
मोठ्या उत्साहात गणेशाचं आगमन झालं. घर आनंदून गेलं. यंदाचा गणराया तसा नेहमीसारखाच होता. मात्र, यंदा त्यांच्या डोळ्यात वेगळी चमक होती. अलेक्झांडरच्या ते पटकन लक्षात आलं. त्यामुळे गणराया आल्यापासून गडी त्यांच्या डोळ्याकडेच एकटक बघत बसला. गणरायाच्या खोलीत अधूनमधून येत-जात असणाऱ्या तेजोमयीच्या लक्षात काही वेळाने अलेक्झांडरचं गणरायाकडे एकटक बघणं आलं.
………….
पूजेची तयारी झाल्यावर सगळेजण गणरायांच्या खोलीत जमले. आई-बाबा आणि तेजोमयी सोबत अलेक्झांडरने गणरायांना फुल वाहिले. बाबा आरती म्हणू लागले. आरती संपल्यावर त्यांनी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. दोन श्लोक संपता संपता खोलीत आवाज निनादला,
‘अहो तेजामयीचे पप्पा, जरा व्यवस्थित म्हणा की अथर्वशीर्ष.’ या आवाजाने दचकून सगळ्यांनी मागे बघितलं. घरी कुणी आलय का ते बघण्यासाठी. ‘अहो, तुम्ही मागे नाही, समोर बघा. माझ्याकडे. मी बोलतोय.’ सर्वांनी पुन्हा दचकून समोर बघितलं. गणराय बोलत होते. अलेक्झांडर पुन्हा त्यांच्या चकाकणाऱ्या डोळ्याकडे एकटक बघू लागला. ही भूताटकी तरी नाही ना, असं वाटून तेजोमयीच्या गळ्याला कोरड पडली. गणराया पुन्हा म्हणाले, ‘तेजोमयीच्या आई तुमचंसुध्दा लक्षं नाही, कधी पूजा संपते नि टीव्हीपुढे बसतेय असं झालय तुम्हाला.’ बाबा आणि आई अवाक होऊन गणरायाकडे बघू लागले. ‘तुम्हाला कसं कळलं आम्ही तेजोयमीचे आईबाबा आहोत म्हणून…’ आई कशीबशी म्हणाली. ‘ते महत्वाचं आहे की मी सांगतो ते महत्वाचं. तुमचं दोघांचही लक्षं नाही, हे खरं आहे ना. दोघांनींही काहीही प्रतिकिया न देता, तिथून काढता पाय घेतला. पूर्जा अर्धवटच राहिली.
…………….
‘आता काय? अशी पूजा याआधी कधी अर्धवट राहिली नव्हती. आई धडधडत्या छातीने रडवलेल्या सुरात बाबांना म्हणाली.
‘याआधी गणराय असे कधी बोलले नव्हते.’
‘अहो, मूर्ती बोलणार कशी?’आई म्हणाली.
‘मग आता…’ तेजोमयीनं विचारलं.
‘आता काय? ही मूर्ती नसून भूताटकी तर नाही ना.’
‘याचा अर्थ गणरायाचा मूर्तीत भूत शिरलाय असं म्हणायचं की काय तुम्हाला? अलेक्झांडरच्या कसं लक्षात आलं नाही ते…’
‘आलंय, आलंय त्याच्याबरोबर लक्षात आलय…आईबाबांच्या खोलीत त्याचवेळी प्रवेश केलेली तेजोमयी म्हणाली. ‘तुला कसं कळलं’ आई-बाबांनी तिला विचारलं.
‘स्वत:च्या डोळ्यांनीच बघाना’, असं तेजोमयी म्हणाली. ते तिघेही गणरायाच्या खोलीत आले. त्यांनी भीतभीतच खोलीत प्रवेश केला.
समोर मान वर करुन अलेक्झांडर एकटक गणरायाच्या डोळ्यात बघत होता. गणरायाचे डोळे चकाकत होते. आईबाबांचं लक्षं तिकडे जातात ते चपापले.
‘माझ्यात भूत शिरलाय असं तुम्हाला वाटतं ना’, गणरायांनी बॉम्बगोळाच टाकला.
आईची शुध्द हरपता हरपता राहिली. बाबा थरथर कापू लागले.
‘असं दुसऱ्यांच्या मनातलं भूताशिवाय कोण ओळखू शकतो…’ बाबा कसेबसे म्हणाले.
या मूर्तीमुळे आपल्या घरातील मंडळी घाबरलेली असल्याचं एव्हाना अलेक्झांडरच्या लक्षात आलं. त्याने त्याच्या पध्दतीने उडी मारुन गणरायांच्या डोळ्याकडे आईबाबांचं लक्षं वेधण्याचा प्रयत्न केला.
‘बाबा, हा अलेक्झांडर मघापासून सारखा मूर्तिच्या डोळ्याकडे एकटक बघतोय. या डोळ्यातच काहीतरी रहस्य दडलेय’. तेजोमयी म्हणाली.
बाबांनी अलेक्झांडरकडे बघितलं. त्याने मूर्तीवर उडी घेतली. मूर्ती खाली पडू लागल्याचं लक्षात येताच बाबांनी पटकन हालचाल करुन मूर्तिला पडू दिलं नाही. मात्र या पडापडीत गणरायाच्या डोळ्यातून कॅमेऱ्यासारख्या वस्तू बाहेर पडल्या.
‘हे तर कॅमेरे’ तेजोमयी आश्चर्यचकित होत म्हणाली.
‘हे गणरायाच्या डोळ्यात कसे आले?’ आईने थरथर कापत विचारलं. तिला आता काही सूचत नव्हतं.
……….
आता बाबांच्या थोडं फार लक्षात आलं होतं. त्यांनी सर्वांना बाहेर काढलं. गणरायाच्या खोलीचं दार बंद केलं. सर्वांना दीर्घश्वास घ्यायला सांगितला. आईला त्यांनी पाणी दिलं. स्वत:च्या कपाळावरचा घाम पुसला. हळूहळू ते सांगू लागले. हा यंत्रगणेश आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेनं युक्त असा. त्याच्या डोळ्यातील कॅमेरातून तो आपले निरीक्षण करुन त्याच्या मेंदूकडे लाखो प्रतिमा पाठवू शकतो नि आपल्याबद्दल बारीकसारीक गोष्टी तो जाणून घेऊ शकतो. त्याच्या मेंदूतलं चॅट-जीपीटीच्या स्वरुपातलं गणित (अल्गोरिदम) पटापट निष्कर्ष काढू शकतो.
‘पण हा उपदव्याप करायला सांगितला कुणी तुम्हाला?’ आई रागावलेल्या नि रडवलेल्या स्वरात म्हणाली. ‘दरवर्षी आपण नव्या नव्या अवतारात गणेश आणतो ना. म्हणून यंदा हे रुप. ते सांगायचं राहून गेलं नि मग विसरुनही गेलो…’ बाबा चाचरत म्हणाले.
‘पण त्या सर्व गणेशांना बुध्दी कुठे होती? ते विचार करु शकत नव्हते. निष्कर्ष काढू शकत नव्हते. या बुध्दीवाल्या गणेशाने उघडं पाडलं ना आपल्याला. इतक्या वर्षाची तपश्चर्या गेली की पाण्यात.’ आई रडत म्हणाली.
‘तुला म्हणायचं तरी काय?’ तेजोमयीने आश्यर्चचकित होऊन विचारलं.
‘केवळ उपचार म्हणून, शोभेचा म्हणून आपण गणराय बसवत होतो. पूर्ण लक्ष कुठं होतं आपलं त्याच्याकडे. मनात नव्हता भाव तरी म्हणत होतो, देवा मला पाव. पण हे गुपित गुपितच होतं ना. यंत्रगणेशानं या गुपितावरच पाणी फिरवलं’ आई बंद केलेल्या खोलीकडे एकटक बघत म्हणाली.
– सुरेश वांदिले