सिनेरंग : राकेशकुमार- यशस्वी दिग्दर्शक, दुर्दैवी शेवट

काळ काही जणांबाबत कसा निष्ठूर वागतो बघा, खून पसिना (१९७६), मि. नटवरलाल (१९७९), याराना (१९८०), स्वतंत्रपणे दिग्दर्शनात पाऊल टाकल्यावर पहिले तीनही चित्रपट सुपर हिट. तिन्हीचा नायक अमिताभ बच्चन. अशा यशस्वी दिग्दर्शकाच्या निधनाचे वृत्त चित्रपटसृष्टी आणि मीडियाला दोन दिवसांनी समजावे? तेही संबंधिताच्या नातेवाईकाने श्रध्दांजली सभेचे आयोजन केल्यावर?

    दिग्दर्शक राकेशकुमारच्या बाबतीत तसेच घडले. १० नोव्हेंबर रोजी त्याचे वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी श्रध्दांजलीचे आयोजन केले तेव्हा समजले, राकेशकुमारचे निधन झाले आणि माझे मन सत्तरच्या दशकात गेले. अमिताभ बच्चनचा गल्लापेटीवर विलक्षण दबदबा होता.

    प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा, रमेश सिप्पी, ह्रषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकांच्या चित्रपटात अमिताभ सातत्याने एकामागोमाग एक चित्रपटात भूमिका साकारत असतानाच अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्याने भूमिका स्वीकारली तरी ती बातमी होती. अशातच प्रकाश मेहरा यांनी आपल्या प्रॉडक्सन्सच्या ‘खून पसिना’च्या दिग्दर्शनाची संधी आपला प्रमुख सहाय्यक दिग्दर्शकाला द्यायचे ठरवले आणि राकेशकुमारला दिग्दर्शन पदार्पणाची संधी मिळाली.

    तोपर्यंतचा राकेशकुमारचा प्रवास सतत नवीन गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा होता. चांद परदेसी, के. बी. लाल या दिग्दर्शकांकडे पाचवा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने कारकिर्द सुरु केली. हे प्रामुख्याने स्टंटपट होते. तद्दन मारधाडपट. ज्यात दिग्दर्शकापेक्षा फायटरला जास्त संधी असते. अशातही राकेशकुमारला स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची मिळालेली संधी त्याने अशा पठडीतील चित्रपट नको म्हणून टाळली आणि प्रकाश मेहरांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली वाटचाल सुरू केली आणि एकेक पायरी चढत प्रकाश मेहरांचा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून स्थान प्राप्त केले.

    प्रकाश मेहरांकडे राकेशकुमारने समाधी, जंजीर, हाथ की सफाई, हेरा फेरी, आखरी डाकू, खलिफा या चित्रपटांसाठी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत मजल मारताना त्याचे अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांच्याशी निर्माण झालेले उत्तम संबंध ‘खून पसिना’च्या वेळी उपयोगी पडले. रेखा नायिका होती. प्रकाश मेहरांकडे सहाय्यक दिग्दर्शकांना बरेच स्वातंत्र्य मिळे, आवश्यकता होती सतत या दृश्य माध्यमाबाबत नवीन गोष्टी शिकण्याची आणि योग्य संधी मिळण्याची.

    राकेशकुमारला ते साध्य झाले आणि ‘खून पसिना’च्या यशानंतर राकेशकुमारला एकेक संधी मिळत जाताना अमिताभ बच्चन नावाचा हुकमी एक्का जोडीला होता. निर्मात्यांना आणखीन काय हवे होते? निर्माते टीटो आणि टोनी यांच्या ‘मि. नटवरलाल’ ( अमिताभ, रेखा, अमजद खान) व ‘दो और दो पांच’, (शशी कपूर, अमिताभ, हेमा मालिनी, परवीन बॉबी), नाडियादवाला दिग्दर्शित ‘याराना’ (अमिताभ, नीतू सिंग, अमजद खान) अशी राकेशकुमारची घौडदौड सुरु झाली. मि. नटवरलालच्या आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळी अमिताभ व रेखा यांचा गहिरा रिश्ता गुंतला, गुंफला गेला.

    परदेसीया… सच है पिया सब कहते है मैने दिल तुझको दिया हा गीत संगीत व नृत्याचा मामला याच चित्रपटातला. याच चित्रपटासाठी अमिताभ मेरे पास आओ मेरे मेरे दोस्तो…. गायला. आणि त्याच्या फॅन्समध्ये आता बालप्रेक्षकांची वाढ झाली. आनंद बक्षी यांचे हे गीत राजेश रोशनने संगीतबद्ध केले.

    ‘याराना’च्या वेळी अमिताभ विलक्षण बिझी होता. त्याची एकेक तारीख मिळणे कठीण होते. राकेशकुमारने एक मार्ग काढला. अमिताभने आपल्या अन्य चित्रपटांच्या सेटवर जाण्या-येण्यापूर्वी काही दिवस एक-दोन तास दिले तरी बरेच काम होईल. अमिताभ वक्तशीर असल्याने ते शक्य होत गेले. अशातच नीतू सिंगचे लग्न झाल्याने पुन्हा अडचण आलीच. राकेशकुमारने रेखाकडून नीतू सिंगचे डबिंग करुन घेतले. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ म्हणायला हवे.

    राकेशकुमारच्या या यशस्वी घौडदौडीत अनपेक्षित अडथळे आले. अमिताभ व पद्मिनी कोल्हापूरे अशी जोडी जमवून त्याने ‘चार्ली’ या चित्रपटाची घोषणा केली. नेमक्या त्याच सुमारास मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’च्या सेटवर अमिताभच्या पोटात पुनीत इस्सारचा ठोसा बसला आणि त्याचे आजारपण ओढवल्याने ‘चार्ली’ मागे पडला. पुढे तो बनलाच नाही.

    राकेशकुमारने संजय दत्त व रति अग्निहोत्री जोडीच्या ‘जॉनी’ या चित्रपटाची घोषणा करताच विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’चे निर्माते व वितरक गुलशन रॉय यांनी या नावालाच हरकत घेतली. म्हणून ते ‘जॉनी आय लव्ह यू’ करण्यात आले. दुर्दैव एवढ्यावरच थांबले नाही. संजय दत्त त्या काळात लहरी, वात्रट, अतरंगी म्हणून ओळखला जाई. याचा चित्रपटाला फटका बसला आणि अर्थातच फ्लॉप झाला.

    कुमार गौरव व रति अग्निहोत्री जोडीच्या ‘दिल तुझको दिया’वर राकेशकुमारने लक्ष केले. पण कुमार गौरवचा ‘पडता काळ’ सुरु झाल्याने पिक्चरला वितरकच मिळेना. समाधान इतकेच की, वादा ना छोड हे गाणे लोकप्रिय ठरले. ते चित्रपटाचे अपयश रोखू शकले नाही. राकेशकुमारने ‘कमांडर’, ‘कौन जिता कौन हारा’, ‘सूर्यवंशी’ अशी वाटचाल केली. आता तो दिग्दर्शनाच्या जोडीला निर्माताही झाला.

    अमिताभने ‘कौन जिता….’मध्ये आपल्या या व्यावसायिक मैत्रीला जागत एक धमाकेदार नृत्य केले. विशेष म्हणजे, बोफोर्स प्रकरणात अमिताभला खलनायक ठरवत टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशाह’ (१९८८) च्या प्रदर्शनास काही राजकीय पक्ष व संघटनांचा तीव्र विरोध होत असतानाच एक टेस्ट म्हणून ‘शहेनशाह’च्या एक आठवड्यापूर्वी ‘कौन जिता…’ रिलीज केला. काही ठिकाणी आंदोलकांनी अमिताभवरचा राग ‘कौन जिता…’च्या पोस्टरवर डांबर फासून काढल्याचे इंपिरियल थिएटरवर पहायला मिळाले.

    राकेशकुमारची घौडदौड अशा चढउताराने घडली. कालांतराने निर्मात्यांची पुढची पिढी आली आणि राकेशकुमार मागे पडत गेला. हे काहीसे स्वाभाविक असतेच. खून पसिना, मि. नटवरलाल, याराना वगैरे चित्रपट उपग्रह वाहिन्यांवर मोठ्याच प्रमाणावर पाहिले जाऊ लागले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या चित्रपटांचे गीत संगीत व नृत्य लोकप्रिय असल्याने राकेशकुमारला चित्रपट संगीताचा उत्तम कान, नजर असल्याचे अधोरेखित होत राहिले.

    चित्रपटसृष्टीतील भटकंतीत राकेशकुमारशी माझा परिचय झाला. तेव्हाच्या गप्पांतून माझ्या लक्षात आले, त्याला विनोद खन्नाबद्दल विशेष आस्था होती. पण त्याच्यासोबत अधिक संधी मिळाली नसल्याची त्याला खंत होती. राकेशकुमार त्याच्या सुपरहिट चित्रपटांसाठी कायमच लक्षात राहील. अमिताभची मर्जी संपादन करण्यात यश लाभणे हीदेखील एक उल्लेखनीय गोष्ट आहे. अशा दिग्दर्शकाच्या कर्तबगारीला ही श्रध्दांजली.

    दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com