Rohit Sharma Profile
Rohit Sharma Profile

आपण नेहमी आयपीएलच्या बाबतीत म्हणतो की, 'क्लब ओव्हर कंट्री' यावेळी रोहितने विश्वचषकातील तणावानंतर आपल्या कुटुंबासोबत इंग्लंडला सुट्‌टीवर जाणे पसंत केले. भारतीय कप्तानाच्या या कृतीला 'फॅमिली ओव्हर कंट्री' असे म्हणायचे का?

  भारतीय क्रिकेट हे नेहमी आश्चर्याने ओसंडून वहात असते. कधी खेळाडू, कधी पदाधिकारी तर कधी निवड समिती आश्चर्याचे धक्के देत असते. यावेळी हा बहुमान भारतीय क्रिकेट संघाच्या विद्यमान कप्तान रोहित शर्माने पटकाविला आहे. सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये म्हणजे ट्वेन्टी-२० आणि ५०-५० षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास फारसा रस न दाखविणारा रोहित यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील या ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटपासून दूर राहीला आहे. आपण नेहमी आयपीएलच्या बाबतीत म्हणतो की, ‘क्लब ओव्हर कंट्री’ यावेळी रोहितने विश्वचषकातील तणावानंतर आपल्या कुटुंबासोबत इंग्लंडला सुट्‌टीवर जाणे पसंत केले. भारतीय कप्तानाच्या या कृतीला ‘फॅमिली ओव्हर कंट्री’ असे म्हणायचे का?

  मला चांगलंच आठवतंय, सचिन तेंडुलकर १९९९चा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळत असताना, त्याच्या वडिलांचे रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले होते. झिम्बाब्वेविरुद्ध सामना सोडून सचिन वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात परतला होता. त्यावेळी त्या दु:खद प्रसंगातही, सचिनला त्याच्या आईने विचारले होते, देशासाठी खेळायला गेला होतास ना? इथे काय करतोस? त्या माऊलीने त्या दु:खद प्रसंगातही सचिनला त्याच्या देशकर्तव्याची जाणीव करून दिली होती. सचिन तात्काळ त्यानंतरच्या सामन्यात परतला, त्याने शतक झळकविले.

  सचिन आणि त्याच्यावरील संस्कारांपासून सध्याचे क्रिकेटपटू किती वेगळे आहेत याची पदोपदी जाणीव होते. पत्नीच्या पहिलाय बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारताचे नेतृत्व सोडून विराट कोहली परतला होता. पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतरही अजिंक्य रहाणेने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये चक्क मालिकेत हरविले होते. फक्त कोहलीच नव्हे तर अन्य प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत रहाणेने कप्तान म्हणून किल्ला लढविला होता.
  बुडणाऱ्या बोटीचा कप्तान सर्वात शेवटी बाहेर पडतो असा संकेत आहे. विश्वचषकात सर्वच खेळाडू खेळले होते. प्रत्येकाने असा विचार केला असता तर भारताचा संघच जाऊ शकणार नाही.

  रोहित शर्मा विद्यमान कप्तान आहे. पुढील हंगामाची किंवा विश्वचषक(ट्वेन्टी-२०) स्पर्धेसाठीच्या संघबांधणीसाठी खरं तर त्याने पुढाकार घ्यायला हवा. त्याऐवजी त्यानेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना विचारल्याचे कळते की, ‘माझा तुम्ही विश्चचषकासाठी विचार करीत असाल तर आत्तापासूनच स्पष्ट करा.’
  रोहित शर्मा आयपीएलच्या आपल्या फ्रॅन्चायझीला असे सांगू शकेल का? देशासाठी खेळण्याकरीता मिळणारे मानधन आणि फ्रॅन्चायझींकडून मिळणारी बिदागी याची तुलनाच होऊ शकत नाही. परंतु भविष्यातील येऊ घातलेले हेच मोठे संकट असणार आहे. देशासाठी खेळायला प्राधान्य द्यायचे की क्लब्सच्या ‘कमिटमेंटला’ या प्रश्नाची उत्तरे प्रत्येक खेळाडूची वेगवेगळी असणार आहेत. क्लबसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी प्राधान्य दिले गेल्याचे आपण पाहतोच. इंग्लंडविरुद्ध मालिकेत ‘कोरोना’चे निमित्त करून क्लबसाठी क्रिकेट खेळताना आपण खेळाडू पाहिले आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये इंग्लंडला मालिकेत हरविण्याची भारताची सुवर्णसंधी गेल्याचेही सर्वांनी पाहिले होते.

  दुखापतींच्या समस्यांमुळे न खेळणे वेगळे आणि स्वत:च्या मर्जीनुसार देशाची सेवा टाळणे वेगळे. त्यातही कप्तानाची जबाबदारी अधिक असते. कप्तानच जर आपल्या बोर्डाला आपल्या विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्याबाबत विचारत असेल तर संघांचे स्पर्धेतील भवितव्य काय असेल? २०२२ च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित एकही ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही. रोहितने आणि विराटने त्यावेळीही ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

  त्यावेळी हार्दीक पंड्याकडे ट्वेन्टी-२० क्रिकेटचे भारतीय संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. मात्र त्यावेळीही हार्दीक पंड्याला भारतीय संघाचा कप्तान म्हणून बीसीसीआयने घोषणा केली नव्हती. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे पंड्या बाद झाल्यामुळे सध्यातरी तो प्रश्नही बाजूला पडला आहे. ५० षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित-विराट ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून त्यानंतरही दूर राहीले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. समोर ट्वेन्टी-२० विश्चचषक क्रिकेट स्पर्धा समोर दिसत असताना, या दोन अनुभवी खेळाडूंचा बीसीसीआयला विचार करावाच लागेल.
  दोघांपैकी विराटने आपल्या कारकिर्दीचा ‘रोड मॅप’ तयार केला आहे. स्वत:चा फिटनेस राखून नेतृत्वाच्या स्पर्धेपासून तो दूर झाला आहे. त्याचे लक्ष्य निश्चित आहे. तो प्रेक्षकांच्या मनात अजूनही स्थान पटकावून आहे. त्याला विक्रमादित्य व्हायचे आहे.

  रोहितचे तसे नाही. त्याने स्वत: काय करायचे हे ठरविले पाहिजे. स्वत:च्या भवितव्याबाबत बीसीसीआयकडे विचारणा करणे म्हणजे काहीतरी सूचित करण्यासारखे आहे.
  गुणवत्ता असूनही काहीशा बेदरकार वृत्तीमुळे रोहितला त्याच्या हक्काचेही मिळाले नाही. त्याने किमान यापुढे तरी विराट कोहलीकडे पाहून आपली उर्वरित कारकिर्द ‘प्लान’ करावी. क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवहार्य दृष्टीकोनही ठेवायला हवा, हे स्वत:लाच समजवावे लागेल. आर्थिक व्यवस्थापनाबरोबरच यशाचे व्यवस्थापनही योग्य रितीने करावे लागेल. कोणत्याही युद्धात सेनापती आघाडीवरच असतो. मात्र आघाडीवर राहून तो स्वत:चा बळी देत नाही. कारण त्यानंतरच्या वाताहतीचाही त्याला विचार करावा लागतो. रोहितचे विश्वचषकातील डाव पाहिले तर तसे वाटले नाही. आक्रमकता जरूर असावी. मात्र त्या आक्रमकतेमुळे नंतर संघांची अवस्था काय होऊ शकते याचाही विचार व्हायला हवा.
  भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हावा असे वाटत असल्यास भारतीय क्रिकेटचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. प्रत्येक वेळी प्रतिवर्षी किंवा वर्षभरही विविध संघांच्या फ्रॅन्चायझींचे सामने कुठे ना कुठे सुरू असतात. अशा वेळी देशहितासाठी कोण, किती विचार करणार आणि योगदान देणार ही गोष्ट यापुढे निर्णायक ठरणार आहे. विश्वचषक विजेतेपदाचा मोठा ‘इव्हेंट’ कदाचित केला गेला असता. पण पराभवानंतर त्याचा फारसा विचारही झाला नाही. गेल्या १० वर्षात भारताकडे एकाही आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी नाही हे सत्य ज्यावेळी जिव्हारी लागेल त्यावेळीच झपाटलेल्या खेळाडूंचा एकत्रित संघ पाहता येईल. विविध आयपीएल फ्रॅन्चायझींसाठी ‘टॅलेन्ट स्काऊटिंग’ करणारे जेव्हा स्थानिक स्पर्धांमध्ये अधिक प्रमाणावर दिसायला लागतात तेव्हा राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य शोधावे लागतात. फ्रॅन्चायझींचे प्रतिनिधी वरच्या दर्जाचे क्रिकेट खेळलेले निवृत्त क्रिकेटपटू आहेत आणि भारताच्या निवड समितीत अत्यल्प अनुभवी.
  यापुढे फ्रॅन्चायझींचे संघ निवडताना लावलेला कस-निकष कदाचित राष्ट्रीय संघासाठी लावलेला दिसणारही नाही.

  – विनायक दळवी