
संजय राऊत हे असे एक व्यक्तिमत्व आहे की तुम्हाला त्यांच्यावर एकतर प्रेम करता किंवा त्यांचा द्वेष करता, पण तुम्ही त्यांना टाळून पुढे जाऊ शकत नाही! शिवसैनिकांसाठी ते एक हिरो बनले आहेत. ते रोज सकाळी जे बोलतात त्यावर देशात दिवसभर चर्चा होत राहते म्हणून माध्यमांचेही लाडके आहेत; पण ते जे काही बोलतात त्याचा मनस्ताप ज्यांना होतो त्यांचे शत्रू नंबर एक आहेत.
संजय राऊत सध्या पुन्हा एकदा गाजत आहेत. पण फार निराळ्या कारणासासाठी. एरवी चित्रविचित्र ट्विटसाठी व तिखट, खवचट, लागट व आक्रमक बोलण्यासाठी गाजणारे राऊत सध्या ईडीच्या कोठडीत सरकारी पाहुणचार घेत आहेत. हे होणारच होते. त्याच दिशेने गेली काही वर्षे गोष्टी सरकत होत्या. व याची पूर्ण जाणीव राऊतांनाही होती.
२००८-०९ पासून गोरेगावच्या सिद्धार्थनगर पत्राचाळ इथल्या साडेसहाशे घरांच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प गाजतो आहे. बिल्डरने मराठी भाडेकरूंना बाहेर तर काढलेच, तिथे गुंडगिरी झाली, धाकधपटशा झाल्या. पण त्यांची पाडलेली घरे पुन्हा उभी होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्या सर्वाची तक्रार शिवेसेनेचे स्थानिक नेते व आमदार करत होते. पण दुसरे शिवसेनेचे नेते व खासदार प्रकल्पातील बिल्डरला मदत करत होते. त्या प्रकरणात आता संजय राऊतांना अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी अटक केलेली आहे.
संजय राऊत हे असे एक व्यक्तीमत्व आहे की तुम्हाला त्यांच्यावर एकतर प्रेम करता किंवा त्यांचा द्वेष करता, पण तुम्ही त्यांना टाळून पुढे जाऊ शकत नाही! शिवसैनिकांसाठी ते एक हीरो बनले आहेत. ते रोज सकाळी जे बोलताता त्यावर देशात दिवसभर चर्चा होत राहते म्हणून ते माध्यमांचेही ते लाडके आहेत, पण ते जे काही बोलतात त्याचा मनस्ताप ज्यांना होतो त्यांचे ते शत्रू नंबर एक आहेत. संजय राऊत यांनी राजकारणात एक दबंग आणि रावडी अशी प्रतिमा जाणीवपूर्वक जोपासली आहे.
ते तरुण पत्रकार होते तेव्हापासूनच ते बिनधास्त आणि भरपूर लिखाण करणारे म्हणून ओळखले जात होते. इंडियन एक्सप्रेस समुहातील लोकसत्ताचे धाकटे भावंड असणाऱ्या व आता कलौघात संपून गेलेल्या लोकप्रभा साप्ताहिकाच ते आघाडीचे लेखक, मुलाखतकार होते. तिथले त्यांचे कौशल्य हेरूनच शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी राऊतांना ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून निमंत्रित केले.
त्यांनी बाळासाहेबांच्या लिखाणाची शैली अशी अचूक उचलली होती की सैनिकांना शंकाही यायची नाही की हे लिखाण साहेबांचे नसून ते राऊतांच्या लेखणीचे कौशल्य आहे. त्यांनी कधी शिवसेनेला व ठाकरेंनाही अडचणीत आणणारेही लिखाण परस्पर करून टाकले होते. पण ते बाळासाहेबांनी खपवून घेतले. राऊतांना सामनाच्या संचालनात पूर्ण स्वातंत्र्यही दिले होते. तीच गोष्ट बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनीही पुढे सुरु ठेवली. उद्धव यांनी तर माझे मित्र असा संजय राऊतांचा उल्लेख अटक प्रकरणानंतर केला आहे. इतके ते ठाकरे घरातीलच एक सदस्य बनून गेले होते.
संजय राऊत संपादक व शिवसेना नेता या पदांपेक्षाही पुष्कळ मोठे झाले होते. हीच बाब त्यांच्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांच्या पचनी पडत नव्हती. देशस्तरावरील विरोधी पक्षांच्या नेतृत्वामध्येही राऊत यांना एक स्थान गेल्या पाच सात वर्षात प्राप्त झाले होते. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आणि राहूल गांधी असे नेते एकाच वेळी राऊतांच्या घट्ट संबंधातली बनले होते. शरद पवार व राऊतांचे जिव्हाळ्याचे संबंध तर होतेच आणि त्याच संबंधांचा वापर करून राऊतांनी महाविकास आघाडीची रचना केली. सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी बाकांवर पडलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक राग त्याच बाबीचा आलेला असणार यात शंका नाही.
पण त्याच वेळी, “मला कोणी काही करू शकणार नाही, मी आता इथल्या तपास यंत्रणांच्या पलिकडे गेलो आहे, मी राष्रीमलय स्तरावरचा नेता बनलो आहे…” हा एक गर्व जर राऊतांना झाला असेल, तर त्याचा फुगा अटक प्रकरणाने पुरता फुटला आहे.
संजय राऊत हे तसे मध्यमवर्ग घरातील पत्रकार. पण गेल्या तिन्ही राज्यसभा निवडणुकीत त्यांनी जे संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले आहे, त्यात प्रत्येक वेळी मोठी वाढच पहायला मिळाली आहे. भांडुपमधील एका कोपऱ्यातील त्यांचे घर हा एक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा महत्वाचा बिंदू ठरला यातच त्यांच्या कारकीर्दीचे यश समाविष्ट आहे. पण त्याच वेळी तिथपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील प्रतिमेला सुजित पाटकर आणि प्रवीण राऊत यांच्यासारख्या मित्रांच्या “कार्य-कर्तृत्वामुळे” तडे गेलेले आहेत.
सरत्या सप्ताहात रविवारी मध्यरात्रीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने जी अटक केली त्यातून अनेक बाबी महाराष्ट्राला धक्कादायक वाटाव्यात अशा पुढे आल्या आहेत. पत्राचाळ प्रकरण प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचे आहे आणि त्यात राऊतांचा सहभाग मोठा हे असे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. तिथे सादर झालेल्या पुराव्यांवरून प्राथमिक निष्कर्ष काढताना न्यायालयाने म्हटले आहे की संजय राऊतांचा यात सहभाग दिसतो आहे. त्यामुळेच त्यांना ईडी कोठडीत धाडण्यात आले.
खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर सकाळीच स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडून भांडूपमधील राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, “आपण तुमच्यासोबत आहोत” असा शब्द दिला. या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या गुहेतून बाहेर पडले.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने न्यायालयात सांगितले आहे की, शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याच इशाऱ्याने अनेक व्यवहार केलेले आहेत. या घोटाळ्यातून दरमहा रोख दोन लाख रुपये संजय राऊतांना मिळाले असून एक कोटी सहा लाखांचा नफा त्यांना झाला आहे, त्यामुळे संजय राऊत हे मोठे आर्थिक लाभार्थी असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.
संजय राऊतांची सुटका आता लगेच होईल असे दिसत नाही. कारण पत्राचाळ हे एकच प्रकरण उपटले आहे असे नव्हे तर त्यातून निघालेले स्वप्ना पाटकरांना धमकावण्याचे दुसरे प्रकरणही पुन्हा तपासासाठी घेण्यात आले आहे. ते कदाचित राऊतांसाठी अधिक अडचणीचे ठरणार आहे.
पत्राचाळ व्यवहाराचे एक लाभार्थी पात्र असणाऱ्या सुजीत पाटकर यांच्या घटस्फोटित पत्नीने राऊत त्यांना कसे धमकावत होते याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यांची तक्रार २०१३ मधील आहे. त्यावेळी काही पैसा राऊतांनी स्वप्ना पाटकरांच्या नावे गुंतवला होता व त्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती मालमत्ता सुजीत पाटकर वा संजय राऊतांच्या नावे करून द्या, असे राऊत धमकावत आहेत, घाणेरड्या शिव्या स्वप्नाबाईंना घालत आहेत अशी एक ध्वनिफीत स्वप्ना पाटकारांनी पुढे आणली आहे. त्याचाही तपास वाकोला पोलिसांनी हाती घेतला आहे.
पाटकरांनी २०१३ मध्ये सुजीत व संजय राऊत त्रास देताहेत, धमकावत आहेत, अशी तक्रार मुंबईच्या पश्चिम उपनगरात, वाकोला पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याचा तपास सुरुवातीला झाला. पण पुढे बंद पडला. शिवसेनेचे खासदार तपास करू देणार नाहीत असे पाटकरांना वाटलेच होते. २०१९ नोव्हेंबरनंतर तर संजय राऊत हे तत्कालीन राज्य सरकारचे निर्माते या भूमिकेत गेल्यामुळे पोलीस बतबल झाले. ते प्रकरण कायमचे बंद कऱण्याचासाठी, ए समरी रिपोर्ट, पोलिसांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यायालयात सादर केला. त्याला स्वप्ना पाटकरांनी विरोध केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना फटकारले.
आता २०२२ मध्ये राऊतांचे राज्य बरखास्त झाले व शिंदे-फडणवीसांचे सरकार बसले. राजवट बदलल्याने राऊतांच्या घराचे वासेही फिरले आहेत. आता शिंदे सरकराने स्वप्ना पाटकरांच्या जुन्या तक्रारींची, तसेच नव्या ध्वनिफीतींची अधिक गंभीर नोंद घेतलेली दिसते. ईडीच्या या पुढच्या चौकशीतही संजय राऊतांच्या विरोधात काही ना काही आणखी पुरावे सापडणारच नाहीत असे नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस, काही महिने राऊतांचे बोलणे व टिवटिव बंदच राहणार यात शंका नाही.
अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com