम, पाहुणा, गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकूरे उदंड जाली,  सुंदर मी होणार, चार दिवस प्रेमाचे, शू-कुठे बोलायचं नाही, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, आम्ही दोघं राजाराणी, ओळख ना पाळख, बहुरूपी, श्री तशी सौ,, सासू माझी ढाँसू, माझीया भाऊजींना रीत कळेना, एका एग्नाची पुढची गोष्ट, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतय… ही प्रशांतची नाटके. जी रसिकांना विसरता येणार नाहीत.

    – एका मैफलीत प्रभाकर पणशीकर यांनी मी विचारलं होतं की ‘आपल्या नंतर लखोबा लोखंडे कोण करू शकेल?’ त्यावर लगेच पंत म्हणाले होते – ‘प्रशांत दामले!’ ही बातमी जेंव्हा प्रशांत पर्यंत पोहचली तेंव्हा त्यानेही लखोबा साकारायचा आहे! असे सांगितले होते. पण पूढे बातम्यांशिवाय काहीएक घडले नाही. विष्णुदास भावे हा रंगभूमीवरला मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारतांना त्याने ‘लखोबा लोखंडे ची भूमिका साकार करणार असल्याची घोषणा केल्यास रसिक त्याचे निश्चित स्वागत करतील. भावे पुरस्काराबद्दल प्रशांतचे अभिनंदन!

    sanjaydahale33@gmail.com