संत साहित्याची प्रसारक : प्राची गडकरी

तिच ब्रह्मा तिच मुक्ती, आदिमाया विद्या शक्ती
विश्व चैतन्याची होई, तिच्यापासून उत्पत्ती
महाराष्ट्री अवतरे, थोर शक्ति माता अशा
साडेतीन शक्तिपीठे, आम्हा दाखविती दिशा…’

प्राची यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या भक्तीगीताचे सादरीकरण प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावर झाले आणि गीतकार म्हणून त्यांचे नाव देशभरात झळकले. हा बहुमान त्यांना मिळालाच शिवाय “साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती” ही संकल्पना असलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशभरातून सर्वोत्तम चित्ररथाचे द्वितीय पारितोषिक मिळाले, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.

उपजतच कवितेचं अंग असलेल्या प्राची वयाच्या २२व्या वर्षी काव्यरसिक मंडळाच्या संपर्कात आल्या. काव्यरसिक मंडळ हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं मंडळ. या मंडळाशी जोडलं गेल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने कविता म्हणजे काय, याची जाण आली. याशिवाय इतरही साहित्य वाचनाची आवड लागली. कवितेचा अभ्यास करता करता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्या करू लागल्या. सूत्रसंचालन करताना त्या विषयाचा, आमंत्रित पाहुण्यांचा, मार्मिक बोलण्याचा अभ्यास, आलेल्या साहित्यिकाच्या अनुरूप एखादी कविता करणे किंवा शेरोशायरी करणे ही निवेदनाची कौशल्य त्यांनी आत्मसात केली. आपल्या सुमधुर वाणीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्राची म्हणाल्या, ‘माझे निवेदनाचे, कविता वाचनाचे कार्यक्रम सुरू असतानाच आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मला चालून आली. माझं नशीब असं की मला बऱ्याच वेळा संतांचे कार्यक्रम मिळायला लागले आणि संत साहित्यातील माझी ओढ वाढत गेली.’

सातत्याने संतांच्या कार्यक्रमांचे निवेदन प्राची करू लागल्या. त्यामुळे संत साहित्याबद्दल त्यांना इतकी गोडी निर्माण झाली की त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींवर सखोल अभ्यास करायला घेतला. ज्ञानेश्वरीतील ओव्या उलगडणे, अमृतानुभव काव्यात रूपांतरित करणे असं करता करता स्त्री संत साहित्याचा जास्त अभ्यास करणं आवश्यक असल्याचं त्यांना जाणवलं. शुभस्य शीघ्रम करीत सर्वप्रथम त्यांनी मुक्ताईवर अभ्यास केला आणि ‘मी मुक्त, मुक्त, मुक्ताई’ हा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रमही करण्यास सुरुवात केली. याविषयी त्या म्हणाल्या, “खरं तर ज्ञानेश्वर म्हटलं की मुक्ताई आल्याच, पण मुक्ताई म्हटलं की ज्ञानेश्वर आले, हे अनेकांना माहीत नाही. ‘शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दूर त्याला’ सांगणाऱ्या मुक्ताईने काय काय केलं, तिने कसं घर सांभाळलं, तिचे चमत्कार याविषयी अभ्यास करतानाच इतर दहा-बारा स्त्री संतांचाही माझा अभ्यास होत गेला. यानंतर प्राची यांची सातत्याने स्त्री संतांवरची कीर्तने-प्रवचने चालूच होती. गेल्या वर्षी करोनापश्चात जेव्हा पंढरपूरची वारी गेली तेव्हा प्राची यांना या वारीसाठी काहीतरी नवीन सुचविण्याची विचारणा शासनाने केली. कीर्तन-प्रवचनात बहुतेकांना स्वारस्य नसतंच, शिवाय तरुण मुलंमुली तर कीर्तन-प्रवचन ऐकायला येतच नाहीत, हे ध्यानात घेऊन कीर्तन-प्रवचनाऐवजी छोट्या नाटुकल्या करून ‘संतांचे महात्म्य’ तरुण पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकतो, असे प्राची यांनी सुचविले. याप्रमाणे स्त्री-पुरुष संतांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना प्रतिबिंबित करणाऱ्या १२ ते १५ मिनिटांच्या छोट्या-छोट्या ११ एकांकिका त्यांनी शासनाला लिहून दिल्या. पृथ्वी थिएटरधील तीसेक उत्कृष्ट कलाकारांना घेऊन संपूर्ण १७ दिवस या एकांकिकांचे वारीत सादरीकरण करण्यात आले. कित्येकांना माहिती नसलेल्या जनाबाई, प्रेमाबाई, बयाबाई, भागूबाई, विठाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गोदाबाई इ. स्त्री संतांची निर्व्याज भक्ती, त्यांच्या आयुष्यातील चमत्कार या प्रयोगांमुळे अनेकांपर्यंत पोहोचले. यादरम्यान शासनातर्फे त्यांनी खास संत साहित्यावर चार कार्यक्रमही केले. यावर्षी प्रजासत्ताक
दिनानिमित्त प्रत्येक राज्याला राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आपली संस्कृती-परंपरा जतन करणारी कलाकृती दाखविण्याची संधी देण्यात आली होती. यात महाराष्ट्र शासनाने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्री शक्ती’ ही संकल्पना घेऊन चित्ररथ तयार केला आणि यावर गाणी लिहिण्याची मोलाची जबाबदारी प्राची यांच्यावर सोपविली. चित्ररथासाठी प्राची यांनी लिहिलेल्या गाण्याची निवड झाली. याशिवाय महाराष्ट्राची ‘वाद्यसंस्कृती’ दाखविणाऱ्या चित्ररथासाठीही त्यांनी गाणी दिली. आपल्याकडील लोप पावलेल्या जवळजवळ ९० वाद्यांना त्यांनी या गाण्यातून पुनरुज्जीवित केलं. कर्तव्यपथावर पथसंचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशभरातून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. याविषयी प्राची म्हणाल्या, ‘२८ जानेवारीला ही आनंदाची बातमी मला समजली. ‘ट्विटर’वर तर अनेक नामवंतांनी माझी गीतरचना ठेवली होती. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पत्रिकेत माझं नाव गीतकार म्हणून झळकलं. हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता.’ सध्या प्राची यांचे महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर असे जवळपास ५०० कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम झाले आहेत. तसेच २०१८पासून त्या ‘समग्र गडकरी दर्शन’ हा राम गणेश गडकरी यांच्यावरील कार्यक्रम करीत असून त्याचे आतापर्यंत १०० प्रयोग त्यांनी केलेत.

आजपावेतो प्राची यांची अनेक विषयांवर ३५० पेक्षा अधिक व्याख्यानं झाली आहेत, तर ४७ स्त्री संत साहित्यावर त्यांनी लेख लिहिले आहेत. ‘अंतिम प्रवास, मुक्ता सांगे जनाई, वशिष्ठाये विशिष्ट कैकयी, गणगवळण’ हे चार दिर्घांक, ९ एकांकिका, ५६ कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘कुणी नामदेव घ्या, कुणी जनाबाई घ्या’ या दोन अंकी नाटकाचे लेखन त्यांनी केले आहे तर ‘तीन त्रिक तीस’ आणि ‘कलांगण’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. याव्यतिरिक्त कथाकथन, व्यावसायिक नाटकात त्या काम करतात. ‘तुझं आहे तुझं पाशी’चे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. आकाशवाणीवर ‘ऐसी अक्षरे रसिके’ सदराचे अनेक भाग त्यांनी केले आहेत.

प्राची महाविद्यालयातून ‘स्त्री संत साहित्यावर आणि उपनिषदांवर’ अतिथी व्याख्याता म्हणून व्याख्याने देतात. सध्या ‘आरंभ’ आणि ‘शब्दांच्या पलिकडे’ ह्या दोन वाद्यवृदांचे सुत्रसंचालनही त्या करीत आहेत. ‘ती मी आणि स्त्री…’ हा स्त्री स्वभावातील गुणदोष आणि वैशिष्ट्ये सांगणारा तसेच स्त्रीचे सर्व पैलू उदाहरणासाहित उलगडून दाखविणारा त्यांचा कार्यक्रम सध्या खूप गाजत आहे. अवतरण केंद्राचा ‘कुसुमाग्रज पुरस्कार’, ‘बालकवी पुरस्कार’ हे उल्लेखनीय पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. संतसाहित्याने आपल्याला ७००० म्हणी तसेच ५००० सुभाषिते दिली आहेत. उपनिषदं म्हणजे काय? मुक्ताई, जनाबाई, बयाबाई या ७०० वर्षापूर्वीच्या स्त्रिया कुठून शिकल्या? संत बयाबाईने तर शेरोशायरीतून देव म्हणजे काय हे हिंदी भाषेत लोकांना समजावून सांगितलं. हे सगळं अलौकीक ज्ञान मला पुढे आणायचं होतं. आताच्या पिढीला संतसाहित्याची गोडी लावण्याकरिता तसेच समाजप्रबोधन होण्याकरिता गोष्टीरूपातील ही प्रवचने आवश्यक आहेत. मी केलेल्या उपनिषदांचं कीर्तन किंवा प्रवचन जेव्हा तरुण मुलंमुली आवडीने ऐकतात. तेव्हा मी जिंकलेय असं मला वाटतं.” असं समाधान त्यांनी व्यक्त केलं.

– अनघा सावंत

anaghasawant30@rediffmail.com