रश्मिका मंदान्ना : हेमा, रेखा, श्रीदेवीची परंपरा

दक्षिण भारतीय अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्याच्या यशस्वी परंपरेत रश्मिका मंदान्नाचं नाव घ्यायची वेळ तिनेच आणली आहे बघा...

  वैजयंतीमाला, हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा या प्रत्येकीनं आपलं सौंदर्य, नृत्य, अभिनय आणि लोकप्रियता या केमिस्ट्रीच्या जोरावर आपली स्पेस, ‘नंबर वन’चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. त्याच प्रगती पुस्तकात आता रश्मिका मंदान्ना हे नाव घ्यायचं का? आता तुमच्यातील काही मंडळी म्हणतील, ही तर तमिळ, तेलगू, कन्नड चित्रपटाची अभिनेत्री… हिंदीमध्ये तिने असं काय काम केले आपण सांगायला गेलो तर “गुड बाय”, “मिशन मंजू” या चित्रपटांमध्ये आणि सलमान खानसोबत एका जाहिरातीत असं तिने काम केले; आता “एनिमल” या चित्रपटांमध्ये ती रणबीर कपूरची ती नायिका आहे. इतकंच नव्हे तर त्या चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासुद्धा साउथ इंडियन. तिचं हिंदीतले प्रगती पुस्तक आत्ता आत्ता कुठे चांगल्या गुणांचं ठरत असताना तिला लगेच आपण हिंदी चित्रपटसृष्टीवर एकेकाळी राज्य करणाऱ्या वैजयंतीमाला, हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी जयाप्रदा या साउथ इंडियन अर्थात दक्षिण भारतीय अभिनेत्रींच्या वाटचालीस ती ती पुढे नेते असं म्हणायचं का? तर याचं उत्तर “होय” आहे, होय.

  वैजयंतीमाला साठच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपची त्रिमूर्ती दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या तिघांचीही एकाच वेळी नायिका होती. या तिघांसोबतची रुपेरी पडद्यावरील तिची प्रणय दृश्य आजही तजेलदार वाटतात. राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, सुनील दत्त, धर्मेंद्र इत्यादींचीही ती नायिका झाली. त्या काळात नंबर वनची अभिनेत्री ठरवण्याचा फंडा होता, टाॅपच्या हीरोंसोबत नायिका साकारण्यात जास्त यशस्वी कोण ठरतयं. तर वैजयंतीमाला. काळाला सुसंगत होता हो तो फंडा.

  हेमा मालिनीने ‘सपनो का सौदागर’पासून रुपेरी पडद्यावर पाऊल टाकताच ती रसिकांच्या स्वप्नांची राणी झाली. तिला पहिल्याच चित्रपटामध्ये “ड्रीम गर्ल” अशी उपाधी दिली आणि त्या ड्रीम गर्लने सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. धर्मेंद्रला आपलसं केलं. रेखानेही आपला अभिनय, सौंदर्य, गॉसिप्स आणि लोकप्रियता या गुणांवर प्रचंड लोकप्रियता संपादली. अभिनय, लोकप्रियता यातही ‘लंबू’ असलेल्या अमिताभ बच्चनशी तिचे खास नाते निर्माण झाले. टाॅपवर राहताना असेही फंडे सपोर्ट सिस्टीम ठरतात.

  फोटोसेशनच्या बाबतीतही रेखाच नंबर वन. रेखाचा एकूणच उत्साह फारच दांडगा. आजही रेखा कोणत्याही इव्हेंटला आली रे आली की, आजच्या पिढीचे तमाम फोटोग्राफर, व्हिडिओवाले धडाधड फ्लॅश उडवतात. लोकप्रियचे गणित म्हणजे दुसरं काय असतं? हेच तर असते.

  श्रीदेवीने ‘हिम्मतवाला’ (१९८३)त जितेंद्रसोबत ताथय्या ताथय्या ओ गाण्यात अशा पद्धतीने नृत्य केलं आणि रुपेरी पडदा व्यापून टाकला. तिला बघता बघता ती स्टार झाली. ती ‘हिम्मतवाली’ म्हणून ओळखली जाऊ लागली आणि श्रीदेवीचे युग आलं. इन्किलाब, मिस्टर इंडिया, आखरी रास्ता, नगीना, रुप की रानी चोरों का राजा, नजराना अशा चित्रपटांमध्ये ती तर त्या चित्रपटाच्या नायकांच्या वरचढ ठरल्याचं दिसलं. एक अतिशय लक्षवेधक, बहुचर्चित उदाहरण द्यायचं झालं तर पंकज पराशर दिग्दर्शित “चालबाज” या चित्रपटातील श्रीदेवीची दुहेरी भूमिका. चित्रपटांमध्ये सनी देवल व रजनीकांत असे दोन नायक होते. परंतु संपूर्ण सिनेमा देवीच्या डबलरोलने व्यापून टाकला. एक डॅशिंग आणि एक सरळसाधी. पिक्चर रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सीता और गीता’ची रिमेक. त्यात हेमा मालिनीची दुहेरी भूमिका. तरी “चालबाज”ला नवा चेहरा देण्यात श्रीदेवी यशस्वी ठरली. यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ व ‘लम्हे’ श्रीच्या करियरमधील हायपाॅईंट. सर्वोच्च बिंदू.

  जयाप्रदानेही आपल्या सौंदर्य अभिनय आणि नृत्य या गुणांवर हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांनी एकदा जयाप्रदाला प्रमाणपत्र देताना असं म्हटलं की, भारतीय पारंपरिक सौंदर्याचा प्रतीक म्हणून आपण जयाप्रदाचे नाव घेऊ शकतो.

  वैजयंतीमाला ते जयाप्रदा या साऊथच्या तडकामध्ये एक गोष्ट कॉमन काॅमन. पाचही जणींनी भारतीय सौंदर्याचे प्रतीक साडीला आवर्जून महत्व दिलेय. वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांमध्ये या अभिनेत्रींनी सातत्याने रुपेरी पडल्यावर दर्शन घडवलं. फोटोसेशनमध्ये सुद्धा त्या साडीमध्ये छान दिसल्या. महत्त्वाच्या इव्हेंट्समध्ये त्या कायमच साडीत आल्या. मग ती साडी कांजीवरम असेल किंवा अन्य कुठल्याही पद्धतीची असेल.

  या परंपरेत भारती, मीनाक्षी शेषाद्री, भानुप्रिया, शांतीप्रिया, जयासुधा अशा आणखीन काही साऊथ इंडियन अभिनेत्रीची नाव देता येतील.
  आजच्या गतिमान युगात रश्मिका मंदान्नाने आपली ओळख निर्माण केलीय. आता काळ बदललाय. चित्रपटाच्या यशापयशसह आणखीन दोन गोष्टी महत्वाच्या. एक म्हणजे दक्षिणेकडचे चित्रपट तिकडच्या भाषेसोबतच हिंदीमध्ये डब येत आहेत. तिकडचे स्टार त्या पिक्चरसह हिंदी पिक्चर्सच्या रसिकांना माहित पडताहेत. जग जवळ आलय म्हणतात ते असेही आहे. ‘पुष्पा द राईज’ने रश्मिकाला आपल्या आणखीन जवळ आणले. (आता याचाही सिक्वेल येतोय.) श्रीवल्ली आणि सामे सामे या दोन गीत संगीत- नृत्यात रश्मिका छा गयी. गाणी सुपर हिट म्हणजे कलाकार सतत नजरेसमोर राहतो. आजच्या डिजिटल पिढीचा दुसरा फंडा सोशल मिडिया. गुगलवर रश्मिका मंदान्ना सर्च एकदम भारी आहे. सोशल मीडियात तिच्या रिल, फोटो, मुलाखती यांचे सातत्य केवढे तरी. आज चित्रपट पाहण्यास भाषेची समस्या नसते. सबटायटल्स मोठाच फंडा. त्यामुळेच रश्मिकाचे किरीक पार्टी, अंजनीपुत्र, गीत गोविंदम हे रश्मिकाचे साऊथ मुव्हीज हिंदी चित्रपटाचा प्रेक्षकही आवडीने बघतोय. आज ती मुंबई असेल, हैदराबाद असेल, चेन्नई असेल कुठेही जरी गेली तरी मीडियाचा ससेमेरा सतत तिच्यामागे असतोच असतो. मुंबई विमानतळावर ती किंवा गेली तरी खाड खाड फ्लॅशने ती उजळते. आज ज्यांना पापाराजी म्हटले जाते त्या फोटोग्राफर्सची सर्वाधिक पसंती रश्मिकाला आहे. तिचे फॅन फॉलॉवर्स खूप आहेत. तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर लिहिलं जातय, वाचलं जातेय, पाहिलं जातेय. तिची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जणू न्यूज होतेय. तिची आकर्षक पर्सनॅलिटी, तिचं रुपडं, तिचं नृत्य, तिचा अभिनय यात ती लक्षवेधक ठरतेय. खरं तर तिच्या अभिनयाबद्दल बोलावं/ सांगावं अशी संधी तिला अजून फारशी मिळालेली नाहीये. परंतु दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये ज्या पद्धतीचे नायिकेचे संकोच नसलेले जे व्यक्तिमत्व लागतं त्यात रश्मीकामध्ये नक्कीच आहे, त्यामुळे बदलत्या काळानुसार, सोशल मीडियाच्या युगानुसार आणि ग्लोबल युगातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदानाचंच नाव आवर्जून घेता येईल. म्हणून मी म्हणतो रेखा, हेमा, श्रीदेवी यांच्या वाटचालीला पुढे नेणारी अभिनेत्री आहे रश्मीका मंदान्ना. दक्षिणेकडील काजल अग्रवाल, अनुष्का शेट्टी, ऋत प्रभू, कीर्ती सुरेश, नयनतारा, सई पल्लवी, पूजा हेगडे इत्यादी अभिनेत्री दक्षिणेबरोबर हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा भूमिका साकारताहेत. स्पर्धा तगडी आहे. साउथच्या सिनेमांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आक्रमण केलेले आहे; त्या आक्रमणातला एक जबरदस्त फंडा रश्मिका मंदान्ना. आजची ती टॉपचे अभिनेत्री आहे एवढं नक्कीच. प्रियांका चोप्रा, कैतरिना कैफ, दीपिका पदुकोण, कंगना रानावत यांच्या तुलनेत रश्मीकाला मीडियातून सतत पुढे चाल मिळतेय हे तरी तुम्ही नक्कीच मान्य कराल ना?

  बदलत्या काळासोबत यश/ पोझिशन यांच्या व्याख्या बदलल्यात आणि त्यात रश्मिका मंदान्ना एकदम सही है भिडू. एक अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. बोलका चेहरा आणि तिला यशाची घाई नाही. तर मग आणखीन काय हवे?

  – दिलीप ठाकूर