Anagha-Sawant

इको-प्रिंटिंगचे तंत्रज्ञान अवगत करून डिझायनिंग क्षेत्रात ‘लिफेज’ हा ब्रॅण्ड जन्माला घालणारी श्रद्धा जोशी-बर्डे. नैसर्गिक घटकांचा वापर करून हातमागावरील कपड्यावर सुंदर, अद्वितीय कलाकृती घडविणे हे ‘लिफेज’चं वैशिष्ट्य. पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्णपणे हितकारक होतील अशा उत्पादनांचा आगळावेगळा ब्रॅण्ड निर्माण करणारी श्रद्धा ही एकमेव मराठी तरुणी आहे.

  मातीचे झाड: झाडाची मी: माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती……’ कवयित्री शांता शेळके यांच्या ‘हे एक झाड आहे’ या कवितेतील या ओळी जिला चपखल लागू पडतात, ती म्हणजे ‘लिफेज’ची निर्माती निसर्गप्रेमी श्रद्धा. आपल्या कुशल हातांनी विविध वृक्षांच्या पानाफुलांना हाताळत कपड्यावर ती डिझाईन्स साकारते. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि शून्य कचरा या तत्वांना नजरेसमोर ठेऊन पाने, फुलांच्या पाकळ्या, देठ तसेच कांद्याची साल यापासून अप्रतिम कलाकृती घडविणाऱ्या श्रद्धाचा ‘लिफेज’ हा ब्रॅण्ड डिझायनिंग क्षेत्रात नक्कीच वाखाणण्याजोगा ठरला आहे.

  बालपणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं स्वप्न पाहिलेल्या श्रद्धाच्या अंगी कलेची आवड उपजतच होती. परंतु नशीब मात्र तिला वेगळ्या वाटेवर घेऊन गेलं. पण तिथेही मुळातच हुशार असणाऱ्या श्रद्धाने कॉमर्समध्ये पदवी घेऊन नंतर सी.ए.च्या अभ्यासक्रमात उत्तम यश संपादन केलं.

  मूळची दादरची असलेली परंतु विवाहानंतर पुण्यात स्थायिक झालेली श्रद्धा पुण्यातच एका बड्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत होती. उत्तम नोकरी असतानाही अंगी असलेली सर्जनशीलतेची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. याच आवडीतून १४ वर्षांच्या नोकरीचा राजीनामा देत श्रद्धाने २०१६ साली स्वतःचा डिझायनिंग स्टुडिओ उभारला.

  ‘लिफेज’च्या सुरुवातीविषयी श्रद्धा म्हणाली, “नोकरीत कार्यरत असतानाही मी चित्रकला, हस्तकला, भित्तीचित्रे, नामावली बनवणे इ. छंद जमेल तसे जोपासत होतीे. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करायची आवड होतीच. पुढे नोकरी सोडायची ठरवल्यावर प्रथम मी एक वर्षाचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि इंटर्नशिपही केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचा ड्रेस डिझायनिंगचा स्टुडिओ सुरू केला. माझं ड्रेस डिझायनिंगचं काम व्यवस्थित सुरू असतानाच, पाने वापरून कपड्यावर इको-प्रिंटिंग करतानाचा परदेशातील एक व्हिडिओ माझ्या नजरेस पडला. मला ही गोष्ट आवडली. परंतु भारतात हा प्रकार मला कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मी परदेशातील त्या प्रशिक्षकांचे फेसबुक ग्रुप जोडले. त्यातही अगदी मोजून एक-दोनच भारतीय आणि ते ही वयाने ज्येष्ठ होते. अखेर एक रशियन आणि दोन अमेरिकन शिक्षिकांकडून स्काईप क्लासद्वारे मी इको प्रिंटिंगचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतरही एक-दीड वर्ष मी घरी वेगवेगळी पानेफुले वापरून इको-प्रिंटिंगचे प्रयोग करीत होते. असंख्य प्रयोगाअंती अखेर ‘लिफेज’ या माझ्या ब्रॅंडचा मी आत्मविश्वासाने श्रीगणेशा केला.”

  भारतातील वृक्ष हे परदेशातील वृक्षांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे सुरुवातीला श्रद्धाला रंगाच्या, आकाराच्या दृष्टीने प्रत्येक पान प्रिंट करून पाहताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. इको-प्रिंटिंग हे वेगळं तंत्र कितीही छान असलं तरी कपडा धुतल्यावर ते जात असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही, मग श्रद्धाने स्वतः कपडे वापरून ही प्रिंट कायमस्वरूपी असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर ‘लिफेज’ ब्रॅण्ड प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलं.

  श्रद्धाने २०१८च्या शेवटी डिझायनिंग बंद करून संपूर्णपणे नैसर्गिक इको-प्रिंटिंगच्या क्षेत्राची वाटचाल सुरू केली. याविषयी श्रद्धा म्हणाली, “सध्या रिसर्चमध्ये स्पष्ट होतंय की आपण जे कपडे वापरतो त्यातील केमिकल डायमुळे, सिंथेटीक प्रिंटमुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढण्याची शक्यता निर्माण होते. पण इको-प्रिंटिंगची पद्धत नैसर्गिक आहे. यात डायसाठी हरडा पावडर, मंजिष्ट, हळद, डाळींबाची साल, कांद्याची साल, लोध्र हे नैसर्गिक घटक वापरले जातात. तसेच तुरटी, हरडा वापरून कापड तयार केले जाते. त्यामुळे त्वचेला कसलीच हानी पोहचत नाही. तसेच तयार होणारी प्रत्येक कलाकृती ही वेगळी असते. इको-प्रिंटिंग म्हणजे जणूकाही निसर्गाबरोबरच काम करणं. मला हे एवढं आवडलं की, मी पूर्णपणे याच्यातच झोकून द्यायचं ठरवलं.”

  कुठलीही मशीन न वापरता केवळ हाताने घडविलेल्या कलाकृती हे लिफेजचं महत्त्व. नैसर्गिक पद्धतीने साड्या, स्टोल, ड्रेस मटेरियल, दुपट्टे, कुशन कव्हर, पडदे, स्लिंग बॅग्स, लाकडी ट्रे अशी कितीतरी सुंदर आणि आकर्षक उत्पादनं ‘लिफेज’च्या माध्यमातून घडत आहेत.

  इको-प्रिंटिंगसाठी पूजेमधील निर्माल्याची पानं, हिवाळ्यात गळून पडणारी झाडांची पानं, पावसाळ्यात पडलेल्या फांद्या हे सर्व श्रद्धा जमा करत असते. त्याचा वापर करून झाल्यावर पुन्हा निसर्गालाच अर्पण करते. निसर्गाकडून ओरबाडून घेण्याची वृत्ती बळावत असताना श्रद्धासारख्या व्यक्तींचं कार्य कौतुकास्पद आहे.

  अनघा सावंत

  anaghasawant30@rediffmail.com