वजन कमी होते म्हणजे काय होते ? तज्ञांकडून जाणून घ्या शास्त्रीय माहिती

  वजन कसे कमी करावे(Weight loss) हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो खास करुन स्त्री वर्गाला चला आज याबद्दल थोडी शास्त्रीय माहिती घेऊया.

  वजन कमी करण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यातील काही महत्वाची कारणे आपण पाहूयाात –
  १. चांगले दिसण्यासाठी
  २. आजारपण टाळण्यासाठी
  ३. आजारपण असेल तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी इत्यादी.

  वजन कमी करण्यासाठी खालील मुद्दे खूप महत्वाचे आहेत
  १. वय – जसजसे आपले वय वाढते तसतशी आपली चयापचय शक्ति क्षीण होत जाते.
  २. लिंग – पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे वजन लवकर कमी होत नाही. कारण त्यांचे (hormone) संप्रेरके पुरुषांपेक्षा वेगळी असतात.
  ३. आरोग्य – निरोगी व्यक्तींचे वजन रोगी व्यक्तीपेक्षा लवकर कमी होते. एखाद्या व्यक्तीला  Hypothyroidism असेल किंवा मधुमेह असेल किंवा स्त्रियांमध्ये PCOD/PCOS असेल तर वजन कमी करण्यासाठी त्रास होतो.

  वजन कसे कमी होते ?
  आपल्या सर्वांची चयापचय (Basal Metabolic Rate) क्रिया वय, उंची, वजन आणि शारीरिक क्रिया यावर अवलंबून असते. म्हणजे जिवंत राहण्यासाठी तेवढे उष्मांक (calories) आपल्याला खावे लागतात. जर आपण ते उष्मांक (calories) जास्त खाल्ल्या तर वजन वाढते आणि कमी खाल्ले तर कमी होते. पण त्या बरोबर व्यायामाची जोडसुद्धा आवश्यक आहे.

  अर्धा किलो चरबी कमी करण्यासाठी ३५०० उष्मांक (calories) जाळावी लागतात. म्हणजे जर आपण दिवसाला ५०० उष्मांक जाळत किंवा खर्च करत असू आणि तेवढेच उष्मांक आपण जेवणातून कमी केले तर एका आठवड्यात अर्धा किलो वजन कमी होवू शकते. पण तसे होण्यासाठी मी वर सांगितलेल्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत जसे वय, लिंग, आरोग्य इत्यादी.

  बर्‍याच जणांना असे वाटते की, मी फक्त व्यायाम केला तर वजन कमी होईल पण तसे होत नाही. त्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहारसुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
  कमी गोड खाणे, फास्ट फूड कमी खाणे, वेफर, चिवडा, खारी, बटर, पाव असे मैदा युक्त पदार्थ कमी खाणे किंवा टाळणे, कोक सारखी शीत पेय वर्ज्य करणे, मीठ कमी खाणे अशा अनेक गोष्टी आहेत. पण सर्वात आधी एखाद्या सुशिक्षित आहार तज्ज्ञांचा आणि व्यायाम प्रशिक्षकाचा सल्ला घ्या.

  – सचिन पांडुरंग लाड, व्यायाम आणि आहार तञ्ज्ञ