सावनेर..! अद्भुत ‘मायनिंग टुरिझम..!’

विदर्भातील नागपूरपासून ‘सावनेर’ हे तालुक्याचे गाव केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि कोळशाच्या प्रचंड खाणी असलेला हा परिसर आहे. सावनेरमध्ये केंद्र सरकारच्या पाच कोळशाच्या खाणी आहेत. यापैकी खाण क्र.१ मध्ये देशातल्या पहिल्या ‘मायनिंग टूरिझम’चा शुभारंभ केंद्र सरकारने केला आहे.

  झारखंड मध्ये धनबाद जवळ असलेल्या “चासनाला’’ या कोळशाच्या खाणीत २७/१२/१९७५ ला दोन खाणींच्या मध्ये असलेली भिंत पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने फुटली. हजारो फुट खोल असलेल्या अंधारलेल्या काळोखाच्या या खाणीमध्ये जवळपास ३७५ गरीब मजुर अचानक झालेल्या या दुर्घटनेत दबुन मारल्या गेलेत. बाहेर पडण्याकरिता या गरीब मजुरांना कुठलाही रस्ता सापडला नाही .त्यावेळेस खाणीतल्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालेत अन देशात एकाच हल्लकल्लोळ माजला . याच घटनेवर आधारित एक सुंदर “थीम” प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोपडा यांनी घेतली. सलीम जावेद यांच्या अदभुत लेखणीतुन साकारलेला व अमिताभ बच्चन , शशी कपूर,शत्रुघ्न सिन्हा व राखी यांच्या सर्वांगसुंदर अभिनयाची जुगलबंदी असलेला ‘कालापत्थर’ हा अनोखा चित्रपट भारताच्या रुपेरी पडद्यावर २४ ऑगस्ट १९७९ ला आणला आणि जमिनीमधला काळोख काय असतो व काळोखातले जीवन काय असते याचे कदाचित पहिलेच दर्शन या चित्रपटाद्वारे रुपेरी पडदयावर भारतीय लोकांना झाले अन सारा समाज आश्चर्य चकित झाला. हा चित्रपट सुपरडुपर हीट झाला अन अमिताभ बच्चन यांनी अभिनयाची नवीनच उंची गाठून ‘अँग्री यंग मॅन’ वर शिक्कामोर्तबच केले..!

  विदर्भातील नागपूरपासून ‘सावनेर’ हे तालुक्याचे गाव केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि कोळशाच्या प्रचंड खाणी असलेला हा परिसर आहे. पौराणिक आदासा गणपती, कपिलेश्वर, ताजसावंगी आश्रम, जामसावळीचा झोपलेला हनुमान,वाकी येथील ताजबाग, विदर्भाचे पंढरपूर असलेले धापेवाडा अशी सर्व दिशेला प्रसिद्ध देवस्थाने आहेत आणि असंख्य भाविकांनी सावनेरचा ग्रामीण परिसर सदैव फुललेला असतो. निसर्गरम्य वडचिचोली, खेकरानाला, ‘शिवतीर्थ’, ईको पार्क , खाप्याचे जंगल ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि नदी,तलाव,मंदिरे यांचे नैसर्गिक वरदान सावनेरला लाभलेले आहे.

  अशा या सावनेरमध्ये केंद्र सरकारच्या पाच कोळशाच्या खाणी आहेत. या पैकी खाण क्र.१ मध्ये देशातल्या पहिल्या ‘मायनिंग टूरिझम’ चा शुभारंभ केंद्र सरकारने केलेला आहे.देशातील पहिल्या ‘मायनिंग टूरीझम’ चा मान व दर्जा सावनेरच्या खाणीला मिळाला आहे…सावनेर, धापेवाडा, आदासा या फक्त ४/५ कि.मी. च्या रस्त्यावर डाव्या बाजुने वळल्यास जंगल सदृश उंच उंच झाडांमध्ये लपलेल्या सावनेर खाण क्र.१ कडे हा धुळीचा रस्ता जातो अन सुंदर इको पार्क दृष्टीस पडतो आणि आपला प्रवेश होतो. हा इको पार्कच १५ हेक्टरमध्ये आहे असे कळते. येथे कोळशाच्या खाणीमधले अद्भुत साम्राज्य बघता येते..!

  खाणीमध्ये जाण्या अगोदरच एक प्रकारचे विचित्र दडपण यायला लागले. खाण म्हटले की भीतीदायक अंधार डोळ्या समोर येतो.!.भीती..थरार व रोमांच .यांचे अदभुत मिलन ..! आत मध्ये काय असेल याची हुर हुर लागली. विशिष्ठ प्रकारचे जोडे व विजेरी असलेल्या माईन्स कॅप आम्हाला देण्यात आली आणि उघड्या चेअर लिफ्टवर आजुबाजुला दोन पाय पसरवून बसवण्यात आले व दोन्ही हात वरच्या दोराला धरले.ही चेअर लिफ्ट वर असलेल्या दोराला अडकवलेली असते अन सायरन झाल्या बरोबर काळोखाच्या साम्राज्यात आमचा प्रवेश व्हायला लागला..! लिफ्ट सुरु झाल्या बरोबर भीतीमुळे जोराने ओरडावसे वाटले पण आता पुर्णपणे अडकल्यामुळे कुठूनही सुटका नव्हती. श्वास रोखून आमचा प्रवास अंधारच्या दिशेने सुरु झाला आणि आम्ही जमिनीच्या उदरात जायला लागलो. जणु काही खोल खोल गुहेतच…! हा संपुर्ण बोगदा जवळपास अडीच मिटर पेक्षा जास्त व्यासाचा व तीन ते चार मीटर रुंद असुन आत मध्ये अतिशय आकर्षकपणे सावधानतेचे सुचना फलक लावलेले दिसले. खाली खाली जात असताना छतांवर असलेल्या चंदेरी उजेडाचे अतिशय मंद मंद दिवे व भयाण शांतता हेच काय आमच्या सोबतीला होते . जमिनी खाली अनेक खोदलेल्या नाल्या दिसल्यात. पाण्याचा सतत प्रवाह सुरू होता. दोन्ही बाजूच्या भिंतीकडे बघितले तर पाणी झिरपताना दिसले. कधी असे वाटायचे की आपली लिफ्ट तुटून नालीवर पडणार नाही ना? कारण लिफ्ट च्या दांड्याचाही धडधड आवाज येत होता, हेलकावे बसत होते व लिफ्ट पण खालीवर होत होती.त्यामुळे मनावर एक प्रकारचे दडपणपण आले होते. त्यामुळे असे वाटायला लागले की पुढे काय होते अन आपण सुखरूप राहतो की नाही. परंतु आत मध्ये सुरक्षेची भरपूर काळजी घेण्यात येते. मदतीला सेफ्टी ऑफिसर, माइनिंग इंजिनिअर, वेंटीलेशन ऑफिसर असल्यामुळे सोबतीला भरपुर आधार असतो. फक्त यांना सोडून कुठेही भटकून जाऊ नये, कारण धोका होण्याचा संभव असतो. अशा या अंधारलेल्या गुहेत जवळपास दीड कि.मी.चा प्रवास रोप वेच्या लिफ्ट चेअरवर बसुन, पाय समोरच्या पँडलवर ठेऊन व दोन्ही हात वरच्या दोराला धरून शांतपणे झाला. जमिनीच्या खाली दोनशे पंचवीस फुटावर आम्ही आलो होतो व एका जंक्शनमध्ये एक एक करून सर्वांची भेट झाली. येथे पंपिंग स्टेशन , मायनर्स स्टेशन, स्ट्रेस रिलीफ सेंटर हे काही अंतरावर दिसले. प्रथमोपचार केंद्र पण दिसले .“ काम पर सोना , जान को खोना’’ हा जीवन मुल्य सांगणारा फलक दिसला. येथून आमचा पुढचा प्रवास पायी पायी सुरु झाला . सगळीकडे काळ्या रस्त्याचे व कोळशांच्या भुकटीचे साम्राज्य दिसायला लागले. ओबड धोबड रस्ते. वर बघितले तर छतावर डस्ट मारून छत पांढरे केले होते. समोर जाता असताना डाव्या उजव्या बाजुला अनेक टनेल, टर्मिनल, व जन्क्शंस दिसलेत .काही ठिकाणचे रस्ते बंद केले होते..असे अनेक टनेल्स अंधारलेल्या गुहेकडे जात होते.तेथे भयाण रस्ता होता .
  एक भयप्रद शांतता तेथे नांदत होती…! असे अनेक काळे बोगदे सर्वत्र दिसलेत. येथे असे शंभरच्या वर जन्क्शंस असल्याची माहिती मिळाली .हा एक प्रकारचा काळोखातला भुलभुलैय्याच आहे….!.

  बारकाईने निरीक्षण केले असता असे दिसले की या छतावर दीड मिटर वर “रुफ सपोर्ट”आहे. एकाएकी छत खाली येऊ नये व कुठलाही धोका होऊ नये म्हणुन हिरवे,लाल व पिवळे सिग्नल्स एकाच रांगेत लावलेले दिसले. याला तांत्रिक भाषेत ‘टेल टेल’ म्हणतात. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या धोक्याच्या सुचना दिसतात. पण सहजा सहजी धोका होत नाही. जमिनीपासून आम्ही आता १६५ मीटर वर खाली होतो. गर्मी सुरु झाली..! भरपूर उकाडा जाणवू लागला. अनेक कामगार खाणीमध्ये फक्त शॉर्टवर उघड्या अंगाने शारीरिक कष्ट करताना दिसले. खाणी खाली हे कामगार बंधु आठ तास काम करतात. फक्त मंद चंदेरी प्रकाशात ..! आश्चर्य व विस्मयकारक दृश्य समोर दिसत होते..! अन एकाएकी मनात विचार आला …एका एकी छत खाली आले तर? नखशिखांत हादरलोच…! अमिताभ बच्चनच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटातील पाणी भरलेल्या खाणीतला प्रसंग आठवला ..! जीवाच्या आकांताने रडवेले झालेले ते कामगार आठवले..! अन थरकापच झाला ..! माजरीच्या खाणी मध्ये असेच ११

  कामगार मृत्युमुखी पडल्याचे समजले….!

  नुसता कोळशाचा चुरा ..! आता आम्हाला मशिनरी दिसल्या . कोळसा वाहुन नेणारे प्रचंड मोठे बेल्ट दिसलेत.त्याला कन्व्हेअर बेल्ट म्हणतात असे कळले . समोर अजुन खाली गेल्यावर ट्रक्टर सारखी ‘युनिव्हर्सल ड्रिलिंग मशीन’ दिसली . याला एल.एच.डी. म्हणजे ‘लोड हॉल्ट डम्पर’ म्हणतात अशी माहिती मिळाली. ही मशीन कोळशाच्या भिंतीला एका वेळेस पंधरा ते सोळा मोठे छिद्र करते..ही अतिशय महत्वपुर्ण प्रक्रिया आम्हाला बघायला मिळाली. हे काम २४ तास सुरु असते. येथे कामगारांची बटरी १६ तास चार्ज असते. या छिद्रा मध्ये बारूद भरली जाते. त्यानंतर पॅकिंग लाऊन डीनोटर / वायर ने जोडण्यात येते . सर्व छीद्रे बंद केल्याची खात्री करून सर्व कामगारांना व पर्यटकाना मग दूर अंतरावर नेण्यात येते. ‘खबरदार रे’ अशी जोर्याकत आरोळी कामगार प्रमुखा कडुन ठोकण्यात येउन पडदे बंद केल्या जातात ..! अन कानठाळ्या बसवणारा प्रचंड ब्लास्ट होतो अन आवाजाने खाण हादरून जाते…! हा खरा खाणीतला क्लायमॅक्स आहे…! ब्लास्ट म्हणजे मुख्य आकर्षण..! .नशीब बलवत्तर असेल तर हा ब्लास्ट बघायला व अनुभवायला मिळतो. सर्वच पर्यटकांना ही संधी लाभेलच असे सांगता येत नाही. कारण सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन काळजी घेतल्या जाते.जंगला मध्ये वाघ बघण्याचा जो आनंद आहे तोच आनंद येथे “ माईन ब्लास्ट” अनुभवण्याचा आहे…! कोळशाची भिंत आता फोडण्यात आली होती ..! एका ब्लास्ट मध्ये १२/१३ टन कोळसा निघालेला होता..! मग अजस्त्र मशिनने हा दगडी कोळसा कन्व्हेअर बेल्ट मध्ये टाकुन शुद्धीकरणाच्या प्रक्रीयेकरिता समोर रवाना होत होता. आम्ही जमिनीच्या खाली ४७० पेक्षा जास्त फुटा वर होतो…! जमिनी खालचा अंदाजे चार कि.मी.चा प्रवासाचा अंतिम टप्पा येथे होता पण येथे अनेक रिस्क फॅक्टर असल्याचे समजले.गॅसचा ब्लास्ट होऊ शकतो..रोप तुटू शकतो,छत खाली येऊ शकते.ज्वालाग्रही पदार्थांना एकाएकी आग लागू शकते, छतावर पाणी व चिखल असतो. याला फिशरर्स म्हणतात असे कळले. आमच्या करीता खाण येथे संपलेली होती. त्या ४७० फुटावर जमिनी खाली कीर्र काळोख झाला. कुणीही कुणाला दिसत नव्हते. सगळीकडे काळोखाचे भीतीदायक साम्राज्य पसरलेले होते ..! हा अंधार त्या वेळेस जाणवले की हा विजेरीचा मंद प्रकाश म्हणजे या मेहनती कामगारांची ‘लाईफ लाईन’च आहे…!

  अडीच तासानंतर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. परत एकदा लिफ्ट चेअरवर बसून काळोखात व अंधारलेल्या बोगद्यात सावनेरच्या ‘मायनिंग टुरिझम’च एक आश्चर्यकारक अनुभव घेऊन जमिनीवर यायला लागलो ..!

  श्रीकांत पवनीकर

  sppshrikant81@gmail.com