विद्यार्थ्याच्या क्षमतेची ओळख

    प्रत्येक विद्यार्थी आणि पालकास यशाच्या मार्गाची आस लागलेली असते. हा मार्ग कोणत्याही दिशेला जाणारा असू शकतो. ही दिशा कोणती राहू शकेल, उत्तरेकडे जाणारी की, दक्षिणेकडे जाणारी की, पूर्वेकडे की, पश्चिमेकडे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तो घेण्यासाठी डोळे आणि कान उघडे ठेवणे गरजेचे आहे. हे काम दहावी आणि बारावीपासून करावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जसा आपल्या क्षमतांचा परिचय होणे आवश्यक ठरते. तसेच, पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमतेबद्दल अनावश्यक समजूत करुन घेतलेली नसावी. याचा अर्थ असा की विद्यार्थ्याला गणित जमत नसल्याचे आठवीपासून दहावीपर्यंतच्या गुणांवरुन दिसत असेल व गणिताचे नाव काढताच विद्यार्थी दचकत असेल तर अभियांत्रिकी शाखेकडे पाठवण्याचा अट्टाहास करणे म्हणजे स्वत:हून आगित उडी घेण्यासारखे आहे. आयआयटीच्या परीक्षेची काठिण्यपातळी प्रचंड मोठी असल्याचे ठाऊक असूनही किंवा ऐकूनही किंवा दरवर्षीच्या निकालावरुन कळत असूनही आयआयटी शिकवणी वर्गाला टाकणे म्हणजे स्वत:ला टकमक टोकावरुन दरित उडी मारण्यासाठी नेण्यासारखे ठरते.
    आयआयटी कोचिंगसाठी आठवीपासूनच लाख- लाख रुपये खर्च करण्याची ओढूनताणून आणलेली क्षमता ही मुलांसाठी काहीही करण्याची आपली पवित्र कर्तव्य भावना जरी असली, तरी ती बिनकामाची ठरते हे लक्षात ठेवायला हवे. प्रयत्नांती काहीही शक्य असल्याचे थोर नेपोलियन महाराजांनी सांगून ठेवले असले तरी त्यांना हे ठाऊक नव्हते की आयआयटीच्या सर्व कॅम्पसमध्ये १३ हजारापेक्षा अधिक जागा नाहीत. त्यासाठी ७ ते ८ लाखाच्या आसपास विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसतात. तेव्हा आयआयटीचे स्वप्न बघण्याच्या पालकांच्या अट्टाहासामुळे कोचिंग क्लास (महा) उद्योगाचे अधिकाधिक भले होत चालले आहे. ते इतके की, अशा काही आयआयटीच्या कोचिंग क्लासेसची वार्षिक उलाढाल काहीशे कोटिंच्या रुपयात पोहचली आहे. अत्यंत आकर्षक अशा जाहिरातींनी हे कोचिंग क्लासेस पालकांना भूलवत असतात. या जाळ्यात विद्यार्थी अलगद आठवीतच सापडतो. आठवी ते बारावी या पाच वर्षाच्या कालावधीत घोकंपट्टी, चाळणी परीक्षांचा मारा, ट्युटोरिअल या गुंगीत ढकलला जातो. परिणाम, ना त्याची आयआयटी प्रवेश परीक्षेची धड तयारी होते, ना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेची तयारी होते.
    कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यास जेव्हा आयआयटी प्रवेश परीक्षेच्या काठिण्य पातळीची प्रत्यक्ष कल्पना येऊ लागते, तेव्हा त्याचे लक्ष विचलित व्हायला लागते. आपणास जमू शकते(च) ते आपणास आता जमू(च) शकत नाही, असा त्याचा प्रवास सुरु होतो. पण घरचा दबाव आणि शिकवणी वर्गाच्या संचालकांच्या वास्तवापासून दूर जाणाऱ्या मोहक आणि भ्रामक शब्दांमधे अडकून असा विद्यार्थी तयारीचा सोहळा पार पाडत राहतो. मात्र या सोहळ्याला अप्रामाणिकतेची जोड असते. याची जाणीव होताच हळूहळू विद्यार्थी नैराश्याकडे ढकलला जातो. हे त्याला कळलेले असते. शिकवणी वर्ग संचालकासही हळूहळू कळायला लागते. पण या शांततेचा भंग करण्यात त्याला रस नसतो. कारण तो या विद्यार्थ्याकडे फक्त ग्राहक म्हणून बघत असतो. या ग्राहकास त्याला आपल्या दुकानातून जाऊ द्यायचे नसते. त्यामुळे खरे काय ते, पालकासमोर येऊ दिले जात नाही. आयआयटी कोचिंग उद्योगाचे वास्तव आहे.
    आठवी ते बारावीपर्यंतच्या आयआयटी कोचिंगच्या शिकवणी प्रवासामुळे विद्यार्थ्यांना मोठा शिण येऊ शकतो. हे ध्यानात घ्यायला हवे. हे शिणत्व त्याच्या मेंदुला थकवण्यास कारणीभूत ठरु शकते. परिणामी इतर अभ्यासावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी हा कसोटीचा काळ असतो. हे सर्व टाळता येणे शक्य आहे. विद्यार्थ्याची गणित आणि भौतिकशास्त्रातील गती बघून आणि आयआयटीमध्ये अवघ्या दहा हजारांना प्रवेश मिळतो हे लक्षात ठेऊन आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गात टाकायला हवे. म्युच्युअल फंडाची सर्व घराणी आताशा स्पष्टपणे सांगायला लागली आहेत की, यापूर्वी एखाद्या फंडाने चांगला नफा मिळवून दिला म्हणून पुढेही देईल याची खात्री देता येत नाही. तसेच, या शिकवणी वर्गांचे आहे. शेजारच्याच्या मुलाने एखाद्या विशिष्ट शिकवणी वर्गामुळे आयआयटी चाळणी परीक्षेत चांगली कामगिरी केली म्हणून तुमचा मुलगाही करेल याची हमी कोणतेच शिकवणी वर्ग घेत नाही. देत नाही.
    सुसंगत आणि स्पर्धात्मक आठवी ते बारावीच्या आयआयटी कोचिंगचा प्रवास शक्यतो टाळणे श्रेयस्कर ठरु शकते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक व आजच्या काळाशी सुसंगत आणि स्पर्धात्मक असा आहे. या अभ्यासक्रमाचा मन:पूर्वक अभ्यास – परिशिलन – सराव, या त्रिसूत्रानिशी केल्यास कला – वाणिज्य आणि विज्ञानशाखेत बारावीमध्ये चांगले यश मिळू शकते. शिवाय, देशातील उत्तमोत्तम महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांमध्येही चांगली कामगिरी करु होऊ शकते.
    इतर संस्थाही महत्वाच्या
    आयआयटीमधून अभियांत्रिकीचा अभ्यास केल्यावर निश्चितपणे उत्कृष्ट संधी मिळतात. याचा अर्थ इतर दर्जेदार शासकीय आणि खासगी संस्थांमधून मिळत नाही असा होत नाही. या संस्थांनी गेल्या काही वर्षात स्वत:मध्ये आमुलाग्र बदल केला आहे. चांगल्या प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. प्रशिक्षित प्राध्यापकांना नेमले आहे. बऱ्याच खासगी संस्थांनी कालसुसंगत म्हणजे आजच्या घडीला आवश्यक असणारे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. काही संस्थांनी परदेशातील नामवंत संस्थांशी या बाबत सामंजस्य करार केले आहेत. इंटर्नशिपच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या संस्थांमार्फत शंभर टक्के प्रयत्न केले जातात. प्लेसमेंटसेलद्वारे नोकरी मिळवून दिली जाते. या संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा लक्षात घेऊन नामवंत कंपन्या या संस्थांमध्ये प्लेसमेंटसाठी जात असतात.
    आपल्या राज्यातील बहुतांश शासकीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळणेसुध्दा प्रगतीच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरु शकते. पुणे – मुंबई – ठाणे – नाशिक -नागपुरातील काही खाजगी अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास रोजगारक्षम अभियंता होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. ते सुध्दा आयआयटी प्रवेश परीक्षा कोचिंग क्लासेसच्या शिकवणीसाठी खर्च केलेल्या एक चतुर्थांश रक्कमेमध्ये. या खाजगी महाविद्यालयांमधील विविध सवंर्गात (अनुसूचित जाती, जमाती, नॉनक्रिमिलेअर ओबीसी, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग, दिव्यांग) अशा संवर्गासाठी  असलेल्या राखीव जागा/प्रवेश शुल्कात शासकीय नियमानुसार सूट किंवा सवलत, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती यांचा लाभ मिळू शकतो.
    आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ही मेन आणि ॲडव्हान्स्ड अशा दोन टप्प्यात घेतली जाते. मेन परीक्षेतून साधारणत: अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांची, ॲडव्हॉन्स्ड परीक्षेसाठी निवड केली जाते. मेन परीक्षेतील गुण नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, देशातील काही नामवंत खाजगी अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. हे गुण मिळवण्यासाठी सध्याच्या बारावी बोर्डाचा अभ्यासक्रम  उपयुक्त ठरणारा आहे. त्यासाठी मुलाला आठवीपासूनच आयआयटी प्रवेश परीक्षा कोचिंग क्लासेसला टाकण्याची गरज नाही. टाकायचेच असल्यास अकरावीमध्ये याचा विचार करायला हवा. म्हणजे दहावीपर्यंत विद्यार्थी शांतचित्ताने व एकाग्रतेने इतर विषयांचे ज्ञान ग्रहन करु शकेल आणि अकरावीनंतर जेईई (मेन) परीक्षेवर लक्ष केंद्रित करु शकेल. यामुळे त्याच्यावर ताण राहणार नाही आणि पालकांवर अधिक आर्थिक भार पडणार नाही.
    – सुरेश वांदिले