खडसेंच्या साथीने सेनेची खेळी!

जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार असल्याने १८ रोजी नव्या पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक होत आहे. मनपात भाजपची एकहाती सत्ता व नेतृत्व गिरीश महाजन यांच्याकडे असल्याने ते ठरवतील तो निर्णय साऱ्यांना मान्य करावा लागणार होता

  – डी. बी. पाटील
  एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठाेकल्यापासून राज्यात सर्वात जास्त चर्चेत आहे ताे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातून भाजपा संपविण्याची भीष्मप्रतिज्ञा केलेल्या खडसेंना अजून भाजपाला माेठा धक्का देण्यात यश आलेले नाही. आता जळगाव महापािलकेतील २५ नगरसेवक ‘गायब’ झाले आहेत. ते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लपवून’ ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता खडसेंच्या साथीने सेनेने जळगाव महापािलकेत ही खेळी खेळल्याची चर्चा रंगली आहे. या खेळीतून खडसे गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून गिरीश महाजनांनाही धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

  भाजपाची डाेकेदुखी
  जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार असल्याने १८ रोजी नव्या पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक होत आहे. मनपात भाजपची एकहाती सत्ता व नेतृत्व गिरीश महाजन यांच्याकडे असल्याने ते ठरवतील तो निर्णय साऱ्यांना मान्य करावा लागणार होता. पण नगरसेवकांची त्यास मान्यता नव्हती. महापौर पदासाठी पाच दावेदार असल्याने महाजन यांच्यासमोर ते जबर आव्हान होतेच.पण त्यांची ती डोकेदुखी पक्षच्या नगरसेवकांकडून दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे.

  महापाैर खडसेंचाच!
  जळगाव महापालिकेतील भाजपा नगरसेवकांत खडसेंनी मानणारा माेठा वर्ग आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेने २५ नगरसेवक पळवल्याची चर्चा असली तरी एकनाथ खडसेंच्या संमतीशिवाय हे हाेऊच शकत नाही, हेही जाणकारांना माहिती आहे. ५७ नगरसेवक असलेल्या जळगाव महापालिकेत शिवसेनेचे १५ नगरसेवक आहेत. त्यांना हे २५ नगरसेवक मिळाल्यास त्यांचे संख्याबळ ४० हाेईल. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यास त्यांना यश येईल. मात्र हे करत असताना भाजपाचे जे २५ नगरसेवक अज्ञात स्थळी आहेत त्यातीलच एकाला महापाैरपद दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच जळगाव महापालिकेत सेनेचा महापाैर असला तरी ताे एकनाथ खडसेंना मानणारा असेल, हे उघड आहे. त्यामुळे सेनेच्या माध्यमातून खडसे महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

  गिरीश महाजनांना धक्का
  गिरीश महाजन हे खडसेंचा बाेट धरून राजकारणात पुढे आले. त्यानंतर त्यांनी आपले प्रस्थ वाढवण्यास सुरूवात केली आणि नंतर वरिष्ठांच्या मदतीने भाजपातून खडसेंचाच पत्ता कट केल्याचे दस्तुरखुद्द खडसेच सांगत आहेत. गिरीश महाजन यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने षडयंत्र रचून खडसेंचे भाजपात खच्चीकरण केले. उभी हयात भाजपाच्या वाढीसाठी घालवणाऱ्या खडसेंना आयुष्याच्या सायंकाळी भाजपातून बाहेर पडून राष्ट्रवादीचा हात धरावा लागला, हे दु:ख खडसेंनी वारंवार बाेलून दाखवले आहे. त्यामुळे जळगाव महापािलकेत हाेत असलेल्या राजकारणाच्या मुळाशी खडसेच आहेत, असे म्हणण्यास वाव आहे.