इको फ्रेंडली सणाचा श्रीगणेशा

गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांचा एक आवडता सण. मात्र या सणावर यावर्षी कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करणे अनेकांनी टाळले. गणपती मंडळांचे गणपती, तिथल्या विविध संकल्पनांचा आधार घेऊन केलेली सजावट पाहण्यासाठीही यंदा गर्दी जमणार नाही. यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि गर्दी टाळून साजरा करत असताना लोक आता हा सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याकडे अधिक वळू लागले आहेत.

इको फ्रेंडली गणपतीसाठी गेल्या वर्षीपर्यंत शाडूच्या मातीच्या गणपतीचा पर्यायच लोकांना माहित होता. आधी लोक त्या दुकानातून विकत आणायचे. मात्र त्या मूर्ती आता लोक घरी बनवत आहेत. इतकच काय गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी रद्दी, फुले, फळे, पाने, झाडे, गायीचे शेण, पीठ इत्यादी जे आसपास किंवा सहज उपलब्ध असेल त्यापासून गणपतीची मूर्ती बनवून लोकांनी यावर्षी पूजा केलेली पाहायला मिळत आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्तींचा ट्रेंड पुढे नेण्यासाठी लाल मातीच्या मूर्तींचा ट्रेंड अधिक लोकप्रिय झालेला दिसत आहे. अनेक कंपन्यांनी गणेशोत्सवाआधी लाल मातीच्या मूर्तींची विक्री करायला सुरुवात केली. लाल मातीच्या या मूर्तीसोबत एका झाडाच्या थोड्या बिया आणि कुंडी देण्यात येते. गणेशोत्सवानंतर या मूर्तीचे विसर्जन कुंडीमध्ये केल्यानंतर बाप्पा एका झाडाच्या रुपात आपल्यासोबत नेहमी राहणार, अशी ती संकल्पना. त्यामुळे मातीपासून मूर्तीपर्यंत आणि पुन्हा मूर्तीपासून मातीपर्यंत असा एक पर्यावरणपूरक गणपती उत्सव यावर्षी जास्त पाहायला मिळत आहे.

कोणताही उत्सव असला तरी त्यात आपली त्या उत्सवामागची भक्तीची भावना महत्वाची. पण उत्सव साजरे करताना पर्यावरणाला आपण हानी तर पोहोचवत नाही ना याचा विचार होणेही आवश्यक आहे. यावर्षी तो होताना दिसतोय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकांनी यावर्षी बाप्पाचे विसर्जनही घरच्या बादलीत , टबमध्ये किंवा टाकीमध्ये केलेले पाहायला मिळाले. तलाव, नदी आणि समुद्रामध्ये होणारे प्रदूूषण यामुळे टळले. प्रदूषण नसलेले जलस्त्रोत हे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आजच्या घडीला आवश्यक आहेत. जलतज्ञ तर अनेक वर्षांपासून नदी, समूद्र आणि तलावात विसर्जन करू नका, हेच सांगत आहेत मात्र कुणी ते याआधी ऐकत नव्हते. यावर्षी मात्र लोक विसर्जनाच्या बाबतीत सजग विचार करू लागले आहेत. जल प्रदूषणासोबतच ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाणही यावर्षी कमी दिसत आहे. कानाला कांठाळ्या बसवणाऱ्या वाद्यांचे, डिजेचे आवाज नाही की फटाक्यांची जोरदार आतषबाजी नाही. शांतता आणि साधेपणाने साजरा होणारा यावर्षीचा गणेशोत्सव आपल्या सगळ्यांसाठी आत्म परिक्षणाची आणि सणांच्या परिक्षणाची एक संधी आहे. लोकांनी हे परीक्षण केलेही आहे. त्यामुळेच या उत्सवात यंदा वेगळेपणा दिसत आहे. पर्यावरणाचा विचार करून खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करू लागलो तर ते आपल्यासाठीच अधिक चांगले आहे. कारण पर्यावरण नीट राहीले तर आपण फिट राहू शकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हा यावर्षी जो इको फ्रेंडली उत्सवाचा श्रीगणेशा सगळ्यांनी केला आहे. त्यात खंड पडू देऊ नका. गणपती बाप्पा मोरया.